संस्कृत भाषेतला एक शब्द कधीतरी ऐकला होता. 'बद्धपरिकर'. सदैव तयार, सज्ज किंवा सिद्ध असण्याच्या अवस्थेसाठी योजलेला बद्धपरिकर हा शब्द सैन्यदलाला एकदम फिट बसतो. कारण, अंगावर पडेल ते काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी सैन्यदलाचे जवान व अधिकारी सदैव सज्ज असतात. आपत्ती निवारण, अतिरेक्यांचा नायनाट, दंगे-धोपे आटोक्यात आणणे, किंवा अगदी बोअरवेलमध्ये पडलेल्या लहान मुलाला वाचविण्याच्या कामीदेखील सैन्यदलाला पाचारण केले जाते, आणि ते-ते काम फत्ते होणारच असा गाढ विश्वास आम जनतेला वाटतो.
"स्वावलंबी असावे" ही शिकवण घरोघरी तोंडी मिळत असते. प्रत्यक्षात मात्र स्वतःची अनेक बारीक-सारीक कामे पालकांनी करावी अशीच अपेक्षा पुष्कळशा मुलांना असते. कित्येक आईवडील सहजपणे तसे करीतही असतात. मी अगदी लहानपणीच सैनिक शाळेत होस्टेलवर आणि पुढे NDA, व IMA मध्ये राहिल्यामुळे, स्वतःचे बूट, व कपडे धुणे, त्यांची दुरुस्ती, बटणे लावणे आणि इतरही अशी कामे मी स्वतःच करीत आलो. अगदी स्वतःच्याही नकळत, सदैव बद्धपरिकर राहण्याची वृत्ती अंगी भिनत गेली.
मात्र, NDAमधील आमचे रूटीन कमालीचे वेगवान होते. विविध प्रकारचे युनिफॉर्म आणि बूट वेळच्यावेळी आणि A-1 स्थितीमध्ये तयार असावे लागत. आमचे रूटीन सांभाळून, ड्रेस वगैरेची टापटीप रोजच्या-रोज ठेवणे केवळ अशक्य होते. त्यामुळे, आमचे कपडे धुण्यासाठी, आणि स्टार्च व इस्त्री करण्यासाठी धोबी होते. शिवाय, ८-१० कॅडेट्समागे एक, असे ऑर्डर्ली नेमलेले होते. आमच्या खोलीची किल्लीच ऑर्डर्लीजवळ असायची. आम्ही ट्रेनिंगमध्ये व्यस्त असताना आमचे युनिफॉर्म्स तयार ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी तेच सांभाळायचे. जुन्या-जाणत्या ऑर्डर्लीना तर आमचे रूटीन आणि त्याकरिता लागणारे सर्व साहित्यही तोंडपाठ होते. त्यामुळे, आमचे व आमच्या ऑर्डर्लीचे परफेक्ट ट्यूनिंग असायचे. कित्येकदा जिवाच्या आकांताने धावत आम्ही आमच्या कॅबिनमध्ये येत असू तेंव्हा आमचा त्यापुढचा युनिफॉर्म हँगरला लटकवलेला, बूट चमकवून ठेवलेले आणि सॉक्स घालण्यासाठी तयार असे रोल करून ठेवलेले असत!
पुढे आर्मी सर्व्हिसमध्ये आम्हाला अश्याच प्रकारची मदत करण्यासाठी सिव्हिलिअन ऑर्डर्लीऐवजी युनिटचाच एक जवान 'सहायक' म्हणून नेमलेला असे. क्वचित, काही ट्रेनिंग कोर्सेसकरिता आम्ही महू, बेळगाव अश्या ठिकाणी असलेल्या आर्मीच्या ट्रेनिंग संस्थांमध्ये जायचो. तेथे मात्र, NDAमध्ये जसे होते तसेच सिव्हिलिअन ऑर्डर्ली नेमलेले असत.
मी आर्मीमध्ये रुजू झाल्यानंतर सहा महिन्याच्या आतच, फाऊंडेशन कोर्स करण्यासाठी मला इंदोरजवळ महू येथे असलेल्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये पाठवले गेले. आर्मीमध्ये या ट्रेनिंग कोर्सला YO कोर्स म्हणजे Young Officers' Course म्हणतात. बन्सी नावाच्या एका ऑर्डर्लीने गेल्या-गेल्याच माझा आणि माझ्या सामानाचा ताबा घेतला. सर्व सामान कपाटांमध्ये लावूनही ठेवले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याने चहा आणून दिल्यानंतर मी बन्सीला म्हटले,
"अरे, देखना जरा, मेरी लुंगीकी सिलाई थोडी उधड गयी है | एक-दो टाँका लगा देना |"
त्यावर बन्सीचे उत्तर ऐकून मी अवाकच झालो, "हाँ सर, कपडे लगाते वक्त मैंने देख लिया था | लुंगीकी सिलाई तो मैने ठीक कर ही दी है | एक-दो शर्ट के बटन भी ढीले हो गए थे, वोभी टाँका लगाकर टाइट कर दिए हैं |"
ट्रेनिंगमुळे, आम्ही स्वतः कितीही सक्षम झालो असलो तरीही बारीक-सारीक कामात मिळालेली अश्या प्रकारची मदत केंव्हाही हवी-हवीशीच असते. आयुष्यात भेटलेल्या अश्या सर्व मदतनिसांना असे म्हणावेसे मला अनेकदा वाटले, "यार, तू नहीं होता तो मेरा क्या होता?"
१९८६मध्ये माझे लग्न झाले तेंव्हाही मी महूला इंजिनीयरिंगचा डिग्री कोर्स करीत होतो. लग्नानंतर काही महिन्यांनी डॉ. सौ. स्वाती तिच्या MD च्या अभ्यासक्रमाला कायमचा रामराम करून माझ्यासोबत राहायला महूला आली. तेथील ऑफिसर कॉलनीमधील दोन बेडरूमचा क्वार्टर हे आम्हा दोघांचे (राजा-राणीचे) पहिले 'घर'! काही महिन्यांनी, एका प्रमोशन परीक्षेसाठी मला भोपाळला जाणे भाग होते. परीक्षेच्या आदल्या रात्री जायचे आणि दुसऱ्या दिवशी परीक्षा देऊन रात्री परतायचे होते. त्या निमित्ताने स्वातीलाही भोपाळदर्शन होईल म्हणून आम्ही दोघांनी जायचे ठरवले. सकाळी गडबडीतच एक-दोन कपडे, युनिफॉर्मचा एक स्वच्छ जोड, आणि हॉल तिकीट व I-Card अश्या महत्वाच्या गोष्टी मी वेगळ्या काढून ठेवल्या व कॉलेजला गेलो.
मी कॉलेजातून आल्या-आल्या लगेच निघायचे होते. स्वातीने भरून ठेवलेली बॅग घेऊन तडक स्टेशन गाठले. भोपाळला त्या रात्री राहण्यासाठी MES च्या इन्स्पेक्शन बंगल्यात एक Suite मी आधीच बुक करून ठेवला होता. तेथे जाऊन स्थिरावलो. जेवण करून झोपण्यापूर्वी कपडे बदलण्यासाठी मी बॅग उघडली. त्यात स्वातीचे कपडे आणि काही सटर-फटर वस्तू होत्या. परंतु, मीच सकाळी वेगळे काढून ठेवलेले एक-दोन कपडे आणि युनिफॉर्म यांव्यतिरिक्त माझी एकही वस्तू त्या बॅगमध्ये नव्हती!
मी आश्चर्याने स्वातीला विचारले, "माझे आणखी काहीच सामान तू भरले नाहीस? माझा नाईटड्रेस कुठाय?"
त्यावर ती शांतपणे म्हणाली, "मला काय माहीत? तू काढून ठेवलेले सर्व काही मी बॅगमध्ये भरले. त्याशिवाय तुला आणखी काही लागणार होते तर तू ते आधीच काढून ठेवायला हवे होतेस!"
त्यावर आमची थोडी बोलाचाली झाली. पण, त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही.
शेवटी माझी दया आल्यामुळे की काय, स्वातीने स्वतःच्या कपड्यांपैकी एक परकर काढून मला दिला. माझ्या चेहऱ्यावरचे आश्चर्य, अविश्वास, संताप असे संमिश्र भाव पाहून ती इतकेच म्हणाली, "हा परकर घालून झोप. नाहीतरी तुला इथे माझ्याशिवाय कोण पाहणार आहे?"
माझ्या सर्वच भावना मी गुंडाळून ठेवल्या आणि तो परकर अंगावर गुंडाळून अंथरूण गाठले. ट्रेनिंग संस्थांमधील ऑर्डर्ली किंवा युनिटमधील सहायक यांच्याकडून मिळणारी मदत ही निश्चितच माझ्या पदामुळे मला मिळणारी लक्झरी होती. व्यक्तिगत आयुष्यात मात्र "तू तेरा देख" हेच सूत्र यापुढे आचरणात आणावे लागणार आहे की काय? अश्या विचारात केंव्हातरी झोप लागली. (मात्र, भविष्यात तसे घडले नाही हे नशीब!)
पहाटे बेलच्या आवाजाने खडबडून जाग आली. तेथील बेअराला सहा वाजताच्या बेड-टी साठी रात्री मीच सांगून ठेवले होते ते आठवले. घाईतच दरवाजा उघडायला गेलो. चहाचा ट्रे टेबलावर ठेवून जाताना त्या बेअराच्या चेहऱ्यावर काही वेगळेच भाव मला जाणवले. दरवाजा बंद करून बेडरूममध्ये आलो आणि मला बघून खो-खो हसत असलेल्या स्वातीला पाहताच माझ्या अंगावरील कपड्यांचे आणि एकंदर परिस्थितीचे भान मला आले!
त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही भोपाळ सोडणार होतो आणि उभ्या आयुष्यात त्या बेअराची पुन्हा गाठ पडणार नव्हती हे खरे होते. पण, त्याची आणि इन्स्पेक्शन बंगल्यातल्या इतर स्टाफची त्या दिवशी चांगलीच करमणूक झाली असणार हे नक्की!
त्यांना तरी "बद्धपरकर" अवस्थेतील कॅप्टनसाहेब रोज-रोज पाहायला थोडाच मिळणार होता?
I had a good laugh at the end.
ReplyDeleteHa Ha. Thanks!
Deleteहसून पुरेवाट
ReplyDelete😀धन्यवाद!
Deleteशब्दाला योग्य शब्द सुचवून केलेले लिखाण यावरून आपले अवांतर वाचन व अभ्यासू शैलीचे प्रदर्शन होते...
ReplyDelete🙂Thanks, Trishul!
DeleteYou have a great writer in you.
ReplyDeleteTooo comic occasion.
Thanks for the compliment!🙏
ReplyDeleteहसून पुरेवाट 👌🏻 😂😂
ReplyDelete😂
Deleteश्रीलेखा, तुझ्या काकाचा 'मामा' झाल्याची कथा!
😅😂
DeleteNice one
ReplyDeleteDeepak Kher
Thank you, sir!
Deleteसैन्यातले आयुष्य वेगळें व बहुतकरून मनोरंजक, आणि तुमचें लेखणीचे कसब तर फारच छान.
ReplyDeleteकोर ऑफ इंजिनिर्स चे अनुभव वाचायला आवडतील.
महूच्या संदर्भावरून एक जुनी आठवण झाली. कॉलेज ऑफ कॉम्ब्याट करता लायटींगचे काम आम्ही MES तर्फे केले होते.
OK. ती नवीन बिल्डिंग आमच्यासमोरच उभी राहिली. आधी माळरान होते तिथे. त्यावर आम्ही १९८२ साली टँक राईड केली होती! 😀
Deleteखूप हसलो हे वाचून! 😀👌
ReplyDelete😊👍
Deleteआनंद.. हा प्रसंग तू समोर बसून सांगतो आहेस आणि स्वाती मिस्कील हसते आहे असे वाटले .
ReplyDelete😂👍
Deleteबन्सी माझा ही सहायक होता..सगळे ऑर्डर्ली आपले काम चोख बजावत असत...तो बर्याच वेळा येऊन सांगायचा...साहेब...वो फलां फलां साहब पढ रहे हैं...(आप भी पढने बैठो.असं त्याला सुचवायचे असे).सर्व ऑर्डर्ली मधे एक स्पर्धा असे...किसके साहब को A grading मिला.प्रत्येक कोर्स करत असताना भेट व्हायची..Commander All Arms Wing असताना मारुती(ऑर्डर्ली)ने ऑफिस मधे सेवा केली त्याला तोड नाही...मला वाटतं...हे आपल्या मागच्या जन्मी चे ऋणानुबंध व पुण्य आहे.
DeleteCol Shrinivas Pande
खरंय श्री!
Deleteखूप वेळा मला असं वाटत राहतं की आपलं हे बॉन्डिंग - कोर्समेटस, सीनीयर, ज्युनियर, सहायक, ऑर्डर्ली, सगळ्यांच्याच बरोबरचं,हे सिव्हिलिअन्सना कळू शकत असेल का?
त्यांना ते कळावं हाही माझ्या लेखनाचा एक बारीकसा हेतु आहे. 🙂
Nice one Anand
ReplyDeleteYou have a way of narrating humorous experiences Colonel. �� Fauzis have different uniforms for diff occasions but that Swati tai also got you a uniform wasn't known to us ��
ReplyDelete13th Jun is the day when you got ypur commission. The landmark day which saw recognition of your merit, dedication and resolve to serve the nation.
Milind Ranade
🙂Thanks Milind!
DeleteThat's one uniform I would never like to don again! 😂
कठिण प्रसंग होता.पण निभावल परकावर.
ReplyDeleteहसण्यासारखी असली आर्मीच्या करड्या शिस्तित न बसणारी.गृहस्थधर्माचा जय झाला
😁👍
Delete