Labels

Sunday 26 July 2020

... फौजी दुनिया में ये पहला कदम!

संरक्षण दलांच्या दहा विभागांत महिलांना पर्मनंट कमिशन देण्यासाठी भारत सरकारने मंजुरी दिल्याची बातमी ऐकताच माझे मन भूतकाळात, २८ वर्षे मागे गेले. १७ जुलै १९९२ रोजी सकाळी साडेसात वाजता, सेनाधिकारी होऊ इच्छिणाऱ्या मुलींच्या पहिल्या बॅचसमोर मी उभा होतो, त्यांचा ग्रुप टेस्टिंग ऑफिसर (GTO) म्हणून!  

दिल्लीच्या डिफेन्स इन्स्टिटयूट ऑफ सायकॉलॉजिकल रिसर्च (DIPR) मध्ये GTO कोर्सची थियरी शिकल्यानंतर बंगलोरच्या SSB मध्ये माझे प्रॅक्टिकल ट्रेनिंग सुरु होते. एक 'गुरु GTO' आणि एक शिष्य अशी आमची जोडी होती. पाच-पाच दिवसांची एक टेस्टिंगची बॅच असायची.

Thursday 23 July 2020

तितली कहे मैं चली आकाश...

सैन्यदलातील नोकरीचे अनेक मुला-मुलींना आकर्षण असते. शिपाई, नायब सुभेदार किंवा लेफ्टनंट अश्या तीन पदांवर सैन्यदलात दाखल होता येते. प्रत्येक पदासाठी पात्रतेच्या अटी व निवडीचे निकष वेगवेगळे आहेत. तिन्ही पदावरच्या नोकऱ्या सन्माननीय आहेत. परंतु, वयाच्या २१-२२व्या वर्षी जर एखाद्या व्यक्तीला सेनाधिकारी म्हणून दाखल होता आले तर तिच्या आयुष्याचा आलेख वेगळाच होतो आणि खूप उंच जाऊ शकतो हे नक्की. त्याविषयी, योग्य माहिती, योग्य वेळी मिळणे महत्वाचे ठरते. या संदर्भातले काही रोचक प्रसंग मला चांगले आठवतात.

Friday 17 July 2020

घी देखा लेकिन...

"कारगिल युद्धाच्या वेळी तुम्ही कुठे होता?" या प्रश्नावर, "मी जम्मू-काश्मीरमध्ये होतो" हे उत्तर ऐकताच लोकांना कमालीची उत्सुकता वाटते. आता 'टायगर हिल' किंवा 'तोलोलिंग' येथल्या शौर्याची किंवा हौतात्म्याची 'आँखोदेखी' ऐकायला मिळणार, अश्या आशेने ते माझ्याकडे पाहतात. पण, मी कारगिल-द्रास भागात नव्हे तर जम्मूजवळ अखनूर सेक्टरमध्ये होतो, आणि तिथे प्रत्यक्ष युद्ध झाले नव्हते, हे ऐकल्यावर काही जणांचा इंटरेस्ट थोडा कमी झाल्यासारखा वाटतो. 

कदाचित असे असेल की, युद्धकथा action-packed, रम्य, आणि देशभक्तिच्या भावना जागवणाऱ्या असतात. त्यामानाने, शांतिकाळातले आमचे दैनंदिन जीवन, त्यामधील खाचखळगे, आमची सुखदुःखे, वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर येणाऱ्या अनंत अडचणी,  यामध्ये  'नाट्यमय' असे विशेष काही नसते. आणि म्हणूनच, मला त्याबद्दल सांगणे अधिक आवश्यक वाटते.

Sunday 12 July 2020

चुशूल ना भूल पाएँगे

जुलै २०२०च्या पहिल्या आठवड्यात, चुशूल येथील भारत-चीन सीमेवर, दोन्ही देशांदरम्यानचा तणाव कमी करण्यासाठी महत्वाच्या वाटाघाटी झाल्या. त्याबद्दलचे वृत्त वाचत असता, काही वर्षांपूर्वी चुशूलमध्ये मला आलेला एक अनुभव आठवला.

सैन्यदलाच्या नोकरीत असताना मी लडाखमध्ये कधीच गेलो नव्हतो. तो प्रदेश पाहायची तीव्र इच्छा, सेवेतून निवृत्त झाल्यानंतर चार वर्षांनी पूर्ण झाली. अमेरिकेतील दोन वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये शिकत असलेली आमची मुले, असिलता आणि अनिरुद्ध, २०११ च्या ऑगस्ट महिन्यात, सुुट्टीकरिता एकाच वेळी भारतात येणार होती. त्यामुळे, आम्ही व्यवस्थित नियोजन करून लडाखचा दौरा आखला.