Labels

Tuesday 2 June 2020

लाख छुपाओ, छुप ना सकेगा...

आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित सैनिकी प्रशिक्षण संस्थेत, म्हणजेच NDAमध्ये ट्रेनिंग घेणे ही खरोखर एक पर्वणीच होती. 'सुदान ब्लॉक' ही NDAची मुख्य इमारत, एखाद्या राजवाड्यासारखी अतिशय  देखणी वास्तू आहे. स्वच्छ, चकचकीत रस्ते, विस्तीर्ण  परेड ग्राउंड, विविध खेळांची व पीटीची मैदाने, जिम्नेशियम हॉल, पोहण्याचे तलाव, आधुनिक उपकरणांनी युक्त, प्रशस्त 'कॅडेट्स मेस', स्क्वाड्रन्सच्या  रेखीव, दगडी वास्तू, असा डोळ्यांचे पारणे फेडणारा, NDAचा हिरवागार परिसर सात हजार एकर जमिनीवर पसरलेला आहे. 'पीकॉक बे' नावाचा, खडकवासला तलावाचा एक सुळकादेखील NDAच्या कॅम्पसचाच भाग आहे.  अर्थात, रोजच्या धकाधकीमध्ये, त्या परिसराचे सौंदर्य आम्हाला फारसे जाणवत नसे.

शारीरिक प्रशिक्षणासोबतच, BA/BSc च्या अभ्यासक्रमातले विषय आम्हाला शिकवायला सिव्हिलिअन प्रोफेसर आणि आर्मी एज्युकेशन कोअरचे काही अधिकारीही होते. बहुतेक दिवशी, पीटी, ड्रिल, घोडेस्वारीनंतरची प्रचंड दमणूक आणि पोटात गेलेला दणकट नाश्ता, आमच्या डोळ्यांवर हमखास झापड आणीत असे. काही-काही प्रोफेसर, विशेषतः सिव्हिलिअन, अगदी 'समंजस' होते. झोपी गेलेल्यांना ते निवांत झोपू देत! काहींच्याकडे, आम्हाला उठवण्याकरिता नामी साधने व आयुधे असत. क्वचित, खूपच झोप आल्यास एखाद्या तासाला दांडी मारण्यासाठी आम्ही नाना क्लृप्त्या करायचो. अश्या वेळीही आम्हा कोर्समेटमधील 'बंधुभावाची' सत्वपरीक्षा होत असे. प्रोफेसरांची नजर चुकवून खोटी हजेरी देणे हे तर साधे-सुधे काम होते. 'जीवाला जीव देणारे' कोर्समेट स्वतःचे नाव पुकारले गेले तरी चूप बसून, दोस्तांच्या नावाला मात्र होकार देत असत. तास संपल्यावर, सगळे कॅडेट जाऊ लागले की प्रोफेसरांच्या मागे जाऊन, त्यांना हजेरी तपासायची विनंती करीत असत. आणि मग, "सर, हा काय मी हजर आहे! मग तुम्ही 'गैरहजर' कसे काय लिहिले?" असा कांगावा करून स्वतःची हजेरीही लावून घ्यायचे. काही प्रोफेसर हजेरीच्या बाबतीत फारसे कडक नव्हते. त्यांच्या तासाला दांडी मारायचा 'चान्स' घेता येई. 

कुणा कोर्समेंटला सांगून, आपली हजेरी लावण्याची व्यवस्था केल्याशिवाय तासाला दांडी मारण्याचा धोका आम्ही सहसा पत्करत नसू. प्रोफेसरांकडून गैरहजेरीचा रिपोर्ट स्क्वाड्रनपर्यंत आला तर आमची खैर नसे. 'एक्सट्रा ड्रिल' (ED)ची शिक्षा मिळाली तर, फक्त काही दिवस, दुपारच्या वेळात, इतर कॅडेट विश्रांती घेत असताना, परेड ग्राऊंडमध्ये थोडे पाय आपटण्यावर भागायचे. 'रिस्ट्रिक्शन'ची शिक्षा मिळाली तर मात्र, कमीतकमी आठवडाभर, सकाळपासून रात्रीपर्यंत वेगवेगळ्या वेळी पाठीवर पिठठू बांधून, सुदान ब्लॉकच्या मागच्या बाजूला जाऊन, ड्रिल उस्तादांना रिपोर्ट द्यावा लागे. त्यानंतर, NDA कॅम्पसच्या चहूबाजूने जाणाऱ्या 'पेरिफेरी' रस्त्यावर आम्ही पळत, आणि उस्ताद सायकलवर बसून आमच्या मागे-मागे, अशी वरात सर्वांसमक्ष निघे. शिवाय, त्या काळात 'लिबर्टी', म्हणजे रविवारी पुण्याला जाण्याची परवानगीही मिळत नसे. मुख्य म्हणजे, या पनिशमेंटची नोंद आमच्या 'डॉसियर'वर म्हणजे ट्रेनिंगच्या रेकॉर्डबुकात केली जाई. त्यामुळे एकूणच, ऑफिशियल पनिशमेंटपेक्षा आम्हाला सिनियर्सनी दिलेली अनौपचारिक शिक्षाच अधिक परवडत असे.  

एके दिवशी, तुडुंब नाश्ता झाल्यानंतर मी आणि दुसऱ्या स्क्वाड्रनमधला माझा एक कोर्समेट कसेबसे सायकल मारत निघणार होतो, पण अचानक, टेलिपॅथी असावी तसे आम्ही एकमेकांकडे पाहिले, आणि "चल यार, अगले दो पीरियड तो XXXX सर के हैं। घंटाभर सो लेते हैं।" असे म्हणून आम्ही मेसमधूनच आपापल्या स्क्वॉड्रनच्या दिशेनेे पोबारा केला. आमची हजेरी लावायची जबाबदारी आम्ही कुणालाही दिली नव्हती. पण त्या सरांकडून सहसा तक्रारच जात नसे, म्हणून आम्ही निर्धास्त राहिलो. दोन दिवस गेले आणि तिसऱ्या दिवशी आमच्या स्क्वाड्रनच्या नोटीसबोर्डावर एक चिट्ठी लावलेली दिसली. कुतुहलाने पहिली तर, ती वर्गातील गैरहजेरीची नोटीस असल्याचे दिसले. मी जरा दचकलोच. त्यावर तारीख, वेळ आणि कॅडेटचा रोल नंबर खरडलेला होता पण तो नीट दिसत नव्हता. 'अपराध्याचे' नाव लिहिलेले होते, "Cadet B. A. Bhaskar".  मी नोटीस वाचत असतानाच शेजारी दोन सीनियर कॅडेटही वाचत होते. त्यातील एकजण दुसऱ्याला म्हणाला. "यार, इस नामका कोई कैडेट अपने स्क्वाड्रन में है क्या? मैंने तो ये नाम कभी नहीं सुना। लगता है, नोटीस गलत स्क्वाड्रन में आया है। " दुसराही त्याच्याशी सहमत होता. बोलत-बोलत ते आपापल्या कॅबिनकडे गेले. मीही शांतपणे तेथून निघून गेलो. १-२ दिवस असेच गेले. ती  चिट्ठी अजून नोटीसबोर्डावर लावलेलीच होती. 

तिसऱ्या दिवशी मी जेवण करून रमत-गमत स्क्वाड्रनमध्ये आलो. शनिवार, म्हणजे हाफ-डे असल्याने, दुपारी जरा निवांत ताणून द्यावी असा विचार मी करीत होतो. तेवढ्यातच समोरून, एअर फोर्सचे एक शीख अधिकारी, फ्लाईट लेफ्टनंट गिल येताना दिसले. ते आमच्या स्क्वाड्रनचेच एक "डिव्हिजनल ऑफिसर" होते. (आमच्या बोली भाषेत "डिव्हो"). मी त्यांच्या डिव्हिजनचा कॅडेट नसल्याने त्यांचा-माझा फारसा संबंध कधीच आला नव्हता. ते जरासे विनोदी होते. पुष्कळ वेळा, मनातल्या मनात स्वतःलाच सांगितलेल्या विनोदावर ते हसतायत असा भास होई!

त्या काळातील प्रचलित स्टाईलप्रमाणे, इतर सगळे डिव्हो, 'बुलेट, जावा, येझदी' अश्या मॉडेलच्या बाईकवर किंवा 'बजाज चेतक' सारख्या स्कूटरवर स्वार होऊन येत असत. मोटार कारमधून येणारे दोघे-चौघे होते. एक होते आमच्याच स्क्वॉड्रनचे कॅप्टन अरुण जोशी आणि दुसरे हे फ्लाईट लेफ्टनंट गिल. अम्बॅसॅडर, फियाट आणि स्टॅण्डर्ड याव्यतिरिक्त मोटार कारचे चौथे मॉडेल तेंव्हा भारतात बनतच नव्हते. या गिलसाहेबांची एक जुनाट खटारा फियाट गाडी होती. आमच्या स्क्वॉड्रनचे ऑर्डरली गिलसाहेबांच्या गाडीला धक्का मारून सुरू करून देताना आम्ही अनेक वेळा पाहिले होते. त्यांच्या त्या खटाऱ्याला आम्ही आपसातच खूप हसायचो. 

फ्लाईट लेफ्टनंट गिल समोरून येत असल्याचे मला दुरून दिसताच मी तेथून निसटणार होतो. कारण, ट्रेनिंगच्या काळातील एका अलिखित सूत्रानुसार, विशिष्ट नेमलेले काही काम नसताना, आणि स्वतःचीच काही गरज असल्याशिवाय कधीही वरिष्ठांच्या नजरेला पडायचे नाही. पण तेवढ्यात त्यांनीच लांबून माझ्या नावाने हाक मारली. आता मात्र मला थांबावेच लागले. त्यापुढील आमचा संवाद इंग्रजीमध्ये काहीसा असा झाला...

"बापट, जस्ट अ मिनिट, प्लीज.'
"येस सर"
"मी घरी निघालो होतो. पण तुला पाहिल्यावर आठवलं, मला तुझी थोडी मदत हवी आहे. "
एवढे बोलून ते पुन्हा स्वतःच्याच तंद्रीत गेल्यासारखे दिसले. थोड्या वेळाने, अचानक जागे होऊन मला म्हणाले,
"अं... काय बरं तुझं नांव?"
काही क्षणांपूर्वी त्यांनी मला नावानेच हाक मारली होती. मी त्यांना (मनातल्या मनातच हसत) म्हणालो,
" सर, मी कॅडेट बापट."
"ओह, येस येस, बापट. तू महाराष्ट्रियन नां? माझा एक आर्मी ऑफिसर मित्र आहे कॅप्टन उदय बापट. पण तो नांंव लावतो यू. के. एन. बापट. तू आनंद बापट आहेस पण नेमप्लेटवर नाव ए. बी. बापट लावतोस. हे मधलं बी अक्षर काय आहे?"
त्यांना मदत काय हवी होती ते सांगायचे सोडून भलतीच काहीतरी बडबड ते करीत होते. 
"सर आम्ही महाराष्ट्रियन लोक आपल्या वडिलांचं नावही लिहितो."
"अच्छा अच्छा. बरोबर आहे. आमच्या यूकेएन बापटच्या वडिलांचं नांव बहुतेक नारायण आहे. तुझ्या वडिलांचं नाव काय आहे?"

आता मात्र मी चांगलाच अस्वस्थ होऊ लागलो होतो. 
"सर, माझ्या वडिलांचं नाव भास्कर आहे."
"ओके. आणि महाराष्ट्रात सहसा आधी आडनाव, मग स्वतःचं नाव आणि शेेवटी वडिलांचं नाव, असं लिहायची पद्धत आहे ना?"
मी नुसताच मानेने होकार दिला. हे सगळे संभाषण कोणत्या दिशेला चालले होते ते आता मला लख्ख दिसू लागले होते.  
"ओके... प्लीज कम हियर"
असे म्हणत, माझ्या खांद्याला धरून मला वळवत ते नोटीसबोर्डासमोर घेऊन गेले. 
"कॅडेट बापट आनंद भास्कर, उर्फ बी. ए. भास्कर, तुझ्या नावाची ही नोटीस गेले तीन दिवस या बोर्डावर आहे. स्क्वॉड्रन ऑफिसमध्ये येऊन भेटण्याची सूचना स्पष्ट लिहिलेली असूनही तू का बरं आला नाहीस? कॅडेट ए. बी. बापट म्हणजेच कॅडेट बी. ए. भास्कर, हे कोणालाच कळणार नाही अशी तुझी समजूत होती नां?"

मी फक्त खाली मान करून "आलिया भोगासी" सादर समर्पणाच्या तयारीत उभा होतो. ७ दिवसांच्या 'एक्स्ट्रा ड्रिल' किंवा 'रिस्ट्रिक्शन' अश्या शिक्षेची शक्यता समोर स्पष्ट दिसत होती.
फ्लाईट लेफ्टनंट गिल चढ्या आवाजात कधीच बोलत नसत. आताही ते अगदी मुलायम आवाजात मला म्हणाले, "चल, जरा स्क्वाड्रनच्या बाहेर ये. तुझं काय करायचं ते बघू या." 
मला वाटले, ऑफिशियल पनिशमेंटची कारवाई करण्यापूर्वी, बहुतेक गिलसाहेब 'सीनियर कॅडेट'च्या स्टाईलमध्ये, मला  एक 'स्पेशल  पनिशमेंट सेशन'ही देणार असावेत. 
ते स्क्वाड्रनच्या बाहेर पडले. मी कोपरा-ढोपरांवरून हळूच हात फिरवून घेतला आणि मुकाट्याने त्यांच्यामागे निघालो. चालत-चालत त्यांच्या मोटारीपर्यंत ते पोचले आणि दरवाजा उघडून आत बसत मला म्हणाले, " Come on, Push my car,"

एरवी त्यांचे ते 'धक्का स्टार्ट' चे नाटक पाहून आम्हाला खूप हसू यायचे. आता मात्र मी खाली मान घालून, सर्व शक्तीनिशी तो खटारा ढकलू लागलो. थोड्याच वेळात गाडी सुरु झाली. गियर टाकून पुढे जाता-जाता गिल सरांनी डोके बाहेर काढले, आणि माझ्याकडे पाहून हसले. 
"थँक्स. आता जा, आणि ती चिट्ठी फाडून फेकून दे"  असे ओरडून ते सुसाट निघूनही गेले!

आम्हाला ट्रेनिंग देणारे हे सगळे 'डिव्हो'सुद्धा ६-८ वर्षांपूर्वी आमच्यासारखे NDA कॅडेट्सच होते. म्हणूनच, असले 'लहान-सहान अपराध' क्वचित पोटात घालायचे असतात हे ते जाणून होते. 

कधी-कधीच अशी लॉटरी लागायची आणि आम्ही स्वस्तात सुटायचो! 

26 comments:

  1. बाप रे काका मजेदार आहे

    ReplyDelete
  2. सुवर्ण दिवस ते दिवस आठवले कि आपल्यालाच हसु येतं पुढील काळासाठी booster डोस

    ReplyDelete
  3. B A Bhaskar मजेशीर गोष्ट. थोडक्यात वाचला तुम्ही.

    ReplyDelete
  4. Hilarious anecdote Anand !! ... Sumant Khare

    ReplyDelete
  5. Very interesting read.. खूप मजा येते तुझ्या आठवणी वाचताना ������

    ReplyDelete
  6. गब्बर सिंग च्या शब्दात सांगायचं म्हणजे, "बच गया साला!"

    ReplyDelete
  7. वेळ मारून नेने काय असतं ते यातून स्पष्ट जाणवतं

    ReplyDelete
  8. Amusing incident. Some more Humour In Uniform please.��

    ReplyDelete
  9. Replies
    1. 🙂🙏 आधीच्या सगळ्या पोस्ट वाचल्यास का?

      Delete
    2. Ho .. Khup chan lihilays.. 👌🏻👍🏻

      Delete
  10. मी IMA मधे संपूर्ण दिढ वर्षाचा कालावधी एक ही ED,Restrictions न करता पूर्ण करतोय असं माझ्या Platoon DS(Instructor)च्या लक्षात येताच Passing Out Parade च्या एक आठवड्यापूर्वी मला एक ED award केली...मला खूप राग आला होता खरं तर...काही offence नसताना शिक्षा मिळाली होती...दुसर्या दिवशी संध्याकाळी शेवटचा interview व counselling session होतं.त्यांनी माझ्या शिस्तीचे कौतुक केले व हसत हसत मला म्हणाले...You bloody chap...how can you pass out without a single punishment?...how will you remember your training days?...Don't be so OG..take it easy in life.त्यांचा तो मोलाचा सल्ला पुढे खूप कामी आला.
    Col Shrinivas Pande

    ReplyDelete
  11. Maja yete tujhe blogs wachtana dada...

    ReplyDelete
    Replies
    1. वा! माझा रसिक वाचक वर्ग वाढतोय! 🙂

      Delete
  12. गामतिशिर आणि आपल्या गुरुंचे वर्तन अतिशय निर्मळ.

    ReplyDelete