Labels

Wednesday, 24 June 2020

चाय गरम , 'चिनी' कम!

मे-जून २०२० मध्ये भारत-चीन दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घडलेल्या काही घटनांमुळे, पंगाँग-त्सो, दौलत बेग ओल्डी, गलवान खोरे, श्योक नदी, अशी काही नावे अचानकच चर्चेत आली. यांपैकी बहुतेक भागांमध्ये सामान्य पर्यटकांना जायला बंदीच आहे. लडाखमध्ये पर्यटनासाठी गेलेले लोक पंगाँग-त्सो तळे ("थ्री इडियट्स" सिनेमातले) नक्की पाहतात! १९६२च्या युद्धासंबंधी ज्यांनी वाचले-ऐकले असेल अशांना नथू-ला, चुशूल ही नावेदेखील ऐकून माहीत असतील. मी आर्मी ऑफिसर असल्यामुळे, कामानिमित्त आणि पर्यटनानिमित्तही यापैकी काही भागांमध्ये वावरण्याची संधी मला मिळाली होती. तेंव्हाचे दोन-तीन प्रसंग यानिमित्ताने सहजच आठवले.

१९८४-८५ मध्ये एका युद्धसरावाच्या कँपसाठी भारत-चीन सीमेजवळ क्योंगनोस-ला या ठिकाणी काही आठवडे राहिलो होतो. एकदा मला चीन सीमेपासून जवळच असलेल्या कुपूप नावाच्या ठिकाणी जायचे होते. वाटेत २०-२५ किलोमीटरवर प्रसिद्ध नथू-ला खिंड लागली. सुदैवाने, नेमके त्यावेळी अजिबात धुके नव्हते आणि आसपासचा सर्व प्रदेश स्पष्ट दिसत होता. आम्ही उभे होतो तेथून दरीमध्ये उतरणाऱ्या पायऱ्या आणि एक चौथरा दिसत होता. चौकीवरच्या भारतीय सैनिकाने त्या चौथऱ्याकडे बोट दाखवून सांगितले की त्या ठिकाणी दोन्हीकडून टपालाची देवाण-घेवाण होते आणि क्वचित दोन्ही बाजूंचे अधिकारी त्याच ठिकाणी भेटतात. माझ्यासोबतच्या अधिकाऱ्याने कॅमेरा बाहेर काढताच तो जवान आम्हाला म्हणाला, "सर, चायनीज साईडकी फोटो तो उतार सकते हैं, पर अपनी साईड की फोटो लेना मना है ।"

त्यानेच आम्हाला बोटाने चिनी चौकी दाखवली आणि म्हणाला, "वो देखिये सर, उनका एक सिपाही बाहर खडा है।" खरोखरच एक चिनी सैनिक तेथून आमच्याकडे पाहत होता. माझ्या सहकाऱ्याने त्याच्याकडे कॅमेरा रोखताच त्याने काही हातवारे केले आणि तो लगबगीने चौकीच्या आत निघून गेला. पण, काही सेकंदातच तो बाहेर आला तेंव्हा त्याच्या एका हातात (कदाचित चहाचा) मग आणि दुसऱ्या हातात सिगारेट होती. त्याने झुरका घेण्याची पोझ घेतली आणि आम्हाला इशारा करून जणू सांगितले, "हं, आता काढा फोटो!" आमची हसून हसून अगदी पुरेवाट झाली. पण, त्या दिवशी माझ्या सहकाऱ्याने काढलेले आमचे फोटो मात्र आज दुर्दैवाने माझ्याकडे नाहीत. 

नथू-ला खिंड भूतान देशाच्या पश्चिम सीमेलगत आहे. भूतानच्या पूर्व सीमेलगत अरुणाचल प्रदेश किंवा पूर्वी ज्याला नेफा म्हणत तो संवेदनशील प्रदेश आहे. तेथूनच घुसून चिन्यांनी १९६२ साली जवळ-जवळ तेझपूरपर्यंत मुसंडी मारली होती. १९८८-९० या काळात मी तेझपूर येथे पोस्टिंगवर होतो. तेझपूरपासून चीन सीमेपर्यंत टेलिफोन व संदेश सेवा पुरवण्याचे आमचे काम होते. अत्यंत दुर्गम अश्या पर्वतराजीतून, टेंगा, बोमडी-ला, शांग्री-ला, से-ला, नूरानांग, अशी ठिकाणे जोडत तवांगपर्यंत जाणारा भक्कम रस्ता, BRO म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या अभियंत्यांनी व कामगारांनी अक्षरशः खपून बनवलेला होता. वाटेत ठराविक अंतरावर एकेका उंच टेकाडावर माझ्या ५-६ जवानांची एकेक तुकडी पत्र्याच्या शेडमधून राहायची. हमरस्त्यापासून वरपर्यंत चढण्यासाठी मात्र रस्ते नव्हते, आणि पायवाटाही अत्यंत अरुंद व धोकादायक होत्या. अशा दुर्गम ठिकाणी दोन-दोन उन्हाळे, पावसाळे, हिवाळे काढणे आणि बारा महिने, २४ तास तेथील रेडिओ सेट चालू ठेवणे  म्हणजे चेष्टा नव्हती!

रेडिओ सेट, बॅटरी, जनरेटर वगैरेची देखभाल तर त्या जवानांना अहोरात्र करावी लागेच. पण, संपूर्ण तुकडीसाठी स्वयंपाक करणे, टेकडीवरून उतरून पाणी भरणे, सप्लाय ट्रकमधून भाजीपाला उतरवून टेकडीवर नेणे, अशी कामे त्या ५-६ जणांमध्येच वाटून घेतलेली असत. तांदूळ, गव्हाचे पीठ, डाळ, दूध भुकटी, मसाले, असे रेशन आणि शेगडीसाठी केरोसीन त्या जवानांना महिन्यातून एकदा पोहोचवले जात असे. भाजीपाला आठवड्यातून एकदाच मिळू शकायचा पण, अत्यधिक बर्फ आणि खराब हवामान असल्यास कित्येकदा महिना-महिना डबेबंद वस्तूंवर गुजराण करावी लागे. तेथील संचारव्यवस्थेची देखरेख करण्यासाठी आणि त्या निमित्ताने माझ्या जवानांची विचारपूस करून त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्या मार्गावर माझे वरचेवर जाणे-येणे होते. त्यांच्या घरून आलेली पत्रे, त्यांच्यासाठी युनिटतर्फे थोडी मिठाई, अश्या गोष्टीही मी आवर्जून सोबत नेत असे. इतक्या कठीण परिस्थितीतही चोख सेवा बजावणाऱ्या त्या जवानांपैकी एकाच्याही चेहऱ्यावर मला एकदाही त्रासिक किंवा दुःखी भाव दिसला नाही हे विशेष! त्याउलट, मी गेल्यावर "सर, गरम-गरम चहा घ्या. भुकटीचा असला तरी त्यात सुंठ घालून फक्कड बनवलाय" हे वर असायचे !  

१९९०च्या मे महिन्यात, मी व स्वाती, आमची दीड वर्षांची मुलगी असिलता, माझे व स्वातीचे आई-वडील आणि तिचे दोन भाऊ असे त्या मार्गाने तवांगपर्यंत गेलो होतो. माझ्यासाठी ती नेहमीसारखी ड्यूटीच होती, माझ्या कुटुंबियांसाठी मात्र पर्यटन! तो डोंगराळ, बर्फाळ प्रदेश पाहून, आणि आमच्या रेडिओ तुकड्यांमधील जवानांच्या दैनंदिन जीवनाचे मी केलेले धावते वर्णन ऐकून सर्व कुटुंबीय अचंबित झाले होते. समुद्रसपाटीपासून १३७०० फुटांवर असलेल्या से-ला खिंडीत आमची गाडी थांबली त्या क्षणी माझा एक मेहुणा, ऍडव्होकेट वैभव जोगळेकर, जवळ-जवळ ओरडलाच, "अरे, त्या टेकडीवरून कोणीतरी बर्फातून पळत-पळत येतोय." आम्ही आधी पार केलेल्या चौकीकडून आमच्या येण्याची खबर रेडिओवर मिळाल्यामुळे, मला भेटायला आमचा एखादा जवान येत असेल हे मी ताडले. 

काही क्षणातच एक जवान सॅल्यूट ठोकून धापा टाकत माझ्यासमोर उभा राहिला. आपल्या कोटाच्या खालून त्याने ब्लॅंकेटमध्ये गुंडाळलेली किटली काढली. कुणाला काही कळायच्या आत, कागदी कपात गरम-गरम चहा ओतून त्यांनी प्रत्येकासमोर धरला. डोळ्यात पाणी तरारलेल्या अवस्थेत माझ्या मेहुण्याने त्याला "हे काय?" असे विचारताच तो कसनुसं हसून म्हणाला, "हमारे साहब तो हमेशा उपर चढके आते हैं लेकिन परिवार को पोस्टपर आना मना है, इसलिये आप सबको चाय सडकपर ही पिलाना पडा सर। सॉरी सर।"

माझ्या मेहुण्याने प्रयत्नपूर्वक रोखलेले अश्रू त्याला फार काळ थोपवता आले नाहीत! मुंबईला परत गेल्यानंतर त्याने पत्रात मला लिहिले होते, "...आर्मीच्या  जवानांच्या डोळ्यात, साहेब आल्याचा आनंद व आत्मीयता ठळकपणे दिसत असे. बरेचदा चुकून आम्हाला सलाम झडले. तेंव्हा खरोखरच अगदी लाज वाटत असे.  एकतर, आमची सॅल्यूट स्वीकारण्याची लायकी नाही. आणि दुसरे म्हणजे, जवान करत असलेले कष्ट व त्याग इतके उत्तुंग आहेत की त्यांना आम्हीच त्रिवार सलाम करावा. मिलिटरीतल्या लोकांचे कष्ट व त्याग यांची कल्पना मला होती. पण, प्रत्यक्षात वास्तव हे कल्पनेपेक्षा कितीतरी पटीने ठसठशीत आहे हे या प्रवासात उमगले. दुर्दैवाने, कितीतरी लोकांना तुमची नीटशी माहिती नसते. त्यामुळे तुम्हा लोकांबद्दल रास्त अभिमान असणे वगैरे गोष्टी तर दूरच्याच असतात..."

सैन्यातील अधिकारी व जवान ताठ मानेने जगत असलेले त्यांचे खडतर आयुष्य आणि त्यांच्यामधले प्रेमादराचे परस्परसंबंध प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कुणालाही सहज समजणं खरोखरच अवघड आहे. त्यावर थोडातरी प्रकाश पडावा असाच माझ्या लेखनातून माझा नेहमी प्रयत्न असतो. 

49 comments:

  1. Replies
    1. Thanks! 🙏
      Your name doesn't appear with the comment. I need to know who I am thanking! 🙂

      Delete
  2. हे खरे आमचे हिरो...सलाम🙏

    ReplyDelete
  3. आम्हाला जवानांचा अभिमान वाटतोच पण तो तुमच्या ब्लॉगमुळे द्विगुणित झाला

    ReplyDelete
  4. सलाम, आमचाही! 👌🙏

    ReplyDelete
  5. खरोखरच जवानांना त्रिवार सलाम
    तुमचे लेखनही नेहमीप्रमाणे सुंदर

    ReplyDelete
    Replies
    1. Salute Sir . We know how our army soldiers are working hard but Now we got a information From your blog when we are reading this story about china border. Such a terrible life you lived and other’s are living.please tell us what can we do some (seva) for our soldiers. Thanks a lot . Jai hind 🙏 I am living in USA. NC.

      Delete
    2. Thanks. Do keep their selfless service in mind at all times.

      Delete
  6. Salute to the Indian army... Really proud

    ReplyDelete
  7. भारी...वास्तवाचे वास्तव दर्शन

    ReplyDelete
  8. झकास वाचताना प्रत्यक्षात तिथे आहोत असे वाटले

    ReplyDelete
  9. आपल्या अनुभवाचे उत्तम शब्दांकन सर.तुम्ही उल्लेखलेली 80% नावं व त्याच बरोबर अनेक ठिकाणी Line Laying, PL Route maintenance, radio and RR trials करताना आलेले अनुभव एखाद्या चित्रपटा सारखे डोळ्यासमोरुन झर्रकन तरळून गेले...आपल्या जवानांबरोबर काढलेले सोनेरी दिवस आठवले...त्यातले आपण इथे काही सांगू शकतो...काहींकरिता एकत्र बसावं लागेल..डोळे मिचकावत,पाठीवर थापा देत आठवणींना उजळणी द्यावी लागेल...बाकी काही नाही...मागच्या जन्मी काही पुण्य आपण साठलेलं असणार म्हणून हे अनुभव आपल्या गाठीशी आहेत.
    Col Shrinivas Pande

    ReplyDelete
    Replies
    1. साठवलेलं.*

      Delete
    2. Thanks, Shri!
      Yes. We must get together sometime and reminisce. 🙂

      Delete
  10. salute to the Jawans ! Jai Hind !

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks! 🙏
      Your name doesn't appear with the comment. I need to know who I am thanking! 🙂

      Delete
  11. Your article brings home the realizaction of how much we owe to these brave men in uniform who bear unimaginable hardships. And not just living with a smile in unforgiving terrain, but exchanging bullets with devilish enemy while being there. Jai Hind.
    Milind Ranade

    ReplyDelete
  12. natamastak!!..
    do share more!..very honoured to know you and proud of your work too!

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks! Your name doesn't appear in your comment. I need to know who I am thanking! :-)

      Delete
  13. Emotional bond of the men in uniform is as strong as their determination to serve the motherland. Dr.vivek kulkarni.

    ReplyDelete
  14. अभिमानास्पद..जय हिंद..

    ReplyDelete
  15. Thanks! 🙏
    Your name doesn't appear with the comment. I need to know who I am thanking! 🙂

    ReplyDelete
  16. Dear Anand!
    What a wonderful write-up of wonderful memories relating to a wonderful relationship between some wonderful denizens of one of the most wonderful organisations of this nation...indeed, of this world!
    You give life anew to the past!������

    ReplyDelete
  17. Apratim varnan kelay. Dhanyavad Anand for such wonderful nostalgic memories.. Col Mukund Pandit Pune

    ReplyDelete
  18. Anand, you're a born story teller. It's amazing how you recall the details and build in the nuances of situations and circumstances in to your narration. Goes without saying that you have a BIG funny bone 😊

    ReplyDelete
  19. This comment is from Sumant Khare.

    ReplyDelete
  20. Lots of emotion with a message.Great going Anand

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks! 🙏
      Your name is not visible, probably because you haven't registered it on Blogger and have taken the option of posting the comment as 'anonymous'.

      Delete
  21. Madhura Bedekar5 July 2020 at 22:32

    Wonderful write up,jai hind sir

    ReplyDelete
  22. आनंद सर खुप छान वर्णन केलय.खरोखरीच प्रत्यक्षात सर्व गोष्टी डोळ्या समोर उभ्या राहिल्या. भारतीय आर्मी समोर नतमस्तक... दातार गोविंद

    ReplyDelete
  23. खूपच छान वर्णन केलय साहेब तुम्ही....वाचताना एवढे अभिमानास्पद वाटतय...तुम्ही तर हे सर्व अनुभवलंय...U r so lucky!!

    ReplyDelete
  24. अशा वातावरणात अशी सेवा देणार्या जवानाबद्दल काही लिहू शकत नाही .निशब्द फक्त अश्रू.

    ReplyDelete