Labels

Sunday, 16 August 2020

बस, छोरी समझ के ना लडियो...!

"गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल"  हा सिनेमा १२ ऑगस्ट २०२० रोजी प्रदर्शित झाला. एका महिला हवाईदल अधिकाऱ्याचा कारगिल युद्धामधील सहभाग हाच या सिनेमाचा केंद्रबिंदू आहे. परंतु, हवाईदलासारख्या पुरुषप्रधान संस्थेत रुजू झालेल्या गुंजन सक्सेनाच्या वाट्याला आलेली, लैंगिक विषमतादर्शक वागणूक, आणि तिला पुरुषांपेक्षा कमी लेखणारी काही विधानेदेखील या सिनेमामध्ये आहेत. अंगीभूत क्षमता आणि कर्तृत्वाच्या जोरावर, ती लैंगिक विषमतेवर मात करते आणि स्वतःकरिता मानाचे स्थान मिळवते असे या सिनेमात दाखवलेले आहे. या चित्रपटात रंगवलेल्या काल्पनिक आणि अतिरंजित दृश्यांमुळे आणि पात्रांच्या तोंडी असलेल्या संवादांमुळे, भारतीय हवाईदलासंबंधी चुकीचा संदेश समाजासमोर जात असल्याचे बोलले जात आहे.   

सैन्यदलात अधिकारी म्हणून निवडले जाण्यासाठी महिलांची पहिली बॅच १९९२ साली SSB, म्हणजेच सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डासमोर आली तेंव्हा मी तेथे निवड अधिकारी होतो. सर्व महिला उमेदवारांची मानसशास्त्रीय घडण तपासण्यापासून त्यांची निवड करण्यापर्यंत, जे निकष पुरुष अधिकाऱ्यांसाठी आम्ही वापरीत होतो तेच आम्ही महिला उमेदवारांकरिता वापरले. पुढे १९९६-९८ आणि २००५-०७ अश्या दोन कालखंडांमध्ये माझ्या हाताखाली दोन वेगवेगळ्या महिला अधिकाऱ्यांनी काम केले. एक व्यक्ति म्हणून, आणि एक अधिकारी म्हणूनही त्या दोघी महिला अधिकारी, बहुसंख्य पुरुष अधिकाऱ्यांइतक्याच सक्षम होत्या. एखाद्या-दुसऱ्या पुरुष अधिकाऱ्यापेक्षा तर त्या सरसच होत्या. त्या दोन्ही महिला अधिकाऱ्यांपैकी एकीसोबत आलेले काही अनुभव खूपच सकारात्मक होते आणि ते मलाही बरेच काही शिकवून गेले. 

माझ्या हाताखालच्या अधिकाऱ्यांमध्ये मी स्त्री-पुरुष भेदभाव कधीच केला नाही. माझ्यासारखीच विचारसरणी असलेले इतरही अनेक अधिकारी होते. मात्र, माझ्या परिचयातले काही मोजके अधिकारी, हाताखालच्या महिला अधिकाऱ्यांना, केवळ त्या 'महिला' असल्यामुळे विशेष सवलती देण्याची भाषा करीत असत. त्याउलट, काही अधिकारी, शब्दांनी आणि कृतीनेही, महिला अधिकाऱ्यांना क्वचित कमी लेखत असत. अश्या काही अपवादात्मक प्रसंगांमध्ये, महिला सेनाधिकाऱ्यांच्या मनात जे विचार आले असतील, ते 'दंगल' या हिंदी सिनेमात, कुस्तीवीर गीता फोगटच्या तोंडी असलेल्या  एका वाक्यात व्यक्त होतात, "बस, छोरी समझ के ना लडियो... !" 

१९९७ साली, पुण्याच्या एका सिग्नल युनिटमध्ये मी काम करीत होतो. युद्धकाळात राजस्थान बॉर्डरवरची दूरसंचारव्यवस्था सांभाळणे, ही माझ्या सब-युनिटची, म्हणजे कंपनीची, महत्वाची जबाबदारी होती. बॉर्डरजवळची टेलिफोन एक्सचेंजेस बारा महिने चालू अवस्थेत ठेवण्यासाठी, आमच्या काही छोट्या तुकड्या तेथेच वास्तव्याला असत. कंपनी कमांडर या नात्याने, त्यांच्या कामाच्या देखरेखीसाठी अधून-मधून मला पुण्याहून तेथे जावे लागे. माझ्या कंपनीत, मी आणि लेफ्टनंट गीता असे दोनच अधिकारी होतो. मी पुण्याबाहेर असल्यास आमच्या कंपनीचा दैनंदिन कारभार गीता उत्तम प्रकारे सांभाळत असे. 

वार्षिक युद्धसरावासाठी वर्षातून किमान एकदा, संपूर्ण युनिटला बॉर्डरवर हलवावे लागे. त्या काळात, पुण्याहून बॉर्डरपर्यंतच्या प्रवासाचे नियोजन, सर्व उपकरणे, आणि इतर सामानाच्या बांधाबांधीवर देखरेख, CO साहेबांसोबत चर्चा, मीटिंग्स अश्या उपद्व्यापात माझी खूपच धावपळ चालू असे. एकदा, मी अश्याच गडबडीत होतो आणि दुपारच्या जेवणाची वेळ होत आली होती. माझ्या लक्षात आले की तो जवानांच्या पगाराचा दिवस होता. मी मीटिंगला जाता-जाता गीताला सांगितले की पगाराची सर्व रक्कम मुख्य ऑफिसातून आणवून घेऊन तिने जवानांना पगार वाटण्याचे काम पूर्ण करावे. ते काम सहजच तास-दीड तासाचे होते. 

गीताला आदेश देऊन मी पुढच्या कामासाठी बाहेर पडणार तेवढ्यात तिच्या चेहऱ्याकडे माझे लक्ष गेले. ती जरा अस्वस्थ आणि विचारमग्न दिसली. मी मागे वळलो आणि तिला विचारले, "काही प्रॉब्लेम आहे का गीता?"

ती  गडबडीने उठून मला म्हणाली, "नाही नाही सर, काही प्रॉब्लेम नाही. मी लगेच त्या कामाला लागते." 

पण, माझे समाधान झाले नाही. कोणतेही काम केंव्हाही आले तरी नाराज होणे हा गीताचा स्वभाव नव्हता.
 
मी पुन्हा खोदून विचारल्यावर ती म्हणाली, "सर, मी पगाराचे काम संपवूनच घरी जाईन. पण, एक विनंती आहे. आज संध्याकाळी गेम्स परेडसाठी मी नाही आले तर चालेल का?"

मला आश्चर्य तर वाटलेच, पण ती काहीतरी लपवीत आहे असेही मला वाटले. मी खुर्ची ओढून तिच्या टेबलासमोरच बसलो, आणि शांतपणे सर्व काही मला सांगण्यास सांगितले. 

"सर, चार महिन्यांपूर्वी लग्न झाल्यानंतर, काल प्रथमच माझे सासू-सासरे माझ्याकडे काही दिवसांसाठी आलेले आहेत. सध्यातरी पक्के घर न मिळाल्याने आम्ही दीड खोलीच्या टेम्पररी घरातच राहत आहोत. किचनच्या नावाने, गॅस ठेवण्यापुरते एक टेबल फक्त आहे. जगदीप [गीताचा आर्मी ऑफिसर नवरा, जो त्यावेळी पुण्यातच कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग (CME) मध्ये शिकत होता] परीक्षेच्या अभ्यासासाठी दिवसभर CME मध्येच असतो. घरी गेल्यावर गरम रोट्या बनवून सासू-सासऱ्यांना जेवू घालेपर्यंत उशीर होईल म्हणून मी थोडी सवलत मागितली, इतकेच."

एक अधिकारी, आणि नवीन लग्न झालेली सून, अश्या दुहेरी भूमिकेत असलेल्या गीताचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात येताच मी तिला मोकळ्या मनाने सांगितले, की तिने वेळेवर घरी निघून जावे आणि संध्याकाळच्या परेडसाठीही येऊ नये. माझी मीटिंग संपल्यानंतर पगारवाटपाचे काम मी स्वतः करेन, कारण माझ्या घरी स्वयंपाक करण्याची जबाबदारी माझ्यावर नव्हती. पण, गीताने मला स्पष्टपणे सांगितले की माझी धावपळदेखील ती पाहत होती. संध्याकाळी तिला परत यायचे नसल्याने पगारवाटपाचे काम केल्याशिवाय ती घरी जाणार नाही. हे सांगताना तिच्या चेहऱ्यावर स्वाभिमान, कृतज्ञता आणि माझ्याप्रति असलेली आस्था असे तिन्ही भाव मला स्पष्ट दिसले आणि तिच्याबद्दल माझ्या मनात असलेला आदर वाढला. 

पुढे आम्ही वार्षिक युद्धसरावासाठी राजस्थानात जोधपूर, बाडमेर, जैसलमेर भागात गेलो. आमच्या हेडक्वार्टरच्या सर्व अधिकाऱ्यांसाठी नवीन टेलीफोन केबल्स टाकणे आणि त्या वालुकामय प्रदेशात ठिकठिकाणी खांब रोवून त्या केबल्स सुरक्षित करण्याचे काम तेथे गेल्या-गेल्या सुरु झाले. जवानांकडून ते काम करून घेण्याची जबाबदारी गीतावर होती. लांबलांबवर पसरलेल्या रेडिओ तुकड्यांवर देखरेख करण्यासाठी मी दिवसभर जीपमधून हिंडत होतो. केबल्सचे काम कसे झाले आहे ते पाहायला मला रात्रीपर्यंत वेळच मिळाला नव्हता. रात्री जेवण झाल्यावर मी टॉर्च घेऊन एकटाच माझ्या तंबूमधून बाहेर पडलो आणि केबल्सच्या इन्स्पेक्शनसाठी निघालो. 

अचानकच गीता तिच्या तंबूमधून बाहेर आली आणि म्हणाली, "सर, दिवसभर तुम्ही बाहेर-बाहेरच असल्याने केबल्सच्या कामाचा रिपोर्ट मी तुम्हाला देऊ शकले नाही. आता तुम्ही तिकडेच चाललेले दिसताय, तर मीही तुमच्यासोबत येते."  

मी तिला सांगितले की जेवणानंतरचा फेरफटका आणि इन्स्पेक्शन अश्या दुहेरी हेतूने मी बाहेर पडलो होतो. तिने दिवसभर उभे राहून काम करून घेतले असल्याने, तिने विश्रांती घ्यावी. काम पाहून आल्यावर काही सूचना असल्यास त्या मी तिला दुसऱ्या दिवशी सकाळी देईन. 

"सर, काही चुका झाल्या असतील किंवा तुमच्या आणखी काही सूचना असतील तर त्या जागच्याजागी मला समजतील आणि उद्या काम करणे सोपे जाईल." असे म्हणत गीताही माझ्यासोबत निघाली. मी केबल रूटचे निरीक्षण करण्यात गर्क होतो. गीताला वेळोवेळी काही सूचना देत असलो तरी तिच्याकडे माझे लक्षही जात नव्हते. आमच्या तंबूच्या जवळ आल्यावर माझी परवानगी घेऊन आणि सॅल्यूट करून  ती  तिच्या तंबूकडे निघाली. 

ती जात असताना प्रथमच माझ्या लक्षात आले की ती जरा लंगडल्यासारखी, पाय वेळावून टाकत होती. मी तिला त्याबद्दल विचारताच ती हसू लागली. मला काहीच कळेना. उत्तरादाखल तिने पाय वर करून मला तिचा बूट दाखवला. तिच्या बुटाच्या तळव्याचा अर्धा भाग टाचेकडून उकलला जाऊन लोंबत होता. 

"सर, आपण निघालो आणि थोड्याच वेळात एका ठिकाणी वाळूत माझा पाय रुतला. मी पाय जोराने खेचला आणि बुटाची ही अवस्था झाली. नशीब, मी आणखी एक बुटांची जोडी आणलीय, नाहीतर उद्या प्रॉब्लेमच आला असता."

मला आश्चर्यच वाटले, "गीता, माझं लक्ष तर नव्हतंच, पण तू तरी मला तेंव्हाच सांगायचं होतंस."   

"ठीक आहे सर, एवढा काही मोठा प्रॉब्लेम नव्हता." असे म्हणून ती  हसत-हसतच निघून गेली. 

मी विचारात पडलो. तिच्या जागी कोणीही, अगदी मी जरी असतो तरी कदाचित, अचानक उद्भवलेली अडचण वरिष्ठांना दाखवून आपल्या तंबूकडे परत वळलो असतो. केबल रूटच्या इन्स्पेक्शनकरिता जाणे म्हणजे काही युद्धजन्य परिस्थिती नव्हती. पण, गीताला ते मान्य नसावे. एक स्त्री असल्याचा गैरफायदा घेऊन, आपण अवाजवी सवलत मागितल्याची शंका चुकूनही आपल्याबद्दल कोणाच्या मनात येऊ नये याकरिता ती अतिशय जागरूक होती.

गीतासारखे, आणि कालांतराने माझ्या कंपनीमध्ये पोस्टिंगवर आलेल्या संजय खत्रीसारखे, कर्तव्यनिष्ठ आणि समर्पित अधिकारी हाताखाली असणे हे माझे भाग्यच मला वाटते. आजही त्यांची आठवण येते तेंव्हा मला त्यांचे गुणच आठवतात. स्त्री-पुरुष समानता किंवा विषमता याबद्दलचे विचार माझ्या मनाला शिवतदेखील नाहीत. 

13 comments:

  1. आजकाल युवकामधे समर्पण भावना लोप पावत चालली आहे, उत्तम वर्णन केले आहे

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय.
      धन्यवाद! 🙂

      Delete
    2. खरे आहे,hal मध्ये असल्याने विविध airforce stations ला TD निमित्त जाणे होते,तिथेही असे कर्तव्यनिष्ठ officers भेटले आहेत.

      Delete
  2. Your articles bring home the ground realities of Military life Colonel. It is interesting to know that there is a lot of personal involvement in a system driven instituition that Armed Forces are.
    Lt. Geeta is definitely an officer to be quoted for ability and sincerity.Kudos to her. And wothout doubt working under you, brought about the best in her. Same for Lt. Sanjay Khatri, I am sure.
    And wasn't it Lt. Geeta who wasn't being considered to be an officer of the unit by the 'welcome committee' - only because of her gender!!
    Milind Ranade

    ReplyDelete
    Replies
    1. Yes, Milind.
      The same Geeta proved worthy of the rank she was wearing! 🙂

      Delete
  3. That film has gross exaggerations in the name of artistic expression. Too far from reality.

    ReplyDelete
    Replies
    1. I heard that the IAF is initiating some legal action. I'm not sure.

      Delete
  4. Really nice articke covering ground realities. Worth reading sir

    ReplyDelete
  5. Anand, I feel very strongly that you should publish this article in a couple of newspapers + e version of newspapers. It will certainly help in correcting the incorrect perception that the film has created, and will continue to create if not rebutted through such real life experiences.
    Very well written and nuanced article !!
    - Sumant Khare

    ReplyDelete
  6. सिनेमातिल अतिरंजित दृष्यामुळे गैरसमज जास्त होतात.पण थोड्या प्रमाणात एक गोष्ट खरी आहे.की स्त्रिया व पदोन्नती सर्वांना भावते असे नाही.हाताची पाची बोट सारखी नसतात.सत्याचा विजय होतो.

    ReplyDelete
  7. Wonderful article sir,thank you! I could co-relate it very well.Jay hind!

    ReplyDelete
  8. Best Article ever read.... !!!

    ReplyDelete