Labels

Sunday 26 July 2020

... फौजी दुनिया में ये पहला कदम!

संरक्षण दलांच्या दहा विभागांत महिलांना पर्मनंट कमिशन देण्यासाठी भारत सरकारने मंजुरी दिल्याची बातमी ऐकताच माझे मन भूतकाळात, २८ वर्षे मागे गेले. १७ जुलै १९९२ रोजी सकाळी साडेसात वाजता, सेनाधिकारी होऊ इच्छिणाऱ्या मुलींच्या पहिल्या बॅचसमोर मी उभा होतो, त्यांचा ग्रुप टेस्टिंग ऑफिसर (GTO) म्हणून!  

दिल्लीच्या डिफेन्स इन्स्टिटयूट ऑफ सायकॉलॉजिकल रिसर्च (DIPR) मध्ये GTO कोर्सची थियरी शिकल्यानंतर बंगलोरच्या SSB मध्ये माझे प्रॅक्टिकल ट्रेनिंग सुरु होते. एक 'गुरु GTO' आणि एक शिष्य अशी आमची जोडी होती. पाच-पाच दिवसांची एक टेस्टिंगची बॅच असायची. अश्या एकूण दहा बॅचेस, माझ्या 'गुरु' सोबत मी वावरायचे, तो करीत असलेल्या टेस्टिंगचे निरीक्षण करायचे, आणि त्या अनुषंगाने त्याच्यासोबत चर्चा करायची, असे प्रॅक्टिकल ट्रेनिंगचे स्वरूप होते. पाच बॅचेसचे बारकाईने निरीक्षण झाल्यानंतर, सहाव्या बॅचपासून, गुरूच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतःच प्रत्यक्ष टेस्टिंग करू लागायचे, आणि नवव्या व दहाव्या बॅचचे संपूर्ण टेस्टिंग मी एकट्यानेच करायचे अशी पद्धत होती.
  
नेमके त्याच सुमारास, सैन्यदलांमध्ये महिला अधिकारी नियुक्त करण्याचे जाहीर झाले होते. माझ्या प्रशिक्षणादरम्यानची जी नववी बॅच होती ती मुलींची असणार आहे, हे आम्हाला समजले. ती बॅच सुरु होण्याच्या आदल्या दिवशी माझा गुरु, मेजर नायर मला म्हणाला, "या बॅचचे संपूर्ण टेस्टिंग मीच करेन. तू अजून अनुभवी GTO नाहीस आणि मुलींची ही पहिलीच बॅच आहे. तुला हॅन्डल करणे अवघड जाईल ."

"सर, नवव्या आणि दहाव्या बॅचेसचे संपूर्ण टेस्टिंग मीच करायला हवे. तसे नाही केले नाही तर माझ्या ट्रेनिंगला अर्थच राहणार नाही. आणि माझे ट्रेनिंग रीतसर पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही मला पास करणेही अयोग्यच होईल. शिवाय, मुली काय आणि मुले काय, आपल्या टेस्टिंगमध्ये फारसा काहीच फरक नाहीये. मी ते करू शकेन."

माझे मुद्देसूद बोलणे ऐकून मेजर नायर निरुत्तर झाला. माझ्या लक्षात आले की, प्रथमच मुलींची बॅच येत असल्याने, कुठे काही चूक व्हायला नको, या विचाराने तो जरा अस्वस्थ होता. मग मात्र, तो गुरु आणि मी चेला आहे हे बाजूला ठेवून मी सूत्रे हातात घेतली.
 
"सर, अडथळ्यांच्या शर्यतीतला एक बारीकसा फरक सोडला तर, सर्व टेस्टिंग नेहमीप्रमाणेच करण्याचे आदेश आलेले आहेत. तो फरकदेखील, केवळ, स्त्री-शरीराच्या नैसर्गिक मर्यादा लक्षात घेऊन, आणि टेस्टिंगदरम्यान कुणाला इजा होऊ नये यासाठीच करण्यात आलेला आहे. 'जंटलमेन' ऐवजी 'लेडीज' असे संबोधन वापरणे हा तर कॉमनसेन्सचा भाग आहे. बाकी काही अडचण येईल असे मला वाटत नाही. त्यांना सगळ्या सूचना मी व्यवस्थित समजावून देईन. तुम्ही अजिबात काळजी करू नका."

नायरला माझ्याबद्दल थोडा भरवसा वाटू लागला असे मला वाटले, पण तेवढ्यात तो एकदम म्हणाला, 
"नाही, नाही, थांब, थांब. हे पहा, टेस्टिंगच्या काळात, आपण उमेदवारांना गळ्यात अडकवायचे चेस्ट नंबर दिलेले असतात. सर्व उमेदवारांनी एकमेकांना त्यांच्या नावाने नव्हे तर, नंबरानेच हाक मारायची अश्या सूचना आपण देतो. पण या मुलींशी बोलताना तो तेवढा भाग मात्र तू जरा बदल." 

"सर, पण मला तसं त्यांना सांगावंच लागेल. नंबराने हाक मारली नाही, तर कोण कुणाशी बोलतेय आपल्याला काहीच कळणार नाही. मग आपण त्यांच्या वागण्या-बोलण्याबाबतच्या नोंदी कश्या करणार?"

"अरे, ती  सूचना तर त्यांना द्यावीच लागेल. पण ... अं ... ते नंबर छातीवर  बांधलेले असल्यामुळे आपण त्यांना 'चेस्ट नंबर्स' म्हणतो. मुलांच्या बाबतीत ठीक आहे. पण, मुलींच्या छातीकडे बोट करून "चेस्ट नंबर" असं  म्हणणं काही बरोबर होणार नाही. त्या मुलींना खूपच लाज वाटेल. त्यापेक्षा तू 'कँडिडेट नंबर' असा शब्द वापर."

त्याच्या या असल्या अजब आणि बिनबुडाच्या भीतीबद्दल हसावे की रडावे, असा प्रश्न मला पडला. छातीवर बांधलेल्या नंबरला, 'चेस्ट नंबर' म्हणण्यात लाज वाटण्यासारखे काय आहे हेच मला कळेना. तरी मी समजावायचा प्रयत्न केला, "सर, यात लाज वाटण्यासारखे काहीच नाही. आपण फक्त... " 

मेजर नायर माझे काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता, 
"नो नो, बापट. दॅट इझ फायनल. यू विल से 'कँडिडेट नंबर'. ओके ?" 
मग मात्र माझा नाईलाज झाला. 
 
माझ्यासमोर आलेल्या दहा मुलींवर नजर पडताच, काही मुलींच्या चेहऱ्यावर मला एक वेगळीच चमक दिसली. कुठल्या ना कुठल्या SSB कोचिंग क्लासमध्ये प्रशिक्षण घेऊन आलेल्या उमेदवारांच्या चेहऱ्यांवर अशी चमक असते. अश्या उमेदवारांना, SSB मध्ये नेमके काय-काय आणि कसे-कसे घडणार आहे याची पूर्वकल्पना असते. पण, अधिकारी होण्यासाठी जे अंगीभूत गुण आणि कुवत असावी लागते ती कुठल्याही कोचिंगमुळे येऊ शकत नाही. त्यामुळे, अश्या 'प्रशिक्षित' उमेदवारांनी जर उसना मुखवटा लावलेला असेल तर तो आमच्या टेस्टिंगमध्ये हळू-हळू गळून पडतो आणि 'दूध का दूध, पानी का पानी' वेगळे-वेगळे दिसू लागतेच!

मी नेहमीचे ब्रीफिंग सुरु केले. 'कँडिडेट नंबर' हा शब्द मी एकदोनदा वापरल्यावर, गटातल्या एका 'प्रशिक्षित' मुलीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटल्याचे मला जाणवले. 'कँडिडेट नंबर' हा शब्द मेजर नायरच्या डोक्यातून नवीनच निघालेला असल्याने, तिला मिळालेल्या कोचिंगमध्ये, तो  शब्द सांगितला गेला नसणारच! ती गोंधळून इकडे-तिकडे पाहू लागल्यावर आणखी ४-५ मुलींचेही माझ्या ब्रीफिंगमधले लक्ष उडाले. शेवटी मी त्या मुलीला विचारले. "येस, कँडिडेट नंबर 7, एनी प्रॉब्लेम?"

"सर, तुम्ही जो 'कँडिडेट नंबर' म्हणताय, तो म्हणजे... हा चेस्ट नंबरच ना?" छातीवर बांधलेला कापडी नंबर हलवत  ती मुलगी म्हणाली. 

"येस, दॅट्स राईट. तुम्ही एकमेकींना फक्त चेस्ट नंबरनेच हाक मारायचीय, आपली नावे वापरायची नाहीत. इझ दॅट  क्लियर?"

"येस सर" असे जोरात ओरडून, त्या मुली "हुश्श" अश्या चेहऱ्याने एकमेकींकडे पाहू लागल्या. तेवढ्या एका क्षणाचा अवधी मिळताच, मी वळून नायरकडे पाहिले आणि नुसतीच प्रश्नार्थक मान उडवली. त्याने आश्चर्याने डोळे आकाशाकडे वळवले! 

बंगलोरहून यशस्वीपणे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर ३-४ महिन्यातच, मला अलाहाबादच्या सिलेक्शन सेंटरमध्ये GTO म्हणून पोस्टिंग मिळाले. आता महिलांच्या दुसऱ्या बॅचसाठी मुली येऊ लागल्या होत्या. सैन्यामध्ये महिलांचा प्रवेश, ही बाब तशी सर्वांच्याचसाठी नाविन्यपूर्ण होती. पण, आमच्या दृष्टीने, इतर उमेदवारांप्रमाणेच त्या मुलीदेखील, अधिकारी बनण्यासाठी आलेल्या उमेदवारच होत्या. स्वातीकडून मात्र, माझ्या कानावर आले की, आमच्या बोर्ड प्रेसिडेंटच्या बायकोपासून, सर्वच अधिकाऱ्यांच्या बायकांमध्ये प्रचंड कुजबूज सुरु होती. आपले नवरे 'मुलींचे' टेस्टिंग करीत आहेत, याबद्दल सगळ्याच बायकांना कमालीची मत्सरमिश्रित उत्सुकता वाटत होती असे मला समजले!

एक-दोन दिवसातच, आमच्या बोर्ड प्रेसिडेंट ब्रिगेडियर साहेबांनी आम्हा सर्व GTO ना बोलावून सांगितले की दुसऱ्या दिवशीच्या टेस्टिंगसाठी ग्राउंडवरच, पण जरा दूर एखाद्या झाडाखाली, ८-१० खुर्च्या मांडून घ्याव्यात. बोर्डच्या सर्व लेडीजना टेस्टिंग प्रोसीजर पाहायला मिळावे, असा विनंतीवजा आदेश त्या ब्रिगेडियरसाहेबांना त्यांच्या पत्नीकडून मिळालेला असणार! 

सकाळी-सकाळी टेस्टिंग सुरु होण्यापूर्वीच सर्व बायका स्थानापन्न झाल्या. सर्कस पाहायला आलेल्या लहान मुलांच्या चेहऱ्यावर दिसते ती उत्सुकता, आणि कामगिरीवर निघालेल्या गुप्तहेराची सतर्कता असे दोन्ही भाव प्रत्येकीच्या चेहऱ्यावर दिसत होते! ग्राऊंडवरच्या सर्व टेस्ट्स आम्ही नेहमीप्रमाणेच चालवल्या. त्या दिवसाचे टेस्टिंग संपल्यानंतर, आम्ही सर्व GTO जेंव्हा आमच्या त्या 'प्रेक्षकांना' भेटलो तेंव्हा, "अरेरे, एवढं दुर्बिणीतून पाहूनही काहीच सापडलं नाही" असा भाव काहीजणींच्या चेहऱ्यावर होता असा भास मला झाला! आमच्या ब्रिगेडियर साहेबांच्या पत्नी मात्र स्वातीकडे पाहत मला म्हणाल्या, "मेजर बापट, तुम्ही अगदी उत्साहाने पुढे होऊन प्रत्येक मुलीशी शेकहँड वगैरे करीत होता!" 

१९९२ साली, म्हणजे अगदी एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर, सैन्यदलासारख्या संपूर्ण पुरुषप्रधान संस्थेमध्ये महिलांना स्थान मिळणे, ही किती खळबळजनक, आणि भुवया उंचावणारी घटना होती, हे माझ्या या अनुभवांवरून लक्षात आले असेलच. 

पुढील सर्विसमध्ये, काही अधिकारी आणि त्यांच्या पत्नीदेखील, महिला अधिकाऱ्यांना पुरुषांपेक्षा कमीच लेखत असल्याचे मी पाहिले. मग महिला अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या शिपायांना तसे वाटले तर काय नवल? 

१९९७ साली घडलेला एक प्रसंग माझ्या चांगलाच लक्षात आहे. मी पुण्याच्या सिग्नल युनिटमध्ये होतो आणि लेफ्टनंट गीता नावाची एक अधिकारी माझ्या सब-युनिटमध्ये, म्हणजे कंपनीत, होती. तिच्यावर पडेल ते काम ती नेहमी हसतमुखाने, आणि अगदी चोख बजावत असे. आर्मीमधील 'इंजिनियर्स' नावाच्या विभागातल्या एका कॅप्टनबरोबर नुकतेच तिचे लग्न झालेले होते.

एकदा, आमच्या युनिटच्या इन्स्पेक्शनसाठी भेट देणारे एक वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्या पत्नीच्या स्वागतासाठी आमची ऑफिसर्स मेस सुशोभित करणे चालू होते. सर्व अधिकाऱ्यांच्या पत्नी मिळून एक करमणुकीचा कार्यक्रमही आयोजित करणार होत्या. आमच्या 'महिला मंडळाच्या' अध्यक्षा अर्थातच CO साहेबांच्या पत्नी होत्या. कार्यक्रमाच्या ठिकाणी रांगोळी काढण्याची जबाबदारी एखाद्या तरुण अधिकाऱ्याच्या पत्नीने उचलावी असे बोलणे चालू असताना, माझ्या पत्नीला उद्देशून अध्यक्षा म्हणाल्या, "स्वाती, तू ही जबाबदारी तुझ्या नवऱ्याच्या कंपनीमधील लेफ्टनंट गीतावर सोपव."

स्वातीला आश्चर्यच वाटले. ती म्हणाली, "अधिकाऱ्यांच्या पत्नींनी ही कामे करायची आहेत. गीता स्वतः एक अधिकारी आहे. तिला हे काम कसे  देता येईल? शिवाय तिच्यावर कंपनीच्या कामांचीही जबाबदारी असणार आहे."

CO साहेबांच्या पत्नी चटकन म्हणाल्या, "गीता प्रथम एक महिला आहे आणि मगच अधिकारी वगैरे. तू तिलाच हे काम करायला सांग. तुझा नवराच तिचा कंपनी कमांडर आहे. तिच्यावरची जबाबदारी तो मॅनेज करेल." 

"तिचे काम कोण करेल हा प्रश्नच नाहीये. पण ती इतर ऑफिसर्ससारखीच एक प्रशिक्षित ऑफिसर आहे. तिला ऑफिसर्स मेसमध्ये रांगोळ्या काढायचे काम सांगणे अयोग्य होईल." स्वातीने हे ठामपणे सांगितलेले त्या बाईंना रुचले नाही. 

त्या म्हणाल्या, "तीही एका आर्मी ऑफिसरचीच बायको आहे. तिच्या नवऱ्याच्या युनिटमध्ये ती रांगोळ्या काढेलच की. मग इथे काढल्या म्हणून काय हरकत आहे?" 

"त्या युनिटमध्ये गीता तिथली अधिकारी म्हणून नव्हे, तर तिथल्या एका अधिकाऱ्याची पत्नी म्हणून ते कर्तव्य पार पाडेल. पण, आपल्या युनिटमध्ये ती एक अधिकारी आहे आणि तिने अधिकारी म्हणूनच वावरले पाहिजे." 

स्वातीने स्पष्ट नकार दिल्यानंतर वातावरण बरेच तापले. दुर्दैवाने स्वातीचा मुद्दा योग्य असूनही इतर बायकांपैकी कोणीही तिच्या बाजूने बोलले नाही. घरी आल्यावर स्वातीने मला हे सर्व सांगितले. अर्थातच, या बाबतीत आमचे एकमत होते. 

दुसऱ्या दिवशी सकाळी CO साहेबांनी मला बोलावून, घडल्या प्रकाराबद्दल विचारताच, मी त्यांना म्हणालो, "सर ती आपल्या युनिटमध्ये एक अधिकारी आहे. तिने युनिटमध्ये सगळीकडे अधिकारी म्हणूनच वावरावे असे माझे स्पष्ट मत आहे. शिवाय, तिच्यावर मी इन्स्पेक्शनसंबंधीची काही कामे सोपवलेली आहेत." 

CO साहेब धुसफुसले, पण माझे म्हणणे त्यांना खोडूनही काढता आले नाही. थोडे पडसाद उमटल्यानंतर  ही घटना विस्मरणात गेली. एकाच निवडपद्धतीमधून निवडले जाऊन, एकाच प्रकारचे प्रशिक्षण स्त्री-पुरुषांनी एकत्रच घेतल्यानंतरही, महिला अधिकाऱ्यांकडे केवळ महिला म्हणून पाहण्याची अनिष्ट मानसिकता, मी सर्व्हिसमध्ये असताना मला काही प्रसंगी निश्चितच पाहायला मिळाली.  

त्यानंतर बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले आहे. मी आता सेवानिवृत्त असल्याने, आजच्या काळात सेनाधिकारी किंवा त्यांच्या पत्नींमध्ये, महिला अधिकाऱ्यांकडे एक 'अधिकारी' म्हणूनच पाहण्याची दृष्टी पूर्णपणे आली आहे की नाही हे मी खात्रीशीर सांगू शकणार नाही. परंतु, सुप्रीम कोर्टापर्यंत यशस्वी लढा दिल्यानंतर, सरकारच्या या ताज्या निर्णयाने, महिला सेनाधिकाऱ्यांना निदान सेवा-शर्तीच्या बाबतीत तरी समानतेचे हक्क मिळाले असे मानायला हरकत नाही. 

19 comments:

  1. सरकार ने महिला सबलीकरण धोरण भारतीय सेनेमधे लागू केला यांचा मनोमन आनंद आहे

    ReplyDelete
  2. Yes fully agree .. they deserve PRC .. Col Mukund Keshav

    ReplyDelete
  3. Very nice memory and write up sir

    ReplyDelete
  4. My exp has been little diffrent,I met lady offr from AEC she on being commissioned got married during 20 days intial leave from academy and reported in Bde Hq, planned her first child during the first year of service,as also her long maternity leave. Later she planned her second child also while in service & then left after 5 yrs ser.
    So wonder what she learnt in service & what did army gain due to her commission.I am sure all are not alike but certainly felt that there was need to have some restriction of age or service from org before getting married,like it is for the young officers,say 3/5 yrs with the PRC.

    ReplyDelete
  5. OK. Experiences can be different.
    The contention about setting certain restrictions along with the terms of service is debatable.

    However, there's no Law prohibiting male officers too from marrying even after just one day's service.
    If you are referring to the 25 years of age 'rule', and the need to seek CO's permission etc. Well, it was written in DSR all right.
    But, DSR by itself will not stand the test of law.
    In any case, some of my coursemates had got married within one year of their service.

    Your name did not come up with your comment. We could have had this discussion on another forum if I knew your identity. 🙂

    ReplyDelete
  6. It is disconcerting to see that there was gender bias in the Armed Forces. Commendable on your part to have treated those under you so fairly. Its admirable of Swati Tai to have spoken out that Lt. Geeta was an officer in the unit and should be seen in that capacity only. Being a lady didn't make her a part of the welcome committe.
    Hopefully, Lt. Gen Madhuri Kanitkar being promoted to that rank recently is indicative of change.
    Milind Ranade

    ReplyDelete
    Replies
    1. Gen. Madhuri is a Medical Officer. Women medical officers have been in service for many years. So, they may be on a level playing field by now. We also have had women medical officers reaching a General rank before Gen. Madhuri did.
      Gender bias is an all-pervading phenomenon and services haven't been an exception.
      But, eventually, even in the Armed forces, I'm sure they would be seen only in the light of their capabilities and achievements, rather than as 'women'.

      Delete
  7. The action taken by you n your wife were perfect.
    I can't understand why wives of other officers were against Mrs Swati

    ReplyDelete
    Replies
    1. All of them were not against her.
      But, they were not 'for her' either! 🙂

      Not everyone can muster up the courage to speak out against something unfair or unjust. 😒

      I wish you had added your name along with your comment.

      Delete
  8. सुप्रीम कोर्टाने जरी महिलांना न्याय दिला असला तरी प्रत्येक पुरुषाने मनोमन स्विकार केला आणि प्रत्येक स्त्री च्या जागी स्वतःची आई, बायको किंवा मुलगी पाहिली तरच हे शक्य आहे.

    ReplyDelete
  9. Dear Anand ,
    excellent write up , Swati's stand and your support / follow up to it is admirable.

    I have different view on necessity of induction of lady officers in Army except AMC ,AEC etc , they would definitely keep getting comparative pampered treatment at the cost of other colleagues is my presumption .However SC has given decision on the same so no point expressing further and it should be treated as closed topic . From debating point , capabilities/ aptitude are same irrespective of gender however hope it is actually true in different service situations and prove the experts on the subject right .
    I fail to understand why there should be any restriction on ladies employment for night duty even in corporate world even in metros.?? Conditions in society are probably not ...may be ,that is separate topic , we will discuss when we meet .
    Lt Col Mahesh Kulkarni ( retd)

    ReplyDelete
  10. Dear Anand ,
    excellent write up , Swati's stand and your support / follow up to it is admirable.

    I have different view on necessity of induction of lady officers in Army except AMC ,AEC etc , they would definitely keep getting comparative pampered treatment at the cost of other colleagues is my presumption .However SC has given decision on the same so no point expressing further and it should be treated as closed topic . From debating point , capabilities/ aptitude are same irrespective of gender however hope it is actually true in different service situations and prove the experts on the subject right .
    I fail to understand why there should be any restriction on ladies employment for night duty even in corporate world even in metros.?? Conditions in society are probably not ...may be ,that is separate topic , we will discuss when we meet .
    Lt Col Mahesh Kulkarni ( retd)

    ReplyDelete
  11. Dear Anand ,
    excellent write up , Swati's stand and your support / follow up to it is admirable.

    I have different view on necessity of induction of lady officers in Army except AMC ,AEC etc , they would definitely keep getting comparative pampered treatment at the cost of other colleagues is my presumption .However SC has given decision on the same so no point expressing further and it should be treated as closed topic . From debating point , capabilities/ aptitude are same irrespective of gender however hope it is actually true in different service situations and prove the experts on the subject right .
    I fail to understand why there should be any restriction on ladies employment for night duty even in corporate world even in metros.?? Conditions in society are probably not ...may be ,that is separate topic , we will discuss when we meet .
    Lt Col Mahesh Kulkarni ( retd)

    ReplyDelete
  12. पुरुषी क्षेत्रात स्त्री चे पदारपण पुरुषांना रुचणारे नसते.अधिकारी स्रीच्य हाताखाली कामकरण्याची मानसिकता नसते.सर्वच पुरुष असे नसतात.सहकार्याने वागणारेही असतात.

    ReplyDelete
    Replies
    1. मानसिकता बदलणे अत्यावश्यक आहे. 🙂

      Delete