Labels

Monday 12 April 2021

एक था ठकसेन !

एका टिचकीने नारळ किंवा कलिंगड प्रत्येकवेळी बिनचूक जोखता येणे कदाचित शक्य असेल, पण मनुष्यस्वभाव? छे! 

१९७७ ते १९८० या काळात, NDAमध्ये प्रशिक्षणार्थी कॅडेट असताना माझ्याच 'स्क्वाड्रन' मधल्या एका कॅडेटला नीटपणे ओळखण्यात आम्ही सर्व कोर्समेट्स कमी पडलो होतो त्याची गोष्ट सांगण्यासारखी आहे.

 

अभिजीत सिंह (नाव बदललेले आहे) या माझ्या कोर्समेटने प्रथमदर्शनीच माझ्यावर आपली छाप पाडली होती.  सफाईदार इंग्रजी व हिंदी संवादकौशल्य तर त्याच्याकडे होतेच. शिवाय, तो स्वतः अमराठी असूनही उत्तम मराठी बोलत असे. हुशार, हजरजबाबी, आणि अतिशय तल्लख विनोदबुद्धी असलेला, प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा अभिजीत कुणालाही आवडेल असाच होता. तोही माझ्यासारखाच नवखा, पहिल्या सत्रात नुकताच दाखल झालेला कॅडेट असूनदेखील NDA मधील अनेक गोष्टींचे बारकावे त्याला ठाऊक होते. साहजिकच, बरेच कॅडेट त्याच्याकडे  बारीक-सारीक सल्ले मागण्यासाठी जात असत

सुट्टीच्या दिवशी 'लिबर्टी' हवी असल्यास, म्हणजेच NDAमधून बाहेर जायचे असल्यास, आमच्या 'लिबर्टी कार्ड' वर अधिकाऱ्याची लिखित परवानगी व सही असावी लागे. NDA च्या अलिखित नियमानुसार, ड्रिलची परीक्षा पास झाल्याशिवाय आम्हाला मुळात लिबर्टी कार्ड मिळतच नसे. सुट्टीच्या दिवशी, 'लिबर्टी' शिवाय हिंडणाऱ्या कॅडेट्सना पकडण्यासाठी, NDAची दोन्ही गेट्स, आणि पुणे शहरातील सर्व मुख्य बस स्थानकांच्या आसपास 'सापळे' लावलेले असत. डोक्याचा चमनगोटा केलेले NDA कॅडेट्स सहजी ओळखू येत. साध्या वेषात, दबा धरून असलेले NDA चे ड्रिल 'उस्ताद' अचानक प्रकट होऊन कॅडेट्सचे 'लिबर्टी कार्ड' तपासत असत. ज्यांच्याकडे 'लिबर्टी कार्ड' नसे, किंवा त्या दिवशीच्या 'लिबर्टी' ची नोंद व अधिकाऱ्याची सही ज्यांच्या कार्डावर नसे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाई. 

माझे घर पुण्यातच असूनही, ड्रिल परीक्षेमध्ये पास होईपर्यंतचे पहिले काही महिने मी घरी जाऊच शकलो नव्हतो.  कठोर शिक्षेच्या भीतीने, चोरीछुपे, म्हणजे 'लिबर्टी कार्ड' शिवाय जाण्याची हिंमतही झाली नव्हती. पण, मला नेहमी एका गोष्टीचे नवल वाटे. माझ्याप्रमाणेच ड्रिल परीक्षा पास न झालेला अभिजित मात्र, दर रविवारी मस्त पुण्यात हिंडून येत असे. एके दिवशी सहज विचारल्यासारखे मी त्याला त्याचे गुपित विचारले. हसत-हसत त्याने ड्रॉवरमधून जे काढून दाखवले ते पाहून मी थक्कच झालो. 

त्याच्याकडे २-३ लिबर्टी कार्ड्स होती. प्रत्येक कार्डावर त्याचा फोटो होता. त्यांवरचे नाव आणि नंबर मात्र काल्पनिक होते. सर्व कार्डांवर वेगवेगळ्या दिवशी लिबर्टी मंजूर झाल्याच्या नोंदी होत्या. सर्वात थक्क करणारी बाब म्हणजे प्रत्येक नोंदीपुढे आमच्या प्रशिक्षक अधिकाऱ्यांच्या सह्या होत्या - अर्थातच बनावट! माझे डोके गरगरू लागले. "तेरे लिये भी बनाके दूँ क्या एक ?" या त्याच्या प्रश्नावर मात्र मी कोपरापासून हात जोडले आणि त्याला रामराम केला. 

NDAमधील अलिखित आचारसंहितेनुसार, माझ्या कोर्समेटच्या या भानगडीविषयी मी कुणाजवळही वाच्यता करणार नव्हतो. परंतु, इतर काही कोर्समेट्सना याचा वास आधीच लागलेला होता हे मला बऱ्याच काळानंतर समजले. 

पुढे एक-दोन वेळा, त्याने कुठून-कुठून काही छोट्या-मोठ्या वस्तू ढापल्याचे (NDAच्या भाषेत, 'मॅनेज' केल्याचे) कानावर आले होते. हॉस्पिटलमधून डॉक्टरांच्या चिट्ठ्याही 'मॅनेज' करून वैद्यकीय रजा तो मिळवीत असल्याची वदंताही होती. आम्ही सगळेच त्यावेळी जेमतेम १७ वर्षांचे होतो. अभिजीत करीत होता ते उद्योग अर्थातच बेकायदेशीर होते. आपण तसल्या भानगडींपासून लांब राहायला हवे, हे जरी कळत असले तरी त्याबद्दल एक सुप्त आकर्षणदेखील वाटत होते. त्यामुळेच, अभिजीत नुसता चटपटीत नव्हे, तर चांगलाच 'पहुंचा हुआ' आहे, इतकेच आम्हा कोर्समेट्सचे त्याच्याबद्दलचे विचार होते. एका भावी सेनाधिकाऱ्याच्या व्यक्तिमत्वाचा हा पैलू भविष्यात भारतीय सैन्याच्याच दृष्टीने धोकादायक ठरू शकतो, असा विचार त्यावेळी आम्ही कुणीच केला नाही हे मात्र खरे.  

एके दिवशी, माझ्या समोरच्याच केबिनमध्ये राहणारा मोहन (टोपण नाव 'स्पेको' किंवा चष्मिश) नावाचा कोर्समेट तिरीमिरीत माझ्या केबिनमध्ये शिरला आणि सरळ माझ्या कपाटाची झडती घेऊ लागला. त्यातील युनिफॉर्मच्या कप्प्यातून दोन-तीन युनिफॉर्मचे जोड त्याने काढले, आणि त्यावर मार्किंग शाईने छापलेला NDA नंबर तपासला. मग मात्र माझी कॉलर धरून तावातावाने, दोन-चार शिव्या हासडत मोहन मला म्हणाला, "साले, मेरे बाकी के सिव्हिल कपडे कहाँ हैं ?" 

अचानक झालेल्या त्या हल्ल्याने मी पूर्ण बावचळून गेलो होतो. त्या खाकी कपड्यांवरचा नंबर मोहनने मला दाखवला. C/१२९२० म्हणजे मोहनचाच नंबर! माझा नंबर तर C/१२८२५ होता. आता मी अधिकच भांबावलो. मोहनचा आरोप असा होता की धोब्याकडून आलेल्या त्याच्या कपड्यांचे बंडल मी लंपास केले होते. ज्या चादरीमध्ये त्याचे कपडे बांधलेले होते ती त्याला माझ्या केबिनबाहेर सापडली होती. आणि आता तर (मी न केलेल्या) चोरीचा 'भक्कम पुरावा'च त्याच्या हातात होता! आणि वर त्या बंडलातल्या इतर मुद्देमालाबाबत तो मला विचारत होता. 

मोहनच्या शिव्यांचा पहिला भर ओसरल्यानंतर मी शांतपणे म्हणालो, "मोहन, तुझी उंची माझ्यापेक्षा किमान चार इंच जास्त आहे. तुझे कपडे मीच चोरले आहेत असे जरी गृहीत धरले तरी ते मी वापरू शकेन का? जरा तरी विचार कर, मी ते का चोरेन?" असे मी म्हणताच, नाकावर घसरलेला चष्मा वर करत आणि तोंडाच्या एका कोपऱ्यातून जिभेचे टोक बाहेर काढून (त्याची नेहमीची 'बावळट' लकब!) तो विचारात पडला. 

तेवढ्यात, आम्हा ४-६ कॅडेट्सच्या मदतीसाठी नियुक्त असलेला आमचा ऑर्डर्ली माझ्या केबिनमध्ये आला. त्याची साक्ष काढली असता असे समजले की आम्ही सगळे खेळाच्या तासासाठी गेलो असताना नेहमीप्रमाणे  धोबी प्रत्येक कॅबिनसमोर, त्या केबिनमध्ये राहणाऱ्या कॅडेटच्या कपड्यांची बंडले ठेवून गेला होता. ऑर्डर्लीकडून असेही समजले की सगळे जरी खेळायला गेले असले तरी कॅडेट अभिजित मात्र स्क्वाड्रनमधेच  हिंडत होता.

एकमेकांकडे पाहून मी आणि मोहन एकसुरात, "ब्लडी अभिजीत!" असे ओरडलो आणि अभिजीतच्या केबिनकडे धावलो. निष्पन्न असे झाले की, अभिजीतनेच ते बंडल चोरले होते. त्यातले स्वतःच्या कामाचे, म्हणजे रंगीत सिव्हिल कपडे काढून घेऊन, युनिफॉर्मचे कपडे तेवढे समोरच्या, म्हणजे माझ्या कपड्यांच्या बंडलात त्याने खुपसून ठेवले होते. आमच्या ऑर्डर्लीने नेहमीच्या तत्परतेने माझ्या बंडलातले सर्व कपडे माझ्या कपाटात लावून ठेवले होते. केबिनबाहेरच पडलेल्या जास्तीच्या चादरीचे गूढ न उकलल्यामुळे, ऑर्डर्लीने मोहनची ती चादर माझ्या केबिनसमोरच राहू दिली होती, ज्यामुळे मोहनच्या संशयाची सुई साहजिकच माझ्याकडे वळली होती. 

स्वतःच्या कोर्समेट्ससोबत बेईमानी किंवा चालबाजी करणाऱ्या कॅडेट्सना जो प्रसाद मिळत असे तो अभिजीतलाही दिला गेला. 'कंबल परेड' अशा नावाने प्रचलित असलेल्या त्या प्रसादाचे स्वरूप म्हणजे कांबळ्यामध्ये गुंडाळून कोर्समेट्सकडून दिला जाणारा सौम्य चोप! ते प्रकरण तेवढ्यावरच मिटले. 

पुढे आम्ही डेहरादूनच्या इंडियन मिलिटरी अकॅडमी (IMA) मध्ये वर्षभराच्या विशेष प्रशिक्षणासाठी गेलो. NDAच्या एकाच 'स्क्वाड्रन' मधले आम्ही कोर्समेट्स, IMA मध्ये मात्र वेगवेगळ्या 'कंपनी' मध्ये विभागले गेलो. साहजिकच अभिजित व मोहन, या दोघांशीही माझा फारसा संपर्क राहिला नाही. 

एके दिवशी, शेजारच्या 'सिंहगड' कंपनीमधील माझा कोर्समेट, संजीव बजाज गडबडीने माझ्याकडे आला. अभिजीत व मी NDA मध्ये एकाच 'स्क्वाड्रन' मध्ये असल्याने, NDAमधील अभिजीतच्या वर्तनाबद्दल, खरंतर गैरवर्तनाबद्दल, तो माझ्याकडे चौकशी करू लागला. एका ज्युनिअर कॅडेटचे चोरीला गेलेले घड्याळ अभिजीतच्या केबिनमध्ये सापडले होते. सिनियरमोस्ट कॅडेट या नात्याने संजीव त्या प्रकरणाची चौकशी करत होता. अभिजीतच्या जुन्या सवयींची कुणकुण लागल्याने तो अधिक माहिती घेऊ पाहत होता. मी अभिजीतबाबतचे सर्व जुने अनुभव संजीवला सांगितले. 

त्या प्रकरणाची रीतसर चौकशी सुरु झाली आणि अभिजीतला आर्मीच्या कायद्यानुसार, चोरीच्या आरोपाखाली अटक झाली. अर्थात, ही चौकशी IMA च्या स्तरावरच होती आणि पुढील कारवाईचे सर्व हक्क IMA च्या कमांडंटच्या अखत्यारीत होते. त्यामुळे, ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, आमच्या 'कंपनी'मधील रिकाम्या केलेल्या एका केबिनमध्ये अभिजीतला बंदिवासात ठेवण्यात आले. त्याच्यावर पहारेकरी म्हणून, आम्हा कोर्समेट्सचीच नेमणूक करण्यात आली. एका रात्री मी पहारेकरी होतो. अभिजीत रडवेला होऊन रात्रभर माझ्याशी बोलत राहिला. त्याने त्याची  जीवनकथाच मला सांगितली. 

प्रतिष्ठित, उच्चशिक्षित आई-बापांचा हा मुलगा शाळेत असल्यापासूनच लहान-सहान चोऱ्या करीत होता. घरी कुणाला त्याबद्दल काही समजलेच नव्हते किंवा कदाचित समजूनही दुर्लक्ष केले गेले होते. अतिशय नावाजलेल्या एका कॉन्व्हेंट शाळेत शिकल्यानंतर अभिजीत NDAची प्रवेशपरीक्षा पास झाला होता. अगदी त्याने स्वतःच कबूल केले असते तर, आणि तरच त्याची ही चोऱ्या करण्याची सवय SSB निवड प्रकियेत पकडली गेली असती. त्यामुळे अर्थातच, अभिजीतच्या व्यक्तिमत्त्वाचे एकंदर दृष्य स्वरूप लक्षात घेता, त्याची निवड होण्यात काहीच अडचण आली नसावी. त्याच्या त्या सवयीचे गांभीर्य, NDA मध्ये असताना आमच्याही पूर्णपणे लक्षात आले नव्हते. इतकेच नव्हे तर, आम्ही नकळतपणे त्यावर पांघरूणही घातले होते हे मला मान्य करावेच लागेल. 

यथावकाश, घड्याळ-चोरीचा अभिजीतवरील आरोप सिद्ध झाला. सेनाधिकारी होण्याच्या दोनच महिने आधी त्याला IMA मधून काढून टाकण्यात आले.

माझ्या सर्व्हिसच्या काळात पुढे आर्मी अधिकाऱ्यांच्या सिलेक्शन बोर्डावर (SSB) मी काम केले. SSBसारख्या शास्त्रोक्त आणि काटेकोर निवडपद्धतीमध्येही मानवी चुका (Human Error) मुळे क्वचित आपली पारख चुकू शकते हे सिद्ध झालेले आहे. त्या निवडप्रक्रियेलाही काही मर्यादा आहेत. त्यामुळेच निसटलेला हा चोर अखेर पकडला गेला होता. भारतीय सेनेच्या दृष्टीने एक मोठाच संभाव्य धोका टळला होता. पुढे अभिजीतचे काय झाले याची खात्रीशीर माहिती मला कधीच मिळाली नाही. अफवा मात्र अनेक ऐकल्या. 

वरकरणी काहीही कळू नये आणि प्रत्यक्षात त्या व्यक्तीच्या अंगी असलेल्या 'नाना कळा' कालांतराने उघड व्हाव्या असे आणखी एक उदाहरण म्हणजे आमचा कोर्समेट मोहन उर्फ 'स्पेको'च असेल, याची कल्पना मात्र मला आर्मीमध्ये माझी सात वर्षे सर्व्हिस झाल्यावर आली! 

त्याबद्दल लवकरच सांगेन. 


26 comments:

  1. खूप छान लेखन व आठवण, आपण अनेकदा आठवणी वरच जगत असतो.

    ReplyDelete
    Replies
    1. अरे बापरे! असे ही होऊ शकते 😱

      Delete

  2. Juni mhanach aahe,Lanket ek Bibhishan aani,faujet ek jaichand asto,nashib,deshache aani seneche balwattar mhanun pudhche dhoke talnyaat yash milaale,hehi nase thodke.Sharing to fb.

    ReplyDelete
  3. Very nice sir, as usual. Your narration of facts is actual and touching. Self explanatory

    ReplyDelete
  4. खूप छान अनुभव लिहलाय. शब्दांकन नेहमीप्रमाणेच सुरेख.

    ReplyDelete
  5. कर्नल, नेहमी प्रमाणे सदाबहार कथन! आता "स्पेको"ची कथा वाचायची उत्कंठा लागलीय!

    ReplyDelete
    Replies
    1. 🙏धन्यवाद!

      स्पेको नावाच्या 'नमुन्या' ची कथाही लवकरच पाठवेन. 🙂

      Delete
  6. अनुभव खूप सुंदर तऱ्हेने मांडला. वाचताना उत्कंठा वाढत होती. पहिल्यांदा तुमचा लेख वाचला, सर. पुढेही वाचेन.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद प्रतीक!
      माझे याआधीचे लेख याच ब्लॉगच्या होमपेजवर जाऊन वाचू शकतोस.

      तुझे लेखन कसे चालले आहे?

      Delete
    2. हो सर जरूर.
      सध्या तरी लेखन कमी आणि वाचन जास्त चालले आहे. धन्यवाद विचारल्याबद्दल.

      Delete
  7. Thanks Colonel. A very thought provoking narrative indeed. Understand why resourcefulness is not the only thing that our
    Military looks for- the man has to have core values that make him worthy of the uniform.
    I await the Specko story eagerly.
    Milind Ranade

    ReplyDelete
    Replies
    1. Yes. Milind.
      Rightly observed. Thanks.

      I shall post the next story very soon. ☺️

      Delete
  8. Amazing sequential elaboration of happenings!👍🏻
    Eager to read what 'Specko' did.

    Keep up the pace!👍🏻

    ReplyDelete
  9. अनुभव खरतर आपल्याला गोत्यात आणणारा होता.परंतु यामध्ये सदर व्यक्तीचे नाव न लिहिता लिखाण केले यावरुन मनाचा मोठेपणा दिसून येतो.

    ReplyDelete