Labels

Saturday 16 January 2021

वेळ आली नव्हती... (भाग दुसरा)

१९८३ सालची गोष्ट आहे. मी अमृतसरच्या सिग्नल रेजिमेंट मध्ये पोस्टिंगवर होतो. आमच्या रेजिमेंटची एक तुकडी (ब्रिगेड सिग्नल कंपनी) कायमस्वरूपी सुमारे ८० कि. मी. दूर असलेल्या जालंधर छावणीमध्ये तैनात असे. त्या कंपनीचे मुख्य अधिकारी, मेजर शेषाद्री, दीड-दोन महिन्यांच्या रजेवर जाणार होते. त्यांच्या अनुपस्थितीत त्या कंपनीचा कार्यभार मी सांभाळावा असे आमच्या CO साहेबांनी ठरवले होते. मेजर शेषाद्रीच्या हाताखाली काम शिकण्यासाठी म्हणून मला अमृतसरहून महिनाभर आधीच जालंधरला पाठवण्यात आले. त्या अडीच-तीन महिन्यांच्या वास्तव्यात काही मजेदार प्रसंग घडले. त्यापैकी एका प्रसंगाची आठवण 'खेल खेल में सनम...' नावाच्या लेखात मी पूर्वीच लिहिली आहे. 

जालंधरचा एक प्रसंग मात्र, आज रंजक वाटला तरी, तो घडला तेंव्हा चांगलाच बाका होता. 

जालंधरच्या कंपनीचा कमांडर म्हणून काम पाहत असताना, जवानांना नियमित प्रशिक्षण देण्याची व युद्धतंत्राचा सराव करवण्याची जबाबदारी माझ्यावरच होती. प्रत्येकाला आपापले व्यक्तिगत शस्त्र (रायफल किंवा स्टेनगन) चालवण्याचा सराव करण्याची संधी देणे आणि नंतर प्रत्येकाच्या कौशल्याची चाचणी घेणे, हा त्याचाच एक भाग होता. एकदा, माझ्या कंपनीच्या जवान आणि नायब सुभेदार, व सुभेदार पदावरच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन मी फायरिंग रेंजवर गेलो. 

जे सामान्य वाचक शस्त्रसरावाबाबतीत अभिज्ञ नसतील अशा वाचकांना फायरिंगसंबंधी थोडी सविस्तर माहिती देणे आवश्यक आहे. 

रेंजवर सरावासाठी वापरली जाणारी प्रत्येक गोळी, ही 'ब्लँक', म्हणजे नुसतीच आवाजी गोळी नसून खरी-खुरी प्राणघातक गोळी असते. म्हणूनच, गोळीबाराच्या प्रशिक्षणातील सर्वात पहिला व अतिशय महत्वाचा धडा, 'रेंज डिसिप्लिन' म्हणजेच रेंजवरील शिस्तशीर वर्तनाचा असतो. त्यासाठी, प्रत्यक्ष गोळीबार सुरु करण्यापूर्वी, बंदुकीत गोळ्या न भरता, नुसताच सराव करवला जातो. कोणता आदेश कानावर पडल्यावर काय कारवाई अपेक्षित आहे हे ठोकून-ठोकून सर्वांच्या मनावर पुनःपुन्हा ठसवले जाते. अगदीच टोकाचे उदाहरण द्यायचे झाले तर, अपेक्षित कारवाईव्यतिरिक्त, नाक खाजवण्यासारखी निरुपद्रवी हालचाल जरी केली तरी त्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते. यावर, "हे जरा जास्तच नाही का?" अशी प्रतिक्रिया येऊ शकेल. पण, निष्काळजीपणामुळे एखादा जीव जाण्यापेक्षा अगदी टोकाची कडक शिस्त केंव्हाही चांगली!

फायरिंग करणाऱ्यांचा एकेक छोटा गट (डिटेल) 'फायरिंग पॉईंट' वर शिस्तीने आणला जातो. आपापल्या रायफलसह प्रत्येकाला पालथे पडायचे असते. ठराविक हुकूम मिळाल्यानंतरच बंदुकीत गोळ्या भरणे, आणि रायफल कॉक करणे अपेक्षित असते. 'फायर' असा हुकूम मिळाल्यानंतरच गोळ्या झाडायच्या असतात. फायरिंग पूर्ण झाल्यानंतर 'डिटेल'मधला प्रत्येक जवान आपापल्या सर्व गोळ्या झाडून झाल्याची, आणि बंदुकीची नळी रिकामी असल्याची खात्री करून तसा रिपोर्ट देतो. महत्वाचे म्हणजे, एखाद्या वेळी, फायरिंग करणाऱ्यांपैकी एखादी व्यक्ती, त्या ठिकाणी उपस्थित असलेला वरिष्ठ अधिकारीही असू शकतो. त्यालाही हे सर्व नियम तंतोतंत पाळावेच लागतात. 

फायरिंग पॉईंटसमोर ठराविक अंतरावर (रायफलसाठी सुमारे ३०० मीटर) एका उंचवट्यावर प्रत्येकाचे आपापले टार्गेट, म्हणजे बांबूवर चिकटवलेली कागदी मनुष्याकृती जमिनीत रोवून उभी केलेली असते. त्या उंचवट्याखाली, एका सुरक्षित खंदकात एक जवानांची टोळी (बट पार्टी) दडलेली असते. फायरिंग बंद झाल्याचा इशारा 'बट पार्टी'ला मिळताच, ते जवान खंदकातून बाहेर येतात. प्रत्येक टार्गेटवर लागलेल्या गोळ्यांची भोके मोजून त्यांची नोंद करणे आणि टार्गेट बदलणे, किंवा भोके बुजवून त्याच टार्गेटचा पुनर्वापर करणे हे त्यांचे काम असते. 'फायरिंग पॉईंट' आणि 'बट' एकमेकांपासून दूर असल्याने, त्यांचा आपसात फोनवर संपर्क असतोच. त्याचसोबत, फायरिंग सुरु होणार असल्याची आणि संपल्याची खूण म्हणून लाल किंवा पांढरे निशाण फडकवायची पद्धतही असते.

त्या दिवशी, आम्ही फायरिंग रेंजवर गेलो आणि ठरलेल्या पद्धतीप्रमाणे कारवाई माझ्या देखरेखीखाली सुरु झाली. आसपास बऱ्याच अंतरावर आणखी काही रेंज होत्या. तेथे इतर काही युनिट्सच्या तुकड्या फायरिंगचा सराव करीत होत्या. काही किलोमीटर अंतरावर तोफखान्याचाही सराव सुरु असावा. कारण, अधून-मधून तोफगोळे फुटण्याचे आवाज दुरून येत  होते. आमच्या फायरिंग पॉईंटच्या सुरक्षिततेसाठी, तिन्ही बाजूंनी वाळूची पोती एकावर एक रचून भिंती उभ्या केल्या होत्या. त्यापैकी एका बाजूच्या भिंतीला टेकून मी फायरिंग पॉईंटच्या बाहेर उभा होतो आणि तेथील कारवाई नियंत्रित करणाऱ्या कनिष्ठ अधिकाऱ्याला अधून मधून आवश्यक त्या सूचना देत होतो. फायरिंग करणारी डिटेल माझ्याही पुढे ५-७ फुटांवर पालथी झोपून, समोरच्या दिशेने गोळ्या झाडत होती. अर्थातच, जेथे मी उभा होतो ती जागा संपूर्णपणे निर्धोक होती. 

सर्व गोळ्या झाडून झाल्याचा आणि आपापल्या बंदुकीच्या नळ्या रिकाम्या असल्याचा रिपोर्ट त्या डिटेलमधील सर्वांनी दिला. मी लगेच थोडासा पुढे वाकलो आणि आमच्या सुभेदार साहेबांना म्हणालो, "ठीक है साहब, बट पार्टी को फोन करो और झंडा उपर करो।"

कंबरेत वाकून एवढे बोललो आणि पुन्हा सरळ होऊन, ३०० मीटर दूर असलेली बट पार्टी खंदकातून बाहेर आली की नाही ते पाहू लागलो. त्याच वेळी, माझ्या हनुवटीच्या काही इंच खाली, डावीकडून छोटेसे काहीतरी वेगात आले आणि जिला टेकून मी उभा होतो त्या वाळूच्या पोत्यांच्या भिंतीत शिरले. अर्थातच ती आलेली वस्तू मला दिसू शकली नव्हतीच. फक्त "झ्झ्  SS झप्प" असा काहीतरी आवाज मी ऐकला होता.

चमकून मी उजवीकडे पाहिले. माझ्या उजव्या गालापासून काही इंचांवर, एक वेडावाकडा, काळपट, दीड-दोन इंची लोखंडी तुकडा वाळूच्या पोत्यात घुसलेला होता. मी तो उपसून काढला तेंव्हा तो अजूनही गरम होता. आश्चर्याने मी त्या तुकड्याकडे पाहू लागलो. तोपर्यंत मला घडलेल्या प्रसंगाचे गांभीर्य लक्षातही आले नव्हते. त्या तुकड्याचे निरीक्षण करता, मी अंदाज केला की, दूरवर कुठेतरी होत असलेल्या तोफा किंवा मोर्टारच्या स्फोटानंतर त्या घातक बॉम्बचा एक छोटा तुकडा एखाद्या खडकावर आपटून माझ्या दिशेने आला असणार.      

जरा आणखी विचार करता, मी आपादमस्तक हादरलो! 

माझ्या लक्षात आले की, अक्षरशः एका निमिषापूर्वी मी वाकून उभा असताना, माझा गळा बरोब्बर त्या तुकड्याच्या विक्षेपमार्गातच होता! 

माझ्या चिरलेल्या गळ्यातून आवाजदेखील फुटला नसता. माझ्यासोबत आलेली प्रत्येक व्यक्ती, पुढे चाललेल्या फायरिंगच्या कारवाईकडे लक्ष ठेवून होती. मागे लेफ्टनंटसाहेब रक्ताच्या थारोळ्यात पडले असतील ही कल्पनाही कुणाला आली नसती!

तो बॉम्बचा तुकडा कुठेतरी आपटून माझ्या दिशेने येणे या घटनेला केवळ दुर्दैवी योगायोग इतकेच म्हणता येईल.  माझा जीव वाचावा यासाठी मी जाणीवपूर्वक काहीच केले नव्हते. किंबहुना, मी काही करूच शकलो नसतो. 

खरोखरच 'काळ' माझ्या दिशेने झेपावत आला होता, पण माझी 'वेळ' आली नव्हती इतकेच!

त्याकाळी मी सिगारेट ओढत असे. शांतपणे तो 'काळ' मी काड्याच्या पेटीत बंद केला आणि कामाला लागलो. ती काड्यांची पेटी पुढे काही वर्षे मी अगदी जपून ठेवलेली होती. 
मात्र, जागोजागच्या बदल्या आणि सामान हलवाहलवीच्या सत्रात, केंव्हातरी ती काड्यांची पेटीदेखील 'काळा'च्या उदरात कुठेतरी गडप झाली!

आता पुन्हा केंव्हातरी 'तो' येईलच, आणि बरोबर वेळही साधेल!

20 comments:

  1. प्रत्यक्षात काय घड़ले आहे ह्या जाणिवेचा क्षण खरोखरच थरारक व भीतिदायक असणार .

    ReplyDelete
  2. काळ आणि वेळ दोन्हीही सांगुन येत नाहीत हेच खरे.

    ReplyDelete
  3. काळ आला होता पण वेळ आली नव्हती

    ReplyDelete
  4. Oh Sir. U r lucky. Thrilling experience narrated precisely

    ReplyDelete
  5. Yes, u r v lucky Sir. काळ आला होता पण वेळ आली नव्हती!!

    ReplyDelete
  6. छान लेख आहे फक्त पुढचे लेख लवकरात लवकर पोस्ट करत चला...यावेळी वेटिंग जरा जास्तच झाली❤️🙏

    ReplyDelete
  7. 😰

    🙏🙂 धन्यवाद!

    फक्त A असं नाव आलंय कॉमेंटसोबत. 🤔

    कोण आपण? 🙏

    ReplyDelete
  8. बापरे, असे म्हणतात की प्रत्येक गोळीवर नाव लिहिलेले असते म्हणे.. नशीब तुमचे चांगले की त्या तुकड्यावर तुमचे नाव नवते..तुमची लेखन शैली खूप छान आहे..

    ReplyDelete
  9. काळ आणि वेळ दोन्ही सांगून येत नसतात हेच ख्ररे.वसंत जोशी

    ReplyDelete
  10. सब उपरवाले कि माया है

    ReplyDelete
  11. बापरे खरच भयानक होते.वेळ आली नव्हती.वाचताना थरकाप होतो.युद्धस्य कथा रम्या असे का म्हणतात तेच समजत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. आता विचार करता रम्य म्हणता येते. 🙂
      जान बची तो लाखों पाए।

      Delete