Labels

Thursday 15 April 2021

छुपे रुस्तम !

५८व्या NDA कोर्सच्या 'C' (चार्ली) स्क्वाड्रनमध्ये माझ्यासह अनेक वेगवेगळे 'नमुने' होते. प्रत्येकाची काही ना काही खासियत होती, जी आजही सर्वच कोर्समेट्सच्या लक्षात असेल. आमचा दिवंगत मित्र जोसेफ रेड्डी याच्या आठवणीने जरी  डोळ्याच्या कडा ओलावल्या तरीही, त्याच्या अनेक कोट्या आणि माकडचेष्टा आठवून आजही हसू फुटल्याशिवाय राहवत नाही.

रेड्डीचा खास मित्र, के. ए. मोहन, उर्फ  'स्पेको' हादेखील एक विनोदी 'वल्ली' होता.

नाकावरून सदैव घसरत असलेला चष्मा, तोंडाच्या एका कोपऱ्यातून बाहेर डोकावणारे जिभेचे टोक, आणि केंव्हाही हसू फुटेल असेच चेहऱ्यावरचे भाव, ही मोहनची छबी आजही डोळ्यासमोर येते. त्याची आणि जोसेफ रेड्डीची सतत एकमेकांशी चाललेली मस्करी आणि खेचाखेच, हा आम्हा सर्वांसाठी मोफत करमणुकीचा खेळ होता. मोहनला 'स्पेको' हे टोपण नावही कदाचित जोसेफ रेड्डीनेच बहाल केले होते.  

NDA मधली तीन वर्षे भुर्र्कन उडून गेल्यानंतर मात्र पुढील प्रशिक्षणाकरिता आम्हा कोर्समेट्सची पांगापांग झाली. हवाईदलात जाणारे मित्र डुंडीगळ येथील एयर फोर्स अकॅडमीमध्ये आणि नौदलात जाणारे मित्र कोचीन (कोची) येथील नेव्हल अकॅडमीमध्ये गेले. आम्ही आर्मीवाले, डेहरादूनच्या इंडियन मिलिटरी अकॅडमी (IMA) मध्ये दाखल झालो. परंतु, IMA मध्येही वेगवेगळ्या 'कंपनी' (होस्टेल्स) मध्ये आम्ही विभागले गेल्यामुळे तशी ताटातूटच झाली. प्रत्येक 'कंपनी'करिता ट्रेनिंगचे स्वतंत्र वेळापत्रक लागू असल्याने, भेटीही दुरापास्तच झाल्या. 

IMAच्या पासिंग आउट परेडनंतर कमिशन घेऊन, भारताच्या कोना-कोपऱ्यांमध्ये विखुरलेल्या आर्मीच्या निरनिराळ्या युनिट्समध्ये आम्ही रुजू झालो. एकाच किंवा जवळपासच्या मिलिटरी स्टेशनमध्ये योगायोगाने पोस्टिंग मिळालेले, किंवा टेंपररी ड्यूटीसाठी तेथे आलेले कोर्समेट्स क्वचित एकमेकांना भेटत असत. सर्व्हिसच्या सुरुवातीच्या काही वर्षांत, विविध ट्रेनिंग कोर्सेस करण्यासाठी बेळगांव, महू, पुणे अशा ठिकाणच्या ट्रेनिंग सेंटर्समध्ये आम्ही काही आठवड्यांकरिता जात होतो. नेमके एकाच वेळी तेथे एखादा कोर्स करण्यासाठी आलेल्या काही कोर्समेट्सचा अल्प सहवास लाभून जाई. 

माझा स्क्वाड्रनमेट स्पेको, कोणत्यातरी इन्फन्ट्री बटालियनमध्ये रुजू झाला होता इतपतच जुजबी आठवण मला होती. ९ वर्षे सर्व्हिस झाल्यानंतर स्पेकोची आणि माझी भेट अचानकच महू येथे झाली. आम्ही दोघेही एकच ट्रेनिंग कोर्स करण्यासाठी महूला गेलो होतो. अगदी नुकताच त्याचा विवाह झालेला असल्याने, तो सपत्नीक महूला आलेला होता. फॅमिली क्वार्टरमध्ये तो राहत असल्याने, आम्हा मेसमध्ये राहणाऱ्यांशी त्याचा संपर्क तसा कमीच येत होता. 

आम्ही सर्व्हिसला लागल्यानंतर काही वर्षांनी, म्हणजे १९८७ साली, भारतीय सैन्याने श्रीलंकेमध्ये 'शांति सेना' म्हणून प्रवेश केला होता. परंतु, आपल्या राजकीय नेतृत्वाची अपरिपक्वता आणि आततायीपणामुळे, LTTE या तामिळ फुटीर गटासोबत अनपेक्षितपणे युद्ध करण्याची पाळी आपल्या सैन्यावर आली होती. काहीही पूर्वतयारी न करता अचानक ओढवलेल्या, आणि १९९० पर्यंत चाललेल्या या युद्धात, सुमारे १२०० भारतीय वीर प्राणाला मुकले होते. या युद्धात भाग घेतलेल्या आपल्या अनेक पलटणींमध्ये, पॅराशूट रेजिमेंटची नववी कमांडो पलटणदेखील होती. आमच्या गप्पा-गप्पातून कोणाकडून तरी मला समजले की, स्पेको त्या पलटणीसोबत युद्धात सामील होता आणि त्याने तेथे काहीतरी विशेष 'कारनामा' केलेला होता. त्याबद्दलचे जे अधिक तपशील कानावर आले ते आश्चर्यकारक म्हणावे असेच होते. माझ्या आठवणीतल्या, थोड्याश्या लाजऱ्या, आणि 'बावळट ध्यान' दिसणाऱ्या स्पेकोकडून ते मला अपेक्षित नव्हते. 

१० ऑक्टोबर १९८८ रोजी, भारतीय गुप्तचर यंत्रणेने, LTTE च्या रेडिओ सेटवर चालेले एक संभाषण टॅप केले होते. त्यानुसार, श्रीलंकेच्या जंगलभागातील एका अरुंद पुलावरून, बंडखोर तामिळ 'टायगरां'ची एक तुकडी घेऊन LTTE चा एक मोठा नेता जाणार होता. वाहत्या नाल्यावरच्या त्या पुलाला बंदुकीच्या टप्प्यात ठेवून आपल्या पॅरा कमांडोंची एक तुकडी जंगलात दबा धरून बसली होती. जेमतेम २७-२८ वर्षांचा स्पेको त्या तुकडीचा कमांडर होता.  कित्येक तास वाट पाहूनही काहीच चाहूल न लागल्याने भारतीय कमांडो बेचैन झाले होते.  

गनिमी काव्याची संपूर्ण युद्धनीती अवगत असलेल्या LTTE च्या अतिशय विलक्षण कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास आपल्या सैन्याने केलेला होता. त्यामुळेच, एका फटफटीचा आवाज येताच आपली तुकडी सावध झाली. कारण, LTEE च्या युद्धनीतीनुसार, आधी दोन तामिळ टायगर एका फटफटीवरून पुढील रस्त्याची पाहणी करून परत येत असत. त्यानंतरच, मागून येणारा नेता व त्याची तुकडी पुढे येत असे. अपेक्षेप्रमाणे, ती फटफटी पुलावरून काही अंतर पुढे गेली आणि जवळजवळ लगेच मागे फिरली. आता परत जाऊन त्यांच्या नेत्याला त्यांनी 'ओके'चा इशारा देताच 'सावज' आपल्या टप्प्यात येणार या अपेक्षेने सर्व भारतीय कमांडो सज्ज झाले. 

परंतु, ज्या वेगाने ते फटफटीस्वार मागे फिरून गेले होते, ते पाहून स्पेकोच्या मनात पाल चुकचुकली. काही अंतरावर माणसांच्या ओरडण्याचा आवाज आणि ट्रॅक्टरवजा एका वाहनाचा मोठा घरघराटही त्याच्या कानावर आला. घातपाताचा संशय आल्यामुळे, आपले 'सावज' निसटून चालले असल्याची त्याची पुरती खात्री पटली. क्षणाचाही विलंब न लावता, स्पेकोने आपल्या एका जवानाच्या हातातील 'रॉकेट-लॉंचर' हे हत्यार घेतले आणि तो स्वतः पुलावर धावला. तेथे पोहोचताच त्याला दिसले की एक ट्रॅक्टर आणि त्याला जोडलेली ट्रॉली मागे वळून पळ काढण्याच्या तयारीत होते. 

स्वतःच्या जिवाची यत्किंचितही पर्वा न करता, आपला डावा पाय पुढे ठेवून आणि त्यावर किंचित रेलून स्पेको पुलावर उभा राहिला. त्याने रॉकेट-लॉंचर आपल्या उजव्या खांद्यावर ठेवला, नेम धरला आणि खटका दाबला. रॉकेटच्या स्फोटाने तो ट्रॅक्टर व ट्रॉली उध्वस्त झाली आणि त्यातील माणसे उडून खाली पडली. आपल्या संपूर्ण कमांडो तुकडीने तात्काळ धाव घेऊन त्या जागेला वेढा घातला. एकूण १३ तामिळ अतिरेकी ठार झाले होते. दोन जखमी अतिरेक्यांना जिवंत पकडले गेले. ९ हत्यारे, ३ वॉकी-टॉकी सेट, मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि LTTEच्या संदेशयंत्रणेशी संबंधित अनेक गुप्त कागदपत्रे ताब्यात घेतली गेली. 

परंतु, त्या स्फोटापाठपाठच, ट्रॅक्टरपासून बरेच अंतर ठेवून येत असलेले एक जीपवजा वाहन लगबगीने मागे फिरून धुरळा उडवीत निघून गेलेले स्पेकोने पाहिले. आपल्या गुप्तचर यंत्रणेने नंतर सुगावा लावला की त्या जीपमध्ये बसलेला, LTTE चा दुसऱ्या क्रमांकाचा नेता, गोपालस्वामी महेंद्रराजा उर्फ 'महात्तया' हा शिताफीने निसटला होता. 

कुठे तो, स्वतःच्या साथीदारांना मरायला पुढे पाठवून, स्वतः मागच्यामागे पळ काढणारा बेगडी 'टायगर', आणि कुठे, निधड्या छातीने एकटा शत्रूसमोर उभा ठाकलेला भारतीय कमांडो तुकडीचा खराखुरा वाघ - अर्थातच, आमचा मोहन उर्फ स्पेको !  

कॅप्टन के. ए. मोहन याने दाखवलेल्या त्या अतुलनीय शौर्याबद्दल त्याला भारत सरकारतर्फे, 'वीरचक्र' प्रदान करण्यात आले ! 

आणि इतक्या वर्षांनंतर झालेल्या आमच्या भेटीत या पट्ठ्याने त्या पराक्रमाबद्दल एक अवाक्षरही काढले नव्हते! 

त्याची ही शौर्यगाथा समजल्यावर मी स्पेकोला पुन्हा गाठले. कोर्समेटला शंभर अपराध माफ असतात हे मी जाणून असल्याने त्याची मस्करी करत म्हणालो, "क्यों बे स्पेको, How did you manage to get a Veer Chakra, yaar? चल, मेरे को सच्ची-सच्ची कहानी बता." 

मी केलेल्या चेष्टेच्या उत्तरादाखल, लटक्या रागाने माझ्या पोटात हलकासा ठोसा मारत मोहन म्हणाला, "तू नहीं जानता क्या? अपना व्ही. पी. सिंग है ना, (तत्कालीन पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री) वो मेरा अंकल है!" 

स्वतःच्याच विनोदावर माझ्यापेक्ष्याही मोठमोठ्याने हसत, आणि आत्मप्रौढी टाळत त्याने मला हाताला धरून खेचले आणि म्हणाला, "छोड ना यार पुरानी कहानी. Come, let's have a drink!"

मोहनच्या व माझ्या या भेटीनंतर दोन वर्षांनी जेंव्हा मी स्वतः SSB निवडसमितीवर काम करू लागलो तेंव्हा मला SSB मधील काटेकोर निवडपद्धतीला असलेल्या मर्यादा पूर्णपणे उमगल्या. कॅडेट अभिजीतसारखा एखादा 'ठकसेन' (वाचा "एक था ठकसेन!") निवडला जाणे हे त्या मर्यादांचेच एक अपवादात्मक उदाहरण होते. मात्र, बहुसंख्य उमेदवारांच्या अंगचे सुप्त गुण हेरूनच SSB निवडसमिती त्यांना पास करते, हेदेखील मला कळून आले. मोहनसारख्या प्रत्येक 'हिऱ्याचे' बाह्य स्वरूप कसेही असले तरी, पुढे त्याला पैलू पाडण्याचे काम आमच्या ट्रेनिंग अकॅडमी करीत असतातच. 

महूला झालेल्या त्या आमच्या भेटीत मात्र, मी मोहनकडे पाहत विचार करत होतो, हाच का तो "वेष बावळा..." असलेला कॅडेट मोहन, आमचा चष्मिश 'स्पेको'? 

आज माझ्यासमोर हसत उभा असलेला Capt. K. A. Mohan, VrC?  

17 comments:

  1. Nicely scripted, really Training in NDA and IMA converts the Carbon Lump into a piece of Diamond, Every passout of Academy is a Real Gem of a person

    ReplyDelete
  2. सुंदर, डोळ्यासमोर चित्र उभे राहिले, वीर स्पेको ला सलाम

    ReplyDelete
    Replies
    1. आजच सकाळी स्पेकोशी बोलून त्याची गोष्ट पोस्ट करण्यासाठी त्याची रीतसर परवानगी घेतली होती.😄

      आमचा NDA मधला ग्रुप फोटो माझ्याकडे होताच.

      त्याने त्याचा श्रीलंकेमधला फोटो मला पाठवला.
      त्यामुळे तोही ब्लॉगवर टाकता आला. 🙂

      Delete
  3. Replies
    1. I had spoken to Mohan this morning and sought his permission to post this on my Blog. 😄
      He not only permitted me, but also honoured my request for a snap from Sri Lanka, which I promptly posted along with the Story. 👍

      Delete
  4. Nicely narrated sir. Feel like reached the site. Your daring and courage is noteworthy. Hats off to your dynic leadership sir

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks. 🙂🙏

      Yes. Hats off to Mohan's rare sense of judgement and sheer bravery! 👍

      Delete
  5. Looks can be deceptive. Who exemplifies it better than Capt VAMohan, VrC. Kudos to the brave soldier from 9 Para, the warrior who stepped on the bridge with the rocket launcher. Please convey my heartfelt admiration and thanks to him when you talk to him Colonel. You have graphically recounted the engagement.
    Milind Ranade

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Milind.
      I have copy-pasted your appreciative message to Col. K. A. Mohan, VrC (Retd). 🙂

      Delete
  6. Salute to you n all your colleagues ������

    ReplyDelete
  7. ही वाचताना भितिने शहारेच आले अंगावर.रा.कि.आफाळेबुवा यांचे यू ट्यूबवर परमविरचक्र मिळालेल्या जावांनांच्या शौर्यकथा ऐकल्या तेव्हा आश्रु थोपवताच आले नाहीत.१ले आख्यान सियाचेनचे होते.

    ReplyDelete
  8. श्रीलंकेतिल पराक्रमाबद्दल स्पेकोला विरचक्र देऊन योग्य सत्कार केला याबद्दल त्याचे अभिनंदन आणि सरकारचेही.
    आपली सदसदविवेकबुद्धी जागृत ठेऊन आचूक निर्णय घेणारे त्याच्यासारखेच आपले शुर विर आमचे रक्षण कर्ते आहेत.

    ReplyDelete