Labels

Sunday 13 June 2021

जो शहीद हुए हैं उनकी...


आज १३ जून २०२१. 

चाळीस वर्षांपूर्वी, याच दिवशी, डेहरादूनच्या इंडियन मिलिटरी अकॅडमीमधील दीक्षांत संचलनानंतर 'अंतिम पग' पार करून एका नव्या आयुष्याला मी सुरुवात केली होती.

त्या दिवशी आम्ही, सुमारे तीनेकशे कॅडेट्स भारतीय सैन्यदलात अधिकारी म्हणून दाखल झालो होतो. तो दिवस आज एका संस्मरणीय पद्धतीने साजरा करावा असे आम्ही पुण्यातील काही कोर्समेट्सनी ठरवले. 

आमचे ५६ कोर्समेट्स आज हयात नाहीत. नैसर्गिक कारणांमुळे निधन झालेले काही मोजके मित्र वगळता इतर सर्व अधिकाऱ्यांनी देशासाठी प्राण पणाला लावून हौतात्म्य पत्करले. काही अगदी तरुणपणी श्रीलंकेतील युद्धात, काही ईशान्य भारतातील फुटीरवादी अतिरेक्यांसोबत लढताना, काही सियाचिनसारख्या दुर्गम प्रदेशामध्ये हेलिकॉप्टर अपघातात,  काही जम्मू-काश्मीरमधील घातपातामध्ये, तर काही अधिकारी कारगिल युद्धात शहीद झाले. 

आज पुण्याच्या युद्धस्मारकामध्ये एकत्र जमून त्या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करावी असे ठरले. युद्धस्मारकामध्ये असा समारंभ आयोजित करण्यासाठी, आम्ही सदर्न कमांड मुख्यालयातून पूर्वपरवानगी  मिळवली. समारंभाची सर्व व्यवस्था चोख ठेवण्यासाठी, कर्नल हुद्द्यावरील एक सेवारत अधिकारीही मुख्यालयाने नियुक्त केला. त्यामुळे, सैन्यदलाचे पाईप बँड पथक, पुष्पचक्रे व गुलाबपाकळ्या, आणि सशस्त्र सलामी देण्यासाठी सेनेची एक तुकडी, आम्ही तेथे पोहोचण्यापूर्वीच सज्ज होती. आमच्यापैकी काही अधिकाऱ्यांच्या पत्नीदेखील या प्रसंगी श्रद्धासुमने अर्पण करण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिल्या. माझ्यासोबत तर स्वाती आणि तिचे वयोवृद्ध वडील, ऍडव्होकेट श्रीकृष्ण उपाख्य दादा गोडबोलेही सहभागी झाले. सैन्यात सेवा करण्याचे दादांचे जुने स्वप्न अपुरे राहिले होते. त्यामुळे, त्यांना या प्रसंगी एक वेगळेच समाधान लाभले असावे.  

कोरोनाकाळात कुणी कुठेच बाहेर पडलेले नसल्याने युद्धस्मारकाच्या प्रवेशद्वारावर, जुने मित्र भेटताच आम्ही मनानेच चाळीस वर्षांपूर्वीच्या काळात थोडा वेळ रमलो. काही मित्रांना तर, दरम्यानच्या काळात एकदाही भेटलो नव्हतो. त्यामुळे, नाकातोंडावर मास्क लावूनच, पण गळाभेट घेण्याचा मोह काहींना आवरता आला नाही. 

सैनिकांच्या अंत्यसंस्कारापूर्वी किंवा एरवीदेखील शहीदांना श्रद्धांजली वाहतानाचे ढोबळ स्वरूप ठराविक असल्याने आम्हाला त्याची कल्पना होती. तरीही आजच्या समारंभाचे नेमके स्वरूप आमच्यापैकीच एका कोर्समेटने आम्हा सर्वांना समजावून सांगितले. त्यानंतर आम्ही स्मारकाच्या आवारातील लॉनवर मांडलेल्या खुर्च्यांवर स्थानापन्न झालो. कार्यक्रम सुरु होण्याचा इशारा मिळताच सर्वप्रथम, लयबद्ध हालचाली करीत, पाईप बँड पथकाचे आगमन झाले. पाठोपाठ, बँडच्या तालावर शिस्तबद्ध संचलन करीत, सशस्त्र सलामी देणारी तुकडीही पूर्वनियोजित जागी येऊन उभी राहिली. दोन जवान पुष्पचक्र धरून तयारीत उभे होते.  

आम्हा सर्वांच्या वतीने, आमच्यातील सर्वात वरिष्ठ पदावरून निवृत्त झालेला कोर्समेट, लेफ्टनंट जनरल शशांक उपासनी पुष्पचक्र वाहणार होता. आम्ही सर्वांनी जागेवरच उभे राहून त्याच्यासोबत सलामी द्यायची होती. पुष्पचक्र घेतलेले दोन्ही जवान पुढे आणि शशांक त्यांच्यामागून, असे संथ गतीने, म्हणजेच 'धीरे चल' ची कारवाई करत चालू लागले. स्मारक स्तंभाच्या चौथऱ्यापाशी पोहोचताच तिघेही थांबले आणि सलामी तुकडीची कारवाई सुरु झाली. 

सर्वप्रथम, 'सलामी शस्त्र' म्हणजेच, बंदूक एका विशिष्ट पोझमध्ये आणून, बँडच्या सूर-तालावर सलामी दिली गेली. त्यानंतर, सलामी तुकडी 'शोक शस्त्र' ची कारवाई करून उभी राहिली. या पोझमध्ये, बंदुकीचा दस्ता हातात आणि नळीचे टोक बुटावर टेकवून, मान झुकवून स्तब्ध उभे राहिले जाते. केवळ दिवंगत हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतानाच वाजवली जाणारी, 'लास्ट पोस्ट', ही करुण धून बिगुलावर वाजू लागली आणि आम्हा सर्वांना गलबलून आले.   

'शोक शस्त्र' ची कारवाई संपल्यानंतर, 'रेव्हिली' ही धून वाजवली गेली. तसे पाहता, 'रेव्हिली' ही धून, सैन्यदलाच्या प्रत्येक लहानमोठ्या ठाण्यावर रोज सकाळी, ध्वजारोहणाच्या वेळी वाजवली जाते. नवीन दिवस सुरु होण्याचा तो संकेत असतो. श्रद्धांजली देताना, प्रत्येक 'लास्टपोस्ट' च्या पाठोपाठ 'रेव्हिली' ही धून वाजवून जणू असा संदेश दिला जातो की, दिवंगत सैनिकाच्या आत्म्याने नवीन जगात, नवीन दिवस सुरु केला आहे आणि आपला शोक आवरता घेऊन आपणही तसेच केले पाहिजे!


आमच्या वतीने शशांकने पुष्पचक्र वाहिल्यानंतर, एकेक करून, सर्वांनीच स्मारक स्तंभापाशी जाऊन स्वहस्ते गुलाबपाकळ्या वाहिल्या व शहीदांना वंदन केले. मी, स्वाती व दादा जेंव्हा स्मारकाजवळ गेलो तेंव्हा आम्हा तिघांचेही डोळे पाणावले असले तरी, स्वातीला मात्र हुंदका अनावर झाला आणि सहजच तिच्या डोळ्यातून अश्रूधाराही स्मारकावर वाहिल्या गेल्या. माझ्या डोळ्यात उभ्या राहिलेल्या पाण्याच्या पडद्यावर मला अनेक मनुष्याकृती दिसू लागल्या. आसाममध्ये अतिरेक्यांसोबत दोन हात करत वीरगती प्राप्त केलेला माझा बालमित्र मेजर प्रकाश पाटील दिसला. काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या घातपातात धारातीर्थी पडलेला मेजर मोहित व्हिग दिसला. कारगिल युद्धात स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन, तोलोलिंग ही टेकडी अतिरेक्यांकडून परत मिळवणारा 'विशू', म्हणजेच कर्नल विश्वनाथनही दिसला.  

सहजच मला नागालँडची राजधानी कोहिमा येथील युद्धस्मारकावर लिहिलेल्या ओळी आठवल्या ... 

"परत जाऊन आपल्या घरच्यांना इतकेच सांगा, की त्यांच्या भविष्याकरिता आम्ही आमचा वर्तमानकाळ ईश्वरचरणी अर्पण केला."

"When you go back, tell them of us, and say, for your tomorrow, we gave our today."

जय हिंद!


[खालील लिंकवर क्लिक करा आणि 'लास्ट पोस्ट' व 'रेव्हिली' या दोन्ही सुरावटी ऐकताना डोळ्यातून अश्रू वाहू लागले नाहीत तर मला जरूर कळवा] 

https://youtu.be/t0oUoVHk9vQ

35 comments:

  1. Salute to you and all persons in uniforms,and will always remain in high esteem

    ReplyDelete
  2. देशासाठी
    प्राणार्पणाइतकं कुठलंच
    पुण्य असणार नाही.
    नतमस्तक झालो.
    आणि
    गहिवरलो.

    या हुतात्म्यांना,
    त्रिवार वंदन....!!!
    🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद डॉक्टर! 🙏🙂

      Delete
  3. Salutes with
    Last Post
    To
    Brabehearts.

    ReplyDelete
  4. Salutes with
    Last Post
    To
    Brabehearts.

    ReplyDelete
  5. Salutes with
    Last Post
    To
    Brabehearts.

    ReplyDelete
  6. आनंद
    खरंच संस्मरणीय दिवस .तुमच्या करिअरची सुरवात ज्या दिवशी झाली ,तो दिवस अशा पद्धतीने आठवावा हेच अभिनव आहे .
    मला भारतीय सेनेविषयी नितांत आदर आहे...
    एक कडक सलाम...
    जय भारतीय सशस्त्र सेना

    ReplyDelete
  7. सॅल्युट. .
    जय हिंद . .🇮🇳
    एव्हढंच म्हणू शकतो.🙏

    ReplyDelete
  8. अप्रतिम शब्दांकन. आपल्या सशस्त्र सेनेपुढे मी कायमच नतमस्तक होते. आपल्या देशातल्या लोकांना या बलिदानाची थोडीशी तरी चाड असती तर चित्र वेगळे दिसले असते.

    ReplyDelete
  9. धन्यवाद ज्योत्स्ना! 🙏

    ReplyDelete
  10. आजकालच्या भरकटलेल्या प्रत्येक तरुण पिढीने हा लेख वाचावा.. जीवन म्हणजे काय असत याची जाणीव प्रत्येकालाच असायला हवी...salute to all bravehearts....Lest we forget!!
    ~ Pradip Narsale

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you, Pradip! 🙏
      Do circulate it among your friends.
      Indian Army needs motivated youngsters! 👍

      Delete
  11. हे वाचून आणि लास्ट पोस्ट ऐकून डोळ्यात पाणी उभे राहिले.. सलाम त्या शूर वीरांना ज्यांच्या मुळे आम्ही सुरक्षित आहोत..

    ReplyDelete
  12. हे वाचून आणि लास्ट पोस्ट ऐकून डोळ्यात पाणी उभे राहिले.. सलाम त्या शूर वीरांना ज्यांच्या मुळे आम्ही सुरक्षित आहोत..

    ReplyDelete
  13. आदरणीय कर्नल आनंदजी,
    आपल्यासह ह्या देशाच्या अनेक शूर वीरांना आणि प्रिय भारतमातेला त्रिवार सादर प्रणाम. देशाच्या सीमेवर आपल्यासारखे अनेक योद्धे पहाडासारखे उभे असताना आम्ही सामान्य नागरिक निश्चिंतपणे अत्यंत सुरक्षित आयुष्य जगत असतो. रात्री सुखाची झोप घेतो. मी ह्यापेक्षा जास्त काय बोलू? पुन्हा एकदा विनम्र अभिवादन.
    "जय हिंद जय भारत"

    एक सामान्य नागरिक.
    सौ स्नेहा देसाई.

    ReplyDelete
    Replies
    1. सौ. स्नेहा देसाई,
      लढणाऱ्या सैनिकांच्या पाठीशी तन-मनाने खंबीरपणे उभा असलेला प्रत्येक नागरिक महत्वाचा आहे. त्या नागरिकाने स्वतःला सामान्य म्हणणे हा त्याच्या मनाचा मोठेपणा आहे. 🙏
      धन्यवाद

      Delete
  14. तिन्ही दलातिल आमचे रक्षणकर्ते आहेत म्हणून आम्ही निवांतपणे जगू शकतो.त्यांचे ऋण कधी फिटणारच नाहीत.ही पोस्ट इतकी हृदयस्पर्षी आहे.धून ऐकायची हिम्मत नाही.

    ReplyDelete
  15. धन्यवाद. 🙏
    धून अवश्य ऐका.
    ती ऐकताना डोळ्यातून ओघळणारे अश्रू "सैनिक हो तुमच्यासाठी" असे म्हणत वाहू द्या.

    ReplyDelete
  16. धून ऐकली.ही धून सिनेमात ऐकायला मिळते तेव्हाही अश्रु ओघळत असतात.नेहमी अशी काम करणारी माणसे त्यांच्या हृदयावर किती ताण येत असेल.निदान आम्ही रडून तरी घेतो पण त्यांना ते ही कर्तव्यापुढे करता येत नाही.कितीही वाईट प्रसंग असला तरी खंबिर रहावे लागते.

    ReplyDelete
    Replies
    1. सुजाण नागरिकांचा भक्कम पाठिंबा हाच जवानांचा आधार आणि स्फूर्तिस्थानही! 🙏

      Delete
  17. आम्ही बाडोद्याला गेलो होतो तेव्हा एक मःदिर पाहिले होते ते युद्धात जी विमान पडतात त्या पत्र्याचा करुन मंदिर तयार केले उपयोग केला होता.

    ReplyDelete
  18. माझ्या भल्या साठी गणवेश धारण केलेल्या माझ्या तमाम सैनिक बंधूंना शत शत नमन

    ReplyDelete
  19. डोळे भरून आले...या शूर वीरांना त्रिवार वंदन...!

    ReplyDelete