Labels

Saturday 10 July 2021

सिनियर-ज्युनियर

डिसेंबर १९८६ मध्ये माझ्या लग्नाला हजर असलेल्या नौदल अधिकारी मित्राने, लोकेश उत्तरवार याने, मला विचारले, 

"मग? लग्नानंतर कुठे घेऊन जाणार आहेस बायकोला?" 

खरे सांगायचे तर, मी त्याबद्दल काहीच ठरवले नव्हते. मी तसे सांगताच लोकेश तातडीने मला म्हणाला, 

"सध्या माझे पोस्टिंग गोव्यामध्ये आहे. तू सरळ गोव्याला आमच्या नेव्हल बेसवर ये. राहण्यासाठी एक सुसज्ज खोली आणि माझी स्कूटर मी तुझ्या ताब्यात देईन. मस्तपैकी जिवाचे गोवा करून घ्या राजा-राणी!" 

त्याचे आमंत्रण मी आनंदाने स्वीकारले. गोव्यात पोहोचताच मी व स्वाती टॅक्सीने नेव्हल बेसच्या मुख्य प्रवेशदारापर्यंत गेलो. तेथे तैनात असलेल्या नौसैनिकाने टॅक्सी थांबवून माझी ओळख विचारली. त्यावेळी माझा हुद्दा 'कॅप्टन' असा होता. माझे ओळखपत्र त्या नौसैनिकाच्या हातात देत, "कॅप्टन बापट" अशी माझी ओळख मी सांगितली. माझे शब्द ऐकताच त्या नौसैनिकाच्या चेहऱ्यावर कमालीचे आश्चर्य उमटलेले दिसले. माझ्या ओळखपत्रावर त्याने जेमतेमच नजर टाकली आणि मला एक कडक नेव्हल सॅल्यूट ठोकला.

स्वातीवर या प्रसंगामुळे चांगलाच प्रभाव पडला असणार या कल्पनेने माझी कॉलर ताठ झाली होती. पण स्वातीला  सैन्यदलांसंबंधी फारशी माहिती नसली तरी, अंगीभूत हुशारी आणि चाणाक्षपणामुळे तिला काहीतरी शंका आली होती. खोलीवर पोहोचल्यावर तिने विचारले, "तुला कडक सॅल्यूट ठोकतानादेखील तो नौसैनिक तुझ्याकडे  इतक्या आश्चर्याने का पाहत होता?"

"कारण, त्याला प्रश्न पडला असणार की, 'कॅप्टन' या वरिष्ठ रँकचा अधिकारी इतका तरुण कसा काय ?" 

माझे हे उत्तर ऐकून स्वातीच्या चेहऱ्यावर आणखी एक मोठे प्रश्नचिन्ह उमटले. 

"काही नाही. कदाचित, मी नौदलातील कॅप्टन आहे असा गैरसमज त्या नौसैनिकाच्या मनात निर्माण झाला असणार. नौदलामधली 'कॅप्टन' ही रँक पायदळातील 'कॅप्टन' या रँकपेक्षा पुष्कळ वरिष्ठ, म्हणजे 'कर्नल'च्या बरोबरीची असते!" तिन्ही सेनादलातील रँक्सबद्दल पहिला धडा मी स्वातीला दिला आणि दोघेही मनसोक्त हसलो.   

कोणत्याही क्षेत्रातील नोकरीमध्ये हुद्दा व सेवाज्येष्ठता, या दोन गोष्टींवर पगार, कामाचे स्वरूप, मिळणारा मान, पदोन्नती, हे सर्वच अवलंबून असते. पण, एखाद्या मुलकी कार्यालयात, एकाच हुद्द्यावर काम करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांच्या दैनंदिन जीवनात एकमेकांच्या सेवाज्येष्ठतेचा फारसा विचार सहसा मनात येत नाही. 

सशस्त्र सेनादलांमध्ये मात्र, रँक आणि सिनियॉरिटी या दोन्ही गोष्टींना विशेष महत्व आहे. अगदी ट्रेनिंगच्या काळापासून ते महत्व नकळतच आमच्या मनावर ठसत गेले. अकॅडमीमध्ये, आमच्यापेक्षा केवळ एक टर्म, म्हणजे सहा महिने सिनिअर असलेल्या कॅडेटलादेखील सदैव 'सर' म्हणूनच संबोधणे अपेक्षित असे. पुढे सर्व्हिसच्या काळात, एखाद्या अधिकाऱ्यासोबत वर्षानुवर्षे एकत्र काम केले असले, अगदी शेजारी-शेजारी राहिलो असलो, आम्हा दोघांच्या बायका-मुलांची कितीही घट्ट मैत्री असली, आणि मुख्य म्हणजे, दोघांची रँक जरी एकच असली तरीदेखील एकमेकांशी बोलताना, सेवाज्येष्ठतेनुसार ज्युनियर असलेला अधिकारी दुसऱ्याला 'सर' म्हणूनच संबोधत असे. हे सूत्र आम्हा सगळ्यांच्याच इतके अंगवळणी पडले आहे की, आज निवृत्तीनंतरही आम्ही ते तंतोतंत पाळतो. 

रँक आणि सिनियॉरिटीचे हे महत्व माझ्या मुलाच्या, अनिरुद्धच्या लक्षात लहानपणीच आले होते. त्यामुळे, आमच्या घरी कोणीही भेटायला आले असले की तो अचानक येऊन, बालसुलभ उत्सुकतेने विचारत असे, "बाबा, हे तुम्हाला सिनियर आहेत का ज्युनियर?" त्याचा तो प्रश्न ऐकून आम्हा सर्वांनाच हसू फुटे. 

सेवानिवृत्तीनंतरदेखील आम्ही आमच्या नावासोबत स्वतःची रँकही लावतो याचे अनेक सिव्हिलिअन लोकांना आश्चर्य वाटते. अशा वेळी मी त्यांना त्यामागील कारण समजावून सांगतो. कोणत्याही सरकारी सर्व्हिसमधील अधिकाऱ्यांचा हुद्दा त्यांच्या निवृत्तीपर्यंतच राहतो. परंतु, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १८ अन्वये, लष्करी अधिकाऱ्यांचा हुद्दा त्यांच्या हयातीतच नव्हे, तर मरणोपरांतदेखील त्यांच्या नावासोबत जोडलेला राहतो. मात्र सेवानिवृत्तीनंतर, 'कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)' अशा प्रकारे नाव लिहिणे अपेक्षित असते. 'सेवानिवृत्त' हा शब्ददेखील रँकनंतर नव्हे, तर नावानंतर लिहायचा असतो. "Rank never retires, the officer does." हे त्यामागचे सूत्र आहे!

सशस्त्र सेनादलातील रँक्स आणि त्यांचा क्रम अचूकपणे माहिती असलेले सिव्हिलिअन लोक तसे विरळाच. त्याउप्पर, पायदळ, नौदल, आणि हवाईदल या तिन्ही दलांतील रँक्स क्रमवार सांगू शकणारे लोक मला क्वचितच भेटले आहेत. कर्नल या हुद्दयावर असताना मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर, व्याख्याता, किंवा प्रशिक्षक म्हणून मी जिथे-जिथे आजवर गेलो तिथे श्रोत्यांना माझा परिचय करून देणाऱ्या व्यक्तींनी माझ्या नावामागे 'श्रीयुत', 'कॅप्टन', 'मेजर' किंवा 'श्रीयुत कर्नल' अशी विविध बिरुदे वेळोवेळी लावली आहेत. 

कर्नल हुद्द्याच्या अधिकाऱ्याला 'कॅप्टन' किंवा 'मेजर' म्हणणे म्हणजे, एखाद्या चीफ जनरल मॅनेजरला ओव्हरसियर किंवा सुपरवायझर म्हणण्यासारखे आहे. इतरांच्या अज्ञानामुळे, अनवधानाने होणाऱ्या माझ्या या पदावनतीवर उपाय म्हणून, "माझ्याबद्दलची माहिती श्रोत्यांना सांगण्यात वेळ घालवू नये, मी स्वतःच आपली ओळख करून देईन" असे सांगायला मी हळूहळू सुरुवात केली ! 

सैन्यदलातील रँक्सबाबत सिव्हिलिअन लोकांत असलेल्या अज्ञानासंबंधी अनेक विनोदही प्रचलित आहेत. 

एकदा म्हणे, एका निवृत्त सेनाधिकाऱ्याने एका सिव्हिलिअन मित्राला आपल्या मुलीच्या लग्नाची सुवार्ता दिली, "माय डॉटर मॅरीड अ सेकंड लेफ्टनंट लास्ट मंथ!"

हे ऐकून, आश्चर्य, दुःख, आणि थोडासाच आनंद, असे संमिश्र भाव चेहऱ्यावर घेऊन तो मित्र म्हणाला, "ओह! बट, व्हॉट हॅपन्ड टू द फर्स्ट लेफ्टनंट हू वॉज मॅरीड टू हर अर्लियर ?" 

सैन्यदलांमध्ये महिलांना अतिशय सन्मानाने वागवले जाते. इतके, की एखाद्या ठिकाणी काही वरिष्ठ अधिकारी बसलेले असताना तेथे जर कुणा महिलेने प्रवेश केला, तर सर्व अधिकारी उठून त्या महिलेला अभिवादन करतात आणि ती महिला स्थानापन्न झाल्यानंतरच आपापल्या जागी बसतात! ते अधिकारी जनरल रँकचे असतील आणि ती महिला एखाद्या कॅप्टनची बायको असेल तरीही!

सैन्यदलात विनोदाने असेही म्हटले जाते की प्रत्येक अधिकाऱ्यापेक्षा त्याची बायको एक रँक वरचढ असते! 

अर्थात, यामध्ये विनोदाचा भाग किती आणि तथ्य कितपत, हे वाचकांपैकी प्रत्येक नवऱ्याने प्रामाणिकपणे सांगावे. आणि तो नवरा सैन्यदलातलाच असावा अशी अटदेखील नाही!

14 comments:

  1. पत्नी नेहमी पतिच्या दोन पावले पुढेच असते. फिरायल‍ा जाताना मात्र पती पुढे आणि पत्नी मागे असे चित्र आपल्याला दिसते. त्याचे कारण पतीचे अनुकरण करण्यासाठी हे नसून, पतीवर लक्ष ठेवण्यासाठी असावे असे मला आपले नेहमी वाटते.(माझ्यासारख्या साध्याभोळ्या नवर्‍याला देखील हाच अनुभव येतो.) 😀

    कर्नलसाहेब, नेहमीप्रमाणेच आपला ब्लॉग सहजसुंदर भाषेने नटलेला आहे. वाचून आनंद वाटला.

    'शक्ती' हा शब्दच मुळी स्त्रीवाचक आहे. त्यामुळे पुरुषांनी कितीही बढाया मारल्या तरी बायकांची रँक त्यांच्या नवर्‍यांपेक्षा वरचढच असते ह्या आपल्या मताशी मी सहमत आहे. 🙏

    ReplyDelete
  2. छान लिहिलंय नेहमीप्रमाणे, बाकी betterhalf वरचढ असणे चांगलचं

    ReplyDelete
  3. धन्यवाद, नितीन!
    घरातल्या हुद्द्याबाबत बहुतेक पुरुष सहमत असणार.
    काही मोजकेच उघडपणे मान्य करतील!😂

    ReplyDelete
  4. Written in a fluent and flowing way Colonel. As they say (in lighter vein) a fauzi officer is a friendly person, easy to talk to but the fauzi wife (and even the fauzi daughter) can be formidable ��. Not Swatee tai though, i have met her��
    Another thing I noticed is that its not just his rank that an officer is particular about, its also his unit. One has to be either correct about it or not mention it at all.
    Milind Ranade

    ReplyDelete
    Replies
    1. Very rightly said, Milind!
      🙂
      Fauzi unit is another topic on which many civilians are not well-versed. It hurts even if you refer to the 'Regiment of Artillery' as 'Corps of Artillery'! 😉

      Delete
  5. छान लेख लिहिला आहे बापट साहेब

    ReplyDelete
  6. या विनोदी आठवणीने माझ्याही ज्ञानात भर पडली बरं.

    ReplyDelete
  7. खूप छान लिखाण झालय.सहज सुंदर सोप्या भाषेतले वर्णन त्यामुळे विशेष भावले.
    आपल्या बाबतित लग्ननंतरही वेळ कमी असतो आपल्या मित्राने छान बजावली..

    ReplyDelete