Labels

Friday 16 July 2021

...सुरा सुराही !

मी आर्मीमध्ये होतो हे ऐकल्यावर काही लोकांचे डोळे एका विशिष्ट प्रकारे चमकतात. आर्मीबद्दल थोडी प्राथमिक चौकशी झटपट करून झाल्यावर, एक ठराविक प्रश्न येतो, "तुम्हाला आर्मी कॅन्टीनमधून 'रम'चा कोटा मिळतो ना ?"

माझ्याकडून उत्तर यायला काही क्षणांचा उशीर झालाच तर, "नाही, नाही हो, मी घेत नाही. मी आपलं सहजच विचारलं" अशी सारवासारवही लगबगीने केली जाते! एखादा भोचक मनुष्य, "तुम्ही रोज घेता का?" वगैरे चौकशीदेखील करून मोकळा होतो! 

काही मोजके लोक अधिक चतुर असतात. त्यांच्याकडून सूचक प्रश्न येतात. "एकेकाला किती कोटा मिळतो? तुमचा सगळा कोटा तुम्ही वापरता का?" 

म्हणजे, "तुम्ही तुमचा सगळा कोटा वापरत नसाल तर, मी थोडासा वापरीन म्हणतो" अशा अर्थाचा तो प्रश्न असतो बहुतेक वेळा!

'आर्मी रम' बद्दल अनेक दंतकथाही प्रचलित आहेत. "आर्मी कॅन्टीनची ट्रिपल एक्स रम एकदम अस्सल असते. बाहेरची भेसळयुक्त असते." असे छातीठोक विधान कधी-कधी कानी येते. त्यामुळे, ओळखीतल्या 'आर्मी मॅन'च्या कोट्यामधून एखादी 'अस्सल सुरा सुराही' मिळवणाऱ्या महाभागाची पत त्याच्या मित्रकंपूमध्ये वाढत असावी!

काही 'चावडीवरचे तोंडपाटील' वेगळ्याच बाता मारीत असतात. "तिकडे फ्रंटवर प्रचंड बर्फातही तैनात राहून काम करायचं असतं. मग जवानांच्या अंगात पुरेशी उष्णता राहायला पाहिजे ना! म्हणून मग अस्सल 'ट्रिपल एक्स'ला पर्याय नसतो" वगैरे. 

'रम प्यायल्यावर अंगात उष्णता येते आणि थंडीपासून आपला बचाव होतो', याच्याइतका मोठा गैरसमज दुसरा नाही, हे वैद्यकीय व्यावसायिकच नव्हे तर, एखादा सूज्ञ मनुष्यही सांगू शकेल! सैन्यामधली वस्तुस्थिती अशी आहे की, समुद्रसपाटीपासून अत्यधिक उंचीवर, म्हणजे 'हाय अल्टीट्यूड' पोस्टिंगच्या ठिकाणी गेल्यानंतर, तेथे राहण्याचा सराव होईपर्यंत, सर्व जवान व अधिकाऱ्यांच्या मद्यसेवनावर संपूर्ण बंदी असते. सराव झाल्यानंतरही, प्रमाणाबाहेर मद्यसेवन न करण्याचा वैद्यकीय सल्ला दिला जातो. माझ्याकडून ही वस्तुस्थिती ऐकताच, ते सगळे 'तोंडपाटील' तोंडाचा 'आ' वासतात!

'आर्मी रम' संबंधी काही विनोदी प्रसंग मी अनुभवले आहेत. 

१९८५ साली मी कॅप्टनच्या हुद्द्यावर होतो आणि पुण्याच्या CME मध्ये इंजिनियरिंग करीत होतो. एके दिवशी माझा मित्र जयंत गोडबोले (जो पुढे माझा मेहुणा झाला) याचा फोन आला. "आज संध्याकाळी आपले मोजके मित्र मिळून जेवणाचा बेत करतोय गच्चीवर. तू येताना नेहमीप्रमाणे OMBK घेऊन ये."  

'ओल्ड मंक'  आणि 'ब्लॅक नाईट' यांसाठी OMBK हा कोडवर्ड होता!

त्या काळी जयंत नुकताच पुण्यात नोकरीला लागला होता आणि त्याच्या एका आत्याच्या रिकाम्या बंगल्यात राहत होता. मी पोहोचलो तेंव्हा, २-४ बॅचलर मित्र मिळून, पाव आणि अंडा बुर्जी अशा 'मेजवानी'च्या तयारीत मग्न दिसले. मला पाहताच, स्वाभाविकतः आनंदाची लाट पसरली. काही क्षणातच सगळे 'रम'माण झाले. काही मिनिटेच लोटली असतील, तोच बंगल्याखालून कोणीतरी जयंतला हाक मारीत असल्याचे ऐकू आले.

जयंताने वाकून पाहिले आणि गडबडीने म्हणाला, "अरे बाप रे, सोलापूरहून दादा (जयंतचे वडील) आलेले दिसतात. सोबत भाऊसुद्धा (जयंतचे पुण्यातले दुसरे आत्तोबा) आहेत. मी शक्यतो खालच्या खालीच त्यांची बोळवण करून येतो. पण सावधगिरी म्हणून तुम्ही दिवे मालवा आणि गाद्या पसरून झोपल्याचे सोंग करा."

अचानक आलेल्या या हल्ल्यामुळे एकच हातघाई उडाली. भराभर ग्लास लपवले गेले, स्टोव्ह विझवला गेला, आणि दिवे मालवून सगळ्यांची निजानीज झाली! मी नुसताच दरवाज्याआड उभा राहिलो. काही मिनिटांनी जयंत आला आणि म्हणाला, "चला उठा रे. दिवे लावा."

हुश्श म्हणत उठून, सगळे मित्र पुन्हा 'जैसे थे' होणार, तेवढ्यात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. जयंतच्या मागोमाग दादा आणि भाऊंचाही गच्चीवर प्रवेश झाला होता! 

"अरे, हे काय? गच्चीवर तुमची पार्टी चालू आहे हे ऐकल्यावर आम्हीही जॉईन व्हायला आलो. आणि इकडे सगळी निजानीज कशी?" हे वाक्य ऐकून सगळ्यांचे चेहरे मात्र फोटो काढण्यासारखे झाले. मला पाहून दादा (माझे भावी सासरे) म्हणाले, "अच्छा, कॅप्टनसाहेबांनी पेयपानाची व्यवस्था केलेली दिसते. चला, मग आमचेही ग्लास भरा!" 

मग काय? नवीन मेंबरांसोबत पार्टी पुन्हा सुरु झाली!

'आर्मीच्या ट्रिपल एक्स' चे एक वेगळे महत्वही मला सर्व्हिसच्या अगदी सुरुवातीच्या काळात समजले होते. त्याचा किस्सा वेगळाच आहे. 

एकदा अचानक मिळालेल्या सुट्टीवर, मी अमृतसरहून पुण्याला निघालो होतो. माझ्या सिनियरने मला एक मोलाचा सल्ला दिला. "अचानकच निघतो आहेस. रेल्वेमध्ये ऐन वेळी रिझर्वेशन मिळण्याची शक्यता कमीच आहे. एक रमची बाटली बॅगमध्ये ठेव. उपयोगी पडेल."

अपेक्षेप्रमाणे फर्स्टक्लासच्या तिकीट निरीक्षकाने मला बघून हात वर केले, "गाडी में बिलकुल जगह नहीं है."

"अहो TTE साहेब, प्लीज, रात्रीची वेळ आहे. मला डब्यात तरी चढू द्या. पुढे कुठे एखादी जागा झालीच तर बघा ना." वगैरे विनंत्या ऐकूनही तो काही बधेना. "मी सेनाधिकारी आहे आणि अचानकच सुट्टीवर निघालो आहे." हे वाक्य ऐकताच मात्र, त्याने मला डब्यात चढायची परवानगी दिली. गाडी सुरु झाल्यानंतर काही काळ दरवाज्यापाशी सामान ठेवून, मी त्यावरच बसून होतो. 

थोड्या वेळाने, तो तिकीट निरीक्षक माझ्याजवळ आला. "हे पाहा, तशी डब्यात जागा नाहीये. पण तुमच्यासाठी म्हणून, एका पुढच्या स्टेशनच्या कोट्यातला बर्थ मी तुम्हाला आत्तापुरता देतोय. केवळ तुम्ही सैन्यातले आहात म्हणूनच बरं का!" असे सांगून त्याने देशसेवेचा एक रतीब टाकला. 

कुपेमधल्या त्या बर्थवर मी स्थानापन्न होतो न होतो तोच, तिकीट निरीक्षक पुन्हा माझ्यापाशी आला. माझ्याबद्दल काही जुजबी चौकशी झाल्यानंतर, माझ्या 'कोट्या'पर्यंत त्याने विषय आणला. मग मात्र माझ्या डोक्यात लक्ख प्रकाश पडला, आणि रमची बाटली सोबत नेण्याचा सल्ला देणाऱ्या माझ्या सिनियरच्या दूरदृष्टीबद्दल मी त्याचे मनोमन आभार मानले. पण तरीही, माझ्याकडून काहीच ठोस बोलणे येईना असे पाहिल्यावर त्या माणसाने मला सरळच विचारून टाकले, "सुट्टीवर चालला आहात, म्हणजे तुमच्या सामानात असेलच की एखादी? तशी आम्हालाही चालते कधीकधी!"

'हो, हो आहे ना! थांबा काढून देतो." असे मी म्हणताच, "नाही नाही, मी घरी नेऊ शकणार नाही हो. अं... इथेच थोडीशी... तुम्ही कंपनी देणार ना?" असे विचारत, त्याने मलाही जॉईन होण्याचे आमंत्रण दिले! रेल्वे प्रवासात मद्यसेवन करण्यावर त्याकाळी फारसे कडक निर्बंध नव्हतेच, आणि फर्स्टक्लासमध्ये तर काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण मला स्वतःलाच ती कल्पना रुचत नव्हती. 

'आलिया भोगासी...' असे मनात म्हणत मी बॅग उघडू लागलो, तेवढ्यात, "अहो थांबा, थांबा, मी ड्यूटीवर आहे." असे म्हणून तो मनुष्य एकदम उठून निघूनच गेला. 

आता मात्र, त्या माणसाच्या मनात काय चालले आहे तेच मला कळेना. थोड्याच वेळात, दोन ग्लास हातात घेऊन तो परत आला. आता त्याने स्वतःच्या अंगातला कोट आणि टाय काढला होता. अर्थातच, त्याच्या समजुतीनुसार, तो आता ड्यूटीवर नव्हता!

भारतीय समाजव्यवस्थेत, पुरातन काळी, व्यवसायाची वस्तुविनिमय पद्धती (बार्टर सिस्टम) प्रचलित होती. परंतु, आधुनिक काळातही वापरामध्ये असलेल्या या 'रमविनिमय' पध्दतीमुळे, थेट मुंबईपर्यंतचा माझा प्रवास अगदी आरामात झाला !

'आर्मी रमच्या 'अस्सल'पणाविषयी प्रचलित असलेल्या दंतकथांसोबतच, सैन्यदलातील जवान व अधिकाऱ्यांच्या 'अट्टल पिण्या'बाबतही बरेच गैरसमज पसरलेले असतात. त्याबद्दलची वस्तुस्थिती आणि मला आलेले आणखी काही मजेदार अनुभव पुढील लेखात...  

13 comments:

  1. सैन्यजीवनस्य कथा रम्या: म्हणजे 'रम' च्या कथा हे मला नवीन कळले. 😀
    खूप छान, स्वच्छ निवेदन.

    ReplyDelete
    Replies
    1. 😂
      रमच्या दोनच. ही आणि यानंतरची.
      बाकीच्या कथा रम्यच! 🙏

      Delete
  2. रमाख्यानात 'रम'माण झाले..

    ReplyDelete
  3. Good afternoon sir. Very nicely covered. XXX rum story too good. Hats off to your writing. Thanks for sharing interesting story. Eagerly waiting for next in continuation

    ReplyDelete
  4. Eagerly waiting..!!गम का साथी रम😅

    ReplyDelete
  5. आपण जे लिहिले आहे ते खरे आहे.मिलिटटरी कँन्टिंनमध्ये चागल्या व स्वस्त वस्तु मिळतात असा सगळ्यांचा समज असतो व खरा ही आहे.

    ReplyDelete
  6. आपण जे लिहिले आहे ते खरे आहे.मिलिटटरी कँन्टिंनमध्ये चागल्या व स्वस्त वस्तु मिळतात असा सगळ्यांचा समज असतो व खरा ही आहे -- निलीमा माईणकर

    ReplyDelete