Labels

Wednesday 21 July 2021

व्हॉट इझ युअर पॉयझन ?

सैन्यदलातले जवान व अधिकारी, आणि त्यांचे मद्यसेवन या दोन्ही गोष्टींबाबत सामान्य माणसांच्या मनात अनेक गैरसमजुती असतात. लांब कशाला जा? अगदी माझ्या घरचेच किस्से सांगतो ना!

१९८६ च्या डिसेंबरात आमचे लग्न झाले.

त्यावेळी मी महू येथे ट्रेनिंग कोर्स करत होतो आणि स्वाती MD Medicine च्या टर्म्स भरत होती. आमच्या लग्नानंतर काही काळ ती महूला माझ्यासोबत राहिली होती. ३१ डिसेंबरला मी स्वातीला म्हणालो, "आज DSOI (डिफेन्स सर्व्हिसेज ऑफिसर्स इन्स्टिट्यूट) मध्ये न्यू इयर पार्टी असणार आहे. आपण जायचंय. खूप धमाल असते."

स्वातीने हळूच चौकशी करत, "तिथे काय-काय घडतं? पार्टीसाठी वेशभूषा काय अपेक्षित आहे? जेवणाची काय सोय असणार आहे?" वगैरे विचारलं, पण ती मनातून थोडी धास्तावल्यासारखी वाटली. स्वातीच्या माहेरी अगदी कर्मठ वातावरण जरी नव्हते तरी, आर्मीमधील आयुष्य तिच्यासाठी नवीनच असल्यामुळे, तिच्या मनात थोडी अज्ञाताची भीती असेल असा विचार मी केला.  

आम्ही संध्याकाळी साडेसात-आठच्या सुमारास DSOI च्या मुख्य दरवाज्यातून आत शिरतो न शिरतो तोच, "अर्रे बापट सर, कबसे इंतजार कर रहे थे हम..." असे म्हणत, माझा सहाध्यायी, कॅप्टन कुलविंदर सिंग लगबगीने पुढे आला. शिखांच्या (आणि बहुसंख्य सेनाधिकाऱ्यांच्या) ठराविक पद्धतीप्रमाणे, दोन्ही हात पसरून मला मिठी मारायच्या आवेशात  त्याला येताना पाहून, आणि त्याचा गडगडाटी आवाज आणि हास्य ऐकून स्वाती दचकलीच.

दोन मिनिटे गप्पा झाल्यावर कुलविंदर पुन्हा मित्रांच्या घोळक्यात शिरला. 

"आनंद, तो खूप प्यायला होता का रे?" असे स्वातीने विचारताच मी मोठ्याने हसलो आणि तिला समजावले की कुलविंदरचे वागणे-बोलणे सदा-सर्वदा असेच असते. पण तिचे समाधान झालेले दिसले नाही. 

तासाभराच्या आतच, ती मला हबकून म्हणाली, "आनंद, इकडे सगळ्यांच्या हातात ग्लास आहेत. काही जण तर किती मोठयामोठ्याने हसतायत. त्यांना फार चढली आहे असे वाटतंय. आपण घरी निघून जाऊ या का?" 

तिथे चाललेल्या गोंगाटात मी तिला जमेल तेवढे समजावले, "अगं, आताच कसं निघायचं? १२ वाजेपर्यंत थांबून नवीन वर्षाचं स्वागत नको का करायला? तुला वाटतंय तसं काहीही नाहीये. सगळे लोक बघ, किती आनंदात आहेत! काही जोडपी मजेत डान्स करतायत. त्यांच्या हातात ग्लास जरी असले तरी इथे प्रमाणाबाहेर कोणी पीत नाही. तू मुळीच घाबरू नकोस." 

पार्टी संपली, आणि कुठलाही गैरप्रकार न घडता, किंवा कुणालाही उचलून न्यावे न लागता, ते सगळे 'प्यायलेले' लोक आपापल्या वाहनाने शांतपणे घरोघरी निघून चाललेले पाहून स्वातीचा जीव भांड्यात पडला असावा. 

पुढे काही महिन्यांनी, एका मित्राकडे, होळीच्या निमित्ताने संध्याकाळी पार्टी होती. बायका दिवाणखान्यात बसल्या होत्या. आम्ही ४-५ जण दुसऱ्या खोलीत 'दूरदर्शन' वर 'हास्य कवी संमेलन' पाहत-ऐकत, मद्यपान करीत होतो. काही वेळाने अगदी गोरीमोरी होऊन, स्वाती माझ्याजवळ येऊन म्हणाली, "आनंद, तुझ्या हसण्याचा आवाज ड्रॉईंगरूमपर्यंत ऐकू येतोय. तू ठीक आहेस ना? वाटल्यास आपण वेळीच घरी जाऊ या."

वास्तविक पाहता, माझी परिस्थिती 'तशी' अजिबात नव्हती. त्यामुळे, मला स्वातीचा थोडा रागच आला होता, पण मी तिची समजूत काढली. घरी गेल्यावर मात्र, मी या विषयावर तिचे बौद्धिक घेतले. स्वाती वैद्यकीय व्यवसायात असल्यामुळे, दारूच्या आहारी गेलेले अनेक रुग्ण तिने पाहिलेले होते. त्याउप्पर, आर्मीतल्या लोकांबद्दल, आणि त्यांच्या 'पिण्याबद्दल' स्वातीला जी ऐकीव माहिती होती, त्याआधारे तिच्या मनात बरेच गैरसमज होते. पुढे हळूहळू आर्मीच्या जीवनपद्धतीशी जसा तिचा अधिकाधिक संबंध येत गेला तसे तिचे सर्वच गैरसमज दूर होत गेले.

मिलिटरीमध्ये पाळण्याचे काही रीती-रिवाज, प्रथा-परंपरा, ब्रिटिशांच्या काळापासूनच चालत आल्या आहेत. तसेच, 'सोशल ड्रिंकिंग' या स्वरूपात केल्या जाणाऱ्या मद्यपानाचे आणि त्यावरच्या मर्यादांचे काही लिखित आणि अलिखित नियमही आहेत. उदाहरणार्थ, 'ऑन ड्यूटी' असलेल्या व्यक्तीने मद्यपान करणे बेकायदेशीरच आहे.

सेनाधिकाऱ्यांच्या दैनंदिन जीवनात, एकमेकांच्या घरी जाणे-येणे, एकत्र जेवणे-खाणे, पिकनिकला जाणे, ऑफिसर मेसमध्ये या ना त्या निमित्ताने जमणे, अशा गोष्टींना महत्वाचे स्थान असते. त्यामुळेच, एखाद्या युनिटमधील सर्व कुटुंबांची मिळून एक मोठी जॉईंट फॅमिलीच तयार होते. कठीण काळात, हे आगळे-वेगळे 'एकत्र कुटुंब'च संपूर्ण युनिटचा आधारवड बनते. 

क्वचित, एक किंवा अधिक अधिकारी व त्यांच्या पत्नी मिळून, सहजच एखाद्या संध्याकाळी कुणाच्यातरी घरी जमतात. सुमारे तासभर एकत्र गप्पागोष्टी करून आपापल्या घरी परततात. या पद्धतीला 'कॉलिंग ऑन' असे म्हटले जाते. स्वतःच्या घरी आलेल्या पाहुण्यांना आपण आपल्याकडे विचारतो तोच प्रश्न यजमान विचारतात. पण, आर्मीच्या शिष्टाचाराप्रमाणे सर्वप्रथम महिलांना विचारले जाते, "काय घेणार?" 

त्यानंतर, अधिकाऱ्यांना तोच प्रश्न जरा वेगळ्या स्वरूपात विचारला जातो, "व्हॉट इझ युअर पॉयझन?" 

प्रत्येक वेळी शब्द हेच असतील असे नाही, पण अर्थ एकच असतो, "आपल्या आवडीचे मद्य कोणते?" एखाद्याची इच्छा नसेल, किंवा तो मद्यसेवन करीतच नसेल तर त्याला सरबत, सूप, किंवा चहा-कॉफी ऑफर केले जाते. 

आपण जेंव्हा कुणाकडे 'चहाला' म्हणून जातो तेंव्हा, गप्पा हाच मुख्य उद्देश असतो आणि चहापान हा केवळ एक उपचार असतो. आपण एखादा कप चहा घेतो आणि निघतो. त्याच भावनेने आणि तितक्याच सहजतेने, गप्पांसोबत दोन पेग मद्यसेवन झाल्यानंतर पाहुणे यजमानांचा निरोप घेतात. ऑफिसर्स मेसमध्ये किंवा घरोघरी वरचेवर होणाऱ्या पार्ट्यांमध्येही हेच सूत्र अवलंबले जाते. मद्याच्या धुंदीपेक्षाही, भेटीगाठी आणि गप्पांची लज्जत अधिक महत्वाची असते! हा शिष्टाचार सोडून वागणारा क्वचित एखादा अधिकारी असलाच, तर त्याला वरिष्ठांकडून वेळीच आणि सौम्य शब्दातच, पण सज्जड समज दिली जाते. 

माझ्या ओळखीचे असे अनेक सेनाधिकारी आहेत ज्यांनी ३०-४० वर्षांच्या सर्व्हिसमध्ये दारूचा थेंबही घेतलेला नाही. काही अधिकारी जवळपास रोज संध्याकाळी, पण अतिशय मर्यादित मद्य घेतात. आपापल्या घरी, अगदी बायको आणि मुला-बाळांदेखतही मोकळेपणाने मद्यपान केले जाते. तसेच, बायकांनी मद्य घेण्याबद्दलही कधी भुवया उंचावल्या जात नाहीत. एकंदरीत, 'पिण्याशी' सामान्यतः निगडित असलेला चोरटेपणा अजिबात नसल्याने हपापलेपणा नसतो. 

भरपूर 'ढोसून', त्याबद्दल फुशारक्या मारण्याची मानसिकता सहसा आर्मी सर्कलमध्ये आढळत नाही. "एक पूर्ण 'खंबा' आम्ही दोघात मिळून संपवला, मी नेहमी 'पतियाळा पेग'च भरतो!" असली विधाने आणि चर्चा आर्मी सर्कल्समध्ये होत नाही. जे मोजके लोक तसे करतात त्यांच्याकडे फारसे आदराने पाहिले जात नाही. मुबलक उपलब्ध आहे म्हणून, किंवा दुसरा कोणीतरी पाजवतोय म्हणून, पोटात भरून घेण्याची मानसिकता आर्मीमध्ये सहसा दिसत नाही.   

मद्यपानाविषयीच्या शिष्टाचाराला काही अपवादसुद्धा प्रचलित आहेत. नवीनच कमिशन घेऊन सेवेत जॉईन झालेला 'यंगस्टर' युनिटमध्ये दाखल होताच, त्याला एक 'डायनिंग इन' पार्टी दिली जाते. त्या पार्टीमध्ये, त्याला ठराविक मर्यादेपेक्षा अधिक मद्यसेवनाचा आग्रह निश्चितच केला जातो. पण, एखादी व्यक्ती कोणत्याही वैयक्तिक कारणामुळे, निग्रहाने दारू पिणारच नसेल, तर त्याला जुलूम-जबरदस्तीने पाजले जात नाही. 

अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीनिमित्त ऑफिसर मेसमध्ये पार्टी हमखास आयोजित केली जाते. विशेषतः कॅप्टन व मेजर पदावर बढती मिळालेल्या अधिकाऱ्याच्या खांद्यावर नवीन रँक चढवण्याचा कार्यक्रमच बहुतेक वेळा ऑफिसर मेसमध्ये होतो. त्या अधिकाऱ्याच्या हातात एक भलीमोठी ट्रॉफी दिली जाते. दीड-दोन बाटल्या बियर, आणि इतरही २-३ प्रकारच्या मद्यांच्या मिश्रणाने ती ट्रॉफी शिगोशीग भरलेली असते. ट्रॉफी तोंडाला लावून एका दमात रिकामी केल्यानंतरच, ट्रॉफीच्या तळाशी असलेले, नवीन रँकचे बॅजेस बाहेर काढता येतात. त्यानंतर, टाळ्यांच्या कडकडाटात युनिटचे कमांडिंग ऑफिसर आणि त्यांच्या हाताखालचा एखादा अधिकारी मिळून नवीन रँकचे बॅजेस त्या अधिकाऱ्याच्या खांद्यावर चढवतात. 


त्या मिश्र द्रव्याने पोट टम्म भरल्यानंतरच पदोन्नती प्राप्त होत असल्याने, 'भरून पावणे' हा वाक्प्रचार या प्रथेला निश्चित लागू होऊ शकेल! 

एकंदरीत सांगायचे तर, आर्मीमध्ये मद्यसेवनासोबत नेहमीच थोडीशी औपचारिकताही निगडित असते. पार्ट्यांमध्ये, सर्व अधिकारी सपरिवार हजर असतात. २६ वर्षांच्या सैन्यजीवनात माझ्यावर असेच संस्कार झालेले असल्यामुळे, 'दारू पिणे' या एकमेव उद्देशाने, आणि तेही फक्त एकेकट्या पुरुष मित्रांनी एकत्र जमण्याची कल्पना माझ्या पचनी पडतच नाही. म्हणूनच, "आज संध्याकाळी बसायचं का?" असा प्रश्न विचारणाऱ्यांच्या 'बैठका' मी प्रयत्नपूर्वक टाळतो. दिव्याच्या अवसेला 'गटारी साजरी करणे' हेही मला वैयक्तिकदृष्ट्या पटत नाही. 

मद्यपान करणे आणि मद्यपी असणे यात तसे पाहता पुष्कळ फरक आहे. परंतु, काही लोकांच्या मनात, मद्य आणि मद्यपान करणाऱ्यांच्याबद्दल प्रचंड तिरस्कारच असतो. हा लेख वाचून त्या लोकांची प्रतिक्रिया जर, "तुपात तळले, साखरेत घोळले, तरी कारले कडू ते कडूच" अशी आली, तरी हरकत नाही. 

कारण शेवटी, 

'ख़याल अपना अपना, पसंद अपनी अपनी!"

28 comments:

  1. Great sir
    Thanks for this good info
    My views about drinking has changed a lot because of this information

    ReplyDelete
  2. Nice coverage sir. Its fact in military services, u made it more clear. Good nack of writing u have sir

    ReplyDelete
  3. सर,
    Aarmy life मला माहित नाही पण काही असो मी मद्याच्या पूर्ण विरोधात आहे,हे माझे मत आहे, कृपया गैर समज नसावा,

    ReplyDelete
    Replies
    1. गैरसमजाचा काहीच प्रश्न येत नाही.
      आपण आपल्या मतावर ठाम राहावे. 🙂

      Delete
  4. Nice photos I saw you in army uniform for 1 st time.good article as always

    ReplyDelete
  5. छान लिहिलंत नेहमीसारखं. अभिनंदन. चांगली माहिती मिळाली. विशेषत: सैन्यातसुद्धा न पिणारे अधिकारी आहेत हे कळल्यामुळे आनंद वाटला. धन्यवाद.🙏

    ReplyDelete
  6. Nice,Anand.Military life aani madyapan, baddal, छान माहिती दिली.Mala hi military life baddal, suruwati पासुनच, एक विशेष कुतुहल आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद!🙏
      आपण नाव न लिहिल्याने कोणाचा अभिप्राय आहे ते समजले नाही.

      Delete
  7. खुप छान माहिती आणि अतीउत्कृष्ठ लिखाण.वाचण्यास खुप मजा आली.आनंद लिहीत रहा आणि आनंद देत रहा.
    रवींद्र सराफ

    ReplyDelete
  8. सुरेख लेखन शैली वाचताना प्रत्यक्षदर्शी असल्याचा भास होतो

    ReplyDelete
  9. तुमची लेखन शैली छान आहे,न पिनाऱ्यांची चेष्टा होत नाही हे विशेष आहे.

    ReplyDelete
  10. 🙂धन्यवाद 🙏
    खरंच. 'पिणाऱ्यां'चा तिरस्कार करणारे, आणि न पिणाऱ्यांची चेष्टा करणारे, हे दोन्ही गट आर्मीमध्ये आढळत नाहीत.

    ReplyDelete
  11. धन्यवाद
    कर्नल साहेब
    आता मी मराठीत लिहिणे सुरू केले आहे.
    त्या कॉमिक उत्तरामुळे
    मी शेवटी रोमन चा हट्ट फक्त आपल्या साठी सोडला.
    लेख अप्रतिम आहे,काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.
    आठवणीच्या गल्लीतील ह्या प्रवासात किती तरी "जिंदगी के सफर मे गुजर जाते है जो मुक्काम फिर नाहि... पण इथे ते परत एकदा येतात. धन्यवाद जिमी सर.

    ReplyDelete
    Replies
    1. क्या बात है!👏👏👏
      आभारी आहे 🙏

      Delete
  12. Perfect presentation of the reality 😊 Superb!!!

    ReplyDelete
  13. मद्य सेवनाबद्दल म्हणाल तर त्या भौगोलिक परिस्थितीत त्याची गरज असते.मद्यपिंबद्दल इथे जे पहातो ऐकतो.सिनेमातिल त्या संदर्भातिल अतिरंजित दृष्य यामुळे या बद्दल धास्ती जास्त असते त्यामुळे सुरवातिच्या काळात आपल्याबद्दल मिसेस मिसेसला जे वाटल ते होत.स्वाभाविक होत.

    ReplyDelete
    Replies
    1. होय. तिची भीती स्वाभाविक होती.

      आणि खरे पाहता, कोणत्याच भौगोलिक परिस्थितीत मद्यसेवन आवश्यक असते असे नाहीच.
      अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏

      Delete
  14. सुरेख लिहिले आहे. वेगळा विचार मांडला आहे.आमच्या सारख्या आर्मीच्या बाहेर असणाऱ्यांना आज एक वेगळी बाजू कळली।

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद 🙏
      आपले नाव कळेल का?

      Delete