Labels

Thursday 13 January 2022

धूम्रपान निषिद्ध आहे!

माझ्या लहानपणी, दूरच्या नात्यातल्या एका काकांना तपकीर ओढताना मी पाहत असे. त्यांना केंव्हा आणि किती शिंका येतात याची वाट पाहण्यात एक निराळीच गंमत होती. गेल्या कित्येक वर्षात तपकीर ओढणारा एकही इसम माझ्या पाहण्यात नाही.

हे 'शिंके' लोक जवळ-जवळ नामशेषच झाले असावेत अशी शंका मला येते. मात्र, आजकाल इतर काही अमली पदार्थांची भुकटी नाकाने ओढली जाते असे माझ्या नुसते ऐकिवात आहे. पाहण्याचा योग कधी (सुदैवाने) आलेला नाही.    

हातावर तंबाखू मळून दाढेखाली ठेवणारे, आणि वरचेवर, दोन बोटांच्या बेचक्यामधून पिंका टाकणारे 'थुंके' पूर्वी अगदी सर्रास दिसायचे. आजकाल तंबाखूची चंची आणि चुन्याची डबी क्वचितच पाहायला मिळते. मात्र, रंगीबेरंगी पुडयांमधून मिळणारे तंबाखूजन्य पदार्थ चघळणाऱ्या 'थुंक्यांची' संख्या पूर्वीपेक्षा वाढलीच असेल, कमी निश्चित झालेली नाही.  

माझ्या तरुणपणी, रस्तोरस्ती, घरोघरी, ऑफिसात, चित्रपटगृहाबाहेर, किंवा अगदी कुठेही विड्या-सिगारेटी काढून शिलगावणारे 'फुंके' खूप दिसायचे. हा ट्रेंड मात्र आता निश्चितच बदललेला आहे. जितके 'फुंके' ३०-४० वर्षांपूर्वी दिसत, तितके आज आढळून येत नाहीत. (हेही सुदैवच!) 

एखाद्या 'संस्कारक्षम' बालमनावर चांगल्याबरोबरच वाईट संस्कार करण्यामध्ये इतर अनेक घटकांसोबत सिनेस्टार मंडळींचा मोठाच हात असतो यात दुमत नसावे. १९६० आणि १९७०च्या दशकांमधल्या हिंदी सिनेहिरोंप्रमाणे आपणही सिगारेट शिलगावून हवेत धूम्रवलये सोडावी अशी इच्छा मला त्या काळी झाली नसती तरच नवल होते. 

वयाची दहा वर्षेही पूर्ण झालेली नव्हती तेंव्हा मी सातारच्या सैनिकी शाळेत दाखल झालो. वसतिगृहामध्ये राहत असल्याने आईवडिलांच्या नजरेचा धाक नव्हता, पण शाळेतील वातावरण शिस्तशीरच होते. तरीदेखील बारीकसारीक 'उद्योग' आम्ही करायचोच. 

मला वाटते, मी इयत्ता नववीत होतो तेंव्हाची गोष्ट असावी. माझ्यापेक्षा एक वर्ष पुढे असलेले, मक्या आणि नील नावांचे दोन हुशार पण 'उद्योगी' अवलिये काही काळ माझे 'आदर्श' होते. एके दिवशी दुपारच्या फावल्या वेळात त्यांचे गुपचूप काहीतरी चालू असल्याचे माझ्या लक्षात आले. मी तिथे डोकावताच, मलाही त्यांनी 'लिंबूटिम्बू' म्हणून सामावून घेतले.

रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत काही तास खपून त्या दोघांनी एक उपकरण बनवलेले होते. त्यांनी बुनसेन बर्नरच्या आंचेवर एक कॅपिलरी ट्यूब इंग्रजी 'L' आकारात वाकवून घेतली होती. त्या Lच्या लहान हाताच्या टोकाला त्यांनी थिसल फनेलचे, कमळाच्या आकाराचे बोंडूक बसवलेले होते. परिणामस्वरूप, त्या उपकरणाचा आकार अगदी तंबाखू ओढायच्या पाइपसारखा झाला होता. मी गेलो तेंव्हा त्या 'पाईप'च्या बोंडकात फिल्टर म्हणून थोडा कापूस ठेवून, त्याच्यावर 'गाय छाप', किंवा तत्सम पुडीमधला जर्दा ठासण्याचे काम ते दोघे मन लावून करीत होते!

थिसल फनेलचे बोंडूक आणि L आकाराची कॅपिलरी ट्यूब 

स्वतःच्याच कलाकृतीवर खूष होत त्या दोघांनी तो 'पाईप' पेटवला. शक्य तितक्या सराइतपणाच्या अविर्भावात दोन-दोन झुरके मारल्यानंतर त्यांनी दिलदारपणे 'लिंबूटिम्बू'लाही एक झुरका ओढायला दिला. आपण अगदीच बावळट दिसायला नको म्हणून, मीही झुरका मारला आणि त्या घाणेरड्या वासाच्या धुराचा ठसका दाबत त्यांना दाद दिली. 'फुंके'गिरीचा माझा तो पहिलाच अनुभव अजिबात सुखावह नव्हता. पण, त्या 'Forbidden Fruit' बद्दलचे आकर्षण मात्र कमी झाले नाही.   

१९७७ साली शाळेतून बाहेर पडून मी NDA मध्ये दाखल झालो. धूम्रपान इथेही वर्जितच होते. पण इथे मला मक्या-नील पेक्षाही 'उच्च दर्जाचे गुरु' भेटले. मी सैनिकी शाळेच्या शिस्तीतून NDAच्या, अधिक कडक शिस्तीच्या चाकोरीत आलेलो असलो तरी आमचेच काही कोर्समेट एक-दोन वर्षे कॉलेज कॅन्टीनचे चहापाणी, आणि तंबाखूचा धूर चाखून आलेले होते. 

त्या गुरु लोकांचे पुरवठादार होते आमच्या युनिफॉर्मची देखभाल करणारे ऑर्डर्ली, किंवा कपडे इस्त्री करून आणणारे धोबी! NDAच्या 'गोल मार्केट'मधून, किंवा जवळच्या उत्तमनगर वसाहतीमधल्या दुकानातून सिगारेट विकत आणण्याची जबाबदारी  ते अगदी थोडक्या मोबदल्यात बिनबोभाट पार पाडत असत.

त्या महागुरूंसोबतही मी लिंबूटिम्बू म्हणूनच काही काळ वावरलो. मी स्वतः त्यांच्यात केंव्हा सामील होऊन गेलो ते आता नेमके आठवत नाही. 

NDA कॅडेट्सनी धूम्रपान करणे नियमबाह्य असल्याने, सिगारेट ओढताना कोणी 'रंगेहाथ' पकडले गेल्यास, अथवा एखाद्याकडे 'मुद्देमाल' सापडल्यास कडक शिक्षा मिळायची. त्यामुळे, गुपचूप धूर काढण्यासाठी काही 'गुप्त' जागा ठरलेल्या असत. बाथरूममधल्या वॉटर हीटरची, तापून लाल झालेली कॉईल हा आमचा सोयिस्कर लायटर असे. कारण, तेथे सिगारेट शिलगावली की तडक टॉयलेटमध्ये शिरता येई! 

ठराविक 'गुप्त' जागांवर धूम्रपान करीत असलेल्या कॅडेट्समधला सिनियर-ज्युनियर भेदभावही नाहीसा होऊन, त्यांच्यात एक निराळाच 'बंधुभाव' निर्माण होत असे! 

पण त्या 'गुप्त' जागाही पूर्णपणे सुरक्षित नव्हत्या. कारण, आमच्या ट्रेनिंगसाठी नेमलेले बहुसंख्य अधिकारी स्वतः काही वर्षांपूर्वीच NDA मधून बाहेर पडलेले असल्याने, त्या 'गुप्त' जागा त्यांनाही माहीत असत! 

पुढे आर्मी सर्विसच्या काळात, जवळजवळ दहा वर्षे मी 'फुंके' लोकांच्या कळपात सामील होतो. बदलत्या आर्थिक परिस्थितीनुसार सिगारेटचे ब्रँड बदलत गेले. 'पाऊच'मधली तंबाखू कागदात भरून 'रोल' केलेल्या सिगारेटी, सिनेमात दिसायचे तसले सिगारेट-होल्डर, रुबाबदार पाईप, वगैरे 'स्टाईल' मारण्याचे वेगवेगळे प्रकारही अजमावून झाले.

लग्नानंतर, माझ्या डॉक्टर पत्नीच्या काळजीयुक्त दटावणीलाही न जुमानता काही वर्षे माझी 'फुंके'गिरी चालूच राहिली. सर्विसच्या काळात धूम्रपानाशी संबंधित काही विनोदी आणि काही थरारक अनुभवही आले. ते सर्व अनुभव, आणि धूम्रपानाच्या विळख्यामधून मी कसा आणि केंव्हा कायमचा बाहेर पडलो त्याची कथा मी लवकरच सांगेन... 

26 comments:

  1. वर्णन छान 👍
    पुढचं वाचायला कधी मिळतंय याची उत्सुकता निर्माण झाली आहे . .

    ReplyDelete
    Replies
    1. Nice write up .. somehow never fell prey to smoking, gutka or such related addictions .. I must be the only fool not having smoked ever.. I remember my IMA instructor telling us ,"No smoking means a quality shirt every month".. I always tell people I could never afford smoking even today.. I also gave up pain, superior, saunf etc in 1995 when my mother expired & never restarted till date .. incidently both my son's smoke but never infront of us .. some respect I guess .. Jai Hind 🇮🇳👍 Well done Anand

      Delete
  2. मस्त आहेत आठवणी धुम्रपानाच्या. मी पणं घ्यायचो कधी काळी 2 पाकीट. आता क्वचित.

    ReplyDelete
  3. Sir good evening. I am 63 years old and 45 years I was chain smoker, everyday I smoke 15 or more cigarettes. To quit the bad habit I traveled entire India twice by rail because in rail compartment smoking is ban but at last station in first ten minutes I smoke 3 cigarettes at a time. But on 28th April 20 when I heard sad demise of my father on law I quit cigarettes and till date not a single cigarette I smoke. Now I realize how much money I have wasted in smoke. Every month I can save Six or more thousands. Regards and Jai Hind

    ReplyDelete
    Replies
    1. OK. Good that you quit smoking.
      I could not come to know your name from your response.
      Can you please message / whatsapp me on 9422870294?

      Delete
  4. Nice blog. It has reminded our good old days. Thanks.

    ReplyDelete
  5. Nice narration and submission sir. Awaiting climax

    ReplyDelete
  6. छान. पुढील घटना वाचायला आवडतील. धूम्रपान हा विषय माझ्या दृष्टीने आकर्षक पण अगम्य आहे. मला कधीही सिगारेट ओढाविशी वाटली नाही किंवा कुणा मित्रानेही मला 'ओढ' म्हणून म्हटले नाही.
    त्यामुळे सिगारेट ओढणार्‍यांकडे मी आदराने बघतो. 'हर फिक्र को धुएँ मे मिटाता चला गया' म्हणत बेफिकीरपणे चालणार्‍या देवानंदचे कौतुक वाटायचे तेव्हा.

    ReplyDelete
  7. Very nicely drafted.
    I enjoyed it.
    Ravindra Saraf

    ReplyDelete
  8. Loved the prequel, awaiting the sequel 👌 Keep writing Anand ✍

    ReplyDelete
  9. Good article Anand. I still smoke one or two in a weeks span. But now time has come to quit smoking a bad habbit

    ReplyDelete
  10. खप छान artical . अनुभवकथन आणि प्रांजळपणे काही गोष्टी सांगितल्या. मनापासून कौतुक.
    🙏😊

    ReplyDelete
  11. You have a flair for writing Anand. Keep on expressing! Enjoyed reading. All the Best.

    ReplyDelete