Labels

Saturday 15 January 2022

स्मोकिंग कॅन किल !

"धूम्रपान आरोग्यास हानिकारक आहे" ही धोक्याची सूचना सिगारेट पाकिटांवर छापण्याची सक्ती लागू होण्यापूर्वीच्या काळातली गोष्ट.


कवि केशवसुतांच्या 'तुतारी' या प्रसिद्ध कवितेचे विडंबन मी कुठेतरी वाचले होते आणि ते मी मित्रमंडळींना ऐकवीत असे. "एक सिगारेट द्या मज आणुनी, पेटवीन मी स्वःकाडीने ..." असे काहीसे त्याचे शब्द होते. अर्थात, तो माझा पोरकटपणा होता आणि धूम्रपानाचे दुष्परिणाम तोपर्यंत माझ्या डोक्यात पूर्णपणे शिरले नव्हते हेही खरेच.  

जून १९८८ पासून जुलै १९९० पर्यंत मी आसाममधील तेझपूर येथे पोस्टिंगवर होतो. सिगारेट सोडायला मी उद्द्युक्त व्हावे असा एक प्रसंग १९८९ साली तेझपूरच्या युनिटमध्येच घडला होता.

एका रात्री सुमारे १२-१ च्या दरम्यान, फायर फायटिंग प्रॅक्टिससाठी अलार्म वाजवायचा हुकूम मी पहारेकऱ्यांना दिला. अकस्मात लागलेली आग विझवण्याची जवानांची क्षमता अधून-मधून तपासून पाहणे, हा माझ्या ड्यूटीचा एक भाग होता. 

युनिटच्या पेट्रोल पंपावर 'आग लागल्याची' (अर्थातच खोटी) वार्ता रात्रीच्या पहारेकऱ्यांनी घंटा वाजवून आणि आरडा ओरडा करून सर्व युनिटला कळण्याची व्यवस्था केली. झोपेतून उठून, आग विझवण्याची साधने घेऊन, आमचे जवान पेट्रोल पंपावर जमले आणि (न लागलेली) आग विझवण्यासाठी आवश्यक ती कारवाई त्यांनी केली. 

त्यानंतर सगळ्यांची शिरगणती सुरु झाली. एकूण किती जवान, आणि नायब सुभेदार, सुभेदार वगैरे कनिष्ठ दर्जाचे अधिकारी वेळेत हजर झाले हे तपासून त्याचा रिपोर्ट मला दिला जाणे अपेक्षित होते. मी एका बाजूला अंधारात उभा होतो. सगळेजण झोपेतून उठून अचानक आलेले असल्यामुळे, स्वतः Adjutant साहेब, म्हणजे मी, तेथे हजर आहे हे, रात्रीचे गार्ड वगळता, अन्य कोणालाच कळले नव्हते. 

जवानांची शिरगणती करून, मुख्य हवालदाराने तो रिपोर्ट सुभेदार अथवा सुभेदार मेजर दर्जाच्या अधिकाऱ्यांना देणे, आणि त्यांच्याहून कोणी वरिष्ठ अधिकारी हजर असल्यास सुभेदार साहेबांनी त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला तो रिपोर्ट देणे, अशी आमची प्रचलित पद्धत होती.

अशा तऱ्हेने तो रिपोर्ट माझ्यापर्यंत येण्याची मी वाट पाहत होतो. 

इतक्यात मला विडीच्या धुराचा वास आला. आपल्याला भास झाला असेल आधी मला वाटले. पेट्रोल पंपासारख्या ठिकाणी कोणी विडी ओढत असण्याची शक्यता नव्हती. 

पण एक-दोन क्षणातच माझी खात्री झाली की तो वास विडीच्या धुराचाच होता. मी चमकून इकडे-तिकडे पाहिले. माझ्या डावीकडे काही अंतरावर, पेट्रोल पंपावरच उभा राहून, एक मनुष्य चक्क विडी ओढत होता!

मला राग येण्याच्याही अगोदर, मी भीतीने नखशिखांत हादरलो. हजारो लिटर पेट्रोल व डीझेलचा साठा असलेल्या पंपाचा भडका उडण्यासाठी त्या विडीची एक ठिणगी पुरेशी होती!

मी त्या विडीबहाद्दराच्या दिशेने धावलो. त्याच वेळी त्याने झुरका घेतल्याने त्याचा चेहरा मला स्पष्ट दिसला. आमच्या युनिटच्या कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांपैकी सर्वात वरचे, म्हणजे खुद्द सुभेदार मेजर साहेबच निवांत विडी ओढत उभे होते!

मला कितीही राग आला असला तरी सुभेदार मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याला जवानांसमोर झापणे योग्य नव्हते. मी शक्य तितक्या दबक्या आवाजात त्यांच्यावर खेकसलो, "साहब, ये क्या कर रहे हैं आप?"

कहर म्हणजे, मला पाहताच त्यांनी ती जळती विडी हातातून खाली टाकली, आणि कडक सॅल्यूट ठोकत म्हणाले, "सॉरी सर, मुझे मालूम नहीं था कि आप भी आये हुए हैं। बडी नींद आ रही थी इसलिये बिडी जलाई थी। अगेन, व्हेरी सॉरी सर!"

त्यांचे ते वाक्य पूर्ण व्हायच्या आत मी त्या विडीच्या थोटकावर करकचून पाय दाबून ती पूर्णपणे विझल्याची खात्री केली होती. तरीही त्या भल्या माणसाला त्याच्या कृतीचे गांभीर्य समजलेच नव्हते. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या उपस्थितीत त्याने विडी ओढत उभे राहणे एकवेळ क्षम्य ठरले असते, पण पेट्रोल पंपावर विडी ओढणे?

धूम्रपानाच्या व्यसनाधीन असलेल्या त्या सद्गृहस्थाच्या डोक्यात, रात्री दीड-दोन वाजता या बाबतीत अधिक प्रकाश पाडणे कर्मकठीण होते. 

"अच्छा ठीक है साहब, कल बात करते हैं" इतकेच बोलून मी त्याच्या 'सॉरी'पुराणाला लगाम लावला आणि मनातल्या मनात 'हुश्श' म्हटले. 

जो प्रसंग अनेकांसाठी प्राणघातक ठरू शकला असता त्यातून बोध घेऊन मी त्याचवेळी माझी स्वतःची धूम्रपानाची सवय मोडू शकलो असतो. पण, "जान सलामत तो बिडी पचास" इतकेच कदाचित मी तेंव्हा मनाशी म्हटले असावे. 

१९९० सालच्या जुलै महिन्यात अचानक मला दिल्लीला हजर होण्याचा आदेश मिळाला. काश्मीरमधील वाढत्या अतिरेकी कारवायांना आळा घालण्यासाठी राष्ट्रीय रायफल्स नावाची एक नवीन संघटना उभी केली जात होती. त्या कामासाठी दिल्लीला बोलावले गेलेल्या ८-१० अधिकाऱ्यांमध्ये माझा समावेश होता. 

दिल्ली कॅन्टोन्मेंटमधल्या राजपुताना रायफल्स रेजिमेंटल सेंटरच्या ऑफिसर्स मेसमध्ये एकेकट्या अधिकाऱ्याला राहण्यासाठी खोल्या, ऑफिसच्या नावाने एक मोठा हॉल, एक टेबल आणि दोन बेंच इतकेच आम्हाला तात्पुरते वापरायला मिळाले होते. 

अक्षरशः शून्यातून सुरुवात करून, लढाईसाठी सुसज्ज असे राष्ट्रीय रायफल्सचे सेक्टर हेडक्वार्टर आणि त्याच्या अखत्यारीतल्या तीन बटालियन आम्हाला तीन महिन्यांच्या आत उभारायच्या होत्या. कारण, हिवाळा सुरु होण्यापूर्वी काश्मीर खोऱ्यामध्ये राष्ट्रीय रायफल्स तैनात करायचा भारताचा मनसुबा होता.

आम्ही युद्धपातळीवर काम करीत होतो. दिवसरात्र धावपळ, खाण्यापिण्याची हेळसांड, आणि दिल्लीचा उन्हाळा, या सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊन ऑगस्ट महिन्यात मी आजारी पडलो. व्हायरल ताप, सर्दी आणि खोकला एक दिवस अंगावर काढला. त्यानंतर मात्र मी पूर्णपणे आडवा झालो. दोन दिवस खोलीमध्ये पडून होतो. काहीही खाण्यापिण्याची इच्छाच होत नसल्याने अशक्तपणा आला होता. खोकून-खोकून घसा बसला होता. 

एका दुपारी असाच थकून बिछान्यात पडलो असता, कसेबसे अर्धवट उठून, शेजारच्या टेबलावर हात फिरवत, चाचपडत, मी सिगारेटचे पाकीट शोधू लागलो. माझ्या धडपडीत ते पाकीट खाली पडले. मोठ्या कष्टाने मी ते उचलले आणि त्याच क्षणी, वीज चमकावी तसा एक प्रश्न माझ्या मनात उमटला, 

"अरे, काय करतोयस? अंगात त्राण नाही, सोलवटलेल्या घशातून शब्द फुटत नाहीये, आणि धडपड करतोयस सिगारेट ओढण्याची?"

तो क्षणभरच मी थबकलो, आणि पुढच्याच क्षणी, तिरीमिरीत ते पाकीट शेजारच्या खिडकीतून भिरकावून दिले. स्वतःलाच शिव्या घालत मी पुन्हा आडवा झालो. 

एका मिनिटाच्या आतच माझा एक ज्युनियर, शीख अधिकारी, कॅप्टन नवतेज सिंग माझ्या खोलीमध्ये शिरला आणि एक सिगारेट पाकीट मला दाखवत म्हणाला, "क्या बात है सर, इस में तो अभी चार सिगरेट बाकी है। आपने पॅकेट फेंक क्यों दिया?" 

मीच खिडकीतून फेकलेले ते सिगारेटचे पाकीट बघून माझा स्वतःवरचा राग पुन्हा उफाळून आला. 

"जानबूझकर फेंक दिया। आज से मैंने सिगरेट छोड दी है!" 

माझे वाक्य ऐकताच नवतेज सिंग आश्चर्यचकित झाला. तरीही खात्री करून घेण्यासाठी त्याने मला पुन्हा दोनदा विचारले. माझे उत्तर बदलत नाही हे पाहताच तो म्हणाला. "अरे वाह सर, दोस्त हो तो आप जैसा हो। थँक यू सर!"

त्याने डोक्यावरची पगडी काढली आणि माझ्याच त्या पाकिटातली एक सिगारेट ओठातधरून पेटवू लागला. पण मला तो धूरही माझ्या खोलीत नको होता. त्याला मी जवळ-जवळ खोलीबाहेर हाकललेच.

शीख लोक सहसा सिगारेट ओढत नाहीत. पण त्यांच्यातही नवतेजसिंगसारखे मोजके 'फुंके' अपवाद असतात हे पुष्कळ लोकांना माहीत नसेल! स्वधर्माचा अवमान नको म्हणून सिगारेट फुंकण्यापूर्वी पगडी काढून ठेवणे ही त्यानेच शोधून काढलेली अजब पळवाट होती! 

धर्मप्रथेविरुद्ध वागणारा आणखी एक मनुष्य मला पुढे १९९९ मध्ये भेटला. भारत-पाकिस्तान सेनाधिकाऱ्यांची फ्लॅग मीटिंग सुरु असताना एका पाकिस्तानी मेजरने 'पाईन' ब्रॅण्डच्या सिगारेटचे पाकीट काढून मला सिगारेट ऑफर केल्याची कथा मी पूर्वी "मेरे दुष्मन, मेरे भाई?" या लेखात सांगितली आहे.

दिल्लीच्या वास्तव्यात मी सिगारेट सोडल्यानंतर एखाद्या वर्षभरातलाच प्रसंग असेल. 

मी झेलम एक्सप्रेसने जम्मूहून पुण्याकडे येत होतो. योगायोगाने माझा एक NDA कोर्समेट माझ्याच डब्यात होता. वाटेत एका स्टेशनवर आम्ही चहा प्यायला आणि पाय मोकळे करायला उतरलो. AC कंपार्टमेंटमध्ये त्याने बराच वेळ आपली तल्लफ रोखून धरली असावी, कारण स्टेशनवर उतरताच त्याने सिगारेटचे पाकीट काढले. आधी एक सिगारेट स्वतः घेतली आणि मगच पाकीट माझ्यापुढे धरले. 

"मी सिगारेट सोडली" हे माझे वाक्य ऐकताच त्याने अविश्वासाने माझ्याकडे पाहिले. पण मी निक्षून नाही म्हटल्यावर त्याने स्वतःची सिगारेट पेटवली आणि आम्ही चहाच्या स्टॉलकडे निघालो. 

इतक्यात माझा मित्र अचानक वळला आणि म्हणाला, "अरे यार, मैं अपना वॉलेट लाना भूल गया। तू जरा मेरी सिगारेट पकड, मैं अभी वॉलेट लेके आता हूँ।"

त्याने माझ्या हातात त्याची पेटती सिगारेट दिली आणि तो गाडीच्या डब्यात परत गेला. १-२ मिनिटांनंतर तो परतला आणि त्याने माझ्या हाताकडे पाहिले. त्याच्या सिगारेटचे माझ्या हातात उरलेले बारकेसे थोटूक आणि त्यावर साठलेली राख बघून तो म्हणाला, "तूने एक कश भी नहीं लिया? यार, अब मैं मानने को तैयार हूँ कि तूने सचमुच सिगरेट छोड दी है !"

अर्थातच, त्याने माझी परीक्षा पाहिली होती. आणि ती मी स्वतः घेतलेली माझी परीक्षाही होती, ज्यात मी उत्तम मार्कांनी पास झालो होतो! 

दिल्लीला, २८ ऑगस्ट १९९० ला मी सिगारेट सोडली होती ती कायमचीच!

31 comments:

  1. Both ब्लॉग्स on the subject very nicely written . U have the expertise to make a mundane subject very interesting....

    ReplyDelete
    Replies
    1. सिगारेटचे व्यसन सुटणे केवळ अशक्यप्राय परंतु....

      मी 31 डिसेंबर 2007ला संध्याकाळी हॉटेलात चहा पीत पीत सिगरेट ओढत हितो नवीन वर्षाच्या संकल्पाचा विचार अचानक डोक्यात आला आणि मी सिगरेट पायाखाली चुरडली आणि 15 वर्ष झाली आजतागायत मी सिगरेट ओढली नाही . मी सुग्रेट सोडण्यात यशस्वी झालो,.

      Delete
  2. मी अनेक वेळा सोडली आणि सुरु पणं केली, अर्थात सिगारेट शिवाय राहूच शकत नाही असे नाही self control आहे.आता 25 dec नंतर एकही झुरका नाही. घरी माझ्या आवडत्या ब्रँड चा स्टॉक असतोच आणि या सवयीचा मला गमतीदार अनुभव पणं आला आहे. प्रत्यक्ष भेट झाली तर सांगेन

    ReplyDelete
  3. फुंके समूहाचे सदस्यत्व सोडलेल्या घटनेने आता तिशी पार केली...
    असाच निग्रह दाखवून इतरांनी अनुकरण करावे

    ReplyDelete
  4. It's motivational writing to quit cigarette.

    Nice one

    ReplyDelete
  5. Nice story sir. Great and good decision

    ReplyDelete
  6. नेहमीप्रमाणेच छान वाचनीय ब्लॉग. 🙏

    ReplyDelete
  7. Good life changing decisions are always taken in split seconds

    ReplyDelete
  8. Your writing is really very interesting

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks. 🙏
      I wish I knew your name. 🤔

      Delete
    2. व्वा! सुरूवातीचा थरारक किस्सा आणि नंतरचा सिगरेट सोडली, तो किस्सा अतिशय रंजक अन् कौतुकास्पद!
      🙏😊

      Delete
  9. असं दिलखुलास लिहिलयस. मस्त. माझी बिअर अशीच काही कारणाने बंद झाली. सुरू सप्टेंबर ८७ ~ बंद ३१ डिसेंबर ८८ ला. सर्वात मजेचा भाग असा की तेव्हा (८८ मधे) मला माझे tea totler मला वाह्यात समजत होते. पुढे सर्वाची लग्न.. मुलं.. मुलं मोठी झाली. आता तेच माझे मित्र मला विचारल्यावर मी drinks घेत नाही म्हणल्यावर अशीच माझी test घेतात, मला प्रेमाने आग्रह ही करतात. पण मी घेत नाही. .. मित्राची बायको माझ्या बायकोच कौतुक करतात

    ReplyDelete
    Replies
    1. लेखनशैली आवडली.
      Good example of strong will power

      Delete
    2. धन्यवाद.🙏
      आपले नाव कॉमेंटसोबत आले नाही.
      कळू शकेल?

      Delete
  10. Immense willpower - thats what you exemplified Colonel. Written in the usual interesting manner, the article is inspiring.
    Milind Ranade

    ReplyDelete
  11. सर आपण लिहिलेला कीस्सा खुप रंजक आहे आणि आपला मनोनिग्रह कौतुकास्पद आहे.माला पुण्यातील एका प्रोजेक्टवर सिव्हिल इंजिनिअर म्हणून काम करतानाचा कीस्सा आठवला.आपल्या अंतर्मनातून आलेला मनोनिग्रहाचा आवाज महत्वाचा असतो.सततच्या कामाच्या ताणामुळे आम्ही साईटच्या कॅन्टीन ला चहासाठी सगळे इंजिनिअर ग्रुप एकत्र जमत असु.त्यावेळी सर्वांचे सिगारेट स्मोकींग होत असे.मित्रांनी मला बर्याच वेळा औफर केली जायची.मी घेत नाही असे लक्षात आल्यावर मला ते चॉकलेट द्यायचे.मी ते आनंदाने घ्यायचो.पण ती सवय भविष्यात पुढे लागलीच नाही.

    ReplyDelete
  12. सुंदर आत्मविवेचन

    ~ शशिकांत गुजर

    ReplyDelete