थोड्याच वेळात, एक मध्यमवयीन पंजाबी महिला आणि तिच्यासोबत एक नितांतसुंदर तरुणी
सीट नंबर शोधत येताना दिसले. एखाद्या अविवाहित तरुणाच्या मनात येतील ते सर्व विचार माझ्याही मनात येऊन गेले. त्यापैकी सकारात्मक विचार एकच, आणि तो म्हणजे, या सुंदरीची सीट नेमकी माझ्याच कंपार्टमेंटमध्ये असावी. पण हा विचार दहापैकी नऊ वेळा सफल होत नाही असा सर्वसाधारण अनुभव आहे. मग सहसा काय घडतं? एक तर ती दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये जाऊन बसते, किंवा मावशीला टाटा करून घरी जाते, आणि अगदीच वाईट म्हणजे ती आपल्यापाशी येऊन म्हणते, "माफ करा, पण बहुतेक तुम्ही माझ्या सीटवर बसला आहात!
सीट नंबर शोधत येताना दिसले. एखाद्या अविवाहित तरुणाच्या मनात येतील ते सर्व विचार माझ्याही मनात येऊन गेले. त्यापैकी सकारात्मक विचार एकच, आणि तो म्हणजे, या सुंदरीची सीट नेमकी माझ्याच कंपार्टमेंटमध्ये असावी. पण हा विचार दहापैकी नऊ वेळा सफल होत नाही असा सर्वसाधारण अनुभव आहे. मग सहसा काय घडतं? एक तर ती दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये जाऊन बसते, किंवा मावशीला टाटा करून घरी जाते, आणि अगदीच वाईट म्हणजे ती आपल्यापाशी येऊन म्हणते, "माफ करा, पण बहुतेक तुम्ही माझ्या सीटवर बसला आहात!
त्या दिवशी मात्र माझा सकारात्मक विचारच फळाला आला आणि मला सुखद धक्का बसला. त्या दोघी माझ्याच कंपार्टमेंटमध्ये आल्या आणि सामान ठेवून स्थिरावल्या. त्या धक्कयातून सावरून मी त्यापुढील आणखी सुखद शक्यतांचा आणि माझी रणनीती काय असावी याचा विचार करू लागलो. तेवढ्यात उरलेले तीन सहप्रवासीही अवतरले. त्यातले दोघे तिशी-पस्तिशीच्या आसपासचे, आणि अगदी दोन मैलांवरूनही ओळखू येतील असे टिपिकल फौजी जवान होते. त्यांनी आपले अवजड सामान स्वतःच्या सीटखाली ठेवले आणि ते इतर साथीदारांसोबत शेजारच्या कंपार्टमेंटमधे निघून गेले. तिसरा सहप्रवासी तुकतुकीत चेहऱ्याचा, साधारण माझ्याच वयाचा तरुण होता. त्यानेही सीटखाली सामान ठेवले आणि माझ्याकडे ढुंकूनही न पाहता त्या मुलीला आणि तिच्यासोबतच्या महिलेला हसून अभिवादन केले. अगदी जुनी ओळख असल्यासारखे. त्या दोघीही त्याच्याकडे पाहून तोंडभरून हसल्या. सहजच त्याने त्या दोघींसोबत संभाषण सुरू केले. त्यांची आधीपासूनची काहीच ओळख नव्हती हे लगेच समजले. आणि तो तरुण संभाषणकलेत माझ्यापेक्षा चतुर आणि चटपटीत असल्याचेही लक्षात आले.
त्या दोघी दिल्लीला चालल्या होत्या आणि तो मुंबईला निघाला होता हे त्यांच्या पुढच्या दोन वाक्यातच उघड झाले. त्या तरुणाची टकळी चालू झाली आणि मी फक्त एका बघ्या आणि श्रोत्याच्या भूमिकेत गेलो. तो तरुण भारतीय नौदलातील जवान म्हणजेच एक सामान्य खलाशी होता आणि मुंबईच्या नाविक तळावर असलेल्या अमुक नावाच्या एका बोटीवर कार्यरत होता असे समजले. ती मुलगी आणि तिची आई उत्तर प्रदेशातील कुठल्याश्या गावी एका लग्नासाठी निघाल्या होत्या हेही कळले. मधेच एकदा माझ्याकडे पाहून त्या तरुणाने अभिवादन केल्यासारखा चेहरा केला आणि पुन्हा आपले लक्ष त्या तरुणीकडे वळवले. त्याच्या मुंबईच्या वास्तव्यातील गमती-जमती आणि भारतीय नौदलाच्या बोटीवरील थरारक अनुभव यांचे रसभरीत वर्णन ऐकून त्या तरुणीची छान करमणूक होत असल्याचे मला दिसले. मग त्या तरुणाने खिशातून 'डनहिल' सिगारेटचेे पाकीट बाहेर काढले. त्या काळी नौदलातील खलाशांनासुद्धा इंपोर्टेड सिगारेट आणि इतर विदेशी वस्तू सहजी मिळत याचा आम्हा आर्मी अधिकाऱ्यांना खरोखरच मत्सर वाटे. तो सिगारेट शिलगावणार होता पण तेवढ्यात त्या मुलीच्या चेहऱ्यावरचे भाव त्याने टिपले. तिची संभाव्य नाराजी ओळखून तो सूज्ञपणे बाहेर निघून गेला.
त्या खलाशाने १० मिनिटातच स्वतःबद्दल आणि स्वतःच्या कामाबद्दल जी माहिती बोलून टाकली होती त्यामुळे मी जरा अस्वस्थ झालो होतो. अमृतसरच्या माझ्या या पहिल्याच पोस्टिंगमध्ये मला गोपनीयतेबाबत एक मोलाचा धडा नुकताच शिकायला मिळाला होता. सैन्यदलाशी संबंधित अगदी लहान-सहान गोष्टींसंबंधी चर्चादेखील कधीही अनोळखी व्यक्तींसोबत करू नये अशी शिकवण आम्हाला आमच्या प्रशिक्षणाच्या काळात दिली गेलीच होती. युनिटमध्ये वरचेवर होणाऱ्या, जवानांच्या प्रशिक्षणांदरम्यानही अश्या जागरूकतेचे महत्व अधोरेखित केले जात असे.
"एवढं काय मोठं होणार आहे? ही गोष्ट तशीही अर्ध्या जगाला आधीच माहिती असणार आहे, मी त्याबद्दल चारचौघात बोललो म्हणून काय बिघडलं?" असा विचार करणाऱ्यांना हे कळत नाही की त्या चारचौघातील एक व्यक्ति जर शत्रूचा हस्तक असेल आणि त्याच्याजवळ आधीपासून असलेली माहिती अपुरी असेल, किंवा खात्रीशीर नसेल तर 'गाळलेल्या जागा' भरण्यासाठी तुमची बडबड त्याला उपयोगी ठरू शकते!
विशेषतः रेल्वेच्या प्रवासात बरेच दिवसांनी रजेवर घरी जाणाऱ्यांना गप्पा मारताना स्थळकाळाचे भान राहत नाही. प्रवासात अचानक भेटलेल्या मित्रांसोबत गप्पा सुरु होतात. "आजकाल आमची बटालियन अमुक ठिकाणी आहे किंवा पुढच्या महिन्यात आम्ही राजस्थानमध्येे युद्धसरावासाठी जाणार आहोत" असे सहजी बोलून टाकणारे जवान आणि क्वचित काही अधिकारीही मी पाहिले आहेत. त्या गप्पा आसपासच्या आणि अगदी शेजारच्या कंपार्टमेंटमधील प्रवाश्यांच्याही कानावर पडत असतात. विशेष काही 'हेरगिरी' करावी न लागता अशी माहिती जर शत्रूला आयती मिळाली तर त्याला आणखी काय हवे? पूर्वानुभवाने शहाणा झालेलो असल्याने, त्या खलाश्याच्या जागी असतो तर मी अशी चूक निश्चितच केली नसती. हा विचार मनात आला आणि त्याच्या जागी मी नव्हतो याची हळहळ पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवली!
तो खलाशी बाहेर निघून गेल्यावर त्या मुलीचे लक्ष माझ्याकडे गेले. तिनेच मला अभिवादन केल्याने माझ्या मनातली हळहळही दूर झाली आणि तोंडाचा चिकटाही सुटला! मी मुंबईला आणि तेथून पुढे पुण्याला चाललो आहे इतकेच मी सांगितले. मी कोण आहे, काय व्यवसाय करतो याबद्दल ना तिने मला विचारले ना मी तिला सांगितले. मुंबईमुळे विषय सहजच फिल्मी जगताकडे वळला. त्या दोघी बॉलीवुड चित्रपटांबद्दल भरभरून बोलू लागल्या. तो विषय माझ्याही आवडीचा असल्याने सिनेमा, नाटके आणि 'दूरदर्शन' बद्दल मीही बोलू लागलो. त्याकाळी टीव्हीवर केवळ दूरदर्शनच उपलब्ध होतं आणि त्यावर पाहण्याजोग्या मालिका किंवा नाटके फारशी नसायची. दूरदर्शनची पहिलीवहिली आणि अतिशय प्रेक्षणीय अशी "हम लोग" नावाची मालिका तोपर्यंत सुरु झालेली नव्हती. त्यामुळे फक्त 'चित्रहार' आणि बातम्यांसाठीच दूरदर्शनच्या जालंधर केंद्राचे कार्यक्रम पहिले जायचे. क्वचित 'फ्लॉप शो' आणि 'शाहजी की ॲडवाईस' हे जसपाल भट्टीचे विनोदी कार्यक्रम पाहायचो. एरवी संध्याकाळचे माझे आवडते मनोरंजन म्हणजे लाहोर टीव्हीवरील मालिका. पाकिस्तानी चित्रपट फारच सुमार दर्जाचे असत. पण लाहोर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या टीव्ही मालिका अतिशय श्रेष्ठ असायच्या. त्या मालिकांची एकंदर निर्मितीमूल्ये, कथानक आणि अभिनय सर्वच सरस असायचं. 'समुंदर' नावाची एक मालिका तर आजही स्मरणात आहे.
मी फक्त पाकिस्तानी मालिकाच पाहतो हे ऐकून त्या दोघींना कमालीचे आश्चर्य वाटलेले दिसले. त्या मुलीची आई मला म्हणाली, "तुम्हाला पाकिस्तानी मालिकांमधली भाषा समजू शकते?"
मी म्हणालो, "अहो त्यात काय अवघड आहे? त्यांच्या संवादांमध्ये उर्दू शब्द थोडे जास्त असतात हे खरं आहे. पण आपल्या हिंदी सिनेमातले "ताजिरात-ए-हिंद, दफा ३०२ के तहत, मुजरिम को सजा-ए-मौत फर्माई जाती है" वगैरे डायलॉग ऐकून आपले कान तयार झाले आहेतच, नाही का?"
तरीही त्या बाईच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य कमी झालेले दिसेना. मग तर तिने एक विचित्रच प्रश्न विचारला, "तुम्ही मुस्लिम आहात का?"
मी हसून म्हटलं, "अहो, मी मुस्लिम नाही, हिंदू आहे. पण उर्दू भाषा कळायला मुस्लिम कशाला असायला हवं? मला पाकिस्तानी गझलगायक गुलाम अली आणि मेहदी हसन यांच्या गझला फार आवडतात. उर्दू गझलांमधील शब्दांचे अर्थ शोधता-शोधता त्या भाषेची गोडी मला लागली आहे. आता तर खूप मजा येते."
"अहो, आमच्या तिकडच्या लोकांना हे सगळं सांगितलं तर कुणाचा विश्वासच बसणार नाही." असं तिने म्हणताच मी बोलण्याच्या ओघात मध्येच थबकलो. त्यापुढे तिने मला जे सांगितले ते ऐकून माझ्या काना-मनात शंभर आगीचे बंब एकाचवेळी ठणाणा करायला लागले.
ती बाई आणि तिची मुलगी मुसलमान होत्या आणि पाकिस्तानातील गुजरांवाला शहराजवळील एका छोट्या गावात राहत होत्या. आदल्याच दिवशी अमृतसरची वाघा बॉर्डर रीतसर पार करून त्या भारतात आल्या होत्या आणि उत्तर प्रदेशातील बदायूं गावी होणाऱ्या एका लग्नाच्या निमित्ताने तेथे निघाल्या होत्या. ती बाई स्वतः लहान असताना एकदा भारतात येऊन गेली होती पण तिची मुलगी या लग्नाच्या निमित्ताने प्रथमच आली होती.
हे सगळं ऐकताच मी एकदम सावध झालो. स्वतःबद्दल काहीही माहिती मी त्यांना सांगितलेली नव्हती आणि आता तर मुळीच काही बोलणार नव्हतो. जरा वेळाने टॉयलेटमध्ये जाण्याच्या बहाण्याने उठून मी बाहेर आलो. लगेच सिगारेट फुंकत उभ्या असलेल्या त्या खलाश्याला गाठला. सर्वप्रथम मी त्याला माझे ओळखपत्र दाखवले आणि नंतर त्या दोन स्त्रियांची माहिती पुरवली. मी सैन्यदलातील अधिकारी आहे हे समजताच त्याच्या वागण्यात योग्य ती अदब आलेली मला दिसली. मीदेखील अधिकारवाणीने, त्याने आत्तापर्यंत केलेल्या अनावश्यक बडबडीची आठवण त्याला करून दिली. त्याने सहजी पुरवलेल्या माहितीचा गैरवापर होण्याची शक्यताही त्याच्या लक्षात आणून दिली. परिस्थितीचे गांभीर्य त्यानेही ओळखले. त्याला पुरेसे खडसावून मी परत जागेवर येऊन बसलो. थोड्याच वेळात तो खलाशीही आत आला आणि दुसऱ्या डब्यात कुणी मित्र भेटल्याचा बहाणा करून सामानासकट तेथून सटकला.
त्या खलाश्याचा काटा आपसूकच दूर झाल्यामुळे आता कंपार्टमेंटमध्ये फक्त मी आणि त्या दोघी मायलेकीच उरलो होतो. दिल्लीपर्यंतचा माझा प्रवास त्या सुंदर मुलीसोबत हसत-खेळत गप्पा मारण्यात कसा गेला हे मला समजले नाही. आणि अर्थातच, मी मुंबईला जाणारा एक प्रवासी आहे यापलीकडे तिला माझ्याबद्दल मी काहीच कळूही दिले नाही!
तुम्हाला प्रशिक्षणावेळी "गनिमी कावा " पण शिकवायचे का ?
ReplyDeleteहो. 😉
DeleteExcellent piece. Exciting finish. Heartiest congrats and wishing many more.
Deleteसर तुम्हाला सलाम!खूप छान लिहिले आहे.
ReplyDelete🙏☺️
Delete🙏
Deleteमस्त. स्वातीताई ब्लॉग लिहिते माहीत आहे. Bhouji तुम्ही पण एव्हढे छान लिहिता माहीत नव्हते. धन्यवाद.
ReplyDelete🙏☺️
DeleteSo reassuring that you were always careful and cautious. Very fluent and flowing description with the element of suspense.
ReplyDeleteMilind Ranade
🙏☺️
Deleteछान. असेच लेखन ' चालू ' ठेवा. :)
ReplyDeleteThanks for your compliment, Avi!
DeleteSir, your writing style is amezing
ReplyDelete🙏 धन्यवाद!
DeleteYou seem to be lucky always
ReplyDeleteAlert might be the word! 😁
DeleteOnce bitten twice shy! 😂
DeleteWow Anand ! You certainly have a wonderful flair for writing and narration/ story telling....that too in Marathi. Very engaging and enjoyable. Was reminded of similar experiences on the famous Jhelum Express !!
ReplyDeleteThanks! Your Blogger profile is not visible and you haven't written your name. I have no way to know who I am thanking! 🤔
Deleteमजेदार किस्सा..👌
ReplyDelete🙏
Deleteहा प्रसंग मजेशिर वाटला तरी मजेशिर नसून घातक ठरणारा होता.खर म्हंटल तर त्या नेव्हीतल्या माणसाने बोलण योग्यच नव्हते.ज्यांच्या हातात देशाचे भवितव्य आहे.जनतेचे रक्षणकर्ते म्हणून कार्यरत असताना अखंड सावधानता बाळगणे गरजेचे असते.बाई म्हंटल की पाघळणारे पुरुष असतात पण नेव्हीची शिस्त याचा विसर पडला पण आपल्या प्रसंगावधनामुळे थोडक्यात निभावल.
ReplyDeleteनिश्चितच 👍
Deleteअखंड सावध असावे, दुश्चित्त कदापि नसावे ही समर्थांची शिकवण तुम्ही तंतोतंत जगलात. 👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Delete