Labels

Sunday 1 March 2020

असाही एक शॉक

सैन्यदलातील नोकरीत निरनिराळ्या छावण्यांमधील सरकारी घरांमध्ये राहिलो. मध्य प्रदेशात इंदोरजवळील महू छावणीत सैन्यदलाच्या तीन मोठ्या प्रशिक्षण संस्था आहेत. आमच्या लग्नानंतर लगेच, म्हणजे १९८६-८८ या काळात मी तेथे एका प्रशिक्षणासाठी वास्तव्य करून होतो. सैन्यदलाबद्दल फारशी कल्पना नसलेल्या माझ्या पत्नीचे, डॉ. स्वातीचे ते पहिलेच 'स्वतःचे' घर होते. पण आमच्या सुदैवाने त्या घरात फारश्या 'सरकारी गंमती' नव्हत्या.


'सरकारी गंमती' म्हणजे नेमके मला काय म्हणायचे आहे?
 
राज्य किंवा केंद्र सरकारी इमारतींचे बांधकाम, खिडक्या-दरवाजे, नळजोड आणि विजेच्या तारा व बटणे अश्या सर्व कामांसाठी कंत्राटदारांकडून निविदा मागवल्या जातात. सरकारी नियमानुसार, प्राप्त निविदांपैकी कमीत कमी किंमतीची निविदा स्वीकारली जाते. परंतु, केल्या जाणाऱ्या कामांचा दर्जा समाधानकारक असायला हवा, हा निकष मात्र 'सोयीस्करपणे' बाजूला पडतो की काय नकळे. 

सैन्यदलांसाठी या स्वरूपाची कामे करण्याची जबाबदारी, MES, म्हणजेच मिलिटरी इंजिनीयर सर्विसेसकडे असते. MES ने केलेली अनेक चांगली बांधकामे मी पाहिली आहेत. परंतु, पुष्कळ ठिकाणी, तथाकथित 'सरकारी' कामाचे अनुभवही मला आले आहेत. फौजी घरांमधून राहिल्याशिवाय आणि त्यातील गंमती (?) प्रत्यक्ष अनुभवल्याखेरीज इतरेजनांना त्या सहजी कळणे अवघड आहे. 

नुकतेच लग्न करून आलेल्या एखाद्या नव्या नवरीने, कप्तानसाहेबांसोबत 'नवीन' घरात प्रवेश करताच, बिजागरीतून उतरलेला आणि खर्र-चिर्रर्र असा आवाज करत उघडणारा दरवाजा तिचे स्वागत करी. कुठे एखाद्या खिडकीचे फुगलेले कवाड जरा जोराने उघडायला जावे तर ते चौकटीतूनच निखळून येई. कित्येकदा बाथरूमच्या दरवाज्याचा बोल्ट आणि त्यासाठी केलेली खाच किंवा अल्युमिनियमचे 'कोंदण', यांचे नाते "दोन ध्रुवावर दोघे आपण" असेच दिसायचे. तरीही त्या बाथरूममध्ये बसून निर्धास्तपणे अंघोळ (अथवा इतरही काही विधी) करण्यासाठी मनुष्याला निगरगट्टच असायला हवे! ओल्या लाकडांच्या चौकटींवर फळकुटे टाकून बनवलेल्या खाटा स्वतःच्या जन्मदात्या कारागीरांच्या नावाने कुरकुरत असतील असे मानले, तरी त्यामुळे कुचंबणा होणार ती त्यांवर रात्री झोपणाऱ्या माणसांचीच ना! 

एक ना दोन, अश्या अनेक गंमती असत. विजेच्या तारा, बटणे आणि उपकरणांची तीच गत. एखादी लोंबती तार, लटकणारा स्विचबोर्ड, किंवा शॉक देणारे बटण असायचेच. सरकारी घरांत वास्तव्य केलेल्या अनेकजणांना, कमीअधिक फरकाने हे सर्व अनुभव आले असतील. परंतु, पांडवांनी कौरवांसाठी तयार केलेल्या मयसभेलादेखील लाजवील असा एक अनुभव आम्हाला एकदा आला.

एका संध्याकाळी आम्ही दोघे महू छावणीतल्या ओपन एअर चित्रपटगृहात सिनेमा पाहायला गेलो होतो. माझा एक मित्र नुकताच नवपरिणीत बायकोला महूला घेऊन आला होता. त्याचे घर चित्रपटगृहाजवळच होते. ९.३० च्या सुमारास सिनेमा संपल्यावर, त्याच्या घरी जाऊन काही गृहोपयोगी वस्तू पोहोचवण्याचेे स्वातीने ठरवले होते. 

आम्ही पोहोचलो तेंव्हा घराबाहेरचा दिवा बंद असल्याने फारसा उजेड नव्हता आणि घरातही अंधारच वाटत होता. एवढ्या लवकर निजानीज झाली असेल की काय अशा विचाराने आम्ही परत फिरणार होतो. पण मग वाटले की, कदाचित जेवण करून TV पाहत बसले असतील. आलोच आहोत तर त्यांना निकड असलेली ती वस्तू देऊनच घरी जावे असे स्वातीचे मत पडल्याने मी डोअरबेलचे बटन दाबले, तर काय? ते बटन भस्सकन त्या खाचेच्या आतच गेले. आम्हीही MES च्या घरातच राहत असल्याने, बिघडलेल्या विजेच्या बटनांचा मला पूर्वानुभव होता. त्यामुळे, मी अगदी आत्मविश्वासाने ते बटन नखाने बाहेर काढून पुन्हा दाबले. 

स्वाती जरा घाबरलीच, "जाऊ दे रे, उगीच शॉक-बिक लागायचा. आपण उद्या दिवसा-उजेडी येऊ" असे ती  म्हणू लागली. पण, "हाती घ्याल ते तडीस न्या" हे आमच्या शाळेचे ब्रीदवाक्य मला अचानक आठवले म्हणा, किंवा माझा फाजील आत्मविश्वास म्हणा, ते डोअरबेलचे बटण नेटाने उकरून बाहेर काढणे व पुन्हा दाबणे असा क्रम मी चालूच ठेवला. 

काही क्षणांनंतर मला घरामध्ये काही हालचाल जाणवली. मी हाक देणार तेवढ्यात, माझ्या मित्राचा अत्यंत घाबरलेल्या आवाजात "कौन है? कौन है?" असा प्रश्न आतून ऐकू आला. "आम्ही आहोत" असे सांगितल्यावर त्याने "अच्छा अच्छा, खोलता हूँ" असे म्हटले खरे, पण तरीही २-३ मिनिटानंतरच त्याने दरवाजा उघडला. 

आत शिरल्या-शिरल्या मी म्हटले, "अरे, एवढा घाबरलास का? आणि दरवाजा उघडायला इतका वेळ?" 

त्याने माझ्या प्रश्नाला उत्तर दिलेच नाही. आधी तो एक ग्लासभर पाणी प्यायला आणि म्हणाला, "तू घराबाहेर उभा राहून काय करत होतास?" 

त्यांच्या डोअरबेलच्या बिघडलेल्या बटनाची सगळी गंमत मी हसत-हसत त्याला सांगितली. पण त्याच्या चेहऱ्यावरची भीती काही कमी होईना. त्याची पत्नी तर बिचारी खाली मान घालूनच बसली होती. त्या दोघांची एकंदर अवस्था आणि कसेबसे अंगावर चढवलेले नाईटड्रेस स्वातीच्या चाणाक्ष नजरेने आधीच टिपले होते. तिने मला कोपरखळी मारून नजरेनेच दटावले. 

आपण नेमके 'चुकीच्या वेळी' आलो, हे जरासे उशिरा का असेना, पण माझ्या लक्षात आले!

त्या दोघांची लाडिक थट्टा करायचा मोह अनावर होत होता. पण त्यांच्या चेहऱ्यावरची प्रचंड भीती, कपाळावर डवरलेला घाम, आणि माझ्या मित्राचा भेदरलेला स्वर पाहून मी जरा संयम राखला. मी सावधपणे त्याला म्हटले, "सॉरी यार. आम्ही जरा उशीरच केला तुमच्या घरी यायला. पण एवढं घाबरण्यासारखं काय झालंय तरी काय?" 

तो इतकंच म्हणाला, "अरे, नाही नाही... तुम्ही हे सामान पोहोचवायला आवर्जून आलात ते चांगलंच झालं. तसे आम्ही नुकतेच दिवा बंद करून पडलो होतो, त्यामुळे त्याचंही काही विशेष नाही. पण... काय घडलं हे मी सांगितलं तर तुझा विश्वास बसणार नाही."

"अरे, हे घर आम्हाला नवीनच आहे. कुठली विजेची बटने चालू आहेत आणि कोणती बिघडलेली आहेत हे पाहायला मला वेळही झालेला नाही. बरं, तू दाराशी येऊन डोअरबेलचे बटन दाबायचा प्रयत्न करत असशील हे मला कुठून कळणार? पण इकडे मात्र अचानक माझ्या बेडरूमचा दिवा चालू-बंद व्हायला लागला होता! डोअरबेलच्या बटनाची तार बेडरूमच्या दिव्याला जोडण्याची करामत हे MES वालेच करू जाणे, बाबा !"
   
कल्पना करा... आपण 'तशा' अवस्थेत असताना, जर भुताटकी झाल्यासारखा आपल्या बेडरूमचा दिवा आपोआप चालू-बंद होऊ लागला तर आपली काय अवस्था होईल? 

माझा मित्र आणि त्याची बायको इतके भेदरलेले आणि बावचळलेले का दिसत होते हे मला तत्क्षणी समजले. काही अंशी त्यांची कीवही आली. पण दुसऱ्याच क्षणी, त्यांची झालेली फजिती लक्षात येताच मी खो-खो हसत सुटलो.   

ते बिचारे पती-पत्नी मात्र तो प्रसंग एन्जॉय करण्याच्या मनस्थितीत अजिबात नव्हते!

40 comments:

  1. स्वाती इतका आनंद सुद्धा एक चांगला लेखक आहे. (निदान मला तरी आज कळलं)

    ReplyDelete
  2. Replies
    1. धन्यवाद. आपले नांव कळू शकेल का?

      Delete
    2. Hats off Anand, beautifully worded.. thanks for sharing .. God bless you both

      Delete
    3. Thanks! Your name is not displayed. I wish to know who I am thanking!😀

      Delete
    4. सरकारी घरा चा आनुभव मला असल्याने कथा अगदी डोळया समोर आली. छान लेख.

      Delete
  3. अरे तो चांगले लिहितोच... मी त्याच्या कडूनच शिकते आहे😊

    ReplyDelete
  4. अरे ही तर खरोखरी गम्मतच आहे, बिच्चारे ! MES मात्र विलक्षण संस्था आहे

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले नांव कळू शकेल का?

      Delete
    2. अति आनंद झाला !! सुंदर ओघवती भाषा !!!

      Delete
    3. अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले नांव कळू शकेल का?

      Delete
  5. सुरेख वर्णन! 😀
    असे अनेक किस्से गोळा करून हा ब्लॉग नित्य चालू ठेवा.

    ReplyDelete
  6. A beautiful and entertaining article which gives insight into fauji family life. It's always a joy to read such anecdotes. Thanks for sharing your experiences with us.
    Priyadarshini Dalvi

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks for your encouraging remarks, Priyadarshini!

      Delete
  7. You definitely have a good flair of writing

    ReplyDelete
  8. Replies
    1. Thanks for the appreciation and encouraging remarks, Bal Kaka! 🙏

      Delete
  9. Anana Jijaji you write so well. Ab yeh bataiye aapne swatee se seekha ya swatee ne aapse...
    Lookng forward to more wrtings from both of you ...kind regards. Sanjeev

    ReplyDelete
  10. Wah khup mast lihile ahes majedar incident baddal, pudhchya blog chi wat baghat ahe .
    Mahesh Kulkarni

    ReplyDelete
  11. Wah khup mast lihile ahes majedar incident baddal, pudhchya blog chi wat baghat ahe .
    Mahesh Kulkarni

    ReplyDelete
  12. Wah khup mast lihile ahes majedar incident baddal, pudhchya blog chi wat baghat ahe .
    Mahesh Kulkarni

    ReplyDelete
  13. Wah .khup chan . Waiting for next blog .

    ReplyDelete
  14. Wah .khup chan . Waiting for next blog .

    ReplyDelete
  15. Dada kiti mast lihile ahes enjoyed the incident

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks. Your name or other details not seen in your reply. Who is this?

      Delete
  16. Very nicely written articles, with the intresting angle to very simple things that happened in our lives, we always knew that u had flair for writing.look forwrd to many morenfrom u in future.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks. Your name or other details not seen in your reply. Who is this?

      Delete
  17. Very nice, each article is better than d previous one.Anand,U had documented all these earlier in ur diary or just recollecting from your die hard memory?

    ReplyDelete
    Replies
    1. These experiences were unforgettable. But, as they have been narrated among friends and relatives over the years, the details remained fresh.

      Delete
    2. Your name? Sorry, but I have no way to know whose comment this is.

      Delete
  18. लेख वाचून आज कळले की डॉक्टर सौ स्वाती बापट पण लेख वगैरे लिहितात.
    पण तुमचा अनुभव नक्कीच मजेशीर आहे आणि आणि लेखन आधी म्हटल्याप्रमाणे उत्कृष्ट आणि दर्जेदार आहे.
    शब्बास !

    ReplyDelete
  19. लेख वाचून आज कळले की डॉक्टर सौ स्वाती बापट पण लेख वगैरे लिहितात.
    पण तुमचा अनुभव नक्कीच मजेशीर आहे आणि आणि लेखन आधी म्हटल्याप्रमाणे उत्कृष्ट आणि दर्जेदार आहे.
    शाब्बास !

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. राजन असे नाव वाचतोय पण आडनाव समजत नाही. आधी मी राजन खांबेटे समजलो होतो. आता मात्र हैद्राबादवाले की परांजपे की आणखी कोणी असा संभ्रम निर्माण झाला आहे.

      Delete
  20. madhura Bedekar28 March 2020 at 21:52

    Nicely written article, waiting for more articles

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks. Two more in the pipeline. Posting each one after a gap of a few days to avoid overload. 😁

      Delete
  21. सरांनी खूप छान शब्दात ते माडले आहे... खूपच मस्त गंमत झाली असेल...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद 🙏
      आपली कॉमेंट unknown या नावाने प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे आपले नाव समजू शकले नाही.
      कॉमेंट करतेवेळी, "comment as" असा एक पर्याय दिसतो. तेथे आपले नाव टाकून मग कॉमेंट केल्यास कॉमेटसोबत आपले नावही दिसेल.

      Delete