Labels

Sunday, 22 March 2020

ती बाई कोण होती?

सैन्यदलातील सर्व्हिसच्या सुरुवातीला, म्हणजे १९८१ मध्ये माझं पहिलं पोस्टिंग अमृतसरला झालं. चार वर्षांच्या खडतर ट्रेनिंगची शिदोरी आणि पुष्कळशी ऐकीव माहिती सोबत होती. पण युनिटमधलं काम आणि एकंदर जीवन कसं असतं याचा काहीच अनुभव नव्हता. वयही लहानच, म्हणजे
जेमतेम २० वर्षं पूर्ण झालेली. एवढ्या लहान वयात खांद्यावर स्टार लागल्यामुळे, आणि जाता-येता जवानांचे सॅल्यूट मिळू लागल्यामुळे, "साला मैं तो साहब बन गया" अशी हवा एखाद्याच्या डोक्यात जाणं सहज शक्य आहे. परंतु, त्या भ्रमाचा भोपळा वेळीच फोडण्याची खबरदारी आमचा सिनियर सबल्टर्न, म्हणजे आमच्यापेक्षा थोडासाच सिनियर असलेला अधिकारी, अगदी पद्धतशीरपणे घेत असे. सुरुवातीच्या चाचपडत शिकण्याच्या त्या काळात नवीन अधिकाऱ्याला युनिटमध्ये रुळविण्याची संपूर्ण जबाबदारी सिनियर सबल्टर्नचीच असे. सुरुवातीचे काही महिने मीदेखील असाच चाचपडत वेगवेगळ्या गोष्टी शिकत गेलो.

त्याकाळी जवानांचे पगार दर महिन्याच्या एक तारखेला त्यांच्या हातावर रोख ठेवले जात. युनिटच्या सर्व जवानांच्या पगाराची मोठी रोकड आधी बँकेतून काढून आणावी लागे. त्याकरिता प्रत्येक युनिटमधून एक अधिकारी आणि दोन-चार सशस्त्र जवान एक-दोन मोठे पेटारे घेऊन बँकेत जात. अश्याच एका महिन्यात कॅश ड्यूटीवर माझी नेमणूक होती. मी व माझे जवान आमची कॅश स्ट्रॉंगरूममधून येण्याची वाट पाहत बँकेच्या आवारात थांबलो होतो.

एका क्षणी माझ्या लक्षात आले की जवळच उभी असलेली एक मध्यमवयीन स्त्री माझ्याकडे पाहत होती. माझे लक्ष तिच्याकडे जाताच ती दोन पावले पुढे आली आणि हसून म्हणाली, "नमस्ते लेफ्टनंटसाहब, मैं मिसेस शर्मा."
मी बुचकळ्यात पडलेला पाहून तीच पुढे म्हणाली, "हम एक दूसरे को नहीं जानते। मैं ऐसेही आपसे बात करने आ गई क्यों कि मुझे थोडी मदद चाहिये।" 
बँकेत फॉर्म भरायला मदत मागणाऱ्यांसारखी अशिक्षित ती नक्कीच वाटत नव्हती. मी प्रश्नार्थक चेहरा करताच ती  पुढे म्हणाली, "मैं ग्रीन अव्हेन्यू में  रहती हूँ। हमारे घर में अगले हफ्ते एक फंक्शन होनेवाला है। काफी मेहमान आनेवाले हैं और मुझे कुछ फर्निचरकी जरूरत है। वैसे नॉर्मल कुर्सीयाँ, टेबल वगैरे तो टेन्टवाले भी किरायेपर देते हैं लेकिन मुझे कुछ १०-१२ अच्छी कुर्सीयाँ, ४-५ तिपाईयाँ, और ८ चारपाईयाँ चाहिये। आपके आर्मी मेस में तो बडा अच्छा फर्निचर होता है। क्या ऐसा फर्निचर मुझे कुछ दिनो के लिये आप दिलवा सकते हैं ? उसका जो भी किराया होगा मैं दे दूँगी।"

हे सगळं ऐकल्यानंतर मला तिच्या अज्ञानाची कीव आली. मी तिला समजावून सांगितलं की आर्मीकडून हे असलं काहीही मिळू शकणार नाही कारण सरकारी कामाव्यतिरिक्त ते फर्निचर इतरत्र कुठेच वापरलं जाऊ शकत नाही. आणि कुणा सिव्हिलियन लोकांना ते भाड्यानं वगैरे मिळणं तर कल्पनेच्याही पलीकडचं आहे. तरीही ती बाई बरीच गयावया करू लागली. "बघा ना, तुमच्या क्वार्टरमास्टरना विचारून तर पहा ना"  तिने क्वार्टरमास्टर हा शब्द वापरताच मला जरा आश्चर्य वाटलं. युनिटची सर्व मालमत्ता 'क्वार्टरमास्टर' या पदावर असलेल्या अधिकाऱ्याच्या अखत्यारीत असते. पण हे तिच्यासारख्या एखाद्या सामान्य सिव्हिलियन गृहिणीला माहीत असणं मला तरी अनपेक्षित होतं.

तात्पुरती वेळ मारून नेण्याकरिता मी तिला सांगितले, "मी क्वार्टरमास्टरना विचारतो. पण त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. तुम्ही तुमची दुसरी काही व्यवस्था करा." 
मला वाटले आता पिच्छा सुटेल, पण कसचं काय. ती लगेच म्हणाली, "प्लीज तुम्ही युनिटमध्ये गेल्या-गेल्या क्वार्टरमास्टरशी बोलून घ्या. आर्मी एक्सचेंजचा नंबर माझ्याकडे आहे. तुम्ही सिग्नल रेजिमेंटचे आहात व तुमचे नाव मला माहितीच आहे. मी तुम्हाला आज संध्याकाळीच फोन करते." 

आता मात्र माझ्या लक्षात आले की मला आधी वाटली होती तेवढी ती बाई साधी-भोळी नव्हती. आणि आर्मीबद्दल अनभिज्ञ तर निश्चित नव्हती. माझ्या युनिफॉर्मवरील चिन्हांवरून तिला माझे रेजिमेंट समजले होते आणि नेमप्लेट तर माझ्या छातीवरच लावलेली होती. 

माझ्या मनात विविध शंका येऊ लागल्या. मी कॅश ड्यूटीवर असल्याने सरकारी पैशांची सुरक्षा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती. या अनोळखी बाईच्या समस्येवर मला काही करता येण्यासारखे नव्हतेच. त्यामुळे, माझ्यामागचा तिचा पिच्छा सोडवून घेणे भाग होते. परंतु, वरकरणी तरी सभ्य, आणि चांगल्या घरच्या दिसणाऱ्या, एका मृदुभाषी स्त्रीला चारचौघांदेखत असे अचानक कसे झटकायचे? माझ्या अंगच्या भिडस्तपणामुळे, तिला काय आणि कोणत्या शब्दात सांगावे हे मला कळेना. मी तिला सांगून पाहिले की मी सतत काही ना काही कामात असतो व त्यामुळे ती मला फोनवर गाठू शकणार नाही. 
हे ऐकताच त्या बाईने एक चिट्ठी माझ्यासमोर धरली आणि म्हणाली, "हा माझा फोन नंबर. प्लीज काहीतरी करून आजच तुम्ही माझं काम करा आणि तुम्हीच मला कळवा. मला घाई आहे हो." आता तर मी निरुत्तरच झालो. तिला कसे चुकवावे हा विचार मनात चालू असतानाच ती पुढे म्हणाली, "आमचे सगळे नातेवाईक २-४ दिवसातच यायला सुरुवात होईल. काही नातेवाईक कित्येक वर्षांनी लाहोरहून आणि कराचीहून येत आहेत. ते तर उद्या-परवाच येऊन पोहोचतील."
हे ऐकून माझा थरकापच उडाला. त्या महिलेचे नातेवाईक पाकिस्तानी नागरिक होते. आणि त्या पाहुण्यांची बडदास्त ठेवायला भारतीय सैन्याच्या एका युनिटमधून मी फर्निचर मिळवून द्यावे अशी तिची अपेक्षा होती. हे भलतंच धक्कादायक होतं. मी निष्कारण एखाद्या भानगडीत तर अडकत चाललो नाहीये नां? अशी भीति आता मला वाटू लागली. 
खरं म्हणता तिच्या बोलण्यात मी उगीचच गुंतलो होतो. आता जर ती मागेच लागली आणि सारखी फोन करू लागली तर काय करायचं? तिच्याशी मी बोलत असताना आसपासच्या चार लोकांनी आणि माझ्या जवानांनीही मला पाहिलं होतं. आमचं बोलणं त्यापैकी कुणाच्यातरी कानावर गेलं असण्याचीही शक्यता होती. पाकिस्तान्यांशी नातेसंबंध असलेल्या एका महिलेशी एक भारतीय सेनाधिकारी गप्पा मारीत उभा आहे एवढंसं कारणसुद्धा आर्मी इंटेलिजन्स विभागाचा ससेमिरा त्या अधिकाऱ्याच्या मागे लागण्यासाठी पुरेसं असू शकतं ह्याची मला कल्पना होती. ट्रेनिंगच्या काळात आम्हाला हे सांगितले गेले होते की शत्रूदेशाचे हेर किंवा त्यांचे हस्तक आपल्या देशात आणि विशेषतः सीमेलगतच्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असतात. भारतीय सैन्यदलाच्या तुकड्यांचा ठावठिकाणा, त्यांची व्यूहरचना यासंबंधी हाती लागेल ती माहिती काढण्याकरिता अधिकारी व जवानांना जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न होत असतात. आधी एखादं साधंच काहीतरी काम त्या अधिकारी किंवा जवानांकडून करून घ्यायचं आणि त्यानंतर महत्वाची गुप्त माहिती काढून आणण्यासाठी हळूहळू त्यांच्यावर दबाव आणायचा, अशी हेरांची योजना असते. अश्या योजनांमध्ये महिलांचा वापर सर्रास केला जातो हेही आम्हाला शिकवले गेले होते. त्यामुळे जवानांनी आणि अधिकाऱ्यांनी सदासर्वदा जागरूक राहावे अशी अपेक्षा असते. मिलिटरी ट्रेनिंगचा भाग म्हणून ही सगळी थियरी जरी शिकलो होतो तरी अनपेक्षितपणे का होईना, पण प्रॅक्टिकलमध्ये माझा प्रचंड घोळ होत चालला होता. 

माझ्या सुदैवाने, त्याच वेळी माझ्यासोबतच्या जवानाने येऊन आमची कॅश तयार असल्याची वर्दी दिली. त्या बाईच्या चिट्ठीला हातही न लावता आणि तिच्याकडे न बघताच मी तेथून सटकलो आणि स्ट्रॉंगरूममधून कॅश घेऊन तडक बाहेर पडलो. 

दिवसभर मी बेचैन होतो. त्या काळात मोबाईल वगैरे तर अस्तित्वातच नव्हते आणि मी अगदीच ज्युनियर असल्याने मला स्वतंत्र ऑफिसच नव्हतं तर हक्काचा फोन कुठला असणार? तरीदेखील मी आर्मी एक्सचेंजला सांगून ठेवलं की माझ्याकरता बाहेरून कोणाचाही फोन आला तरी माझ्याशी बोलणं होऊ शकणार नाही असे सांगून टाकायचे. रात्री जेवण होईपर्यंत मी कोणाशीही काहीच बोललो नव्हतो. माझ्या सिनियर सबल्टर्नला मात्र माझं काहीतरी बिनसलं असल्याचा वास आला. त्याने विचारताच, घडलेला सगळा प्रसंग मी त्याला सांगितला. तो एकदम गंभीर झाला आणि म्हणाला, "रात्रीचे दहा वाजलेत पण तरीही आत्ताच्या आत्ता आपण कॅप्टन उदासीकडे जाऊ. तो माझ्या ओळखीचा आहे. त्याला हे सगळं तू मोकळेपणाने सांगून टाक. मग पाहू तो काय म्हणतो ते." 

कॅप्टन उदासी अमृतसर छावणीच्या इंटेलिजन्स विभागाचा अधिकारी होता. त्याने माझे सर्व बोलणे ऐकून घेतले. दोन मिनिटे शांत बसला आणि म्हणाला, "पुन्हा एकदा सर्व काही आठव. त्या बाईचे वर्णन कर. तू त्या बाईशी नेमके काय-काय बोललास ते नीट आठवून मला सविस्तर सांग." 
मी सर्व काही पुन्हा तपशीलवार सांगितले. त्यानंतर तो म्हणाला, "तरुण आणि अननुभवी अधिकारी किंवा जवानांना एखाद्या सापळ्यात अडकवायचे प्रयत्न पाकिस्तानी हेरांच्या हस्तकांकरवी अमृतसर कँटोन्मेंटमध्ये आणि जवळपासच्या परिसरात सुरू असतात. हा तसाच काही प्रकार आहे की काय ते आम्ही पडताळून पाहू. तू सांगितलेल्या वर्णनाची कोणी बाई आधीपासून आमच्या रडारवर आहे का ते पाहायला माझी माणसे आणि अमृतसरमधले आमचे खबरे मी उद्याच कामाला लावतो. तू मात्र सावध राहा. तुला पुन्हा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न झाल्यास एक्सचेंजला कॉल टॅप करायला सांग. तू त्वरित ही माहिती मला दिलीस हे योग्यच झाले. तुझे काहीही चुकलेले नाही. तेंव्हा आता जाऊन शांत झोप. आणि यापुढे मात्र कुणाही अनोळखी व्यक्तीशी बोलताना सदैव मनातल्या संशयपिशाच्चाला जागृत ठेवत जा." एवढे बोलून त्याने माझ्या खांदयावर हात ठेवला आणि माझा जीव भांड्यात पडला. 

त्यानंतर मला कोणाचाही फोन आला नाही किंवा ती बाई मला पुन्हा कधीच भेटली नाही. मला तिच्याबद्दल काही समजलेही नाही. त्या घटनेनंतर पुढे काय घडले यासंबंधी माहिती काढायचे तर मला काहीच कारण नव्हते.
"त्या बाईला फक्त तेवढ्याच मदतीची अपेक्षा असू शकेल? प्रत्यक्षात ती एक पाकिस्तानी गुप्तहेर किंवा त्यांची हस्तक तर नव्हती? मी एका सापळ्यात अडकता-अडकता केवळ सुदैवाने बचावलो होतो का?"
हे सगळे प्रश्न अनुत्तरितच राहिले. मला मात्र फौजी आयुष्याच्या सुरुवातीला एक अत्यंत मोलाचा धडा शिकायला मिळाला होता. त्यानंतर सर्व्हिसच्या काळात आणि सेवानिवृत्तीनंतरदेखील वेळोवेळी खुद्द काही पाकिस्तान्यांशीच समोरासमोर बोलायचे प्रसंग आले. त्याबद्दल नंतर सांगेन. 

58 comments:

  1. Replies
    1. धन्यवाद!
      कॉमेंटमध्ये ती पाठवणाऱ्या नाव किंवा काहीच माहिती दिसत नाही. नाव कळू शकेल का? कृपया यापुढील सर्व कॉमेंट्समध्ये आपले नाव लिहावे.
      🙏

      Delete
  2. सर,तुमच्या आठवणी नेहमी लिहीत जा.खूप छान लिहिता तुम्ही. Keep it up

    मिलिंद वैद्य

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मिलिंद! आणखी काही लिहून तयार आहेत. लवकरच वाचायला देईन. ☺️

      Delete
  3. तुमच्या आठवणीतून एका वेगळ्या जगाचे दर्शन होत आहे. लिखाण पण खूप छान !

    ReplyDelete
  4. Very nicely written. I am writing in English so that non Marathi people may appreciate the compliment. And indeed in our senior years we understand the the seriousness of the situation that you underwent and luckily came out of it without any harm or injury...

    ReplyDelete
  5. अविनाश22 March 2020 at 17:42

    छान वर्णन केलं आहेस, आनंद. लोकांना सैनिकांच्या जीवनाची, गप्पांच्या ओघात ओळख करून देतात हे लेख. अजून खूप लिहा. ��

    ReplyDelete
    Replies
    1. नक्की अवि. पुढचे दोन अनुभव तयारच आहेत. लवकरच वाचायला देईन.

      Delete
  6. Well written. Interesting.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद!
      कॉमेंटमध्ये ती पाठवणाऱ्या नाव किंवा काहीच माहिती दिसत नाही. नाव कळू शकेल का? कृपया यापुढील सर्व कॉमेंट्समध्ये आपले नाव लिहावे.
      🙏

      Delete
  7. सैन्याजीवनाच्या कथा रम्य खऱ्याच, आणि लेखकाची शैलीही रंजक! अजून कथांच्या प्रतीक्षेत...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. अजून दोन अनुभव लिहून तयार आहेत. लवकरच वाचायला देईन.

      Delete
  8. छान अनुभव वाचताना डोळ्यासमोर घडते आहे असे वाटत होते श्रीधर गवई

    ReplyDelete
  9. असा अनुभव इतरांना कळणे महत्वाचे.. त्यांना अलर्ट राहण्यासाठी उपयोग होईल. छान शब्दांकन.
    सतीश चिंतलवार

    ReplyDelete
  10. सर, अननुभवी असतानाही तुम्ही फार प्रसंगावधान दाखवले. सलाम!!

    ReplyDelete
  11. बापरे ! अग्निपरीक्षाच की ही !!

    ReplyDelete
    Replies
    1. हो. ते काही दिवस प्रचंड बेचैनीत गेले.

      Delete
  12. Really thrilling experience

    ReplyDelete
  13. विलक्षण धैर्य आणी कार्य घट्टपणे निभावत येत असता आपण कायम. वाचताना थरार अनुभवला अजुन वाचायची इच्छा आहे. साधेपणा भावला लिखाणातला. धन्यवाद
    अभय भा. अिंगळे.

    ReplyDelete
  14. फार छान लिहिलंय तुम्ही आणि खूपच इंटरेस्टिंग!

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्राय आवर्जून कळवल्याबद्दल धन्यवाद. पण आपली ओळख पटली नाही. कोण ते कळू शकेल का?

      Delete
  15. Starting plot for a thriller. Nice.

    ReplyDelete
    Replies
    1. Wonderful writeup. Army could have been testing your integrity. If it was not it should use similar techniques to filter out the rot, before it grows like a demon.

      Delete
    2. Thanks. You have proposed an innovative approach!
      Your name is not visible in your comment. Please identify yourself.

      Delete
  16. Kunal Raut from mit,Alandi:Sir ,really interesting story and I liked it.I was your student sir.

    ReplyDelete
  17. Well written, u have all d inputs of a good writer
    Interesting episode.

    ReplyDelete
  18. Well written, u have all d inputs of a good writer
    Interesting episode.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks! But your name? I don't know who I am thanking. ☺️

      Delete
  19. Very interesting experience. In Life many times we experience unexpected things. Perhaps The God desires to teach Something through such experiences.

    ReplyDelete
  20. A vivid narrative! I can almost see a smart, upright officer of Signals Regiment trying to understand the intentions of the sweet talking lady who was desperately trying to establish lines of communication with him.
    Milind Ranade

    ReplyDelete
  21. खूप छान मांडणी केलेय सर.सर्वच अनुभवातून आम्हाला ही खूप काही शिकण्यासारखआहे.

    ReplyDelete
  22. madhura Bedekar28 March 2020 at 21:45

    A very interesting experience,well written also, Salute to Indian army

    ReplyDelete
    Replies

    1. 🙏अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

      Delete
  23. छान अनुभव शेअर केलात सर..👍

    ReplyDelete
  24. तुमची लेखन शैली खूप छान आहे.. लिखाण आवडले..

    ReplyDelete
  25. सहज फेसबुक पाहता पाहता तुमच्या अनुदिनीचा दुवा मिळाला आणि गेले तासभर मी वाचतच आहे. कर्नलसाहेब, सगळेच लेख सरस आहेत आणि वेगळ्या अनुभवांशी परिचय होतो आहे. प्रत्येक लेखावरच प्रतिक्रिया द्यायला हवी होती, खरं म्हणजे. 'वह कौन थी?'च्या निमित्ताने तुमचं लिहिणं आवडल्याचं कळवतोय. इथून पुढे वाचत राहीन.
    - सतीश स. कुलकर्णी

    ReplyDelete
    Replies
    1. उत्साहवर्धक अभिप्रायाबद्दल धन्यवाद! 🙏

      Delete
  26. छान लेखन. जिवंत अनुभव. 👍🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
    तुम्हाला संपर्क कसा करावा ? माझा नंबर देतोय. बोलूया आपण ? 9673471658

    ReplyDelete
  27. मनःपूर्वक धन्यवाद! 🙏 माझा व्हॉट्सप नंबर 9422870294

    ReplyDelete
  28. Finally आज वाचली ... गंम्मतशीर रहस्य कथा झाली ही 😊 beautifully written!

    ReplyDelete
    Replies
    1. 😁
      You know the characters in this story. Capt. Udasi, The unit QM, Capt. Pruthi Singh (although I have not mentioned his name).

      Delete