Labels

Saturday 23 May 2020

जितना रगडा, उतना तगडा !

NDAमधील कडक ट्रेनिंगबद्दल स्वातीला कमालीचे कुतूहल होते. अधे-मधे तुटक-तुटक माहितीच कानावर आल्याने तिची उत्सुकता अगदीच शिगेला पोहोचली होती. NDAतले पीटी-ड्रिलचे 'उस्ताद' जे वाक्य नेहमी म्हणायचे, ते तिला मी सांगितले होते "जितना रगडा, उतना तगडा!" ते सगळे उस्ताद आम्हाला चांगलेच रगडायचे, हे तिला ऐकून माहिती झाले होते. पण, सिनियर कॅडेट्स नेमके काय स्पेशल ट्रेनिंग देतात त्याचे गूढ अजून उकलायचे होते. ते  सांगण्याआधी त्या वेगळ्या ट्रेनिंगमागचे कारण तिला सांगणे मला जास्त महत्वाचे वाटले.

सेनाधिकारी होऊ इच्छिणाऱ्या सर्वांनी उंचेपुरे, तगडे असायलाच हवे असा एक गैरसमज आहे. ठराविक उंची, वजन, आणि निरोगी प्रकृती, हे निकष आहेतच. पण, सेनाधिकारी निवडताना, त्या व्यक्तीचे मानसिक संतुलन आणि मनाचा कणखरपणा (Mental Robustness) हेच मुख्यतः जोखले जाते. युद्ध किंवा युद्धसदृश परिस्थितीत अनेक वेळा, कल्पनेच्याही पलीकडचे कठिण प्रसंग अनपेक्षितपणे समोर येतात. असह्य शारीरिक कष्ट सोसून सहनशक्तीचा अंत होत आलेला असताना, अचानक नवीन संकटाला सामोरे जावे लागते. न डगमगता, खंबीरपणे, ठोस निर्णय घ्यावे लागतात. त्या निर्णयांवर स्वतःचा आणि हाताखालच्या जवानांचाही जीव अवलंबून असू  शकतो. कमकुवत मनाचा मनुष्य अश्या प्रसंगी योग्य निर्णय घेऊ शकत नाही. म्हणूनच, सेनाधिकाऱ्याच्या मनाचा खंबीरपणा शारीरिक क्षमतेपेक्षाही अधिक महत्वाचा असतो, आणि तो ट्रेनिंगच्या काळात अधिक उजळून यावा अशी अपेक्षा असते. त्याच दृष्टीने, NDAसारख्या संस्थांमधील कॅडेट्सचे ट्रेनिंग बेतलेले असते. त्या अधिकृत ट्रेनिंगला पूरक, पण अनधिकृत, असे 'स्पेशल ट्रेनिंग' ज्युनियर्सना सीनियर कॅडेट्सकडूनही मिळत असते. कॅडेट्सच्या मनाचा कणखरपणा वाढवणे हाच त्या अनौपचारिक आणि अनधिकृत ट्रेनिंगचाही मुख्य हेतू असतो.

५८व्या कोर्सचे आम्ही कॅडेट्स NDA मध्ये दाखल होण्यापूर्वी असा निर्णय झाला होता की, कॅडेट्सचे पहिल्या सहा महिन्यांचे ट्रेनिंग एखाद्या वेगळ्याच कॅम्पसमध्ये केले जावे. त्यामुळे, जुलै १९७७ मध्ये पुण्यातच घोरपडी येथे NDA Wingची सुरुवात आमच्या कोर्सपासूनच झाली. इतर कोणीच कॅडेट्स तिथे नसल्याने, सिनियर्सकरवी  आमचे काही 'ट्रेनिंग' घडण्याचा प्रश्नच नव्हता. जानेवारी १९७८ मध्ये, आम्ही खडकवासल्याच्या मुख्य कॅम्पसमध्ये दाखल झाल्यावर मात्र, सर्वात ज्युनियर आम्हीच असल्याने, ते 'ट्रेनिंग' आमच्या वाट्याला सहा महिने उशिरा आले इतकेच! 

क्वचित, ज्युनियर कॅडेट्सकडून काहीतरी अनुशासनभंगाची घटना घडल्यास, स्क्वाड्रन कॅडेट कॅप्टन किंवा तत्सम पदावरील एखादा सिनियर कॅडेट, संपूर्ण कोर्सला एकत्र करून त्या चुकीची जाहीर चौकशी करीत असे. "हे कोणी केले आहे, बोला?" अशासारख्या प्रश्नानंतर, चेहऱ्यावरची माशीही हलू न देता, आम्ही शांत उभे राहायचो. त्यावेळी आम्हा सर्व कोर्समेट्सचा एकोपा अगदी पणाला लागत असे. अर्थात, त्यानंतर जी सामूहिक शिक्षा मिळे, ती आम्ही सगळेच एकत्रितपणे, हूं की चूं न करता भोगत असू. या अनौपचारिक ट्रेनिंगमधल्या सामूहिक 'शिक्षा' अगदी टिपिकल असायच्या.

कधी-कधी आम्हाला 'सावधान' पोझिशनमध्ये बराच काळ एकाच जागी उभे ठेवले जायचे. बरेचदा, या शिक्षेमुळे आमचे सर्व वेळापत्रक गडबडून जाई. नाष्टा-जेवण तर चुकायचेच, पण त्यापुढचा क्लास किंवा इतर ट्रेनिंगच्या ठिकाणी तरी वेळेत पोहोचता यावे म्हणून आम्ही जिवाच्या आकांताने धावत सुटायचो. कारण, ड्रिल-पीटीला पोहोचायला उशीर झाला तर जागच्याजागी उस्ताद लोकांकडून वेगळी शिक्षा मिळायची. आणि जर क्लासला उशीरा पोहोचलो तर प्रोफेसरांकडून लेखी रिपोर्ट जायचा आणि "एक्स्ट्रा ड्रिल" किंवा "रिस्ट्रिक्शन्स" अश्या NDAच्या अधिकृत पनिशमेंटही दिल्या जायच्या! 

'पट्टी परेड' नावाच्या शिक्षेत आम्हाला दर ५ मिनिटांनी वेगवेगळ्या प्रकारचे युनिफॉर्म घालून, पुन्हा होतो त्या ठिकाणी परत यावे लागायचे. अक्षरशः विजेच्या वेगात धावत कॅबिनमध्ये जाऊन आम्ही कपडे बदलून येत असू. NDAत वापरले जाणारे सर्व प्रकारचे युनिफॉर्म एकापाठोपाठ एक आणि तेही A-1 टापटिपीत घातलेले असावे लागायचे.  

त्यानंतरचा ठराविक 'छळ' म्हणजे, 'पट्टी परेड' संपल्या-संपल्या, "आतापासून एका तासाच्या आत कॅबिन इन्स्पेक्शन होईल" असा आदेश दिला जाई! त्यामुळे, 'पट्टी परेड' करताना आपापल्या कॅबिनमध्ये आम्ही घातलेला राडा निस्तरून, सर्व काही चकाचक करून केबिनबाहेर उभे राहावे लागे!

असल्या शिक्षा म्हणजे 'सौम्य' प्रकारच्या होत्या. शरीरापेक्षा मनालाच त्यांचा अधिक त्रास व्हायचा. पण त्यात काही फायदेही होते. एकाच जागी, न हलता उभे राहणे, झटपट विविध युनिफॉर्म बदलता येणे, सर्व काही चौफेर विखुरलेल्या अवस्थेतली आपली खोली तासाभरात इन्स्पेक्शनसाठी तयार करता येणे, अश्या गोष्टींचा सराव आपोआप होत असे.

ज्या 'कडक' शिक्षा दिल्या जात त्यामध्ये मनासोबत शरीरालाही कष्ट पडत. उदाहरणार्थ, आपापल्या सायकली, किंवा जोडीदार कॅडेटला खांद्यांवर उचलून, पळत-पळत स्क्वाड्रनला चकरा मारणे, दंड नावाचा अवयव आपल्या खांद्याला जोडलेला आहे याची संवेदनाच जणू नष्ट होईपर्यंत जोर काढत राहणे, कंबरेतून शरीर उचलताही न येईपर्यंत 'क्रंचेस' म्हणजेच 'सिट-अप्स' काढत राहणे, अश्या काहीश्या त्या शिक्षा असत. मध्येच, बेडूकउड्या, कोलांट्या मारत जाणे, आडवे लोळत जाणे, असले प्रकारही असायचे. 

या शिक्षा कष्टदायक असल्या तरी आमचे शरीर अधिक कणखर आणि ताकदवान करण्यासाठी फायदेशीरही होत्याच. या शिक्षांचेच आणखी कठीण स्वरूप म्हणजे, उघडी पाठ आणि अनवाणी पायांनी, भर पावसात, किंवा रणरणत्या उन्हात तापलेल्या खडी अथवा फरशीवर त्या सर्व क्रिया करणे. तळमजल्यापासून वरच्या मजल्यांपर्यंत पायऱ्यांवरून कोलांट्या मारत, चढत जाण्याची करामतदेखील आम्ही केलेली आहे! अर्थात, आम्ही सर्व कोर्समेट मिळून या शिक्षा भोगत असल्याने त्या जराश्या सुसह्य होत असत. तळहातांवर किंवा तळपायांवर आलेल्या फोडांचे, आणि सोलवटलेल्या कोपरा-ढोपराचे किंवा पाठीचे दुःखही सहज हलके होऊन जाई!

मेसमध्ये जेवताना भोगाव्या लागणाऱ्या शिक्षा अगदीच विचित्र होत्या. "Eating a Square Meal" नावाच्या शिक्षेत, चमचा अथवा काटा उचलून सरळ तोंडात घालण्याऐवजी, हवेतल्या हवेत चौरसाकृती मार्गाने उचलत तोंडापर्यंत आणावा लागे! कधीकधी मटार किंवा तत्सम दाणेदार पदार्थ चमच्याने न खाता, काट्यानेच उचलून खायची सक्ती असे. असल्या शिक्षा भोगता-भोगता, शक्य तितके पोटात भरून घेण्यातच आमचा खरा कस लागत असे!

दुसरी टर्म संपल्यानंतर पुढच्या वर्षभरात आमच्या या 'स्पेशल ट्रेनिंगची' फ्रीक्वेन्सी आणि तीव्रताही कमी झाली, कारण आम्ही हळू-हळू 'मोठे' होत गेलो. शेवटच्या दोन टर्ममध्ये तर अश्या प्रकारचे अनौपचारिक 'प्रशिक्षण' आम्हीच आमच्या ज्युनियर्सना देण्याचे दिवस आले!

NDAच्या जुन्या रिवाजाप्रमाणे शेवटची टर्म संपता-संपता, पासिंग आउट परेडपूर्वीच्या आठवड्यात एक दिवस असा येई जेंव्हा शेवटच्या टर्मचे 'पासिंग आऊट कॅडेट' आपल्या ज्युनियर्सकडे जाऊन "आम्हाला शिक्षा करा" अशी विनंती करत! ज्युनियर्सदेखील सीनियर्सच्या विनंतीला 'मान देऊन' त्यांना काही 'लुटुपुटीच्या शिक्षा' भोगायला लावत. अर्थात, हे सर्व अतिशय हलक्या-फुलक्या वातावरणात होत असे. ज्या सीनियरने ज्युनियर्सचे 'अनौपचारिक ट्रेनिंग' अधिक कडकपणे केलेले असे, त्याला 'शिक्षा' करायला जरा जास्तच गर्दी जमायची. मात्र, एखाद्या सीनीयरला ज्युनियर्सनी शिक्षा करायला नकार दिला तर मात्र त्याहून मोठी नामुष्की दुसरी कोणतीच नसे.

हे लुटुपुटीचे 'रिव्हर्स पनिशमेंट सेशन' संपल्यानंतर ज्या प्रेमाने सिनियर्स आणि ज्युनियर्स एकमेकांची गळाभेट घ्यायचे ते प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यातील उत्कटता कळणारच नाही! त्याक्षणी, ज्युनियर्सच्या मनात सिनियर्सबद्दल फक्त आदर आणि प्रेमच असायचे. सिनियर्सच्या हातून पूर्वी भोगलेल्या शिक्षांबद्दल कसलाही कडवटपणा ज्युनियर्सच्या मनात उरत नसे. सिनियर्सनी ज्युनियर्सकडून 'शिक्षा' मागण्यामागे हाच उद्देश असायचा. 

माझ्या बाबतीत 'तो दिवस' जेंव्हा आला तेंव्हा माझ्या ज्युनियर्समध्ये कमालीचा उत्साह दिसला. थोड्या कोलांट्या, बेडूकउड्या मारल्यानंतर मला मेसमध्ये चलण्याचा 'आदेश' मिळाला. मेसमध्ये मला टेबलापाशी बसवून सूप दिले गेले. ते सूप अधिकाधिक 'चवदार' बनवण्यासाठी अनेकांनी हातभार लावलेला दिसला! मीही इमानदारीत मला मिळालेल्या 'आदेशानुसार' Square Meal खात ते सूप संपवले.

पासिंग आऊट परेडचा रोजचा सराव झाल्यावर, आम्हाला वापरण्यासाठी मिळालेले सर्व Kit परत करणे, प्रत्येक डिपार्टमेन्टकडून क्लियरन्स सर्टिफिकेटवर सह्या घेणे, हे सर्व करताकरता पुढचे ४-५ दिवस भुर्र्कन उडून गेले. ३१ मे १९८० ला माझी 'पासिंग आऊट परेड' झाली आणि IMA मध्ये दाखल होण्यापूर्वीच्या सुटीसाठी मी घरी आलो. घरी पोचल्यानंतर काही मिनिटातच मी जवळजवळ बेशुद्ध झाल्यासारखा खाली कोसळलो. त्यानंतर, आई-बाबांची काळजी दूर करण्यासाठी मला त्यांना सर्व काही सांगावेच लागले.

पासिंग आऊट परेडच्या आधीचे ४-५ दिवस, मी रोज थोडे-थोडे दूध पीत, दही खात, अधून-मधून  'मिल्कमेड' चाटत, असे काढले होते. माझ्या गालांच्या आत आणि जिभेवर फोड आल्याने मला इतर काहीही खाणे अशक्य होते. पोटात अक्षरशः आग पडत होती. कारण काय, तर त्या दिवशी, माझ्या अतिउत्साही ज्युनियर्सना, 'काय करू अन काय नको' असे झाले होते. प्रत्येकाने थोडी-थोडी, असे करत प्रचंड प्रमाणात मिरपूड माझ्या सूपमध्ये घातली गेली होती. त्यावेळी त्यांच्यापैकी कुणाच्याच ते फारसे लक्षातही आले नसावे. त्याचा परिणाम काय होईल याचा अंदाज ना त्यांना होता ना मला. माझ्या स्वाभिमानामुळे मीही आपल्या तोंडाने अजिबात कुरकूर न करता ते सूप पिऊन टाकले होते. अर्थात, त्यात एक प्रकारची मिजासही होती! त्यानंतर मात्र, पुढे कितीतरी वर्षे मी जेवणात अख्खे मिरे किंवा मिरपूड अजिबात खात नव्हतो. 

आज इतक्या वर्षांनंतरही मला म्हणावेसे वाटते, "कॅडेटपण दे गा देवा" ! असे वाटते, की मला NDAच्या पहिल्या टर्मपासून, तिथल्या अधिकृत आणि अनधिकृत 'ट्रेनिंग'सकट, माझे आयुष्य पुन्हा सुरु करता यावे. माझ्या त्याच सिनियर्स आणि ज्युनियर्ससोबत तीन वर्षे पुन्हा मिळावीत. मात्र आता ते शक्य नाही याची हळहळही वाटते.

असंच एखाद्या दिवशी NDAमधला माझा कुणी कोर्समेट, ज्युनियर किंवा सीनियर भेटतो. अगदी उत्कटतेने आम्ही एकमेकांची गळाभेट घेतो आणि जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा देतो. त्यांच्यासोबतच्या गप्पांमधून पुनःप्रत्ययाचा आनंद जरी मिळाला तरी 'हेही नसे थोडके' असे म्हणून मी समाधान मानतो झालं !

41 comments:

  1. Those were d days my friend, wish we can turn the clock back & be there.

    ReplyDelete
    Replies
    1. Yes!
      Your name is not displayed with the comment. 🤔

      Delete
  2. As usual very interesting.
    Makes a very exciting reading

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks!
      Your name is not displayed with the comment. 🤔

      Delete
  3. Wonderful write sir. Academy life is amazing.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks!
      Your name is not displayed with the comment. 🤔

      Delete
  4. Great Anand. Pure unadulterated nostalgia. Enjoyed the read.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Anand!
      Would we not give anything to go back in time? 😀

      Delete
  5. It was shared to me by my husband.
    मला वाटते त्यातच सर्व काही आहे. तुम्ही त्यालाही अकॅडमी days ची आठवण करून दिली. ग्रेट write up

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks!🙏
      Your name is not displayed with the comment. 🤔

      Delete
  6. आनन्द अशा अनेक 'गमती जमातीं' नी तुम्हां सर्वांचं जीवन समृद्ध झालं आणि त्या रोमांचकारी गंमती ऐकून आमचं पण , लिहीत रहा !

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks!🙏
      Your name is not displayed with the comment. 🤔

      Delete
  7. Replies
    1. Thanks!🙏
      Your name is not displayed with the comment. 🤔

      Delete
  8. 'स्पेशल ट्रेनिंग'शब्दबद्ध केलेस ते बरे झाले.

    ReplyDelete
  9. Excellent read, Anand! Reading about all those novel punishments, I got transported to 'Seventh Heaven'...remember 'Seventh Heaven'? I think you forgot to incl that. Reading this, 'it was yesterday once more!' Thanks!

    ReplyDelete
  10. Ha Ha 'Seventh Heaven'!
    Yes, I could have included that too.
    Alas, great times don't come second time!🙁

    ReplyDelete
  11. सैनिकाला अश्या शीक्षेबद्दल जिव्हाळा प्रेम वाटणे म्हणजेच शिस्तप्रिय आयुष्याची गुरुकिल्ली, या न मिळालेल्या शिक्षेला आम्ही मुकलो
    वाचून खूप छान वाटले.
    Rajan P Belgaum

    ReplyDelete
  12. Thanks.khup vegli mahiti मिळाली. ह्या गोष्टी सामान्य माणसाला माहीत नसतात. निदान मलातरी माहीत नव्हत्या. सैन्य जीवन किती कठीण आहे हे कळले थोडेफार. हॅट्स ऑफ टू all forces.

    ReplyDelete
  13. Trained you to face the life reality but without loosing the hope and values

    ReplyDelete
  14. Dear Anand , very nicely expressed the phase of life with 'lot of josh and less of Hosh'.

    Mahesh.


    ReplyDelete
  15. Dear Anand , very nicely expressed the phase of life with 'lot of josh and less of Hosh'.

    Mahesh.


    ReplyDelete
  16. Training at NDA is one of the best examples that show what Abraham Lincoln meant when he said "Test of fire makes the finest steel." It was great to read the article and get to know how such experiences toughened you mentally and physically. Heartening to know that despite "punishments" given bond between juniors and seniors is very strong (as you ve written on other write ups too). Please write about regular training at the Academy also.
    Milind Ranade

    ReplyDelete
  17. 👍
    Next post about training coming up shortly. 🙂

    ReplyDelete
  18. Rigours of training of such institutions well taught and well understood. The fine line between a good relation with juniors, and such institutions' requirements and purpose to be achieved, well presented
    Sanjay Joshi

    ReplyDelete
  19. What a adventurous academic life sir....great experience

    ReplyDelete
  20. NDA cadets,
    Salute to you all brave,talented,
    extraordinary and devoted personalities.Your highly disciplined routine during your training is really tough and as you said enthusiastic also.We all are proud of you.
    तुम्हा सर्वांना शिरसाष्टांग दंडवत.

    ReplyDelete
  21. माझ्या मनात NDA बद्दल आदरयुक्त कुतूहल नेहमीच होते व आजही आहे.

    मला वाटतं 1977 किंवा 78 साली NDA च्या पाससिंग आऊट सोहळा पाहण्याचा योग आला. आम्ही सुट्टीत दिल्लीहून पुण्याला आलो होतो. वडिलांना प्रोटोकॉल प्रमाणे पासिंग आऊट चे आमंत्रण व कार पास आला होता. त्यांना जाणे शक्य नसल्याने मी व भाऊ त्यांची गाडी घेऊन NDA ला गेलो.

    परेड व इतर कार्यक्रम सुरेख व शिस्तबद्ध होते. सुदान हॉल व कॅम्पस प्रेक्षणीय वाटला. हॉल मध्ये पूर्वीच्या NDA कामांडन्टसची तैल चित्रे होती. त्यात माझ्या वडिलांचे मित्र मेज जनरल बक्षींचे चित्र पाहिल्याचे आठवते.

    मुख्य अतिथी इंदिरा गांधी होत्या. त्यांना जवळून पाहण्याचा व त्यांच्या हायटी मधे सामील होण्याचा योग आला.

    माझ्या जुन्या आठवणी.

    ReplyDelete
    Replies
    1. खूपच छान लिहिता तुम्ही आमच्या सारख्या नागरी जीवनातील लोकांना सैन्याबद्दल अशी माहिती तुमच्या लिखाणातून समजते. धन्यवाद सर

      Delete
  22. अशी माहिती सहसा वाचनात येत नाही पण आपल्या लिखाणाच्या उपक्रमामुळे आमच्यापर्त पोहचल्या.खूप खूप धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. आनंद वाटला. अभिप्रायाबद्दल धन्यवाद! 🙏

      Delete