Labels

Friday 29 May 2020

तू यारों का यार है...

सैनिकी ट्रेनिंगसंबंधी एक म्हण आहे,
"The more you sweat in peace, the less you bleed in war!" 

माझ्या परिचयाच्या अनेक सिव्हिलियन्सना असे वाटते की आर्मी ऑफिसर्सचे आयुष्य अगदीच छानछोकीचे, ऐषआरामाचे असते, आणि त्यांच्या ट्रेनिंगच्या तुलनेत जवानांचे ट्रेनिंग अधिक खडतर असते. वस्तुस्थिती नेमकी त्याउलट आहे. एक सर्वसाधारण जवान जे-जे करतो, ते कॅडेट्सना शिकावे लागतेच. त्याउपर, त्यांची शारीरिक व मानसिक जडण-घडण जवानांहूनही अधिक कणखर व्हावी असेच त्यांचे ट्रेनिंग असते. साहजिकच, NDAमध्ये कॅडेट्सना भरपूर घाम गाळावा लागतो. पीटी, ड्रिल, घोडेस्वारी, मैदानी खेळ, पाठीवर वजन घेऊन, वाटेतले अडथळे पार करत लांबचा पल्ला गाठणे, यासारख्या अनेक गोष्टी असतात. हे सगळे कॅडेट्सकडून करून घेणारे 'उस्ताद' म्हणजे आर्मीतले निवडक आणि आपापल्या विषयातले निष्णात, हवालदार, नायब सुभेदार किंवा सुभेदार हुद्द्याचे लोक असतात. त्याशिवाय, NDAतील तीन वर्षात कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या डिग्रीसाठी आर्टस्, सायन्स किंवा कंप्यूटर सायन्सच्या विषयांचा अभ्यासक्रमही पूर्ण करावा लागतो. अश्या सर्वंकष ट्रेनिंगनंतर, "हे सगळं जर मी सहज करू शकलो, तर मी काहीही करू शकेन" असा आत्मविश्वास कॅडेट्समध्ये आला नाही तरच नवल.  

NDAत दाखल होताना आम्ही १७-१८ वर्षाची मुले होतो. मला माझ्या ट्रेनिंगचे दिवस आजही आठवतात आणि सहजच एखाद्या साधारण कॉलेजकुमाराच्या दिनचर्येशी मनातल्या मनात तुलना होते. पहाटे पाच-साडेपाचच्या सुमाराला आम्ही उठायचो. रोज दाढी केल्याशिवाय दिवस सुरु झाला असे म्हणायची सोय नव्हती! एकूण दिनक्रम अक्षरशः घड्याळाच्या काट्यावर आखलेला असायचा. आठवड्याऐवजी, १२ दिवसांचे चक्राकार वेळापत्रक असायचे. रविवार व सर्व सुट्ट्यांचे दिवस वगळता, ओळीने D-१ ते D-१२ पैकी, एकेका दिवसाचे वेळापत्रक लागू असे. पीटी, ड्रिल, घोडेस्वारी, मिलिटरी प्रशिक्षण, यांसोबतच इंग्लिश, गणित, फिजिक्स, केमिस्ट्री, इतिहास-भूगोल, अश्या विषयांचेही तास असायचे. 

एकूण वेळापत्रक असे काही बेतलेले असे, की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेळेवर पोहोचणे ही रोज द्यावी लागणारी परीक्षाच असायची. वेळ न पाळल्यास हमखास कडक शिक्षा मिळायचीच. प्रत्येक टर्मच्या सुरुवातीला, आम्हाला एक-एक सायकल वापरण्यासाठी दिली जायची. दोन-दोन सायकलींच्या तीन ओळी, असा सहा सायकलींचा गट करूनच जावे लागे. दर दोन ओळींमध्ये ठराविक अंतर ठेवावे लागे. दुर्दैवाने सायकल पंक्चर झाल्यास, किंवा सहापेक्षा कमी कॅडेट मागे उरल्यास, सायकल हातात धरून त्यासह पळत-पळत जाणे हाच एकमेव पर्याय उपलब्ध असायचा! दोन ठिकाणांमधली प्रचंड अंतरे सायकलींवर कापत, आम्ही अक्षरशः धापा टाकतच पुढच्या तासाला पोहोचत असू.   

एखाद्या दिवशी ड्रिलचा तास पहिला असायचा, तर एखाद्या दिवशी पीटीचा. पीटी असो वा ड्रिल, भर थंडीमध्येही, तास संपल्यानंतर आमचे बनियन पिळले तर घामाची धार लागायची. काही दिवशी, हे दोन्ही तास पाठोपाठदेखील असत. अश्या 'डबल आउटडोअर'च्या दिवशी, पीटीचा तास आधी असल्यास, कडक स्टार्च केलेला खाकी ड्रेस, जड अम्युनिशन बूट आणि स्टॉकिंग्स, बेल्ट, कॅप असा संपूर्ण युनिफॉर्म सायकलवर समोर टांगून न्यावा लागे. वाटेत चुकून ड्रेस खाली पडला आणि खराब झाला, किंवा एखादा आयटम नजरचुकीने न्यायचा राहिला, तर ड्रिल उस्तादांकडून कडक शिक्षा ठरलेलीच! भरपूर रगडा पीटीनंतर, घामेजलेले कपडे परेड ग्राउंडबाहेरच बदलून, ड्रिलचा चकाचक ड्रेस घालून तयार होईपर्यंत आमची चांगलीच दमछाक व्हायची. कारण, पीटी आणि ड्रिलची ग्राऊंड्स जरी शेजारी-शेजारी असली तरी, जाण्याचा रस्ता मात्र पाऊण किलोमीटर लांबीचा होता! ड्रिल उस्ताद त्यानंतर तासभर जेंव्हा आम्हाला पिदडायचे तेंव्हा त्यातूनही तरून जायची ऊर्जा आमच्यात कुठून येई हे आमचे आम्हालाही कोडेच असायचे. पण आम्ही ते करायचो खरे!

सकाळचे आउटडोअर पीरियड झाल्यानंतर तासाभराचा ब्रेक असे. त्यामध्ये, कमीतकमी वेळात स्क्वाड्रनमध्ये परतून, आंघोळ करून, कपडे बदलावे लागत. कारण, ब्रेकनंतर, इतर विषयांच्या पीरियड्ससाठी, कडक स्टार्च आणि इस्त्री केलेला युनिफॉर्म घालून, आणि वह्या-पुस्तकांची झोळी सोबत घेऊन जावे लागे. NDAतला प्रत्येक युनिफॉर्म घालायची पद्धतही ठराविक होती. त्यात एखादी चूक जर कुणा सिनीयरला आढळली तर 'पनिशमेंट सेशन' हमखास व्हायचेच. म्हणून, तशी चूक होऊ नये याची खबरदारी घ्यावी लागे. हे सगळे केल्यानंतर मेसमध्ये जाऊन, नाश्ता खायला जेमतेमच वेळ मिळे. त्या तरुण वयात एवढी दमछाक झाल्यानंतर, समोर येईल ते आणि येईल तितके खाऊन आम्ही पचवू शकायचो. अतिशय उत्तम प्रतीचा नाश्ता आमच्यासाठी अमर्यादित प्रमाणात उपलब्धही असायचा. पण, वाटेत सायकल पंक्चर झाली किंवा एखाद्या 'पनिशमेंट सेेशन' मध्ये अडकलो तर मेसमध्ये जाण्याइतकाही वेळ उरत नसे.  

त्या बारा दिवसांपैकी एक दिवस, सकाळी घोडेस्वारीचे पीरियड असत. त्यासाठी आम्ही घोडेस्वारीचा विशिष्ट युनिफॉर्म घालूनच स्क्वाड्रनबाहेर पडायचो. नेहमीच्या युनिफॉर्मचाच शर्ट पण पँटऐवजी, खास घोडेस्वारीसाठीची तंग तुमान, म्हणजेे 'ब्रिचेस' घालायचो. पायात घोट्याच्याही वरपर्यंत येणारे उंच बूट असायचे. ब्रिचेसच्या वरूनच, फ्लॅनेलच्या पट्टीचा रोल गुडघ्यापासून सबंध पायावर गच्च गुंडाळायचो. त्या गुंडाळीच्या दर दोन वेटोळ्यांमध्ये ठराविक रुंदीचीच गॅप ठेवावी लागे. बुटांच्या लेसेसजवळ त्याची गाठ बांधलेली असायची. घोड्यावर आमची मांड पक्की बसण्यासाठी आणि, काही कारणाने घोड्यावरून पडल्यास, गुडघ्याची वाटी व सांधा सुरक्षित राहण्याकरिता ही पट्टी खूप उपयोगी होती. पण गुडघ्याचे सांधे त्या पट्टीने घट्ट आवळलेले असल्याने, ड्रेस घालून झाल्यावर जवळ-जवळ ताठ पायांनीच चालावे लागे.

एके दिवशी, घोडेस्वारीचे तास संपले तेंव्हा नेहमीप्रमाणे पोटात भुकेने खड्डा पडलेला होता. लगबगीने सायकल रॅकपाशी आलो, आणि पंक्चर होऊन खाली बसलेले माझ्या सायकलचे टायर पाहताच पोटात दुसरा खड्डा पडला. पुढचे सगळे दिव्य क्षणार्धात डोळ्यापुढे चमकून गेले. घोड्यांच्या पागेपासून माझ्या स्क्वाड्रनपर्यंतचे दोन किलोमीटर अंतर, सायकल हातात घेऊन, ताठ पायांनी पळत-पळत कापायचे होते. ब्रेकफास्टचा चान्स तर शून्यच होता. परंतु, आंघोळ, कपडे बदलणे आणि वह्या-पुस्तकांची झोळी घेऊन पुढच्या पीरियडसाठी वेळेत पोहोचणेदेखील कठीण दिसू लागले. सगळे कोर्समेट्स भराभर सायकलींवर टांग मारून सहा-सहाच्या गटांनी सुसाट निघाले होते. 

अश्या वेळी, आम्ही शक्य झाल्यास एक युक्ती करायचो. चटकन डोक्यात तो विचार आला आणि लांबूनच मी माझा स्क्वाड्रनमेट मनोज वर्मा याला खाणा-खुणांद्वारे मदतीसाठी निरोप दिला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव नेहमीच जरासे बधीर, आणि डोळे भावशून्य असायचे. माझा निरोप त्याला समजला की नाही ते कळायला काहीच मार्ग नव्हता आणि ते जाणून घेणेही शक्य नव्हते. "चलो ये कॅडेट, जल्दी भागो यहांसे" असे म्हणत, डोळे गरागरा फिरवत आणि हातातली काठी हलवत माझ्या मागेच उभ्या असलेल्या उस्तादाला, महारथी कर्णाच्या स्टाईलमध्ये "सायकलचक्र उध्दरू दे" म्हणायची इच्छा होती. पण मी मुकाट्याने सायकल घेऊन पळत निघालो. 

सगळे आवरून, NDAच्या मुख्य इमारतीतल्या, म्हणजेच 'सुदान ब्लॉक'मधल्या आमच्या वर्गाजवळ मी धापा टाकतच पोहोचलो. मनोज वर्मा वर्गाबाहेर दरवाज्यातच उभा होता.
 मी व माझा जिगरी यार, मनोज वर्मा 

"यार, मेरा अपना ब्रेकफास्ट आधा छोड़कर ही  मुझे भागना पडा। मेस में देर हो गई थी, तो  मैं अकेलाही सायकल चलाकर आ रहा था। रास्तेमें सार्जंटने पकड़कर मेरा नाम नोट किया है।अब मुझे पनिशमेंट तो पक्का मिलनेवाली है, पर कोई बात नहीं। तू कहीं जाके ये आरामसे खा ले | तेरा अटेंडन्स मैं लगवा दूँगा, लेकिन जरा जलदी आईयो।" 
असे म्हणून त्याने माझ्या हातात एक पॅकेट कोंबले.

स्वतःचा नाश्ता कसाबसा संपवून, कोर्समेटसाठी निदान एक-दोन स्लाइस तरी बांधून घेऊन जाण्याचे सत्कार्य, वेळ पडल्यास आम्ही सगळेच कोर्समेट्स एकमेकांसाठी करायचो. शक्य झाल्यास, ब्रेडसोबत एखादे अंडे अथवा कटलेटही कुणी बांधून आणले तर तो बोनस असे. मनोजने दिलेले ते पॅकेट कसेबसे तोंडात कोंबण्यासाठी, 'सुदान ब्लॉक'चा एखादा सुनसान कोपरा मी शोधू लागलो. परंतु, अश्यावेळी, बाथरूम हीच एकमेव हक्काची जागा मिळे.

पोटात भुकेचा डोंब उसळला होता. ते पॅकेट मी घाईघाईने उघडले. लोक जेवणापूर्वी देवाचे नाव घेऊन आभार मानतात. पण, लोणी आणि जॅम लावलेले चार स्लाइस, दोन अंडी आणि एक कटलेट खाताना प्रत्येक घासागणिक मी देवाचे नव्हे, मनोजचे नाव घेत होतो!

आज विचार करता, या अगदी साध्या-साध्या गोष्टी वाटतात. पण त्या खडतर ट्रेनिंगच्या काळातले हेच अनुभव आम्हा कोर्समेट्समधल्या घट्ट नात्याचा पाया ठरले. युद्धकाळात वेळ पडल्यास, आपल्यासाठी प्राणही पणाला लावायला आपला कोर्समेट मागे-पुढे पाहणार नाही, याची प्रत्येक NDA कॅडेटला खात्री असते, ती यामुळेच! 

28 comments:

  1. कोर्स स्पिरीट! मला नेमका मराठी प्रतिशब्द सुचत नाहीये.
    ते दिवस आठवले की आता आश्चर्य वाटते की कसे करत होतो आपण ते सगळं?

    ReplyDelete
  2. तुमचे लिखाण खूप आवडले..असेच लिहित रहा...

    ReplyDelete
  3. बारा दिवसांचा चक्राकार दिनक्रम ही संकल्पना एकदम वेगळी आहे . सैन्यातील वेगवेगळे गणवेश या विषयावर सचित्र व सविस्तर लिहा .

    ReplyDelete
    Replies
    1. 👍 अधिक सविस्तर लिहिल्यास लोकांना वाचण्यात रस वाटेल का? अशी शंका होती.
      आपल्या सूचनेचा जरूर विचार करेन.
      धन्यवाद. 🙏

      Delete
  4. अप्रतिम... तुमच्या लेखणीतून तुमच्या अनुभवातील गोष्टींचा जीवंतपणा स्वतः अनुभवतो की काय असेच वाटते...

    ReplyDelete
  5. A walk down the memory lane.. 🇮🇳

    ReplyDelete
  6. हे वाचून फक्त एवढेच बोलू शकतो Live a life less ordinary!

    ReplyDelete
    Replies
    1. 🙏 माझ्यासारख्या ऑर्डिनरी माणसाला या प्रतिक्रियेमागचं दर्शनशास्त्र समजणं जरासं कठीण जातंय. 🙁
      प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

      Delete
  7. तुझे लिखाण हे दिवसेंदिवस अधिकाधिक आवडू लागले आहे. ज्योत्स्ना k

    ReplyDelete
  8. madhura Bedekar29 May 2020 at 14:41

    सर, तुमच्या लिखाणाला खुप छान हा शब्द लहान वाटतो, तुम्ही असेच लिहीत रहा,मला पण तुम्हा लोकांच्या विविध ganveshanchi माहिती हवी आहे

    ReplyDelete
    Replies
    1. 🙏🙂
      युनिफॉर्मबद्दल लिखाण मनावर घ्यायला हवं.
      👍

      Delete
  9. A graphic description Colonel. A very well drawn sketch of daily routine at NDA - one fraught with dangers !! Your article brings home the importance of two most important resources- time and food. Would love to know about the different kinds of uniforms and times when they are worn.
    Milind Ranade

    ReplyDelete
  10. Managing the routine on the days of equitation was really very difficult prposition more so without functional cycle.

    ReplyDelete
  11. आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असे नाते आपल्या काही coursemates बरोबर तैयार होत जाते.प्रशिक्षण व त्यानंतर चे सेवानिवृत्त होईपर्यंत चे सोनेरी दिवस कसे गेले हे कळत ही नाही..आणि मग course get together केव्हां होतंय आणि पुन्हा आपण भूतकाळात रमतोय ह्याचीच प्रतीक्षा व हुरहुर लागून रहाते.
    Col Shrinivas Pande

    ReplyDelete
  12. Great style col..तुमचं लिखाण वाचुन हुकलेल्या NDA प्रवेशाची जाणीव जरुर होतेच...पण तुमच्या लिखाणाच्या style मुळे पुढचा लेख वाचायची उत्सुकता वाढते हे निश्चित ...
    अमरीश जोशी, पुणे

    ReplyDelete
    Replies
    1. 🙂
      मनःपूर्वक धन्यवाद! 🙏

      Delete
    2. अतिशय खडतर जीवन

      Delete
  13. आपल्यात जिद्द असल्यामुळे सर्व गोष्टी पार पाडल्या.
    आताची मुले मुली पाश्चिमात्य देशाचे नको असलेले अनुकरण करतात खरच त्यांना थोडीतरी शिस्तिची गरज आहे.

    ReplyDelete