Labels

Sunday, 12 July 2020

चुशूल ना भूल पाएँगे

जुलै २०२०च्या पहिल्या आठवड्यात, चुशूल येथील भारत-चीन सीमेवर, दोन्ही देशांदरम्यानचा तणाव कमी करण्यासाठी महत्वाच्या वाटाघाटी झाल्या. त्याबद्दलचे वृत्त वाचत असता, काही वर्षांपूर्वी चुशूलमध्ये मला आलेला एक अनुभव आठवला.

सैन्यदलाच्या नोकरीत असताना मी लडाखमध्ये कधीच गेलो नव्हतो. तो प्रदेश पाहायची तीव्र इच्छा, सेवेतून निवृत्त झाल्यानंतर चार वर्षांनी पूर्ण झाली. अमेरिकेतील दोन वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये शिकत असलेली आमची मुले, असिलता आणि अनिरुद्ध, २०११ च्या ऑगस्ट महिन्यात, सुुट्टीकरिता एकाच वेळी भारतात येणार होती. त्यामुळे, आम्ही व्यवस्थित नियोजन करून लडाखचा दौरा आखला.
मी निवृत्त झालो असलो तरीही, भारतीय सेनेकडून काही सुविधा आजही मला मिळू शकतात. त्याप्रमाणे, श्रीनगर-कारगिल-लेह या प्रवासात आणि लेहमधील वास्तव्यातही, भारतीय सेनेच्या वेगवेगळ्या युनिट्सच्या गेस्टरूम्समध्ये नाममात्र भाडे भरून, राहण्या-जेवणाची उत्तम सोय सहज होऊ शकली. स्वखर्चानेच, पण आर्मीसोबत नेहमीचे संबंध असलेल्या एजेन्सीकडून, विश्वासू चालक आणि आरामदायी टॅक्सीही मिळाली. आठ-दहा दिवसांच्या वास्तव्यात, लेहच्या आसपासची पण वेगवेगळ्या दिशांना असलेली, अनेक ठिकाणे आम्ही पाहिली. एका दिवशी, लेहहून निघून, थिकसे येथील बौद्ध गोम्पा, चुमाथांगचे नैसर्गिक उष्ण पाण्याचे झरे, आणि 'त्सो मोरिरी' तळे पाहावे; तळ्याजवळच रात्री मुक्काम करावा, आणि दुसऱ्या दिवशी हानले येथील वेधशाळा पाहून चुशूलमार्गे लेहला परत यावे, असे नियोजन आम्ही केले होते. 

लडाखमधील निसर्गसौंदर्य खरोखरच डोळ्याचे पारणे फेडते. बर्फाळ पर्वत, क्षणा-क्षणाला रंग बदलणाऱ्या टेकड्या, हिरवीगार कुरणे, तळ्याचे निळे पाणी, आणि वाळवंटात असते तशी रेताड जमीन हे सगळे कित्येक ठिकाणी, एकाच दृष्टीक्षेपात पाहायला मिळते. दोन वशिंडे असलेले बॅक्ट्रियन उंट, केसाळ याक, पश्मीना  बकऱ्या, आणि अत्यंत गुबगुबीत व आळशी 'मॉरमॉट', असे वेगळेच प्राणी तेथे दिसतात. लाल व काळ्या मानेचे क्रौंच पक्षी आणि इतरही अनेक जातींचे दुर्मिळ पक्षी तेथे आहेत. नितांतसुंदर आणि शांत असे त्सो मोरिरी तळे व त्याच्या आसपासच्या भागाला सरकारने 'अभयारण्य' घोषित करून पर्यटकांसाठी काही निर्बंधही घातलेले आहेत. त्यामुळे, तेथे मोजकेच पर्यटक असतात

त्सो मोरिरी तळ्याजवळच्या एका छोट्या वस्तीमधील घरांमध्येच राहण्या-खाण्याची सोय होऊ शकते. तिथेच कुठेतरी राहण्याचा विचार आम्ही केला होता, पण अजून ठिकाण शोधले नव्हते. तळ्याकाठी इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसांचा (ITBP) एक कॅम्प आम्हाला दिसला. बर्फाळ हवामानात उबदार राहू शकणाऱ्या गोलाकार छप्पराच्या पाच-सात लांबुळक्या शेड, असे त्या कॅम्पचे स्वरूप होते. सहजच मी कॅम्पच्या गार्डला विचारले, "जवळच्या वस्तीत बऱ्यापैकी राहण्याची सोय कुठे होईल?" माझ्या ओळखपत्रावर 'सेवानिवृत्त कर्नल' वाचताच, तो जाऊन त्यांच्या कमांडंटला घेऊन आला. कमांडंटने मला कडक सॅल्यूट ठोकून त्यांच्या गेस्टरुममध्येच राहण्याची विनंती केली. त्या पाच-सात शेडपैकी एक त्यांची गेस्टरूम होती. आमच्यासाठी फारशी चांगली सोय करू शकत नसल्याबद्दल त्याने दिलगिरी व्यक्त केली. मात्र, गरम जेवण आणि उबदार अंथरूण एवढी माफक गरज तेथे उत्तमरीत्या भागली. दुसऱ्या दिवशी पहाटे, त्या नितळ तळ्याकाठी बसून पाहिलेला सूर्योदय हा एक विलक्षण अनुभव होता. आकाशातल्या, आणि तळ्याच्या पाण्यात उमटणाऱ्या अनेक छटा पाहत बसलो असताना तेथून पाय निघणे अवघड झाले. 


अखेर तेथून निघून, समुद्रसपाटीपासून १४७६५ फुटांवर असलेल्या हानले वेधशाळेत आम्ही पोहोचलो. लडाखमध्ये सर्वसामान्य पर्यटकांना सहजी जिथे जाता येत नाही अशी ठिकाणेही, मी निवृत्त सेनाधिकारी असल्याने आम्हाला पाहता आली. हानले येथील भारतीय खगोलशास्त्रीय वेधशाळा (इंडियन अस्ट्रॉनॉमिकल ऑबझर्व्हेटरी) हे त्यापैकीच एक ठिकाण. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिंपियाडमध्ये आमच्या मुलांनी भाग घेतलेला असल्याने त्यांना ती वेधशाळा बघण्याची खूप इच्छा होती. तेथे जाण्यासाठी लेहच्या जिल्हाधिकाऱ्यांचे विशेष परमिट मला सहज मिळाले. दोन मीटर व्यासाच्या एका रेडिओ दुर्बिणीद्वारे अवकाशातील ग्रह-ताऱ्यांच्या दिशेने येणाऱ्या लहरींचे खगोलशास्त्रीय विश्लेषण करण्यासाठी ही वेधशाळा उभारलेली आहे. तिचे नियंत्रण आणि माहितीचे विश्लेषण बंगलोरच्या भारतीय खगोलभौतिकी संस्था (इंडियन इन्स्टिटयूट ऑफ ऍस्ट्रोफिजिक्स) येथून उपग्रहाद्वारे दूरस्थपणे केले जाते. 
हानलेहून चुशूलच्या दिशेने निघेपर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ होऊन गेली होती. वाटेत एखादी खानावळ किंवा चहाची टपरीच काय, पण एक मनुष्यही दिसत नव्हता. भुकेने जीव कासावीस असताना नेमके त्याच वेळी गाडीचे एक चाक पंक्चर झाले. आमचा ड्रायव्हर स्टेंझिन याने लगबगीने उतरून स्टेपनी बसवली. त्यात अर्धा-पाऊण तास गेला. पुढे कुठेतरी पंक्चर काढून घेऊ, असे तो म्हणाला खरा, पण "त्यादरम्यान स्टेपनीही धोका देणार नाही ना?" ही शंका आमच्या मनात डोकावलीच. आतापर्यंत पाहिलेले लडाखमधील सृष्टीसौंदर्य या भागात आम्हाला मुळीच दिसेना. रस्त्याच्या दोन्ही बाजूचा रेताड, रखरखीत आणि अक्षरशः निर्जीव परिसर पाहून, आपण लडाखमध्ये आहोत की राजस्थानमध्ये असा प्रश्न आम्हाला पडला होता. लडाखच्या पुष्कळशा भागाला High Altitude Desert का म्हणतात त्याचा प्रत्यय आम्हाला आला. रस्त्यावर मैलोंमैलांपर्यंत एकही वाहन नव्हते. चहूबाजूला नजर पोहोचेपर्यंत मनुष्यवस्तीचा मागमूसही नव्हता. 

काही अंतर गेल्यावर अचानकच, ज्या गोष्टीची कुशंका मनात आली होती तेच घडले. गाडीचे आणखी एक चाकही पंक्चर झाले. भर वाळवंटात कुठेतरी आम्ही अडकलो होतो. संध्याकाळ होत आली होती. आमच्याकडचे खाद्यपदार्थांचे पुडे, व पाणी संपत आले होते. सगळ्यात जवळचे वस्तीचे ठिकाण, म्हणजे चुशूल, अजून २०-२५ किलोमीटर लांब होते. मी व स्टेंझिन गाडीतून उतरलो आणि कुठून व कशी मदत मिळवता येईल याचा विचार करू लागलो. स्वाती व मुले चिंताक्रांत, भुकेजलेल्या, दमलेल्या अवस्थेत गाडीतच बसून होते. लेहपर्यंत पोहोचणे तर दूरच, पण सबंध रात्र त्या भयाण, निर्मनुष्य परिसरात, काहीही न खाता-पिता, थंडीमध्ये गारठत काढावी लागण्याची शक्यता समोर दिसत होती. 

इतक्यात, मला लांबवर कुठेतरी, काही माणसांच्या बोलण्याचा आवाज आला. स्टेंझिन कानोसा घेत त्या दिशेने निघाला. मीही पाठोपाठ गेलो. त्या निर्मनुष्य भागात, एका टेकाडावर चक्क एका खोलीचे बांधकाम चालू होते. ३-४ माणसे आणि दोन वाहनेही दिसली. स्टेंझिनने त्या लोकांना आमच्याबद्दल माहिती आणि एकूण समस्येची जुजबी कल्पना दिली. त्या गटातला एक मनुष्य, लवून नमस्कार करून, त्याच्या मोडक्या तोडक्या हिंदीत म्हणाला, "कर्नलसाब, फ़िक्र की कोई बात नहीं है। आप सब मेरी गाडीमें आईए। आर्मी की एक पोस्ट हमारे चुशूल गाँव के पास ही है। आज आपका लेह पहुंचना नामुमकिन है। शायद रातभर चुशूल मेंही  रुकना पड़ेगा। मेरे आदमी आपकी गाडीके टायर ले जायेंगे और बनवाकर बिठा देंगे। आपका ड्रायवर तबतक यहीं रुकेगा। मेरे आदमी आपकी गाड़ी और ड्रायवरको चुशूल तक पहुंचा देंगे।"  

तो गृहस्थ चुशूल गावाचा 'लंबरदार' म्हणजे सरपंच होता. त्याने आम्हाला आर्मीच्या पोस्टपर्यंत सोडले. गाडीसोबत एकट्याच थांबलेल्या आमच्या ड्रायवरबद्दल मी काळजी व्यक्त करताच तो हसून म्हणाला, "सर, तुम्ही बाहेरचे असलात तरी आर्मी ऑफिसर, म्हणजे आमचेच आहात. पण हा ड्रायव्हर तर आमचा लडाखी छोकराच आहे. त्याला सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी माझी!" 

आर्मी पोस्टच्या सुरक्षारक्षकाला लंबरदाराने आमची दर्दभरी कहाणी सांगितली. त्या जवानाने आम्हाला तेथेच थांबवून आपल्या सुभेदार साहेबांना बोलावून आणले. माझे ओळखपत्र पाहून खात्री होताच सुभेदाराने कडक सॅल्यूट ठोकला आणि एकच धावपळ उडाली. झटपट एक गेस्टरूम उघडली गेली, हात-पाय धुवायला गरम पाण्याच्या बादल्या आल्या. वाफाळलेला चहा व बिस्किटे पोटात गेल्यावर आम्हा सगळ्यांच्याच जिवात जीव आलाचीन सीमेजवळ, दुर्गम भागातल्या त्या छोट्याश्या पोस्टवर एक गेस्टरूम असेल, व त्यात एखाद्या बऱ्यापैकी लॉजवर असते तेवढी राहण्या-झोपण्याची व्यवस्था होऊ शकेल, ही कल्पना सिव्हिलिअन्सना कदाचित अविश्वसनीयच वाटेल. प्राप्त परिस्थितीत एक रात्र काढण्यापुरती ती व्यवस्था आम्हाला समाधानकारक वाटत होती.

आम्ही चहा घेत होतो तेवढ्यात ते सुभेदारसाहेब येऊन म्हणाले, "सर, मैंने बटालियन हेडक्वार्टर में आपके आनेकी खबर दी है। हमारे कर्नलसाब टेलीफोनपर आपसे बात करना चाहते हैं।"

फोनवर कर्नलसाहेब मला म्हणाले, "सर, तुमच्या हुद्द्याला साजेश्या सोयी त्या पोस्टवरच्या गेस्टरूममध्ये नाहीत. आज तुम्ही आमच्या युनिटचे गेस्ट आहात. तुम्ही, मॅडम आणि मुलांनी त्या छोट्याश्या खोलीत राहणे मला पसंत नाही. मी तुमच्यासाठी गाडी रवाना केली आहे. बटालियन हेडक्वार्टर फक्त १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. तुम्ही प्लीज इथेच या आणि आमच्या ऑफिसर मेसमधल्या गेस्टरूम मध्ये राहा."   

एव्हाना अंधार पडला होता. स्टेंझिन टॅक्सी घेऊन अजून पोहोचला नव्हता. त्याबद्दल सुभेदारसाहेबांकडे चौकशी करताच ते म्हणाले, "सर, तुमच्या ड्रायव्हरला जेवायला घालून आम्ही इथेच झोपवू. सकाळी तुम्ही सांगाल त्या वेळेला मी त्याला तुमच्याकडे पाठवेन. तुम्ही काळजी करू नका." 

अंधारातच जीपमध्ये बसून आम्ही ऑफिसर मेसमध्ये पोहोचलो. अनेक ठिकाणच्या आर्मीच्या ऑफिसर्स मेस, आणि गेस्टरूम्स स्वातीने आणि आमच्या मुलांनी पाहिलेल्या होत्या. पण चुशूलसारख्या दुर्गम ठिकाणची ती गेस्टरूम पाहून त्यांनीही 'आ' वासला. एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये असावा तसा तो तीन खोल्यांचा Suite होता. सर्व प्रकारची पेये, बिस्किटे, काजू-बदामाच्या डिशेस, वेफर्सचे पुडे, प्रसाधनांच्या सर्व वस्तू, सगळे काही व्यवस्थित मांडून ठेवलेले होते. दोन्ही बाथरूममध्ये गरम पाण्याचे गीझर, आणि खोल्यांमध्ये रूम हीटर चालू करून ठेवलेले होते. आम्ही पोहोचताच तेथील हवालदाराने आमचे स्वागत केले आणि जेवणासाठी मेनू काय हवा असे विचारले. दिवसभर जेवण मिळाले नसल्यानेे, आम्हाला काहीही चालले असते. पण, अगदी अनपेक्षित असे अतिशय चविष्ट कॉन्टिनेन्टल जेवण आणि शेवटी 'स्नोबॉल' नावाचे डिझर्ट, अश्या मेजवानीनंतर, "चुशूलसारख्या आडजागी आता आणखी काय-काय आश्चर्ये पाहायला मिळणार आहेत?" असा विचार आमच्या मनात आला नसता तरच नवल!  उबदार बिछान्यात पहुडल्यावर दिवसभराचा मानसिक ताण आणि शारीरिक थकवा पार निघून गेला.  

दुसऱ्या दिवशी सकाळी स्टेंझिन टॅक्सी घेऊन मेसमध्ये आला. रात्री चुशूल पोस्टवर त्याचीही उत्तम खातिरदारी केली गेली असे त्याने खुशीत सांगितले. भरपेट नाष्टा करून, हिशोबाप्रमाणे बिल भरून आम्ही गेस्टरूम सोडली. परतीच्या प्रवासाला निघणार तेवढ्यात, आदल्या रात्रीपासून आम्हाला हवे-नको ते सर्व पाहणारा उमेश नावाचा जवान हातात काही पुडे घेऊन आला.

"सर, रूम में मैंने तो सबकुछ रखा था। बच्चों ने कुछ लिया ही नहीं। इसलिए हमारे साहब ने, बच्चों के लिए ये पैक कर के देने को कहा है।" 
असे म्हणून त्याने काजू-बदामाचे दोन पुडे आमच्या, अनुक्रमे २३ आणि २० वर्षांच्या, 'बाळांच्या' हातात ठेवले. उमेशला आम्ही धन्यवाद तर दिलेच पण आमच्यासोबत फोटो काढण्याची त्याची इच्छाही पूर्ण केली.

पूर्वी एकदा, मी व माझे एक इन्कमटॅक्स कमिशनर मित्र, पुण्यातल्या सैन्यदलाच्या क्लबमध्ये गप्पा मारत बसलो होतो. निवृत्तीनंतरही मला सेनादलाकडून मिळणाऱ्या सोयी-सुविधा पाहून ते मला म्हणाले होते, "कर्नलसाहेब, आज माझ्या पदामुळे मला खूप मान आहे. जाता-येता लोक सलाम ठोकतात. पुण्यातील कोणत्याही क्लबची मेंबरशिप मला सहजच मिळू शकते. पण निवृत्त झाल्यावर मला यापैकी काहीही मिळणार नाही. त्यामुळेच मला तुमचा खूप हेवा वाटतो!"

त्या लडाख दौऱ्यातल्या आमच्या अनेक सुरस आठवणी आहेत. पण आज बातम्यांमध्ये चुशूलचा उल्लेख येताच हा अनुभव प्रकर्षाने आठवला. चुशूलसारख्या दुर्गम ठिकाणी, अत्यंत खडतर परिस्थितीत, आमचे अधिकारी आणि सैनिक सेवा बजावत असतात. पण, एक सेवानिवृत्त अधिकारी आणि त्याच्या कुटुंबियांची बडदास्त ठेवण्यासाठी झटतानाही मी त्यांना पाहिले आहे. सैन्यदलासारख्या अद्भुत, एकसंध कुटुंबाचा मी आता सदस्य राहिलो नाही, असे वाटून कधी-कधी मला चुटपूट लागते. पण, असे अनुभव आठवले की माझा ऊर अभिमानाने आजही भरून येतो. जणू ते सगळे मला सांगत असतात, "तुमको न भूल पायेंगे!" ! 

33 comments:

  1. Excellent writing
    Really Army is one family
    We are proud of Indian Army

    ReplyDelete
  2. जसे तुम्ही हे अनुभव सांगितले तसे आता अभिमानास्पद अनुभव सुध्दा पाठवा,

    मिलिंद वैद्य

    ReplyDelete
  3. गोविंद दातार- युध्दस्य कथा रम्या असे आहेच पण या अनुभवांचे शब्दांकन सुरेख आहे.

    ReplyDelete
  4. नमस्कार, कर्नल साहेब,
    सुंदर माझ्या समोर चित्र उभे राहिले.

    ReplyDelete
  5. चुशूल पाहुणचार आवडला....विशेषतः अडथळ्यांची शर्यत खेळून आल्यावर म्हणजे एवढा खडतर प्रवास करून आल्यावर ,दुर्गम प्रदेशात झालेली खातिरदारी वाचून छान वाटले.

    ReplyDelete
  6. Write about our SODE course industrial tour experience especially delayed start and all the thrill we had

    ReplyDelete
  7. Excellent narration Colonel. Thanks for literally taking us through the tall picturesque mountains, beautiful lakes and uninhabitable deserts. Nice photos. It is so reassuring to know that even a retired Army officer is treated as a part of the Army and he is still respected by civilians.
    Milind Ranade

    ReplyDelete
    Replies
    1. Yes. One feels so good to be still treated as a part of the family! 🙂

      Delete
  8. Too good... can you please write a book and publish it? Specially stories that kids will like... my son like to hear stories of our armed forces during bed time and my stock is over now so had to repeat the stories.

    ReplyDelete
  9. Fantastic travelogue... very lucid and engaging. Would be a great idea to publish all your blogs as a book. Food for thought:)
    - Sumant Khare

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks, Sumant! 🙏
      I am considering the idea of compiling these anecdotes in a book. 👍

      Delete
  10. सुंदर वर्णन!

    ReplyDelete
  11. Sir, तुमच्या सोबत चुशुल ला गेल्याचा भास व्हावा,इतकं सुंदर प्रवास वर्णन आहे.

    ReplyDelete
  12. सर,
    अत्यंत ओघवती लेखन शैली आणि चित्रमयी अनुभव कथन. मस्तच.
    उमेश उंब्राणी.

    ReplyDelete
  13. Can never forget Chushul, was 2IC at Darbuk with a battery at Chushul. Visited regularly. I also was selected as a delegation leader for a flag meeting across the airfield into Chinese territory, for exchange of PWs. GOC 3 Div asked Inf Bde Cdr, why an Arty officer, and the Bde Cdr from Mahar Regt replied that he is the most capable Offr in my Bde Gp. So have great memories of Ladakh.. Well written Anand. Col Mukund Pandit

    ReplyDelete
    Replies
    1. Wow! That's great!
      Like I suggested, you must also write your memoirs, sir! 🙏

      Delete
  14. आर्मी ऑफिसर एवढ सुंदर लिखाण करू शकत यावर विश्वास बसत नाही...खूप छान लेखन साहेब...अशाच सुंदर सुंदर कथा पोस्ट करत राहा....खूप खूप धन्यवाद!!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद! 🙏
      प्रदीप या नावाच्या चार व्यक्ती माझ्या जवळच्या ओळखीत आहेत. आपण त्यापैकीच एक की कुणी वेगळेच हे कळू शकले नाही.
      समजल्यास बरे वाटेल. 🙂

      Delete
    2. Pradip Narsale.we met in MIT

      Delete
  15. Just Awesome writeup.
    My dad was posted there too.
    Unfortunately, we could not there that time, but will be going some day for sure.

    ReplyDelete
    Replies
    1. Nice to know that!
      Thanks for the appreciation. 🙏
      Since you have not logged in with your name, there's no way for me to know who this appreciation comes from. 😕

      Delete
  16. आपण कुटुंबियांसहित शांतपणे लडाखचे सौंदर्याचे नेत्रसुख घेतले हे आगोदर खूप छान वाटले पण नंतरची अविस्मरणिय अडथळा शर्यत आपल्या पदामुळे अतिशय सुखद पार पडली ह्याचा अभिमान वाटला.

    ReplyDelete
  17. आपण कुटुंबियांसहीत लडाखचे नेत्र सुखद सौंदर्य शांतपणे घेत होतात हे छान वाटल.पण पुढचा खडतर प्रवास त्यानंत आपल्या पदामुळे झालेला गोड शेवट अविस्मरणिय आहे.

    ReplyDelete