Labels

Thursday 23 July 2020

तितली कहे मैं चली आकाश...

सैन्यदलातील नोकरीचे अनेक मुला-मुलींना आकर्षण असते. शिपाई, नायब सुभेदार किंवा लेफ्टनंट अश्या तीन पदांवर सैन्यदलात दाखल होता येते. प्रत्येक पदासाठी पात्रतेच्या अटी व निवडीचे निकष वेगवेगळे आहेत. तिन्ही पदावरच्या नोकऱ्या सन्माननीय आहेत. परंतु, वयाच्या २१-२२व्या वर्षी जर एखाद्या व्यक्तीला सेनाधिकारी म्हणून दाखल होता आले तर तिच्या आयुष्याचा आलेख वेगळाच होतो आणि खूप उंच जाऊ शकतो हे नक्की. त्याविषयी, योग्य माहिती, योग्य वेळी मिळणे महत्वाचे ठरते. या संदर्भातले काही रोचक प्रसंग मला चांगले आठवतात. 

नुकताच BSc झालेला एक तरुण मुलगा एके दिवशी अचानकच जाऊन, सैन्यातील जवान भरतीच्या रांगेत उभा राहिला. त्याच्या घरी अगदीच गरिबी नसली तरी आर्थिक परिस्थिती सामान्य होती. इतर काही तात्कालिक कारणेही असतील, परंतु, लवकरात लवकर आपल्या पायावर उभे राहण्यासाठी तो उतावीळ होता. उमेदवारांची कागदपत्रे तपासून, प्राथमिक चाचणी घेण्याचे काम चालू होते. भरती प्रक्रियेवर देखरेख करणाऱ्या मेजरसाहेबांच्या चाणाक्ष नजरेला, हा तरुण इतरांपेक्षा थोडा वेगळा वाटला. त्यांनी त्याला बाजूला घेऊन कसून चौकशी केली. ते त्याला म्हणाले, "तू शिपाई म्हणून भरती होऊ नयेस असे मला वाटते. तुझ्यात एक वेगळी चमक मला दिसते आहे. सध्या काहीही अडचणी असल्या तरी त्यातून काही दिवस मार्ग काढ. दोन वर्षात एम.एस्सी (इलेक्ट्रॉनिक्स) पदवी मिळव. त्यानंतर, 'टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स' (TGC) या प्रक्रियेतून ऑफिसर बनण्याकरिता तू पात्र होशील. अधिकारीपदासाठी, TGC ही एकमेव एंट्री अशी आहे की त्यामार्गे दाखल होणाऱ्या अधिकाऱ्यांना रुजू होताक्षणी, दोन वर्षांची सेवाज्येष्ठता (Seniority) मिळते. म्हणजेच, जणू आजपासूनच तू सैन्यात अधिकारी म्हणून दाखल झालास असे होईल. पटत असेल तर रांगेतून बाहेर पड, घरी जा आणि विचार कर." 

मेजरसाहेबांच्या सल्ल्यानुसार, त्या तरुणाने नुसता विचार केला नाही, तर खरोखरच पुढच्या दोन वर्षात तो एम.एस्सी होऊन सैन्यदलात अधिकारी म्हणून दाखलही झाला. मी सर्व्हिसमध्ये असताना, माझ्यापेक्षा २-३ वर्षे सिनियर असलेल्या त्या तरुण अधिकाऱ्याने स्वतःच्याच पूर्वायुष्याची ही विलक्षण कथा मला सांगितली होती!

सेनाधिकारी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी TGC, NDA, CDS, AFCAT, यांसारखे आणखीही वेगवेगळे मार्ग आणि त्यांचे स्वतंत्र निकष आहेत. ऑफिसर बनण्याची पात्रता असलेल्या निवडक शिपायांनादेखील डेहरादूनमधील आर्मी कॅडेट कॉलेज (ACC) या संस्थेमध्ये तीन वर्षांचे ट्रेनिंग दिले जाते. त्यानंतर ते NDA मधून बाहेर पडणाऱ्या मुलांच्या बरोबरीला येतात. डेहरादूनच्या इंडियन मिलिटरी अकॅडमी (IMA) मध्ये एक वर्षाचे विशेष प्रशिक्षण झाल्यावर ते लेफ्टनंट पदावर रुजू होतात. माझ्या  कितीतरी कोर्समेट्सनी याच मार्गाने, शिपाई ते अधिकारी, हा प्रवास केलेला होता. 

सेनाधिकारी पदासाठी योग्य व्यक्ती निवडण्याच्या प्रक्रियेत, SSB हा एक महत्वाचा टप्पा असतो. मात्र, या SSB निवडप्रक्रियेबाबत काही हास्यास्पद गैरसमज प्रचलित आहेत. उदाहरणार्थ:- "तगडी शरीरयष्टी आणि स्टॅमिना असेल तरच निवड होते", "ज्यांचे वडील, काका, भाऊ, आर्मीमध्ये किंवा प्रशासकीय सेवेत अधिकारी असतात अशांचीच वर्णी लागते", "SSBच्या मेसमध्ये जेवत असताना वेटरच्या वेषातले अधिकारी उमेदवारांचे टेबल-मॅनर्स तपासतात", "पैसे चारल्याशिवाय काही होत नाही" आणि असे बरेच काही! पण, उमेदवारांनी अश्या गैरसमजांना बळी न पडता, निवडप्रक्रियेची अधिकृत माहिती करून घेणे आवश्यक असते. 

SSBमध्ये ग्रुप-टेस्टिंग ऑफिसर (GTO), इंटरव्ह्यूइंग ऑफिसर, व सायकॉलॉजिस्ट, असे तीन निवड अधिकारी असतात. हे तिघेही, स्वतंत्रपणे, आपापले ठराविक शास्त्रीय तंत्र वापरून, उमेदवारांची मानसशास्त्रीय घडण समजून घेतात. त्यांच्या अंगी सेनाधिकारी होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांची (officer-like  Qualities) पातळी किती आहे ते तपासतात, प्रशिक्षणकाळात त्या गुणांना कितपत झळाळी आणता येईल याचाही अंदाज बांधतात, आणि स्वतंत्रपणे आपापला अहवाल लिहितात. एकूण, पाच दिवसांच्या या प्रक्रियेच्या शेवटी, तिघेही अधिकारी एकत्र चर्चा करून निवडीसंदर्भात सामूहिक निर्णय घेतात. 

अलाहाबादच्या SSB मध्ये, GTO पदावर १९९२ साली माझी नियुक्ती झाली. पण त्याआधी, म्हणजे १९८९ साली, मी आसाममध्ये तेझपूरच्या सिग्नल युनिटमध्ये पोस्टिंगवर असताना एक प्रसंग घडला होता. एका रात्री उशीरा, मी गार्ड चेकिंगच्या ड्यूटीवर युनिटमध्ये फिरत होतो. एका पोस्टवरच्या जवानांच्या सतर्कतेची परीक्षा घेऊन मी पुढे निघालो. पण, गार्डरूममध्ये प्रकाश दिसल्यामुळे मी चटकन आत शिरलो. ज्यांची ड्यूटीची पाळी संपली असेल किंवा अजून यायची असेल असे जवान तेथे झोपलेले असतात. एका छोट्याश्या दिव्याच्या प्रकाशात एक जवान काहीतरी वाचत होता. मला पाहताच त्याने लगबगीने उठून सॅल्यूट केला आणि भीतभीत, डाव्या हातातले पुस्तक लपवत माझ्यासमोर उभा राहिला. नवीनच भरती झालेला, संजयकुमार नावाचा तो एक रेडिओ मेकॅनिक होता. रात्री, 'लाईट्स आऊट'च्या वेळेनंतर, दिवा लावून काहीतरी वाचत असताना पकडले गेल्याचा अपराधी भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. मी खडसावताच तो म्हणाला, "सॉरी सर, चूक झाली. पण, मी अभ्यास करीत होतो." 

मी त्याला सुनावले, "लाईट्स आऊटच्या वेळेनंतर दिवा लावून वाचत बसला आहेस ही तुझी चूक आहेच. पण, तू नुकताच भरती झालेला आहेस. वरच्या श्रेणीचा मेकॅनिक होण्यासाठीची परीक्षा इतक्यात तुला देता येणार नाहीच. आधी रेडिओ आणि इतर उपकरणे वापरून त्यात कौशल्य मिळव. लेखी परीक्षेची तयारी त्यानंतरही करता येईल." 
त्यावर तो भिडस्तपणे खाली पाहत म्हणाला, "सर, मी ACC च्या परीक्षेसाठी अभ्यास करीत होतो."

हे ऐकून माझे कुतूहल जागे झाले. मला जितकी वाटली होती त्यापेक्षा या मुलाची झेप लांब पल्ल्याची दिसत होती. त्याच्या हातातील गाईड मी चाळले. त्याला दोन-चार प्रश्न विचारले. एक-दोन अचूक उत्तरे देताना त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकला. जी उत्तरे त्याला आली नाहीत त्याबद्दल त्याच्या डोळ्यात, "अरे, मला हे का आले नाही?" असा भाव जाणवला. कदाचित त्यामुळेच, मला आतून वाटले की या मुलाला आपण काहीतरी मदत करावी. मी म्हटले, "ठीक आहे. जमेल तसा अभ्यास करत राहा. कधी काही अडले तर मला विचार. पण नियमबाह्य काम करू नकोस." 

दुसऱ्या दिवशी मी त्या जवानाच्या वरिष्ठ सुभेदारसाहेबांकडे त्याच्याबद्दल चौकशी केली. त्यांचेही त्याच्याबद्दलचे मत चांगले दिसले. आदल्या रात्रीचा प्रसंग त्यांच्या कानापर्यंत पोहोचला होता. त्या जवानाने नियमभंग केला असला तरी मी त्याच्याविरुद्ध कारवाई करू नये, अशी विनंती त्यांनी मला केली. मी कारवाई करणार नव्हतोच. त्याउलट, मी सुभेदारसाहेबांना सांगितले की यापुढे त्याची रात्रीची ड्यूटी, युनिटच्या मुख्य ऑफिसजवळ लावली जावी. ऑफिसात ड्यूटीवर असलेल्या क्लार्कला, दिवा लावून ऑफिसचे काम करण्याची मुभा असे. हा जवान 'ऑफ ड्यूटी' असताना तेथे बसून अभ्यास करू शकेल असा विचार मी केला. दिवसाही, शक्य असेल तिथे, अभ्यास करण्यासाठी त्याला काही सूट देता आल्यास पाहावे असेही मी सुभेदारसाहेबांना सुचवले. मी जगावेगळे काहीच केले नाही. वैयक्तिक आयुष्यात प्रगती करण्याची मनापासून इच्छा असलेल्या जवानांना शक्य ती मदत, बहुसंख्य अधिकारी करतातच.  

१९९२ च्या एप्रिल महिन्यात अचानक आणि अनपेक्षितपणे, GTO ट्रेनिंग कोर्ससाठी माझे नामांकन झाल्याचा संदेश दिल्लीच्या सेना मुख्यालयातून आला. असे नामांकन करण्यापूर्वी, ज्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या SSB निवडीच्या वेळी अत्त्युत्तम मार्क मिळवले होते, त्यांच्या फायली काढून, त्यांचे सर्व गोपनीय अहवाल तपासले जातात. प्रत्येक अहवालात, 'प्रामाणिकपणा', 'कर्तव्यनिष्ठा' अश्या गुणांमध्ये ज्यांना दहापैकी कमीतकमी नऊ गुण मिळालेले असतील त्यांचेच ट्रेनिंगसाठी नामांकन केले जाते. ट्रेनिंग कोर्सनंतरही त्यांची  कसून चाचणी घेऊनच त्यांची नियुक्ती बोर्डावर केली जाते. माझ्या ट्रेनिंग बॅचमधील एकूण १३ प्रशिक्षणार्थीं अधिकाऱ्यांपैकी फक्त दोन अधिकारी SSBवर नियुक्त केले गेले. मेजर (आता निवृत्त ब्रिगेडियर) हरीश चांदे आणि मी, असे दोघेही महाराष्ट्राचे सुपुत्र निवडले गेलो होतो हा एक सुखद योग होता!
 
SSB मधील चार वर्षांच्या काळात, जवळ-जवळ १५०० उमेदवार मी तपासले. त्यापैकी जेमतेम १५० उमेदवार सेनाधिकारी बनण्यास पात्र ठरले असतील! काही उमेदवार माझ्या चांगलेच लक्षात राहिले. ज्याचे आजोबा निवृत्त मेजर जनरल, आणि वडील केंद्र सरकारचे वरिष्ठ सनदी अधिकारी होते, असा एक मुलगा अगदी कमी मार्क मिळवून नापास होऊन गेला होता. अत्यंत सामान्य परिस्थितीतल्या, जन्मांध आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा नेत्रदीपक गुण मिळवून चमकला होता. इंग्रजी भाषा विशेष बोलता येत नसलेली एक हिंदीभाषी मुलगी, अंगच्या सुप्त गुणांमुळे सहज निवडली गेली होती. त्याउलट, सफाईदार इंग्रजीमुळे सहजी छाप पाडणारी, पण गटातल्या इतर मुलींसोबत अतिशय तुच्छतेने वागून आपल्या 'अंगच्या नाना कळा' दाखवणारी मुलगी, संपूर्ण निवडसमितीने एकमुखाने बाद ठरवलेली मी पाहिली आहे. 
 
अलाहाबादच्या SSB मध्ये अगदीच 'हटके' असे काम केल्यानंतर, १९९६ साली मी पुण्याच्या सिग्नल युनिटमध्ये पोस्टिंगवर आलो. तेथे माझ्याकडे राजस्थान बॉर्डरजवळच्या भागातील दूरसंचारव्यवस्था पाहण्याचे काम होते. कामाचा आवाका मोठा होता आणि हाताखाली एक महिला अधिकारी फक्त होती. ती अतिशय स्वाभिमानी, विश्वासू आणि कार्यक्षम अधिकारी होती. पण, माझे काम हलके करण्यासाठी आणखी दोन, किंवा निदान एकतरी अधिकारी मला मिळावा असा लकडा मी आमच्या कमांडिंग ऑफिसर (CO) च्या मागे लावला होता. एके दिवशी CO साहेबांनी मला सांगितले की नुकताच कमिशन घेऊन पहिल्याच पोस्टिंगवर युनिटमध्ये आलेला एक लेफ्टनंट ते माझ्या हाताखाली देत आहेत. मी कपाळाला हात लावून घेतला. म्हणजे आता माझे काम हलके होण्याऐवजी या नवीन पिल्लाला युनिटमध्ये रुळवण्याचे काम करावे लागणार होते!

त्या नवीन लेफ्टनंटने दरवाज्यात उभे राहून आत येण्याची परवानगी मागताच मी फाईलमधून मान वर केली. रुबाबदार सॅल्यूट करत, "लेफ्टनंट एस. के. खत्री रिपोर्टींग सर" असे खणखणीत आवाजात म्हणणारा तो मुलगा मला आवडला. मी त्याला खुर्चीवर बसायची खूण केली आणि फाईल वाचता-वाचताच म्हटले, "येस, लेफ्टनंट खत्री, टेल मी मोअर अबाउट युअरसेल्फ". 
"सर, मी लेफ्टनंट संजयकुमार खत्री. तेझपूरला तुमच्या हाताखाली रेडिओ मेकॅनिक होतो. तुम्ही ओळखलेले दिसत नाही", असे त्याने म्हणताच, तो मला पाहताक्षणी का आवडला असावा हे माझ्या ध्यानात आले. आत कुठेतरी मी त्याला ओळखले होते पण ते मलाच समजले नव्हते. त्याचा इथपर्यंतचा सगळा प्रवास मी जाणून घेतला. तेझपूरला मला तो 'लंबी रेस का घोडा' वाटला होता, पण त्याने आकाशाला गवसणी घालून ते सिद्धही करून दाखवले होते. ते मला दिसावे यासाठीच कदाचित, नियतीने त्याला पुन्हा माझ्याच हाताखाली पाठवले होते!

गीता आणि संजय, या दोघा लेफ्टनंट्सनी पुढील एक-दीड वर्षे, त्यांच्या कंपनी कमांडरच्या, म्हणजे माझ्या कामाचा भार खूपच हलका केला. गीताबद्दलही एक रंजक आठवण मनात येते आहे, पण ती  पुन्हा केंव्हातरी सांगेन ... 

28 comments:

  1. सुंदर लेख, शिक्षणासाठी मदत आज ही करत असता. धन्यवाद

    ReplyDelete
  2. मनाला भारावून टाकणारी भाषाशैली वाचतांना अत्यानंद झाला,सर आपणांस मी पण आदर्श मानतो कारण दोन वर्ष आपल्या अधिनस्त सेवा केली आहे, 1996 साला मध्ये जे आपल्या चेहऱ्यावरचा तेजस्वी पणा आजही दिसत आहे.

    ReplyDelete
  3. Very nice and touching article sir. Your inspiration and motivation for onecradio mechanic to become army officer is noteworthy. Great story of life sir

    ReplyDelete
  4. खुपछान लिहिलंय, ओघवती भाषा!

    ReplyDelete
  5. Dear Sir, this is one of the noble deeds to help young and able men to aspire in wearing the uniform. That too in vernacular language ! Salutes...

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks! 🙏
      Your name is not displayed in the comment.

      Delete
  6. Lt Sanjay Kumar Khatri's story is a real inspirational one !!

    ReplyDelete
  7. Nice to learn about so many facets of Army life, missed of entry at various levels. Most interesting you did not hide the fact that after Lt Khati reported to you, you had missed recognizing him. Honest presentation.
    Great.
    Sanjay Joshi

    ReplyDelete
  8. Very nice and inspiring. Sharing it. 👌

    ReplyDelete
  9. ज्या युवकांना आर्मी मधे भरती व्हायचे त्यांनी हा ब्लॉग वाचावा , धन्यवाद

    ReplyDelete
  10. Many like Lt. Sanjay Khatri must have benefited from your motivational leadership of encouraging those under you to aim high.
    It is interesting to know how selection is done by the Military. Thanks gor sharing your experiences Colonel.
    Milind Ranade

    ReplyDelete
  11. Motivational & inspiring write up .. well done Anand .. Col Mukund Pandit

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you, sir!
      The next post is also up on the Blog! 🙂

      Delete
  12. At the time of reading of para no. 7, in way you gave inspiration and motivation to radio mechanic and I memorised same inspiration and motivation you gave me in our 1st meeting sirji...

    ReplyDelete
  13. Very touching,and eagerly waiting for ur blog..keep going sir and motivate our young generation🙏

    ReplyDelete
  14. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  15. आपल्या अधिकाराचा सुयोग्य वापर करुन त्या मुलाला शिक्षणाची सोय केली हे गौरवास्पद आहे.

    ReplyDelete