Labels

Friday 17 July 2020

घी देखा लेकिन...

"कारगिल युद्धाच्या वेळी तुम्ही कुठे होता?" या प्रश्नावर, "मी जम्मू-काश्मीरमध्ये होतो" हे उत्तर ऐकताच लोकांना कमालीची उत्सुकता वाटते. आता 'टायगर हिल' किंवा 'तोलोलिंग' येथल्या शौर्याची किंवा हौतात्म्याची 'आँखोदेखी' ऐकायला मिळणार, अश्या आशेने ते माझ्याकडे पाहतात. पण, मी कारगिल-द्रास भागात नव्हे तर जम्मूजवळ अखनूर सेक्टरमध्ये होतो, आणि तिथे प्रत्यक्ष युद्ध झाले नव्हते, हे ऐकल्यावर काही जणांचा इंटरेस्ट थोडा कमी झाल्यासारखा वाटतो. 

कदाचित असे असेल की, युद्धकथा action-packed, रम्य, आणि देशभक्तिच्या भावना जागवणाऱ्या असतात. त्यामानाने, शांतिकाळातले आमचे दैनंदिन जीवन, त्यामधील खाचखळगे, आमची सुखदुःखे, वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर येणाऱ्या अनंत अडचणी,  यामध्ये  'नाट्यमय' असे विशेष काही नसते. आणि म्हणूनच, मला त्याबद्दल सांगणे अधिक आवश्यक वाटते. आज-काल, वर्तमानपत्रे, दूरदर्शन वाहिन्या, आणि सोशल मीडियामधल्या माहितीच्या महापुरात, सैन्यदलाविषयी बऱ्याच खऱ्या-खोट्या बातम्या, बरी-वाईट मते आणि साधार-निराधार माहिती वाहत असते. परंतु, सैन्यदलातील व्यक्तींचे दैनंदिन आयुष्य, त्यांची कार्यालये, छावण्या, आणि प्रत्यक्ष सीमेवरील चौक्या बहुसंख्य लोकांना प्रत्यक्ष पाहता येतच नाहीत. त्यामुळे, 'हत्ती आणि सात आंधळे' या गोष्टीप्रमाणे, ज्याला जी माहिती हाती लागेल त्यावरून प्रत्येकजण सैन्याविषयी आपापले मत बनवीत असतो. 

कारगिल युद्धाच्या काळात, पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रणरेषा पार करून, छुपी घुसखोरी केली होती. त्यांना हुसकावून लावण्यासाठी आपण कारवाई सुरु केली तरी संपूर्ण आंतरराष्ट्रीय सीमेवर भारत-पाक युद्धाची घोषणा झाली नव्हती. केवळ युद्धासाठी सज्जतेच्या दृष्टीने, संपूर्ण अखनूर छावणी नियंत्रण रेषेच्या जवळ हलवण्यात आली होती. आमचे मुख्यालय, दूरसंचार केंद्र, कमांडिंग जनरलसाहेबांचे आणि इतर महत्वाच्या अधिकाऱ्यांचे राहण्याचे ठिकाण, जमिनीखाली बंकरमध्ये होते. मी आणि माझ्याहून कनिष्ठ पदावरचे सर्व अधिकारी आणि जवान मात्र तंबूमध्ये राहत होतो. मी तेंव्हा लेफ्टनंट कर्नल पदावर होतो. माझ्या पदामुळे मला मिळालेली 'विशेष सुविधा' इतकीच की, माझ्यासाठी एक स्वतंत्र छोटा तंबू होता आणि त्याला लगतच एक बाथरूम-कम-संडास! (संडास म्हणजे फक्त जमिनीत खोदलेला एक चर). माझ्याहून कनिष्ठ अधिकारी एकेका छोट्या तंबूत दोघे, आणि जवान मोठ्या-मोठ्या तंबूमध्ये सहा-सहा जण एकत्र, असे राहत होते. त्या परिस्थितीत काढलेल्या दोन-अडीच महिन्यांचे वर्णन जेंव्हा मी करतो तेंव्हा, ऐकणाऱ्या बऱ्याच लोकांच्या लक्षात येते की, आम्ही प्रत्यक्ष युद्धात सहभागी नसतो तेंव्हाही आमचे आयुष्य म्हणजे सुळावरची पोळीच असते. 

एकदा, पुण्यातल्या एका पॉश कॉलनीमध्ये राहणारा मनुष्य, माझ्या उपस्थितीत कुणालातरी सांगत होता, "१९७१ नंतर, श्रीलंका किंवा कारगिलमधली छुटपूट कारवाई वगळता, एकही युद्ध झालेले नाही. मग एरवी आर्मी नेमकी काय करते? संरक्षणखर्चात कपात करून, देशाचा पैसा इतर क्षेत्रात प्रगती करण्यासाठी वापरला पाहिजे." 
जरा वेळानंतर, गप्पा-गप्पात बोलल्यासारखे, मी त्याला सहज म्हटले, "तुम्ही राहता त्या सोसायटीत बऱ्याच चोऱ्या होतात म्हणे. महिन्याला सरासरी किती घरफोड्या वगैरे होतात?" 
त्यावर तो जरा दुखावल्यासारखा म्हणाला, "अहो, काय विचारताय? आमच्यासारख्या पॉश कॉलनीत शिरायची हिम्मत आहे का चोरांची? भरगच्च पगार देऊन, एवढी टाईट सिक्युरिटी आम्ही उगाच ठेवलीय का?"
"चोऱ्या होतच नाहीत तर उगाच सिक्युरिटीवर पैसे का वाया घालवता?" त्याच्याकडे रोखून बघत मी हे विचारताच तो समजायचे ते समजला. मग मी त्याला शांतपणे समजावून सांगितले. शांतिकाळात, कठोर शारीरिक प्रशिक्षण, शस्त्रांची देखभाल, नेमबाजीचा सराव, हे सर्व सातत्याने चालू असते. म्हणूनच, अत्यंत कमी अवधीमध्ये कोणत्याही आव्हानाला सामोरे जायला सेनादले सदैव सज्ज असतात. 

आर्मीमध्ये वेगवेगळे विभाग आहेत. माझ्या, म्हणजे 'सिग्नल्स' विभागाचे लोक दूरसंचार सेवा पुरवतात. पूल बांधणे, भूसुरुंग पेरणे अथवा निकामी करणे, अश्या कामांसाठी 'इंजिनियर्स' विभागाचे लोक असतात. रणगाड्यांचा 'आर्मर्ड कोअर', तोफखान्याचा 'आर्टिलरी', असे बरेच विभाग असतात. या सर्व विभागातल्या सैनिक व अधिकाऱ्यांचे आयुष्य जवळ-जवळ सारखेच असते. इतर विभागांच्या तुलनेत, 'इन्फन्ट्री' मधल्या लोकांची आणि त्यांच्या परिवारांची जरा जास्तच फरपट होते. सर्वसाधारणपणे, सैन्यदलातील प्रत्येक व्यक्तीचे एकाआड एक पोस्टिंग फील्डवर असते. म्हणजे त्या काळात परिवारांपासून दूरच राहावे लागते. फील्ड पोस्टिंगमधल्या एकंदर परिस्थितीबद्दल नुसते ऐकून त्याची संपूर्ण कल्पना येणे कठीण आहे. इशान्य भारतातील जंगलात, किंवा दुर्गम पर्वतीय क्षेत्रातल्या एखाद्या चौकीवर, महिनोंमहिने एक अधिकारी आणि ४०-५० जवान, डोळ्यात तेल घालून सेवा बजावत असतात. विशेषतः सियाचिन हिमनगावर, उणे ४०-५० डिग्री तापमानात राहून, सीमेचे रक्षण करणाऱ्या कित्येक जवान आणि अधिकाऱ्यांचे, ऐन उमेदीच्या काळात जे कायमस्वरूपी शारीरिक आणि मानसिक नुकसान झालेले आहे त्याची भरपाई कशानेच होऊ शकणार नाही. 

एका दिवाळीत मी आणि स्वाती माझ्या एका कोर्समेटच्या घरी गेलो होतो. तो काश्मीरमधून आदल्याच दिवशी रजेवर आला होता. आम्ही गेलो त्यावेळी तो झोपलेला असल्याने आम्हाला आश्चर्यच वाटले. पण त्याच्या पत्नीने सांगितले की त्याची बटालियन अतिरेक्यांविरुद्धच्या कारवाईमध्ये अतिशय सक्रिय असल्याने कित्येक दिवस तो शांत झोपलेला नाही. त्याचवेळी घराबाहेर काही मुले फटाके फोडत होती. अचानकच, माझा मित्र झोपेतून उठून, गोंधळलेल्या अवस्थेत बाहेर आला. आम्हाला बघून खूष झाला, पण थोडा खजील झाल्यासारखाही वाटला. तोंड धुण्यासाठी तो आत गेल्यावर त्याची पत्नी काळजीच्या स्वरात म्हणाली, "कालपासून असेच होते आहे. फटाक्यांचा आवाज आला तरी हा धडपडून उठतो आणि आपली AK-47 शोधू लागतो!" 

'पीस पोस्टिंग' मध्ये परिवारासह राहण्यासाठी, अधिकाऱ्यांनाही आधी तात्पुरती एक-दीड खोली मिळते. त्यांच्या हुद्द्याप्रमाणे लागू असलेला फ्लॅट किंवा बंगला मिळेपर्यंत काही महिने जातात. शिवाय, दर दीड-दोन वर्षांनी, नवीन गावी जाऊन घरच्या स्त्रीलाच संपूर्ण घराची घडी नव्याने बसवावी लागते. जुन्या मित्रांना सोडून नव्या शाळेत जाणे, नवे मित्र जोडणे, या परिस्थितीशी मुलांना जुळवून घ्यावेच लागते. जेमतेम काही महिने परिवार एकत्र राहतो तोवर, अधिकाऱ्याला एखाद्या ट्रेनिंग कोर्ससाठी बेळगाव, महू किंवा असेच कुठेतरी जावे लागते. दर सहा-आठ महिन्यांनी, युद्धसरावासाठी संपूर्ण युनिटला जवळच्या बॉर्डरवर पाठवले जाते. एखादी नैसर्गिक आपदा आली, तर मदतीसाठी तिथे धाव घ्यावी लागते. हां-हां म्हणता दोन वर्षे निघून जातात आणि पुन्हा फील्ड पोस्टिंगवर जायची वेळ होते! कित्येक सण-वारी आणि पारिवारिक जीवनातल्या महत्वाच्या आणि आनंदाच्या क्षणांमध्ये परिवार एकत्र नसतोच. कितीतरी मुले कळत्या वयाची होईपर्यंत त्यांनी आपल्या वडिलांना नीटसे पाहिलेही नसते. एक विनोद तर असाही सांगितला जातो की, फील्डमधून रजेवर घरी आलेल्या वडिलांना दारात पाहून मूल आईला सांगायला जाते, "मम्मी, कोई अंकल आपसे मिलने आये हैं !"

अश्या विविध परिस्थितीतून जात असताना, युनिटचे अधिकारी, जवान, आणि त्या सर्वांचे परिवार एखाद्या मोठ्या कुटुंबाप्रमाणे, एकमेकांना धरून राहतात. अधिकारी आणि त्यांच्या पत्नीदेखील, जवानांकडे व त्यांच्या परिवारांकडे धाकट्या भाऊ-भावजयीसारखे बघतात. असे असते म्हणूनच, आम्हा लोकांचा आपसातील बंधुभाव आणि आदर सेवाकाळातच नव्हे तर सेवानिवृत्तीनंतरही टिकून असतो. अलीकडेच, सौ. वर्षा विसाळ यांचा, स्वानुभवावर आधारित, एक अतिशय सुंदर लेख माझ्या वाचनात आला होता. आर्मी ऑफिसरशी लग्न झालेली ही नवी नवरी, अरुणाचल प्रदेशातल्या एक दुर्गम ठिकाणी, एका बांबूच्या झोपडीत, १९९४ साली आपला संसार सुरु करते. दर दोन आठवड्यांनी पोहोचणाऱ्या डाळ-तांदूळ, भाज्या आणि घरची पत्रे अश्या 'रसदीवर' आनंदात दिवस काढते. एकदा तर, सलग ५६ दिवस पाऊस पडत राहिल्यामुळे त्या रसदीविनाच घर चालवते. इतकेच नव्हे, तर जवान व त्यांच्या परिवारांसाठी आणि जवळपासच्या वस्त्यांमधील आदिवासी कुटुंबांसाठी वेलफेयरची कामे स्वेच्छेने आणि आनंदाने करते. ज्यांना सेनाधिकाऱ्याचे खरेखुरे आयुष्य जाणून घ्यायचे असेल त्यांच्यासाठी सौ. वर्षा विसाळ यांचे अनुभव वस्तुपाठच ठरतील. 

१९९९ साली, एप्रिल महिन्याच्या शेवटी शाळांना सुट्टी लागताच, स्वाती आणि मुले, पुण्याहून माझ्याकडे अखनूरला आली होती. कारगिलमधील (ना)पाक घुसखोरी अजून उघडकीस आलेली नव्हती. आम्ही श्रीनगर, गुलमर्ग अशी ट्रिप करून आलो. त्यानंतर, स्वातीचे व माझे आई-वडील, आमच्या लहानग्या भाचरंडांना घेऊन अखनूरला आले. सिव्हिलिअन्सना LOC पर्यंत सहसा जाता येतच नाही. पण, माझा एक मित्रच LOC वर तैनात असलेल्या एका बटालियनचा कमांडिंग ऑफिसर (CO) असल्याने, मी माझ्या कुटुंबियांना तिथे नेऊ शकलो. तो अनुभव आमच्या मुलांच्या मनात आजही घर करून आहे.

मुनव्वर तवी नदीच्या एका किनाऱ्यावर भारतीय, आणि दुसऱ्या तीरावर  पाकिस्तानी बंकर होते. माझ्या मित्राने, व त्याच्या जवानांनी आम्हा सर्वांना, बुलेटप्रूफ जाकीट व टोप्या घालायला दिल्या. आपले बंकर, हत्यारे आणि बंकरच्या खिडकीतून दिसणारे पाकिस्तानी गस्ती सैनिकही आम्हाला दाखवले. शांतिकाळातही, जवळ-जवळ रोजच, तेथे दोन्हीकडून गोळीबार चालू असतो हे ऐकून आमची मुले चकितच झाली. भारतीय पोस्टमागे पडलेला पाकिस्तानी गोळ्यांचा खच पाहिल्यावर मात्र त्यांचा विश्वास बसला. पाकिस्तानकडून झाडल्या गेलेल्या मीडियम मशीनगनच्या गोळ्याच त्या सैनिकांनी आमच्या मुलांना भेट दिल्या! 

माझ्या मुलाने आणि भाच्याने एका सैनिकाला बरेच प्रश्न विचारले, "तुम्ही इथेच या बंकरमध्ये राहता का? झोप लागते का? काय जेवता? तुमचे CO साहेब त्यांच्या घरून इथे तुम्हाला भेटायला रोज येतात का?" पहिल्या ३-४ प्रश्नांची उत्तरे त्याने दिली. शेवटच्या प्रश्नावर तो हसला आणि त्याच्या COच्या, म्हणजे माझ्या मित्राच्या कानाला लागला. माझ्या मित्राने होकार देताच, तो आमच्या मुलांना म्हणाला, "चला, आमच्या CO साहेबांचा बंगला दाखवतो." काही अंतरावरच असलेला माझ्या मित्राचा बंकर मुलांना दाखवून आल्यावर तो म्हणाला, "आमचे CO आणि इतर ऑफिसर बंगल्यात नव्हे, तर इथे, आमच्यासारखे बंकरमध्येच राहून आमचे नेतृत्व करतात. म्हणूनच आम्हाला लढायला बळ येते." आपले जवान व अधिकाऱ्यांचे आयुष्य आणि त्यांचे परस्परसंबंध, याबाबतीत वेगळे काही सांगायची गरजच नाही. 

या बाबतीतला भारतीय आणि पाकिस्तानी सेनाधिकाऱ्यांमधला फरक स्पष्ट होण्यासाठी, फील्ड मार्शल माणेकशॉ यांनी एकदा सांगितलेली एक आठवण महत्वाची आहे. १९७१ च्या युद्धानंतर, पाकिस्तानी युद्धकैद्यांची छावणी पाहायला माणेकशॉ गेले होते. तेथे त्यांनी सर्वांची विचारपूस केली, त्यांना मूलभूत सुविधा मिळत असल्याची खात्री केली. तेथून निघताना, माणेकशॉ साहेबांना उद्देशून पाकिस्तानी सुभेदार मेजर म्हणाले, "हुजूर, आप हिंदुस्तानी फौज के जनरल होकरभी हमसे आकर मिले, हमारा हालचाल पूछा। हमारे साहब लोग ऐसा नहीं करते। वो अपनेआप को नवाबजादे समझते हैं।"

फौजी लोकांचे एकूणच आयुष्य असे असते की, शक्य होईल तिथे, "आजचा दिवस माझा" असे म्हणून, आयुष्य जमेल तेवढे सुंदर करून घेण्याची त्यांची मानसिकता तयार होते. चुशूलसारख्या दुर्गम ठिकाणी, माझा जो 'पंचतारांकित पाहुणचार' केला गेला, त्याबद्दल "चुशूल ना भूल पाएँगे" या पोस्टमध्ये मी लिहिले होते. ते वाचून, माझ्या काही मित्रांनी त्यांच्या ओळखीतल्या बऱ्याच लोकांचा एक गैरसमज मला सांगितला. त्या लोकांच्या मते, आर्मीमधले जवान खडतर आयुष्य जगतात, आणि सेनाधिकारी मात्र केवळ 'ओल्या' पार्ट्या झोडतात, आणि मजा करतात. मी इतकेच म्हणेन, की अश्या लोकांनी आपल्या मुलांना या आरामाच्या नोकरीत जरूर पाठवावे. 

पण पुष्कळ लोकांना, छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप आणि त्यांचे नवरत्नजडित सोनेरी सिंहासनच फक्त दिसते. मूठभर मावळ्यांसह, रायरेश्वराला रक्ताचा अभिषेक करून, स्वराज्यस्थापनेसाठी प्राण पणाला लावण्याची शपथ घेणारा 'शिवबा' मात्र, शेजारच्या घरी जन्मला तर बरे! 
  

34 comments:

  1. सर , खूपच छान लिहले आहे .आज समजले आर्मी जबाबदारीने काम करते म्हूनच युध्द होत नाही.वॉचमन झोपला तर चोरी होणार.

    ReplyDelete
  2. As usual too good... waiting for the next post ��

    ReplyDelete
  3. कर्नल साहेब, आपल्या सिग्नल कोअर बद्दल आम्हाला फार कमी माहिती आहे. त्याच्या काही रंजक आठवणी लिहा की!

    ReplyDelete
    Replies
    1. ओके. नक्कीच लिहीन. 🙏

      Delete
  4. Sir I liked your blog 😊

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद! आपले नाव कळले नाही.

      Delete
  5. Thanks a ton Colonel. I am very happy that you have written about the reality (grim!) that Army life is. The article should enlighten those who think that life is easy in the Army. Honestly, our Army has been under unbearble pressure for a very long time - even in during so called 'peace'time. Talking to you and other friends in Army I realize the perils that my uniformed brethren face and immensse sacrifices they make for us. Reminds me what I should always be - "an Indian worth fighting for".
    "We dont know them all but we owe them all."
    Milind Ranade

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Milind! My aim is to have more such enlightened and motivated Milind Ranades around! 👍

      Delete
  6. Such a meaningful end up....mind blowing sirji....

    ReplyDelete
  7. Very nice blog...liked it a lot..
    Waiting for the next blog.

    ReplyDelete
  8. the last 2 lines are eye opener !!

    ReplyDelete
  9. Yes your blogs are very authentic & one starts recollecting moments gone by in our own service tenure, Thanks Anand

    ReplyDelete
  10. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  11. Well said and well explained.

    ReplyDelete
  12. Yes sir .clip matches with your story. Vety nicely written. Few photographs r clear. Few not. Very much touching story and it's a fact. I know. Good writing skill u have👍🏼👌

    ReplyDelete
  13. अजुन एक सुंदर लेख....

    ReplyDelete
  14. थोडक्यात योग्य सागितले आहे

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. 🙏
      आपले नांव समजू शकले नाही.

      Delete
  15. Sir...
    Your blogs give me the best guidance.
    Keep sharing.

    Pranita Shinde😊

    ReplyDelete
  16. छान लेख आहे. यानिमित्ताने सर्वसामान्य नागरिकांना सैनिकांचे जीवन समजून घेता येईल आणि बरेच गैरसमज दूर होतील. नवीन पिढीला आणि युवकांना सैन्य भरतीत जाण्याची प्रेरणा मिळेल.

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय. 🙏
      आपलं नाव समजलं नाही.

      Delete
  17. आपल्या आणि कार्यरत असलेले जवान युद्ध असताना नसताना कसे दिवस घालवतात याबद्दल छान मार्गदर्शनपर लेख.आणि उगाचच काँमेंट्स करणार्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा लेख

    ReplyDelete