Labels

Monday, 13 April 2020

ऑपरेशन ब्लू स्टारचे ओरखडे

जून १९८१ ते मे १९८४ या काळात, मी अमृतसरमध्ये माझ्या पहिल्याच पोस्टिंगवर असताना, तेथील एकंदर वातावरणात हळूहळू घडत गेलेले बदल पाहत होतो. पण भारताच्या इतिहासातल्या एका अतिशय गंभीर आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या वळणावर आपण उभे आहोत हेेे त्यावेळी समजणे अवघड होते.
   
पंजाब प्रांतामध्ये एकंदरीत पोलीस आणि सर्वच प्रकारच्या लष्करी व निमलष्करी दलांना भरपूर मान आहे. विशेषतः भारतीय सेनेच्या अधिकारी व जवानांना मिळणारी जी वागणूक मी पंजाबात अनुभवली,
ती इतर कोणत्याही प्रांतात मला दिसली नाही. मी आर्मीच्या दूरसंचार विभागातील अधिकारी होतो. नवीन टेलिफोनच्या तारा टाकण्यासाठी किंवा निकामी झालेल्या तारांची दुरुस्ती करण्याकरिता लहान-लहान खेड्यापाड्यातून, शेतांमधून जवानांसोबत पायपीट करीत जाण्याचे प्रसंग अनेकदा येत असत.

साधारण जेवणाची वेळ झाल्यावर, आम्ही सोबत नेलेले जेवण जेवण्याकरिता एखाद्या झाडाच्या सावलीत थांबत असू. आसपासच्या शेतांमधून शेतकरी, बायका व लहान मुले, "फौजी आ गये, फौजी आ गये" अश्या गजरात, अगदी हर्षोल्हासात आमचे स्वागत करायचेे. शेताच्या बांधापाशी आमच्यासाठी खाटा टाकल्या जात. मीठ, आले, आणि कोथिंबीर घातलेला मठ्ठा (त्यांच्या भाषेत लस्सी) पितळी बादलीमधून आणला जाई. शेतातून काढून आणलेले ताजे मुळे, हिरव्या मिरच्या, पातीसकट उपटून आणलेले कांदे असा रानमेवा छानपैकी धुवून, कापून समोर ठेवला जाई. वर आणखी, "होर कोई साड्डे लायक सेवा दस्सो महाराज" अशी नम्र विनंती केली जाई ! बरं, आमच्याकडून कशाचीही अपेक्षा नसायची ! आम्ही स्वतःहून त्यांना काही देण्याची भाषा केल्यास ते लोक दुखावले जात. फावल्या वेळात आम्ही तरुण ऑफिसर्स अमृतसर शहरात संध्याकाळी फिरायला जायचो. पण साधारण १९८२ च्या ऑक्टोबरपासून वातावरण हळूहळू बदलू लागले आणि आमच्या मुक्त संचारावर अघोषित बंधने येऊ लागली. 

पंजाब तसे लहान राज्य असले तरीही त्या राज्याच्या लोकांचे विविध क्षेत्रांतील योगदान खूपच मोठे आहे. विशेषतः कृषि आणि संरक्षणक्षेत्रात तर पंजाब अग्रगण्य मानला पाहिजे. पण, १९७०च्या दशकात, पंजाबातील राजकीय परिस्थिती काँग्रेस पक्षाला अनुकूल बनविण्यासाठी एक अतिशय कुटिल खेळी खेळली गेली. संत जर्नेलसिंग भिंद्रांवाले नावाच्या एका कट्टरवादी शिखाचा वापर, तत्कालीन 'इंदिरा काँग्रेस' पक्षाच्या सरकारने, अकाली दलाचा प्रभाव कमी करण्यासाठी केला. परंतु, १९८२नंतर भिंद्रांवालें आणि अकाली दल यांनी एकत्र येत काँग्रेसलाच शह दिला.

भारतात शिखांवर होणाऱ्या तथाकथित अन्यायाविरुद्ध आवाज उठवून भिंद्रांवालेंनी अनेक सामान्य शिखांना पद्धतशीरपणे फुटीरवादाकडे वळविले. हळूहळू, पाकिस्तानने या परिस्थितीचा फायदा उठवला. शिखांना फूस लावून स्वतंत्र 'खालिस्तान' भारतापासून वेगळा काढण्याची योजना तयार झाली. फुटीरवादी अतिरेक्यांकडून पोलिसांवर छुपे हल्ले, बँकांची लुटालूट वगैरे केले जाऊ लागले. ठिकठिकाणी नाकाबंदी, पोलीस बंदोबस्त दिसू लागला. त्याच सुमाराला, भारत-पाक सीमेवर पाकिस्तानी सैन्याची जमवाजमव वाढली. आपल्याकडूनही प्रत्युत्तर म्हणून सीमेवर तैनाती वाढवली गेली. भिंद्रांवालेंच्या मागे पोलीस ससेमिरा लागताच ते आपल्या  निवडक अनुयायांसह सुवर्णमंदिरात लपून बसले. खालिस्तान चळवळीचा जोर वाढतच चालला होता. नोव्हेंबर १९८२ मध्ये, अमृतसरमधील परिस्थिती पोलिसांच्या हाताबाहेर जाऊ लागल्यानेे, आर्मीच्या एका बटालियनला मदतीसाठी रातोरात तैनात केले गेले. तेंव्हा, त्या बटालियनकरिता विशेष टेलिफोन यंत्रणा कार्यान्वित करून रात्री एक-दीडला मी परत आल्याचे आठवते.

'खालिस्तान' चळवळ समूळ नष्ट करण्याकरिता सैन्यदलाचा वापर करण्याचा विचार १९८३ मध्येच पंतप्रधान इंदिरा गांधींच्या मनात मूळ धरू लागला होता. परंतु, तो निर्णय घेणे सोपे नव्हते. शिखांचे सैन्यदलातील प्रमाण १५% होते. त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या सुवर्णमंदिरावर आपल्याच सैन्याने हल्ला करणे निश्चितच धोक्याचे होते. १९८३च्या अखेरीस आर्मीच्या पश्चिमी कमांडचे प्रमुख, जनरल सुंदरजी आणि इतर काही वरिष्ठ अधिकारी अमृतसर भेटीवर आले होतेे. सैनिकी कारवाईच्या दृष्टीने सुवर्णमंदिर परिसराची पाहणी करणे हाच त्यांच्या भेटीचा हेतू होता. त्या पाहणीदरम्यान मी त्यांचा रेडिओ अधिकारी होतो. मोबाइल फोनचा जमाना येण्यापूर्वीचा तो काळ होता. मी, आणि पाठीवर रेडिओ सेट बांधलेला माझा ऑपरेटर, त्या दिवशी त्यांच्यासोबत जलियाँवाला बाग व सुवर्णमंदिर परिसरात पुष्कळ वेळ हिंडलो होतो. 

१९८४ च्या मे महिन्यात, अमृतसरहून माझी बदली, पश्चिम बंगालमधील शिलिगुडी येथे झाली. पाठोपाठ, तिकडे अमृतसरमध्ये, १ ते ८ जून दरम्यान 'ऑपरेशन ब्लू स्टार' पार पडले. परंतु, आपल्या राज्यकर्त्यांना आणि सेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही आधी वाटले होते तितके ते काम सोपे ठरले नाही. ती कारवाई भारतीय सैन्याला आणि एकूणच देशाला फार महागात पडली. भारतीय सैन्याच्या इतिहासात प्रथमच, शीख सैनिकांच्या सशस्त्र बंडाची नामुष्की आपल्यावर ओढवली. 

'ऑपरेशन ब्लू स्टार' चे फारच दूरगामी परिणाम झाले. तसे पाहता, सुवर्णमंदिराच्या आवारात हत्यारे व दारूगोळा बनवण्याचे कारखाने आणि भांडारे अतिरेक्यांनी सज्ज केलेली होती. तेथील संगमरवरी भिंती फोडून, त्यातून मशीनगनची नळी बाहेर काढता येईल व जेमतेम बाहेरचे दिसेल अशी 'सोय' त्यांनी ठिकठिकाणी केलेली होती. सुवर्णमंदिराला एखाद्या अभेद्य लष्करी ठाण्याचे स्वरूप आलेले होते. पण हे सर्व विस्मरणात जाऊन, "भारतीय सैन्याने आमच्या मंदिराची नासधूस केली" एवढेच फक्त शीख समाजाच्या मनावर कोरले गेले.

'ऑपरेशन ब्लू स्टार' मध्ये, सुवर्णमंदिराच्या गर्भगृहाची, म्हणजे 'अकाल तख्त'ची, जी हानि झाली त्यामुळे, समस्त शिखांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. 'ऑपरेशन ब्लू स्टार' नंतर काही महिन्यांनी, पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या त्यांच्याच दोन शीख अंगरक्षकांनी केली. त्या हत्येमुळे शिखांविरुद्ध प्रचंड जनक्षोभ उसळला. त्यानंतर झालेल्या शीखविरोधी दंगलींत आणि हत्याकांडात कित्येक शीख परिवार उद्ध्वस्त झाले. मी व्यक्तिशः ओळखत असलेल्या कित्येक शिखांच्या मनावरचा ओरखडा आजही ओला आहे. "तेथील आम जनतेच्या मनातले सैन्यदलाविषयीचे सौहार्द १९८४ नंतरदेखील तसेच टिकून राहिले आहे का?" हे मला सांगता येणार नाही. 

माझी बदली झाल्यावर वर्षभराने, शिलीगुडीमधील आमच्या ऑफिसर्स मेसमध्ये एका रविवारी संध्याकाळी एका अधिकाऱ्याची सेंड-ऑफ पार्टी ठेवली होती. त्याकरिता मेसमध्ये आवश्यक सजावट व बैठकीची व्यवस्था करायची होती. जेवणाच्या मेन्यूबाबत खानसाम्याला योग्य त्या सूचनाही द्यायच्या होत्या. त्याकरिता, मी व आणखी दोन ज्युनियर अधिकारी, मेेेसमध्येे रविवारी सकाळी-सकाळीच हजर होतो. आमच्या मेस कमिटीचे सेक्रेटरी, मेजर कुलवंत सिंग मेसमध्ये आले. मेजर कुलवंत हा मोठा दिलदार आणि गमत्या मनुष्य होता. नेहमीच्या पद्धतीने हसत व आमच्या पाठीवर थाप मारीत म्हणाले, "तुमची रविवारची सकाळ कुरतडायला आलोय मी. चला, आता संध्याकाळच्या पार्टीची तयारी करून टाकू." लगेच त्यांनी मेस हवालदाराला हाक मारून सर्व स्टाफला बाहेर घेऊन यायला सांगितले. आम्हा ज्युनियर अधिकाऱ्यांना त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या व हाताखाली स्टाफ वाटून दिला. स्वतः सोफावर बसले आणि खानसाम्याला पुढे उभा करून त्याच्यासोबत जेवणाच्या मेनूबाबत चर्चा करू लागले. 

आम्ही तिघे आमच्या मेस स्टाफकरवी सगळी कामे करून घेण्यात मग्न होतो. मध्येच केंव्हातरी लक्ष गेले असता, मेजर कुलवंत काहीतरी वाचत सोफावर बसलेले मी पाहिले होते. काही वेळाने अचानकच, प्रचंड मोठ्या स्वरात चाललेली त्यांची आरडाओरड ऐकू आली. एका जवानावर अक्षरशः दात-ओठ खात ते ओरडत होते. तो जे काम करीत होता त्यात काहीतरी चूक दाखवून त्यांनी त्याला धारेवर धरले होते. क्वचित काही अपशब्दही त्यांच्या बोलण्यात येत होते.

मेजरसाहेबांच्या अचानक आलेल्या शाब्दिक माऱ्यामुळे तो जवान भांबावलेला होताच. पण प्रमाणाबाहेरच्या खरडपट्टीमुळे आणि त्यांनी वापरलेल्या अपशब्दांमुळे तो दुखावलाही गेला होता हे मला दिसत होते. परिस्थिती सांभाळून घेण्याच्या उद्देशाने मी मेजर कुलवंत सिंगांना म्हटले, "सर, मी बघून घेतो. तुम्ही शांत व्हा. मी  याची चूक यालाच निस्तरायला लावतो." परंतु, माझ्या बोलण्याचा उलटाच परिणाम झाला. आता त्यांची तोफ माझ्याकडे वळली. 
"तू काय *** बघून घेणार आहेस? इतका वेळ झालाय आणि ही साधी कामं तुम्हां लोकांना यांच्याकडून करवून घेता येत नाहीत? मी आता जातोय. पण संध्याकाळच्या सेंड-ऑफ पार्टीत जराही गडबड झाली तर माझ्याशी गाठ आहे!"
एवढे बोलून मेजर कुलवंत सिंग दाणदाण पावलं आपटत निघूनही गेले.

त्या जवानाला थोडंसं चुचकारून नरम शब्दात मी योग्य त्या सूचना दिल्या आणि कामाला लावलं. आम्ही तिघेही अधिकारी आश्चर्यचकित झालो होतो. मेजर कुलवंत सिंगांचा हा अवतार आम्हाला सर्वस्वी अपरिचित होता. थोड्या चेष्टेच्या स्वरात एक अधिकारी मला म्हणाला, "सर जरा देखना, बारा तो नहीं बजे?"
पण मी मात्र वेगळंच काहीतरी पाहत होतो. 

ती तारीख होती ९ जून १९८५. 'ऑपरेशन ब्लू स्टार' ला बरोबर एक वर्ष झालं होतं. मेजर कुलवंत जिथे बसले होते तिथे पडलेल्या वर्तमानपत्रात पानभर मजकूर आणि भग्नावस्थेतील 'अकाल तख्त' चे फोटो होते. ते सगळे वाचून-पाहून मेजर कुलवंत सिंगांच्या मनात, आत, खूप खोलवर, अतिशय गलबलून आलं असणार. त्या दुखावलेल्या मनस्थितीतच त्यांचा तो उद्रेक झाला होता. त्यांचे विचित्र वागणे, प्रचंड आरडाओरडा आणि शिवराळ भाषेत त्या जवानाची काढलेली खरडपट्टी निश्चितच समर्थनीय नव्हती. पण मी त्यांच्या भावना समजू शकत होतो, कारण त्यांच्याप्रमाणेच दुखावले गेलेल्या अनेक शीख जवानांना व अधिकाऱ्यांना मी जवळून पहिले होते.

आश्चर्य म्हणजे, संध्याकाळी पार्टीमध्ये जे मेजर कुलवंत सिंग आम्हाला भेटले ते नेहमीचेच हसतमुख आणि दिलखुलास व्यक्तिमत्व होते. सकाळच्या त्यांच्या त्या अक्राळविक्राळ अवताराचा मागमूसदेखील दिसला नाही. इतकेच नव्हे तर, पार्टी संपल्यावर त्यांनी पत्नीला गाडीमधून घरी पाठवून दिले. आम्हा तिघां अधिकाऱ्यांची पाठ थोपटली आणि सर्व स्टाफला बोलावून त्यांनाही शाबासकी दिली. त्यानंतर, खास आर्मीच्या पद्धतीनुसार, त्या सर्वांसाठी, 'रम' च्या बाटल्यांचे एक खोके मेस हवालदाराच्या हाती ठेवले. एवढयावरच ते थांबले नाहीत. सकाळी ज्या जवानाला जरा जास्तच धारेवर धरले होते त्याला जवळ बोलावून त्यांनी मिठी मारली आणि स्वतःच्या खर्चाने एक रमची बाटली त्याच्या हातात ठेवली. त्या जवानाने हळूच डोळे पुसलेले कोणाच्याही नजरेतून सुटले नाही. दिलगिरी व्यक्त करण्याचा याहून अधिक प्रभावी मार्ग मला तरी सुचला नसता.

त्यानंतर, मेजर कुलवंत सिंगांचा, आम्हा बॅचलर्ससाठीचा 'विशेष पाहुणचार' संपवून बारमधून डुलत-डुलत निघायला आम्हाला मध्यरात्र झाली!

24 comments:

  1. Hopefully you must have changed the name of the officer in this episode.

    ReplyDelete
    Replies
    1. Goes without saying! I didn't wish to spoil the fun of reading by mentioning that fact. 😉

      Delete
  2. Very apt discription of the change of situation during those times from 1982 to 84 and incidence that took place & due to d feeling of hurt of Sikhs in general specially after the riots which happened in Delhi and across d country.

    ReplyDelete
  3. Wonderful as usual.
    Nice that you didn't mince your words about political parties compromising nation interest for petty gains.

    ReplyDelete
  4. Yes! Those scars ran deep! Those stark images of disrespect/ damage to things one has grown up to revere & later being punished as a community for the follies of a few would have made the good Major's blood boil....but, what a fine example he was of all that's good & golden in our org! .... Very well narrated!

    ReplyDelete
    Replies
    1. Yes. I'm proud to have been a small part of this fantastic organization - The Armed forces. 🙏

      Delete
  5. सर तुमचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.तुम्ही शाळेत येत होता तेव्हा आम्हाला काहीही माहीत नव्हते,म्हणजे तुम्ही आर्मी मध्ये आहात या विषयी सर्वात महत्वाचे म्हणजे तुमची खूप साधी राहणी खूप भावली.

    ReplyDelete
  6. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  7. मी 1986 पासून 3 वर्षे पंजाब मधे होतो. बॉम्ब फुटत होते, ओरखडे दिसत होते, पण प्रेम देखील ओसंडत असायचे - वैयक्तिक पातळीवर.

    ReplyDelete
  8. A flawless narrative in the episode, envlopes all finer details of political, social, and administrative aspects, yet, finally comes straight to the specific incident,a it ends aptly; fully justifying its title.
    If you are still in touch with the Sikh Major, ( the then Senior at Siliguri), convey my salute to him, for having kept national interest uppermost in mind his and served the nation, by overcoming his hurt sentiments.

    Sanjay Joshi.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks, Sanjay! 🙏
      Very encouraging comment.
      Sadly, I don't know the whereabouts of that officer. But, your sentiment is laudable.

      Delete
  9. Very nice way of narrating the experience. Your each and every blog leaves a message for the readers. Thanks.
    Ravindra Nerlikar

    ReplyDelete
  10. Remembered Gen.Arun kumar S. Vaidya by reading this post.He had to pay his life at the cost of this.

    ReplyDelete
    Replies
    1. Yes. That reference is coming up in my next post.

      यापुढील लेखात या घटनेसंबंधातलेच २-३ हृदयद्रावक अनुभव वाचायला मिळतील.

      Delete
  11. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
    Replies
    1. बेफ़िकिर तुमचे लिखान अप्रतिम असते

      Delete
  12. I was then posted at Samba, it was like a walk down the memory lane.. well said Anand .. Col Mukund Pandit

    ReplyDelete