Labels

Friday, 17 April 2020

उन्मळलेल्या वृक्षाचे बळी

'ऑपरेशन ब्लू स्टार'ची कारवाई, खालिस्तानी अतिरेक्यांच्या, आणि त्यांना भरीस घालणाऱ्या पाकिस्तानी यंत्रणेच्या, जिव्हारी बसलेला घाव होता. 'सूड' या मानवी भावनेचं, अव्याहत चालू शकणारं, असं एक चक्र असतं. 'ब्लू स्टार' चा सूड खालिस्तानी अतिरेक्यांनी पुरेपूर उगवला. पण, त्यानंतर घडलेल्या काही घटनांमुळे, आजतागायत चालू असलेल्या या सूडचक्रात काही अतिमहत्वाच्या व्यक्तींसोबतच, कित्येक निरपराध भारतीयांचेही बळी गेले आहेत. त्यांच्यापैकी काहींशी माझा दूरान्वयाने का असेना, पण संबंध आला होता.

१९८४ साली ऑक्टोबरचा संपूर्ण महिना, मी सिक्कीमची राजधानी गंगटोकपासून ३०-३२ कि.मी. दूर, भारत-चीन सीमेजवळ,
क्योंगनोस-ला नावाच्या एका ठिकाणी होतो. एका युद्धसरावाच्या कँपसाठी, आम्ही शिलिगुडीहून येऊन तेथे मुक्काम ठोकला होता. युद्धकाळात शिलिगुडीचे मुख्यालय जर अचानक सीमेजवळ हलवावे लागले तर त्यावेळी उपयोगी पडाव्यात, म्हणून आधीपासूनच उभारून तयार ठेवलेल्या शेडमध्ये आम्ही राहत होतो. त्या ठिकाणाच्या आसपास वस्तीच काय, पण चिटपाखरूदेखील नव्हते. हवा थंड पण आल्हाददायक होती. अजून हिवाळा सुरु व्हायचा होता. तरीदेखील, एखाद्या संध्याकाळी, काही कळायच्या आत, पांढऱ्याशुभ्र आणि हलक्या-फुलक्या, बर्फाच्या 'म्हाताऱ्या' भुरभूर उडत आल्यासारख्या अंगावर पडू लागायच्या. आपल्या येथे, महाराष्ट्रात, त्यावेळी 'ऑक्टोबर हीट'ची काहिली असली तरी, आम्ही मात्र तेथे अंगात ओव्हरकोट घातल्याशिवाय बाहेर पडत नव्हतो. रात्री बुखारी पेटवून शेड गरम केल्याशिवाय, उबदार रजईमध्येही झोप येत नसे. थंड हवेमुळे, आम्हीच धुतलेले आमचे कपडे, पायमोजे, वगैरे, अगदी दोन-दोन दिवसदेखील सुकत नसत.

सलग दोन आठवडे कॅम्पमध्ये काढल्यानंतर एक दिवस मला आणि आमच्या जवानांच्या एका तुकडीला, विश्रांतीसाठी दीड दिवस गंगटोकच्या छावणीत पाठविण्यात आले. दोन आठवडे 'फील्ड'वर राहिल्यानंतर, गंगटोकच्या मेसमधील जेवण, वाफाळलेल्या पाण्याने आंघोळ, इलेक्ट्रिक हीटर लावलेल्या गेस्टरूमच्या उबदार खोलीतील झोप, या सगळ्याची किंमत नव्याने जाणवली! 

३१ ऑक्टोबरच्या सकाळी मी मेसच्या मागील बाजूच्या उतारावर ऊन खात पडलो होतो. अचानक एक जवान सांगत आला की रेडिओवर BBCच्या बातम्यात, इंदिरा गांधींची हत्या झाल्याचे सांगितले गेले. मी स्वतः सर्व तपशील ऐकून त्या बातमीची खात्रीही करून घेतली. आकाशवाणी व दूरदर्शनवरून मात्र ती बातमी संध्याकाळी जाहीर केली गेली असे नंतर समजले.

इंदिराजींच्या शीख अंगरक्षकांनीच त्यांच्यावर बेछूट गोळीबार केल्याचे ऐकून मी हादरून गेलो होतो. NDA मधील ट्रेनिंगच्या काळापासून पुढेही सर्व्हिसमध्ये, 'भारतीय' ही एकच, स्वतःची अशी, ओळख आम्हा सर्वांच्या अंगवळणी पडली होती. प्रांत, राज्य, धर्म, जात यावर आधारित कोणताच भेद आम्ही कोणीही मानत नसू. मात्र, 'ब्लू स्टार' नंतर लगेच, बिहारमध्ये रामगढ येथील ट्रेनिंग सेंटरमधल्या शीख रिक्रूटांनी सशस्त्र बंड केलं  होतं. एका ब्रिगेडियर पदावरील अधिकाऱ्याची हत्या करून ते पंजाबच्या दिशेने निघाले होते. मोठ्या हिकमतीने त्यांना जेरबंद करण्यात यश आलं होतं. अजून आर्मीच्या नोकरीकरिता पूर्णपणे प्रशिक्षित नसलेल्या तरुण मुलांनी, भावनेच्या आहारी जाऊन केलेलं ते कृत्य होतं हे खरं. परंतु, त्यानंतरच्या काळात, आमच्यापैकी काही शीख सेनाधिकारी मित्रांच्याही विचारात, वागण्यात, बोलण्यात एक प्रकारचा कडवटपणा, आणि क्वचित तुटकपणाही आला असल्याची शंका वेळोवेळी माझ्या मनात येऊन गेली होती. प्रशिक्षित आणि निवडक अश्या शीख अंगरक्षक पोलिसांनी देशाच्या पंतप्रधानांची हत्या करणं हे मात्र फारच वाईट लक्षण होतं.

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर, मुख्यतः दिल्लीत शीखविरोधी दंगे उसळले. कॉंग्रेसचे प्रक्षुब्ध कार्यकर्तेच नव्हे, तर चिथावले गेलेलेे अनेक सामान्य नागरिकही, दिसेल त्या शिखांवर प्राणघातक हल्ले करू लागले. त्यांची घरे व दुकाने जाळू लागले. संधीचा फायदा घेऊन अनेक समाजकंटकांनी शिखांच्या मालमत्तांची लुटालूट केली. ही शीखद्वेषाची आग हळूहळू देशभरात पसरली. शीखविरोधी दंगल आणि हत्याकांडापासून जीव वाचविण्यासाठी अनेक शीख परिवार अक्षरशः सैरावैरा पांगले होते. त्यातील काही सुदैवाने वाचले. पुष्कळांची घरे लुटली व जाळली गेली. कित्येकांनी एखादा हात-पाय गमावला, पण जिवानिशी बचावले. बरेचसे लोक तितके नशीबवानही ठरले नाहीत.

दिल्लीतील दंग्यांविषयी टिप्पणी करताना तत्कालीन नवनियुक्त पंतप्रधान, राजीव गांधी यांनी म्हटलं होतं, "एखादा मोठा वृक्ष जेंव्हा उन्मळून पडतो तेंव्हा धरणीकंप होणं स्वाभाविकच आहे." ही टिप्पणी अतिशय दुर्दैवी होती. त्यामुळे, कळत-नकळत, शीखविरोधी दंगलींचे समर्थन केल्याची भावना निर्माण झाली. आधीच होरपळलेल्या शीख समाजाच्या जखमांवर मीठ तर चोळले गेलेच.

आर्मीमध्ये अधिकारी असलेल्या माझ्या एका मित्राने त्याची कहाणी मला सांगितली होती. ती सांगत असताना त्याच्या डोळ्यातले भाव पाहून मी गलबलून गेलो होतो. त्याचा परिवार एका  इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहत होता. दंगलीच्या काळात, त्यांच्या इमारतीखाली सशस्त्र जमाव उभा होता. कोणत्याही क्षणी ते लोक इमारतीत घुसतील अशी परिस्थिती होती. जीव वाचवण्याचा निकराचा प्रयत्न म्हणून, त्या इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या खिडकीतून शेजारील इमारतीच्या खिडकीत एक फळी टाकली गेली. त्या फळीवरून शेजारच्या इमारतीत जावे आणि तेथून खाली उतरून पळ काढावा अशी योजना होती. माझ्या मित्राची आई, त्या लपलपत्या फळीवरून चालताना तोल जाऊन १५-२० फूट खाली कोसळली. तिचा जीव कसाबसा वाचला पण दोन्ही पाय मात्र गेले !

१ नोव्हेंबरच्या सकाळी दिल्लीजवळच्या छोट्या छोट्या स्टेशनांमध्ये रेल्वे गाड्या येताच, डोळ्यात खून चढलेले लोक त्यात घुसत होते. बिनघोरपणे प्रवास करणाऱ्या निरपराध शीख व्यक्तींना शोधून-शोधून लोखंडी रॉडने मारीत होते, चाकू भोसकून ठार करीत होते. त्यातल्या कित्येकांना स्टेशनवर उतरवले गेले आणि गळ्यात जळते टायर घालून जिवंत जाळण्यात आले! त्या मारल्या गेलेल्या व्यक्तींमध्ये काही सैनिक आणि सैन्यदलांचे अधिकारीही होते. अक्षरशः काळीज हेलावून  सोडणाऱ्या त्यांच्या कहाण्या मी ऐकल्या-वाचल्या आहेत. एकाने जेंव्हा त्या मारेकऱ्यांना आपण आर्मीमध्ये शिपाई असल्याचे सांगितले तेंव्हा त्याला उत्तर मिळाले होते, "आमच्या आईला (इंदिराजींना) ज्याने मारले तोही एक शिपाईच होता...".
आणि त्यानंतर त्या जवानाला भोसकले गेले !

अश्या दुर्दैवी कथा ऐकून कोणालाही वाईट निश्चितच वाटेल. पण स्वतःच्या जवळची एखादी व्यक्ति जर अश्या प्रकारे मारली गेली, तर आपण फक्त, "अरेरे, फारच वाईट झालं" एवढंच बोलून गप्प बसू शकू का ? माझा NDA मधील कोर्समेट, कॅप्टन उपिंदर जस्सल, त्या दिवशी रेल्वे प्रवासात होता. त्याचा अंत ज्या प्रकारे झाला त्याबद्दल मी ऐकलं होतं. ते ऐकूूून, माझेे अंतःकरण अक्षरशः पिळवटून निघाले होतेेे, पण संतापाने मी अंतर्बाह्य पेटूनही उठलो होतो. आज, इतक्या वर्षांनंतरही, त्या प्रसंगाबद्दल मी लिहू इच्छित नाही !

क्योंगनोस-ला येथील कँपहून शिलिगुडीला परतताच मला काही दिवसांची रजा मिळाली. नोव्हेंबरात एके दिवशी, मी एसटी बसने पुण्याहून सोलापूरला निघालो होतो. माझ्यासह बहुतेक प्रवासी डुलक्या काढीत होते. मध्येच केंव्हातरी, बसचा वेग सारखा कमी-जास्त होऊ लागला. ड्रायव्हर वरचेवर हॉर्नही वाजवीत असल्याने माझी डुलकी मोडली. काय घडतंय ते मी पाहू लागलो. आमच्या बसचा ड्रायव्हर एका ट्रकला ओव्हरटेक करू पाहत होता पण तशी संधी मिळत नव्हती. 

एका क्षणी आम्ही ट्रकला मागे टाकले. दोन्ही वाहने समांतर येताच आमच्या ड्रायव्हरने ट्रकच्या दिशेने पाहिले आणि त्याच्या तोंडून शिव्यांची लाखोली सुरु झाली. काही कळायच्या आत ड्रायव्हरने आमची बस त्या ट्रकच्या पुढ्यात घालून थांबवली. बसड्रायव्हर काहीतरी बोलला आणि बसमधले ३-४ लोक माना डोलवत आणि शर्टाच्या अस्तन्या वर सारत त्याच्यासोबत बसमधून उतरले. त्या सर्वांनी त्या ट्रकड्रायव्हरला खाली रस्त्यावर खेचले व यथेच्छ चोपायला सुरुवात केली. ते पाहताच आणि त्यांचे शब्द ऐकताच माझे लक्ष त्या ट्रकड्रायव्हरकडे गेले. तो एक सरदारजी होता. माझे रक्त प्रचंड खवळले आणि मी वेगाने बसमधून खाली उतरलो.

एका बेहोशीत असल्यासारखा मी त्या जमावाच्या दिशेने गेलो आणि "सोडा सोडा" असे ओरडतच एकदोघांना मागे खेचले. त्या जमावाच्या अग्रभागी असलेल्या बसड्रायव्हरच्या पुढ्यात जाऊन मी उभा राहिलो आणि त्याला ती  मारहाण थांबवायला सांगितले. पण साहजिकच, तो स्वतः किंवा इतर कोणीच थांबण्याच्या मनस्थितीत नव्हते. उलट, "तुम्ही बाजूला व्हा हो, आज ह्या साल्याला सोडता कामा नये" असे  म्हणत ते सगळे पुन्हा धक्काबुक्की करू लागले. मग मात्र मी वरच्या पट्टीतला आवाज लावला आणि साखळीने गळ्यात नेहमीप्रमाणे अडकवलेले माझे ओळखपत्र हातात नाचवीत माझी ओळख सांगितली.

मी आर्मीमधील कॅप्टन आहे हे ऐकताच, क्षणभर सगळे जरासे स्तब्ध झाले. तीच संधी साधून मी बसड्रायव्हरला एका बाजूला घेतले आणि जरबेने म्हणालो, "माझ्यासारखेच तुम्हीही सरकारी नोकर आहात. नोकरी टिकवायचीय का घरी जायचंय?" मी असे विचारताच तो थोडासा भानावर आला. खुद्द बसड्रायव्हरचाच नूर जरासा पालटतोय असे पाहिल्यावर त्या उरलेल्या मॉबला पांगवणे अवघड नव्हते. मी सगळ्यांना बसकडे पाठवले आणि त्या सरदारजीला हाताला धरून उठवले. अमृतसरमधील तीन वर्षांच्या वास्तव्यात कामचलाऊ पंजाबी बोलायला शिकलोच होतो. त्याच्या मातृभाषेत मी त्याची खुशाली विचारल्यानंतरचे त्याचे हसू मी कधीच विसरणार नाही.

कॅप्टन जस्सलला वाचवायचा प्रयत्नदेखील मी केला नव्हता. करूच शकलो नसतो, कारण १ नोव्हेंबरला मी त्या रेल्वे स्टेशनात हजरच नव्हतो. तो सल माझ्या अंतर्मनात, खोलवर कुठेतरी निश्चित होता. म्हणूनच कदाचित मी त्या सरदारजी ट्रकड्रायव्हरला वाचवायला धावलो असेन. मात्र, खरंच सांगतो. त्याच्या  डोळ्यात मला माझ्या मित्राचे, 'उप्पी' जस्सलचे मिश्किल हसू तरळून गेल्याचा भास झाला होता.

त्या रात्री मला अगदी शांत झोप लागली!

4 comments:

  1. आपण योग्य तेच केले.फाळणिच्या वेळेस .म.गांधिजिंच्या हत्येनंतर किती जणांना केवळ ब्राह्मण म्हणून सूड उगवण्यात आला.दगली घडवणार्यांकडे आणि त्यात सामिल होणार्यांमद्धे सदसदविवेकबुद्धी नसते.एकच लक्ष्य सूड.

    ReplyDelete