राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA ) मध्ये बॉक्सिंग खेळत असताना, कॅडेट प्रथम महालेच्या मेंदूला जबर दुखापत होऊन त्याचे निधन झाल्याची दुःखद बातमी आज वर्तमानपत्रात छापून आली आहे. तो आमच्याच सातारा सैनिक शाळेचा माजी विद्यार्थी होता.
ही बातमी समजल्यानंतर, आम्हा माजी सेनाधिकाऱ्यांच्या व्हाटसअप ग्रुपवरही अनेकांनी हळहळ व्यक्त केली. एका मित्राने लिहिले होते, "अरे, आपल्या काळातसुद्धा बॉक्सिंग रिंगमध्ये रक्तबंबाळ झालेले अनेक चेहरे आपण पाहिले होते. तेंव्हा तर आपण कपाळाभोवती 'हेडगार्ड' किंवा तोंडामध्ये 'गमगार्ड' देखील घालत नव्हतो. आपल्यापैकी कोणाचा असा अंत झाला नाही हे सुदैवच."
ते वाचून माझे मन सहजच भूतकाळात, म्हणजे ४५ वर्षे मागे गेले.
सप्टेंबर-ऑक्टोबर १९७८ मध्ये मी आमच्या स्क्वाड्रनच्या बॉक्सिंग टीममध्ये होतो. प्राथमिक फेऱ्या आणि उपांत्यपूर्व फेरी जिंकून मी उपांत्य फेरीमध्ये पोहोचलो होतो. उपांत्य लढतीच्या दोन दिवस आधी आमच्या टीमचा सराव चालू होता. आमच्याच संघातील प्रसाद नावाचा माझा जुनिअर आणि मी लढत होतो. माझे ठोसे चुकवण्यासाठी आपले दोन्ही हात कानावर धरून प्रसाद माझ्या पोटापर्यंत खाली वाकला. त्याच्या अंगावर किंचित झुकून, मी त्याच्या हनुवटीच्या दिशेने ठोसा मारला. परंतु त्याच क्षणी, प्रतिठोसा मारण्याच्या हेतूने, वाकलेल्या अवस्थेतून तो वर उसळला.
सर्व ताकदीनिशी आणि त्वेषाने उसळलेल्या प्रसादचे डोके माझ्या नाकावर आदळले. वेदनेने कळवळत मी खाली पडलो. माझ्या नाकातून भळाभळा रक्त वाहू लागले. आमचा संघनायक व इतर कॅडेट आमच्याभोवती गोळा झाले. प्रसादनेच धावत जाऊन बर्फ आणला. काही वेळाने रक्तस्त्राव थांबला, पण नाक सुजून त्याचे वांगे झाले होते. आमच्या कॅप्टनने मला ताकीद दिली, "दोन दिवस संपूर्ण आराम करायचा. सेमीफायनलपर्यंत तू मला फिट पाहिजेस."
दोन दिवसांनंतर सूज बऱ्यापैकी उतरलेली होती, आणि नाक फारसे दुखतही नव्हते. मी वॉर्मप होऊन बॉक्सिंग रिंगमध्ये पोहोचलो. 'लिमा' स्क्वाड्रनचा आर के शर्मा नावाचा एक सिनियर माझा प्रतिस्पर्धी होता. उपांत्य लढतीचा पहिला राउंड सुरु झाला. नाकावर एकही फटका बसू नये याची पूर्ण खबरदारी घेत असलो तरी मी बऱ्यापैकी आक्रमकपणे खेळत होतो.
एक ठोसा चुकवण्याचा प्रयत्नात मी मान वळवली, पण अगदी निसटता फटका माझ्या नाकाच्या शेंड्यावर बसलाच. शरीर गरम असल्यामुळे कदाचित मला वेदना जाणवली नसावी. मी प्रतिहल्ला चढवला आणि आम्हा दोघांची हातघाई सुरु झाली. माझ्या आक्रमकतेमुळे प्रतिस्पर्धी थोडासा बिचकल्यासारखा मला वाटला. पण त्याचे खरे कारण मात्र पहिला राउंड संपल्यावरच मला कळले.
राउंड संपताच मी मागे रेलून स्टुलावर बसलो आणि माझ्या संघातील अहकाऱ्यानी मला स्पंजिंग, वारा घालणे वगैरे सुरु केले. आमचा संघनायक माझ्या कानाशी लागला आणि म्हणाला, "बापट, लढत थांबवायची का? आपण 'वॉकओव्हर' देऊ या का?"
मला काहीच कळेना. मी म्हटले, "सर, तो शर्मा मला जरा घाबरलेला वाटतोय. पुढच्या दोन्ही राउंड्स मी जिंकू शकेन असं मला वाटतंय. आणि तुम्ही हे काय बोलताय?"
"अरे, जरा पुढे वाकून तुझ्या अंगाकडे बघ."
मी वाकून पहिले आणि मला धक्काच बसला. माझ्या नाकातून वाहिलेल्या रक्तामुळे माझा बनियन लालेलाल झाला होता. त्या रक्तात भिजून इतरत्र लागलेल्या प्रतिस्पर्ध्याच्या ठोश्यांमुळे माझे संपूर्ण शरीरच रक्तबंबाळ दिसत होते. तशा परिस्थितीतही मला लढताना पाहूनच कदाचित माझा प्रतिस्पर्धी थोडा बिचकलेला असावा.
समोरच्या कोपऱ्यातून आमची प्रतिस्पर्धी टीम, माझी व आमच्या संघनायकाची कुजबूज बारकाईने निरखत होती. आम्ही आता 'वॉकओव्हर' देणार अशीच आशा त्यांच्या मनात असावी.
इतक्यात आमच्या संघनायकाला बाजूला सारत, आमचे डिव्हिजनल ऑफिसर, महार रेजिमेंटचे कॅप्टन अरुण जोशी माझ्या कानाला लागले.
"बापट, डू यू वॉन्ट टू फाईट?"
"हो सर, पण..."
"आय आम आस्किंग अगेन. डू यू वॉन्ट टू फाईट?"
मी म्हणालो, " हो सर, मी त्याला निश्चित हरवू शकेन. मला खात्री वाटतेय"
"बास. देन गो अहेड. ऑल द बेस्ट"
इतके बोलणे होईपर्यंत घंटा वाजली आणि मी दोन्ही ग्लव्हज एकमेकांवर आपटत उभा राहिलो. कदाचित त्याच क्षणी माझ्या प्रतिस्पर्ध्याचे मनोबल पूर्ण खचले असावे. पुढच्या दोन्ही राउंड्समध्ये मी त्याला निश्चितच भारी पडलो आणि मी उपांत्य लढत जिंकली.
फायनलपर्यंत पोचलेल्या आपल्या खेळाडूचे खास पद्धतीने अभिनंदन करायला आमच्या स्क्वाड्रनचे सर्वच कॅडेट अधीर होते. पण कॅप्टन अरुण जोशींनी सगळ्यांना थांबवले.
"बापट दिसायला लहानखुरा असला तरी त्याचं काळीज सिंहाचं आहे. त्याला तसाच सन्मान मिळाला पाहिजे. हं. आता नेहमीप्रमाणे उचला रे त्याला आणि फेका हवेत!"
कॅप्टन जोशींनी हे म्हणताच सर्वांनी मला उचलून हवेत फेकत आणि झेलत जल्लोष सुरु केला.
इतक्यातच आमच्या खडकवासला मिलिटरी हॉस्पिटलचे डॉक्टर पुढे आले. त्यांचे आणि कॅप्टन जोशींचे नुसते बोलणेच नव्हे, काहीतरी बोलाचाली आणि झापाझापी झाल्याचे आम्हाला जाणवले.
काही क्षणातच मला स्ट्रेचरवर टाकून हॉस्पिटलात भरती केले गेले. पुढचा आठवडाभर मी हॉस्पिटलातच पडून होतो. जी 'वॉकओव्हर' देण्याचे मी उपांत्य फेरीमध्ये नाकारले होते, ती अंतिम फेरीत मात्र माझ्या वतीने परस्परच दिली गेली.
फायनलमध्ये खेळून मेडल मिळवण्याचे माझे सगळे मनोरथ धुळीला मिळाले. पण कॅप्टन अरुण जोशींनी माझ्याविषयी काढलेले ते उद्गार आठवले की आजही माझी छाती अभिमानाने फुलून येते!
त्या प्रसंगी कोणतीही गंभीर दुखापत न होता मी बचावलो होतो हे माझे सुदैव आज मला प्रकर्षाने जाणवले.
१८ ऑक्टोबर २०२३ रोजी निधन पावलेला स्क्वाड्रन कॅडेट कॅप्टन प्रथम महाले, हा NDA च्या शेवटच्या सत्रामध्ये शिकत होता. दीड वर्षातच तो लेफ्टनंट पदावर सैन्यात रुजू झाला असता. त्याचा अकाली मृत्यू सर्वांसाठी क्लेशदायक तर आहेच, पण आपल्या सैन्यदलाचा एक तारा उगवण्याआधीच निखळला ही वस्तुस्थितीही दुःखद आहे.
ईश्वर त्याच्या आत्म्याला चिरशांती देवो.